बालमनाची आनंदी खिडकी!

तुम्हाला कधी असं वाटतं का, की मोठ्यांनी आपलंही थोडं ऐकून घ्यावं? मनातले प्रश्न विचारावेत, स्वप्नं सांगावीत, मनसोक्त गप्पा माराव्यात आणि कोणीही आपल्याला मध्येच थांबवू नये? प्रत्येक मुलाच्या मनात असंच एक सुंदर जग असतं. काल झालेल्या बालदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया मुलांच्या मनात नेमकं काय सुरू असतं!
बालमनाची आनंदी खिडकी!
बालमनाची आनंदी खिडकी!
Published on: 

आनंदाचे झाड

युवराज माने

तुम्हाला कधी असं वाटतं का, की मोठ्यांनी आपलंही थोडं ऐकून घ्यावं? मनातले प्रश्न विचारावेत, स्वप्नं सांगावीत, मनसोक्त गप्पा माराव्यात आणि कोणीही आपल्याला मध्येच थांबवू नये? प्रत्येक मुलाच्या मनात असंच एक सुंदर जग असतं. काल झालेल्या बालदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया मुलांच्या मनात नेमकं काय सुरू असतं!

मुलांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? त्यांच्या डोळ्यांतून दिसणाऱ्या जगाचे कोणते रंग असतात? त्यांच्या मनात कोणते प्रश्न, स्वप्नं आणि कल्पना आकार घेत असतात? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, हे सारं त्यांना मोकळेपणाने व्यक्त करता येतं का? बालदिनाच्या निमित्ताने या प्रश्नांचा विचार होणं गरजेचं आहे. कारण मुलांना केवळ शिकवणं नव्हे, तर त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या मनाचा आवाज ऐकणं, हीदेखील शिक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रात वर्षानुवर्षं काम करताना मला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक लेकराच्या मनात एक स्वतंत्र खिडकी असते. त्या खिडकीतून ते आपल्या भोवतालच्या जगाकडे पाहत असतं. त्याच्या दृष्टिकोनात निरागसता, कल्पकता, कुतूहल आणि कधी कधी मोठ्या माणसांनाही अंतर्मुख करेल अशी प्रगल्भता असते. मात्र, ही खिडकी उघडण्यासाठी त्याला योग्य वातावरण मिळायला हवं. त्याच्या विचारांना मोकळी वाट, शब्दांना कान आणि भावनांना समजून घेणारं मन मिळायला हवं.

याच जाणिवेतून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारडी येथे ‘आनंदाचं झाड’ या संकल्पनेअंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यांपैकीच एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे ‘गप्पांचा तास!’

मुलांना शिकवण्याआधी त्यांना समजून घेऊया!

मुलांना शिकवण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकं, प्रयोग, प्रश्नोत्तरं, चित्रं, खेळ आणि विविध शैक्षणिक साधनांचा वापर करतो. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत मुलांच्या मनात काय आहे, हे समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवतो का, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

मुलांच्या भावविश्वाला समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी ‘गप्पांचा तास’ ही संकल्पना आकाराला आली. या तासाला ठरावीक उत्तरांची चौकट नसते. इथे मुलांना मनातलं सांगण्याचं स्वातंत्र्य असतं. त्यांना बोलताना अडखळता येतं, चुकता येतं आणि पुन्हा प्रयत्न करता येतो. कारण या तासाचा उद्देश त्यांच्या उत्तरांची परीक्षा घेणं नसून त्यांच्या विचारविश्वाचा शोध घेणं हा आहे.

उदाहरणार्थ, ‘तुम्हाला सर्वांत आवडणारा विषय कोणता आणि का?’ हा प्रश्न विचारल्यावर कुणी गणित, कुणी मराठी, तर कुणी इंग्रजी विषयाचं नाव घेतं. एखादं मूल म्हणतं, ‘मला गणित आवडतं, कारण उदाहरणं सोडवायला मजा येते.’ दुसरं म्हणतं, ‘मला इंग्रजी आवडतं, कारण नवीन शब्द शिकायला मिळतात.’ या छोट्या उत्तरांमधून मुलांची अभिरुची, आवडीनिवडी आणि शिकण्याच्या पद्धती समजतात.

कधी कधी वर्गात फारसं न बोलणारं मूलही या तासात हळूहळू बोलू लागतं. स्वतःचा अनुभव सांगतं, मित्रांच्या विचारांशी सहमत किंवा असहमत होतं आणि स्वतःचं मत मांडू लागतं. ही केवळ बोलण्याची प्रक्रिया नसते; हा आत्मविश्वासाचा जन्म असतो!

गप्पांमधून विषयही शिकतात आणि जीवनही!

‘गप्पांचा तास’ केवळ मनमोकळ्या संवादापुरता मर्यादित नाही. योग्य नियोजन केलं, तर तो विविध विषयांच्या अध्ययन-अध्यापनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. भाषेच्या तासाला मुलांना एखाद्या अनुभवाबद्दल बोलायला सांगता येतं. त्यातून शब्दसंपत्ती वाढते आणि विचार क्रमाने मांडण्याची सवय लागते. गणिताच्या तासाला बाजारातील खरेदी-विक्री, वस्तूंच्या किमती आणि मोजमाप यांवर चर्चा करता येते. परिसर अभ्यासात पाऊस, झाडं, पक्षी, पाणी आणि गावातील जीवन यांवर गप्पा मारता येतात. मुलं आधी आपले अनुभव सांगतात, एकमेकांचे विचार ऐकतात आणि मग शिक्षक त्या अनुभवांना योग्य संकल्पनांशी जोडतात. अशा वेळी ज्ञान मुलांवर लादलं जात नाही; ते त्यांच्या अनुभवांतून आकार घेतं. मुलांच्या बोलण्यातून शिकण्याच्या संधी शोधणं आणि त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणं, ही जबाबदारी शिक्षकाची असते.

अभिव्यक्ती म्हणजे सर्वांगीण शिक्षणाचा आत्मा!

शिक्षण म्हटलं की अनेकदा पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम, परीक्षा, गुण आणि निकाल डोळ्यांसमोर येतात. मात्र, शिक्षणाची व्याप्ती एवढ्यापुरती मर्यादित असू शकत नाही. मुलांना स्वतःचे विचार मांडता येणं, प्रश्न विचारता येणं, इतरांचं म्हणणं ऐकता येणं आणि स्वतंत्रपणे विचार करता येणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

मुलं चित्र काढून, नृत्यातून, गाण्यातून, नाटकातून आणि संवादातून स्वतःला व्यक्त करतात. अभिव्यक्तीची प्रत्येक वाट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला हातभार लावते. म्हणूनच ‘आनंदाचं झाड’ या संकल्पनेत अभिव्यक्तीला विशेष महत्त्व आहे.

शिक्षक म्हणून आपल्याला शिकवण्याची सवय असते; मात्र मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी कधी कधी बोलण्यापेक्षा ऐकण्याची अधिक गरज असते. मुलांच्या शब्दांमागची भावना समजून घेणं, त्यांच्या संकोचाची कारणं जाणून घेणं आणि त्यांच्या अनुभवांना महत्त्व देणं, हेही शिक्षणाचाच भाग आहे.

प्रत्येक वर्गात फुलू शकतं आनंदाचं झाड!

‘गप्पांचा तास’ राबवण्यासाठी मोठा खर्च किंवा आधुनिक साधनांची आवश्यकता नाही. गरज आहे ती शिक्षकाच्या संवेदनशील दृष्टिकोनाची, थोड्या नियोजनाची आणि मुलांवर विश्वास ठेवण्याची. प्रत्येक शिक्षक आठवड्यातून एक ठरावीक वेळ या उपक्रमासाठी राखून ठेवू शकतो. ‘माझा आवडता खेळ’, ‘मला आनंद कशामुळे मिळतो?’, ‘मला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे?’ किंवा ‘मी शिक्षक असतो तर...’ असे विषय मुलांसमोर ठेवता येतात.

मात्र, मुलांना बोलण्याची सक्ती करू नये. त्यांच्या बोलण्याची तुलना किंवा गुणांकन करू नये. प्रत्येक मुलाला आपापल्या गतीने व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. कारण प्रत्येक लेकराच्या मनात सांगण्यासारखं काही ना काही असतंच. गरज असते ती फक्त योग्य संधीची!

बालदिन हा केवळ मुलांच्या आनंदाचा उत्सव नाही, तर त्यांच्या हक्कांचा, स्वप्नांचा आणि भावविश्वाचा आदर करण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी मुलांना भेटवस्तू देण्याबरोबरच त्यांच्यासाठी आपला वेळ, लक्ष आणि समजूतदारपणाही द्यायला हवा. त्यांना प्रश्न विचारू द्यावेत, स्वतःचं मत मांडू द्यावं आणि त्यांच्या कल्पनांना भरारी घेण्यासाठी मोकळं आकाश द्यावं.

माझ्यासाठी ‘आनंदाचं झाड’ ही केवळ उपक्रमांची मालिका नाही, तर मुलांकडे पाहण्याची एक दृष्टी आहे. ‘गप्पांचा तास’ आम्हाला शिकवतो की, मुलांच्या मनातलं जग समजून घ्यायचं असेल, तर त्यांच्या जवळ बसावं लागतं आणि त्यांची उत्तरं मनापासून ऐकावी लागतात.

मला वाटतं, शिक्षणाचं खरं सौंदर्य मुलांच्या उत्तरांतच नाही, तर त्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस मिळण्यात आहे. मुलांना बोलू द्या, विचार करू द्या, चुकू द्या आणि शिकू द्या. त्यांच्या मनातल्या खिडक्या उघडू द्या. कारण मुलांच्या ओठांवर शब्द फुलले, की मनात विचार रुजतात; विचारांना मोकळं आकाश मिळालं, की व्यक्तिमत्त्व बहरतं आणि लेकरांचं व्यक्तिमत्त्व बहरू लागलं, की शिक्षणाच्या अंगणात खरं ‘आनंदाचं झाड’ फुलतं!

हेच आमच्या ‘गप्पांच्या तासा’चं फलित आणि बालदिनाच्या निमित्ताने मुलांना समजून घेण्याचा आमचा संकल्प आहे.

शिक्षणातल्या विविध प्रवाहांचा अभ्यास करणारे प्रयोगशील शिक्षक.