थँक्यू..

आज रविवार. बाळू, शमीच्या शाळेला आज सुट्टी. तशी बाबांच्या ऑफिसलाही आज सुट्टीच. त्यामुळे रविवारी नो धावपळ, नो घाईगडबड. नाहीतर इतर वेळी घरची कामं आवरताना आईला जणू दहा-दहा हात फुटतात. घरची कामं पटापट आवरताना तिची लगबग पाहण्यासारखी असते. पण आजच्या रविवारी सारं कसं शांतपणे सुरू होतं. एकटा बाळूच मात्र अशांत होता बरं. त्याला कारणही तसंच होतं म्हणा.
थँक्यू..
Published on

बालोद्यान

एकनाथ आव्हाड

आज रविवार. बाळू, शमीच्या शाळेला आज सुट्टी. तशी बाबांच्या ऑफिसलाही आज सुट्टीच. त्यामुळे रविवारी नो धावपळ, नो घाईगडबड. नाहीतर इतर वेळी घरची कामं आवरताना आईला जणू दहा-दहा हात फुटतात. घरची कामं पटापट आवरताना तिची लगबग पाहण्यासारखी असते. पण आजच्या रविवारी सारं कसं शांतपणे सुरू होतं. एकटा बाळूच मात्र अशांत होता बरं. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. बाळूची आज क्रिकेटची मॅच होती. मॅच खेळायला जाण्यासाठी त्याने कालच आईबाबांची परवानगीसुद्धा घेतली होती. आता मित्र त्याला बोलवायला घरी कधी येताहेत आणि आपण आपली क्रिकेटची बॅट घेऊन कधी एकदा मैदानावर जातोय, असं त्याला झालं होतं.

मित्रांची वाट पाहत गडी दाराच्या तोंडाशीच केव्हाचा उभा होता. शेवटी एकदाचे त्याचे मित्रमंडळ आले. मग आई-बाबांना विचारून बाळूने मोठ्या उत्साहानेच बॅट घेऊन घराबाहेर पाऊल टाकले. त्याला जाऊन अजून पुरता अर्धा तासही झाला नसेल; तोच स्वारी घरी लगेच परत. बरं, आला तोही मोठ्या घुश्शातच. आल्याबरोबर त्याने हातातली क्रिकेटची बॅट घरातल्या कोपऱ्यात रागानेच जोरात आपटली. बॅटचा धाडकन मोठा आवाज झाला. त्या आवाजाने आई आणि शमी पटकन स्वयंपाक खोलीतून बाहेरच्या खोलीत आल्या. बाळूला पाहून त्यांनी, “कसला रे अचानक आवाज झाला”, असं विचारलं, तरी तो काहीच बोलायला तयार नाही. गाल, नाक फुगवून खुर्चीत बसलेला.

तेवढ्यात वर्तमानपत्र आणायला बाहेर गेलेले बाबा घरी परत आले. बाळूला घरात पाहून त्यांनाही आधी आश्चर्यच वाटलं. पण बाळूचा अस्वस्थपणा पाहिल्यावर त्यांनीही लगेच कारण विचारलं. आता मात्र बाळूने तोंड उघडलं. सारी हकीगत सांगितली. क्रिकेटची मॅच ज्या संघाबरोबर होती त्यातील एका मुलाशी बाळूची काही कारणावरून बाचाबाची, वादावादी झाली. एकमेकांना अक्षरश: शिव्या दिल्या गेल्या. एकमेकांवर ते धावून गेले. शेवटी बाळूच्या मित्रांनी बाळूला बाजूला नेलं. पण बाळूचा मूडच गेला सारा. मग तो मैदानावरून सरळ घरीच आला. बाबा म्हणाले, “काय रे तुम्ही हल्लीची मुलं. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडता काय असे? एकमेकांना शिव्या देता काय? बाळू, त्या मुलाने तुला शिव्या दिल्या; मग तू त्या मुलाला शिव्या दिल्यास. मग तुमच्या दोघांमध्ये काय फरक राहिला बरं. बाळा, असा संताप करून घेणं बरं नव्हे. अरे, शांततेतच मार्ग सापडतो. भांडणात तर आपले श्रम वाया जातात. आजच्या तुझ्या या वागण्यावरून मला महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील एका प्रसंगाची आठवण झाली बघ.”

शमी लगेच म्हणाली, “बाबा, कोणत्या प्रसंगाची? सांगा ना आम्हाला तो प्रसंग.”

“होय, होय, सांगतो मी तुम्हाला तो प्रसंग. बाळू-शमू, आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सारे देशवासीय जीवाचे रान करत होते. १९३१ च्या काळी दुसरी गोलमेज परिषद इंग्लंडला भरली होती. राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी या सभेस हजर झाले. हिंदुस्थानातील घटनात्मक प्रश्नांचा विचार सभेत होणार होता. बोटीचा लांबचा प्रवास, इंग्लंडला भरपूर थंडी म्हणून कार्यकर्त्यांनी गांधीजींसाठी उबदार कपडे बोटीवर चढवले; पण गांधीजींनी मात्र ते कपडे परत पाठवले. कारण त्यांना वाटे, माझ्या बांधवांकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत. मग आपण अंगभर उबदार कपड्यांत कसे फिरायचे? गांधीजी नेसत्या पंचावरच बोटीवर फिरत होते. लिहित होते. उघडेबंब गांधीजी पाहून बोटीवरील इंग्रज अधिकाऱ्याला त्यांचा राग आला. त्याच्या दृष्टीने हा असभ्यपणा होता. त्या इंग्रजाने मग रागानेच आपल्याजवळील छोट्या छोट्या तीन कागदांच्या चिटोऱ्यांवर गांधीजींबद्दल अपशब्द लिहिले आणि ते तीन चिटोरे टाचणीने एकत्र टाचून गांधीजींकडे पाठवले. गांधीजींनी शांतपणे ते चिटोरे वाचले. त्यानंतर त्यांनी चिटोऱ्यांची टाचणी काढून ते कागद पाण्यात सोडून दिले आणि मग त्या माणसाकडे पाहून ते शांतपणे म्हणाले, ‘थँक्यू’!”

“तो माणूस भलताच चिडला. त्या इंग्रजाने पुन्हा मागचीच कृती केली. त्याने पुन्हा आपल्याजवळील छोट्या तीन चिटोऱ्यांवर गांधीजींना अक्षरश: शिव्या लिहिल्या. मग त्या चिटोऱ्यांना टाचणी लावून ते चिटोरे पुन्हा गांधीजींकडे पाठवले. गांधीजींनी चिटोऱ्यांवरील शब्द शांतपणे वाचले. मग टाचणी काढून ते चिटोरे त्यांनी पुन्हा पाण्यात सोडले आणि त्या माणसाकडे पाहून ते पुन्हा शांतपणे म्हणाले, ‘थँक्यू’! गांधीजींची कमालीची शांतता पाहून त्या माणसाची अस्वस्थता अधिकच वाढली. त्याला वाटले, आता मात्र हद्दच झाली. तो माणूस रागारागानेच गांधीजींजवळ गेला आणि म्हणाला, “काय चालवलंय तुम्ही हे?” गांधीजी म्हणाले, “मी काहीच चालवलेलं नाही, जे काय चालवलंय ते तुम्हीच, मी आपला शांत आहे.” तो माणूस म्हणाला, “तुम्हाला एवढ्या शिव्या लिहूनही तुम्ही शांतच? काहीच कसं वाटत नाही तुम्हाला?”

“पण मी त्या शिव्या स्वीकारल्याच नाहीत. मी त्या या महासागराच्या पाण्यात सोडून दिल्या. मला त्या लागल्याच नाहीत. मग मी कशाला विनाकारण रागवू?” गांधीजी म्हणाले.

तो इंग्रज अधिकारी पुढे म्हणाला, “मग ‘थँक्यू’ कशाबद्दल?” गांधीजी म्हणाले, “तुम्ही चिटोरे पाठवताना त्या चिटोऱ्यांना ज्या दोन टाचण्या लावल्या होत्या, त्या मी ठेवून घेतल्या आहेत. त्या दोन टाचण्या तुमच्याकडून मला मिळाल्या म्हणून मी ‘थँक्यू’ म्हणालो.”

“गांधीजींमधील परमशांतता पाहून तो माणूस अवाक् झाला. त्या किरकोळ देहयष्टीच्या माणसाची बौद्धिक उंची त्याच्या डोळ्यात सामावत नव्हती. गांधीजींचे शब्द त्याच्या मनात रुंजी घालत होते. गांधीजींशी बोलून त्याला बरंच काही मिळाल्यासारखं वाटलं, म्हणून त्याने मनःपूर्वक गांधीजींना नमस्कार केला आणि त्याच्याही तोंडून नकळत शब्द बाहेर पडले ‘थँक्यू’.”

बाळू खुर्चीतून उठला आणि बाबांजवळ आला. भरल्या गळ्यानेच तो बाबांना म्हणाला, “बाबा, मी चुकलो. माझी चूक मला कळली. खरंच, मैदानावर मी त्या मुलाशी, कुणी आधी खेळायचे या क्षुल्लक गोष्टीवरून भांडलो. त्याला शिव्या दिल्या. यातून काय मिळवलं मी. फक्त मनस्ताप. आई-बाबा, मी वचन देतो, यापुढे मी कधीच असं वागणार नाही. डोक्यात राग घालून घेणार नाही. गांधीजींच्या आयुष्यातील तुम्ही सांगितलेला हा प्रसंग आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. हा प्रेरक प्रसंग सांगितल्याबद्दल बाबा मनापासून थँक्यू.”

साहित्य अकादमीप्राप्त बाल साहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in