दुसरी बाजू
प्रकाश सावंत
व्यंगचित्रकार, विचारवंत आणि जनमानसाचा नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. संजय मिस्त्री आणि हर्षल प्रधान यांच्या आठवणींतून उलगडणारा हा संवाद बाळासाहेबांचा कलाकार, नेता आणि माणूस म्हणूनचा ठसा अधोरेखित करतो.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी दैनिक 'नवशक्ति-फ्री प्रेस जर्नल'च्या कार्यालयाला नुकतीच भेट देऊन बाळासाहेबांविषयीच्या आठवणी जागविल्या. या दोघांशी सवाल-जबाब झाले ते असे..
एका व्यंगचित्रकाराच्या नजरेतून तुम्हाला बाळासाहेब कसे वाटले?
संजय मिस्त्री : पेन्सिल व रंगांच्या फटकाऱ्यांमधून पाझरलेल्या मूकरेषा शब्दसामर्थ्यापेक्षाही अधिक बोलक्या आणि अधिक जिवंत करणारा अवलिया म्हणजे बाळ केशव ठाकरे. त्यांची व्यंगचित्रे वास्तवदर्शी. व्यंगावर नेमके बोट ठेवणारी. दंभावर प्रहार करणारी. अन्यायाविरुद्ध आसूड ओढणारी व व्यवस्थेला धीरगंभीर प्रश्न विचारून जनसामान्यांच्या मनात अंगार फुलवणारी. त्यांच्या व्यंगचित्रात राग, उपरोध, चीड, संताप अशा भावभावनांचा केवळ कल्लोळच नव्हता, तर वेदना, संवेदनाही होत्या. त्यांची ही व्यंगचित्रकला गॅलरीत टांगण्यासाठी नव्हती, तर समाजाला आरसा दाखवण्यासाठी होती. त्यामुळेच कलातपस्वी बाळ ठाकरे जनमानसाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले ते कायमचेच! संवेदनशील विचारांच्या बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना त्यांची तेजस्वी वाणी व ओजस्वी विचारांचा वारसा यापुढे आपल्याला मराठी मनाला सदैव प्रेरणा देत राहील.
महाराष्ट्राच्या चित्रकलेला दोन हजारांहून अधिक वर्षांची दीर्घायुषी परंपरा आहे. एकेकाळी अनंत काणेकर, मो. ग. रांगणेकर व दीनानाथ दलाल यांनी महाराष्ट्राला कलेचे वेड लावले होते. त्या काळच्या ‘चित्रा’ नियतकालिकामध्ये जी चित्रे रेखाटली जात ती कलेचा मौलिक ठेवाच होती. ती पाहून बाळासाहेब प्रभावित झाले होते. बाळासाहेबांच्या पेन्सिल व ब्रशच्या रेषासुद्धा बोलक्या होत्या. ते आपल्या रेषांमधून प्रत्येक पात्र जिवंत करायचे. त्यांच्या रेषा कधी मार्मिक, तर कधी मिश्कील टिप्पणी करुन पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवायच्या. त्यांच्या रेषांना शब्दांची धार होती, ज्या अनेकांना घायाळ करूनच सोडायच्या. माणसांच्या भावभावना, देहबोली, चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषा टिपण्याची उपजत कला बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात होती. त्या रेषाच समाजकारण, राजकारणातील दांभिकतेवर निर्भीडपणे भाष्य करीत होत्या. व्यंगावर बोट ठेवून ढोंगावर असूड ओढत होत्या. पुढे ‘नवशक्ति-फ्री प्रेस जर्नल’ ही तर बाळासाहेबांच्या कलेची प्रयोगशाळाच ठरली. त्यातूनच त्यांची कलाप्रतिमा आणि कलाप्रतिभा संपन्न सुफळ झाली. त्यामुळे त्यांची ग्रेटभेट म्हणजे ऐकण्याचा, पाहण्याचा जणू काही आनंद सोहळाच असे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये त्याकाळी पॉकेट कार्टून येत असत व ती परंपरा आजही सुरू आहे, हे विशेष. बाळासाहेबांच्या भेटीत ‘नवशक्ति, फ्री प्रेस जर्नल’चा उल्लेख अगदी हमखास असायचाच.
माझे वडील बाळासाहेबांचे कार्यकर्ते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी व्यंगचित्राच्या दुनियेकडे आकर्षित झालो, तो केवळ वडिलांचा आग्रह आणि बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. म्हणूनच माझ्या वडिलांना माझा सार्थ अभिमान होता. माझ्या वडिलांनी बाळासाहेबांच्या सोबतचा माझा फोटो आमच्या दिवाणखान्यात लावून तो अभिमानाने मिरवला होता. कारण, बाळासाहेब आमच्यासाठी होते अजरामर सुपर हिरो.
आपली व बाळासाहेबांची पहिली भेट कधी झाली? तेव्हा काय भावना होत्या?
हर्षल प्रधान: खरे तर माझे वडील शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते. बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील सभेला ते मला घेऊन जात असत. पत्रकार म्हणून बाळासाहेबांची आणि माझी पहिली भेट झाली ती १९९३-९४ या वर्षामध्ये. साप्ताहिक 'सकाळ' नंतर मी दैनिक 'नवाकाळ' मध्ये कार्यरत होतो. १९९५ मध्ये युतीचेसरकार आले. तेव्हा दिवाकर रावते नाराज होते. त्यांची एक स्फोटक मुलाखत मी घेतली. त्या दिवशी बाळासाहेबांचा मला फोन आला. मी उभ्या उभ्याच थरथरायला लागलो. त्यांनी मला भेटायला बोलावले. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. माझे म्हणणे त्यांच्यापुढे मांडले. दरम्यानच्या कालावधीत मी भाजपचे काम पाहत होतो. एकदा उद्धव साहेबांनी मला भेटीला बोलावले. पक्षसंघटनेविषयी त्यांनी माझी मते जाणून घेतली. तू माझ्याबरोबर काम करशील का, अशी थेट ऑफरच त्यांनी मला दिली. त्यापुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव साहेबांनी थेट व्यासपीठावरच बाळासाहेबांना माझी ओळख करून दिली. बाळासाहेबांनी मला घरी बोलावले. माझ्याशी समाजकारण, राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली. पुढे हे चर्चासत्र अविरत सुरू राहिले. बाळासाहेबांकडे जाताना मी कसून अभ्यास करून जाऊ लागलो. त्यांच्या निवडक भाषणांचे 'विचारांचे सोने' हे पुस्तक मी सर्वप्रथम प्रकाशित केले. 'अरे एवढी माहिती तू कुठून मिळवलीस?' असा प्रश्न त्यांनी मला केला. तेव्हा साहेब हे सगळे तुमचेच आहे, असे मी त्यांना म्हटले. त्यानंतर मी जवळपास सात पुस्तके लिहिली. ही सर्व पुस्तके मोफत वाटली. या पुस्तकांच्या रूपाने बाळासाहेब सतत माझ्यासोबत आहेत व यापुढेही राहतील. ठाकरे कुटुंब माझेच नव्हे, तर सामान्य कार्यकर्त्यांचे अर्थातच मराठी माणसांचे आधारवड बनले ते या आपुलकीच्या भावनेतून. हीच माझ्यासाठी आयुष्यभरातील मर्मबंधाची ठेव म्हणता येईल.
बाळासाहेबांची गुणवैशिष्ट्ये सांगता येतील का?
हर्षल प्रधान : मी तुम्हाला एक तो किस्सा सांगतो. बाळासाहेबांचे शिवतीर्थावरील अखेरचे भाषण जे दृकश्राव्य माध्यमातून सादर केले गेले, त्या भाषणाची शूटिंग करण्याची संधी मला उद्धव साहेबांनी दिली. ते माझे परमभाग्यच समजतो. त्या दिवशी बाळासाहेब थोडेसे थकले होते. त्यामुळे त्यांना त्रास होईल असे काही बोलू नकोस, असे उद्धव साहेबांनी मला आधीच बजावले होते. बाळासाहेबांचे ते भाषण आम्ही ‘मातोश्री’वर शूट केले. कॅमेरे लागले. लाईट ऑन झाले. बाळासाहेब खुर्चीत स्थानापन्न झाले. त्यांनी मला विचारले, आला का रे हर्षल! मलाही स्फुरण चढले. साहेब, मी माँ साहेबांच्या पुतळ्याजवळ बसलोय. शिवतीर्थावरील समोरचा लाखोंचा समुदाय तुमचा जयघोष करत आहे असे समजून तुम्ही बोला. मी रोल करतोय. तेव्हा बाळासाहेब उस्फूर्त हसले. मग त्यांनी शिवतीर्थावरील सभा गाजवल्याप्रमाणेच आपले भाषण सुरू केले. त्यांनी प्रारंभी काही नर्मविनोद केले. शरद पवारांना कानपिचक्या दिल्या. बोलता बोलता ते भावूक झाले. ‘तुम्ही आजवर मला खूप प्रेम दिलेत. मला सांभाळलेत. तसे माझ्या उद्धव व आदित्यलाही सांभाळा. महाराष्ट्राचा उत्कर्ष करा. एकनिष्ठ राहा.’ या रेकॉर्डिंगनंतर ते माझ्याजवळ आले. त्यांनी माझा हात हाती धरला. ते म्हणाले, ‘हर्षल, आयुष्यात भावना जपा. त्याच महत्त्वाच्या आहेत.’ तेव्हा माझ्या डोळ्यात आपसुकच पाणी आले. त्यानंतर मी बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना नमस्कार करून तेथून थेट घर गाठले. एवढ्या मोठ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या आपण जवळ आहोत ही भावनाच माझ्यासारख्या माणसाच्या मनाला उभारी देणारी होती.
बाळासाहेबांची सर्वात आवडलेली सभा कोणती?
हर्षल प्रधान : बाळासाहेबांच्या जवळपास साडेतीनशे सभा मी ऐकल्यात. त्यापैकी बहुतांश रेकॉर्डेड आहेत. त्या मोबाईलवर आजही उपलब्ध आहेत. त्यांचे एका खासगी कार्यक्रमातील प्रबोधनकारांवरील भाषण मला सर्वाधिक आवडलेल्या भाषणांपैकी एक आहे. बाळासाहेब यांच्या नावातच करिष्मा होता. एक वलय होते. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तरी तेथील लोकही अगदी प्रेमाने, आपुलकीने म्हणत असतात की तुम्ही बाळासाहेबांच्या मुंबईवरून आलात का? हीच बाळासाहेबांची आणि शिवसेनेची ओळख आहे. तीच मराठी माणसाची ताकद बनली आहे. अमरनाथ यात्रेकरू असो की अन्य कुणी सर्वांनाच बाळासाहेबांचा आधार वाटतो, तो काही उगाच नाही.
बाळासाहेबांनी कधीही जातधर्म मानला नाही!
हर्षल प्रधान : होय, खरेच बाळासाहेबांनी कधीच जात-पात-धर्म मानली नाही. अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी तर त्यांचा खास ‘याराना’ होता. नमाजची वेळ झाल्यावर ‘मातोश्री’वर अनेक मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे. ‘ठाकरे’ सिनेमातही हा प्रसंग चितारण्यात आलाय. शेंडी-जानव्याचे हिंदुत्व त्यांना कधीही मान्य नव्हते. कोविड काळात मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनीही हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असा धार्मिक भेदाभेद केला नाही. ते सर्वांना मदत करीत राहिले. आपल्या गावी निघालेल्या उत्तर भारतीयांनाही त्यांनी सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंतची अन्नपाण्याची कमतरता कधी भासू दिली नाही. उलट जेव्हा हेच उत्तर भारतीय बांधव त्यांच्या गावाकडे पोहोचले. तेव्हा त्यांच्याच गावकऱ्यांनी त्यांना गावाच्या वेशीवरच रोखले. अडल्यानाडल्यांच्या कामी ठाकरे येतात म्हणूनच त्यांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. हृदयात राम आणि हाताला काम हेच ठाकरे यांचे हिंदुत्व आहे. सध्याच्या राजकारणाविषयी बोलावे की नाही असा मला प्रश्न पडतो. ठाकरेंची सत्ता उलथवली. पक्ष चोरला. चिन्ह चोरले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हात धुवून मागे लागली. घरे फोडली. माणसे फोडली. न्यायालयात न्याय नाही. निवडणूक आयोगात साधी दादफिर्यादही घेतली जात नाही. तारखांवर तारखा पडत आहेत, पण उद्धव ठाकरे असो वा आदित्य ठाकरे असो ते जराही विचलित झालेले नाहीत. अन्य कोणी असते तर कोलमडून पडले असते. शरणागत झाले असते. तथापि, ठाकरे उभे आहेत. जनता त्यांच्या पाठीशी आहे तीही एकदिलाने.
शत्रूंचेही दिलदार मित्र
शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार म्हणजे प्रमोद महाजन. ते बाळासाहेबांचे मानसपुत्र होते. गोपीनाथ मुंडे यांनाही बाळासाहेबांचा मानसिक आधार होता. एवढेच कशाला शरद पवारही बाळासाहेबांचे सच्चे मित्र होते आणि दिलदार शत्रूही. साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशीही त्यांचा खास ‘दोस्ताना’ होता.
व्यंगचित्रकलेचे सुवर्णयुग
संजय मिस्त्री : मराठी माणसांच्या न्याय्य हक्काला वाचा फोडणाऱ्या ‘मार्मिक’चे घोषवाक्य होते, ‘ना खीचो कमान को, ना तलवार निकालो, अगर तोफ मुकब्बील हो तो अखबार निकालो.’ ही अक्षर वाणी होती प्रसिद्ध उर्दू शायर अकबर इलाहाबादी यांची. ते न्यायाधीशही होते आणि साहित्यिकही. केशव शंकर पिल्लई यांना भारतातील राजकीय व्यंगचित्राचे जनक मानले जाते. १९४८ मध्ये त्यांनी ‘शंकर्स वीकली’ ह्या साप्ताहिकाची स्थापना केली. महाराष्ट्राच्या राजकीय रंगचित्र कलेचे पितामह होते शंकरराव किर्लोस्कर. बाळासाहेबांना त्यांचे बंधू श्रीकांतजी यांचीही वेळोवेळी मोलाची साथ लाभली. त्यामुळेच श्रीकांतजींना कितीतरी गोष्टी करणे शक्य झाले, कधी कार्टूनच्या स्वरूपात, तर कधी सिनेमा परीक्षणाच्या रूपात. ‘नवशक्ति-फ्री प्रेस’मध्ये बाळासाहेबांची चाचाजी/काकाजीच्या कॉमन मॅनच्या रूपात पॉकेट कार्टून काढली जायची. शंकर, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब यांच्या पिढीने व्यंगचित्र कलेत एक नवे मन्वंतर घडविले. तो काळ म्हणजे व्यंगचित्रकलेचे सुवर्णयुगच होते, म्हणतात ना!
आर. के. लक्ष्मण यांची हृद्य भेट
हर्षल प्रधान : बाळासाहेबांनी एक दिवस आर. के. लक्ष्मण यांच्या भेटीची इच्छा उद्धवसाहेबांकडे व्यक्त केली. त्यानंतर लक्ष्मण यांच्या कुटुंबियांशी बोलणे झाले. एक दिवस लक्ष्मण यांना भेटायला बाळासाहेब थेट पुण्यात गेले. उभयतांची भेट झाली. बाळासाहेबांनी लक्ष्मण यांचा हात हाती धरून आपल्या भावना व्यक्त केल्या. एका कलातपस्वीने दुसऱ्या कलातपस्वीची घेतलेली ही भेट ग्रेट न ठरली तरच नवल. त्याकाळी लक्ष्मण यांचे एक कार्टून फार गाजले. शिवसेना-भाजप युतीची जागावाटपाची बोलणी सुरू होती. महाजन ‘मातोश्री’वर पोहोचले. व्यंगचित्रात, ‘बाळासाहेबांनी समोरच्या खुर्चीवर आपले पाय ठेवले होते. बाजूला एक छोटेसे टेबल होते. बाळासाहेब प्रमोदजींना म्हणाले या बसा!’ पण, बसायचे कुठे, हेच प्रश्नार्थक भाव महाजन यांच्या चेहऱ्यावर होते. वैयक्तिक मैत्री जपताना लक्ष्मण हे टीका करायचे कधी थांबले नाहीत ते असे. इथेच होता कलेचा आदर आणि मानसन्मानही.
संजय मिस्त्री, हर्षल प्रधान यांच्या मुलाखतीमधून एक बाब ठळकपणे पुढे आली ती म्हणजे, बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून ग्रेट होते. ते अनेकांच्या मदतीला धावून गेले, पण त्याचा त्यांनी कधीही गवगवा केला नाही. त्यांनी मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडल्यामुळेच एकेकाळी मराठी माणसांना नोकऱ्यांची दारे खुली झाली. शासकीय व खासगी आस्थापनांमधील मराठी टक्का वाढला. त्यांनी अनेकांना घडविले. जगण्याचा आधार दिला. म्हणूनच ते ठरलेत मराठी मनाचा मानबिंदू.
prakashrsawant@gmail.com