

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
मालवणी माणसाच्या गजालींतून लोकशाहीच्या सद्यस्थितीवर भाष्य करतानाच, कोकणची कला आणि अस्मिता दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘लोकांचा नाथ’ अर्थात बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा खास लेख.
दातार मारून चार चणे नसले तरी मालवणी माणूस एकदा गजाली मारूक लागलो काय मगे तानभूक इसरान जाता. धबाधबा कोसळणारो पावसाळो आसांदेत नाय तर आंग भाजून काढणारो उन्हाळो, गजाली मारूक काळवेळेचा आणि ऋतूंचा बंधन नाय. सध्या निवडणुका नसल्या तरी अलीकडेच कोकणात मला अशा गजाली ऐकायला मिळाल्या--
“अरे कनकवलीत यंदा ५ हजार दिल्यानी एका मताक? नगरपरिषदेच्या इलेक्शनात?”
“व्हय तर. अरे लोक पन आता एवडे हुशार झालेत की एकाकडसून पाच हजार घ्यायचे नि दुसऱ्याकडसून पाच हजार नि जेका मत टाकूचा आसा तेकाच टाकायचा.. आता लोकच चल्ले लोकशाही खड्ड्यात घालूक.”
नियतीचा खेळ पण कधी कधी कमाल करतो! ज्या राजापूर लोकसभा मतदारसंघात बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी लोकशाही रुजवली त्याच भूमीत आता अत्यंत उद्वेगाने ‘आता लोकच चल्ले लोकशाही खड्ड्यात घालूकि’ असे उद्गार निघू लागलेत. जुन्या लोकांना आठवत असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या घराघरात पोहोचलेले बॅरिस्टर नाथ पै १९५७, १९६३ आणि १९६७ साली झालेल्या तीन निवडणुकांमध्ये जिंकून लोकसभेवर गेले. राज्यघटनेत लोकशाहीविरोधी असलेल्या ३५९ कलमाच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवला बॅरिस्टर नाथ पै यांनी. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात, राष्ट्रपतींना आदेशाद्वारे नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार मिळतो हे ते ३५९ क्रमांकाचं कलम. तत्कालीन काँग्रेस सरकारने या कलमामध्ये घटनादुरुस्ती करून सुधारणा करण्याचा बॅरिस्टर नाथ पै यांचा प्रस्ताव फेटाळला आणि पुढे १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली, हा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच.
१९७१ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही चौथ्यांदा नाथ पै उभे राहिले होते. नेहमीप्रमाणे त्यांच्या झंझावाती प्रचारसभा कोकणात सुरू झाल्या होत्या. मला आठवतं, मी सहावीत असताना आमच्या गावातल्या फोंडाघाटच्या राधाकृष्णाच्या देवळासमोरच्या पटांगणात नाथ पैंची प्रचारसभा झाली. अगदी त्या वयात सुद्धा नाथ पैंचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे मी सहावीतला मुलगा त्यांचं भाषण ऐकायला रस्त्यावर उभा राहिलो होतो. कारण पटांगण खचाखच भरल्यावर उरलेल्या लोकांना रस्त्यावरच उभे राहून भाषणं ऐकावी लागायची. सहा फुटांहून अधिक उंच असलेले नाथ पै पांढऱ्या शुभ्र वेशात पांढरी हॅट घालून प्रचंड नाट्यपूर्ण भाषण करताना पाहिल्याचं आणि ऐकल्याचं माझ्या मनावरचं चित्र अजून ताजं आहे. ‘कोकणच्या लाल मातीतील माणसाचा आवाज संपूर्ण देशात पोहोचण्यासाठी झोपडी निशाणीवर शिक्का मारा आणि तुम्ही मला म्हणजेच तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्या’, हे नाथ पै यांचं ओजस्वी आवाजातलं आवाहन आजही माझ्या कानामध्ये गुंजत आहे. बॅरिस्टर नाथ पै यांची शेवटची सभा बेळगाव येथे १७ जानेवारी १९७१ रोजी झाली, जिथे त्यांनी मराठी भाषिकांच्या शहीद दिनानिमित्त एका जाहीर सभेला संबोधित केलं. आजारी असतानाही त्यांनी एक तास भाषण केलं आणि लोकांचं प्रेम व आपुलकी फेडल्याची भावना व्यक्त करून ते मंचावरच कोसळले. हीच त्यांची अखेरची सार्वजनिक सभा ठरली. नाथ पै अधिक जगले असते तर मालवणी मुलखाचं भविष्य वेगळं झालं असतं.
पुणे शहरात राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरुजी स्मारक येथे नाथ पै यांच्या स्मरणार्थ ‘बॅ. नाथ पै रंगमंच’ नावाचं छोटं नाट्यगृह उभारलं आहे. त्याचं उद्घाटन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २ एप्रिल २०१३ रोजी केलं.
नाथांच्या कर्मभूमीत म्हणजे तत्कालीन राजापूर मतदारसंघातील मालवण तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून ४० वर्षांपूर्वी ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ ही सेवाभावी संस्था उभारून नाथांच्या विचारांचं उचित स्मारक निर्मिलं आहे. ‘सेवांगण’च्या अंतर्गत साथी दादा शिखरे सभागृह, एस. एम. जोशी संकुल, मधुबन अतिथीगृह, कृष्णाई भोजन कक्ष अशा वास्तू उभारण्यात आल्या असून कौटुंबिक सल्ला केंद्र, साने गुरुजी वाचन मंदिर, साथी ज्ञानेश देऊलकर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, बाल विकास प्रकल्प, प्रा. मधु दंडवते सेवानिधी, साथी बबन डिसोजा शिक्षण निधी, साथी मधु वालावलकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, बॅ. नाथ पै पुरस्कार, मालवणी बोली भाषा संरक्षण, संगोपन, संवर्धन केंद्र, मोफत अन्नछत्र हे आणि असे अनेकविध उपक्रम सातत्यानं राबविले जात आहेत. ॲडव्होकेट देवदत्त परूळेकर हे ‘सेवांगण’चे विद्यमान अध्यक्ष आहेत.
बॅरिस्टर नाथ पै आणि दशावतार यांच्यातील नात्याचा एक अतिशय प्रसिद्ध आणि हृद्य प्रसंग आहे, जो आजही कोकणात मोठ्या अभिमानाने सांगितला जातो. एकेकाळी दिल्लीच्या संसदेत जेव्हा लोककलेचा विषय निघाला, तेव्हा नाथ पै यांनी कोकणच्या दशावताराचं महत्त्व पटवून देताना एका दशावतारी कलाकाराचा (राक्षसाचा) ‘आवाज’ काढून दाखवला होता, असं जुने लोक सांगतात. एका बॅरिस्टरने देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपल्या मातीतील कलेचं इतक्या ताकदीनं सादरीकरण करणं, ही त्या काळी मोठी गोष्ट होती.
दशावतारातील दिग्गज कलाकार बाबी नाईक यांच्याशी नाथ पै यांचे सलोख्याचे संबंध होते. बाबी नाईक जेव्हा रंगमंचावर ‘स्त्री’पात्र (स्त्री पार्ट) साकारायचे, तेव्हा त्यांचे सौंदर्य आणि अभिनय पाहून खुद्द नाथ पै थक्क व्हायचे. एकदा एका प्रयोगादरम्यान नाथ पै प्रेक्षकांत बसले होते. बाबी नाईकांचा अभिनय पाहून त्यांनी उद्गार काढले होते की, “हा माणूस जर लंडनमध्ये असता, तर तिथल्या शेक्सपिअरच्या नाटकांत याने धुमाकूळ घातला असता!”
नाथ पै यांचे मूळ गाव वेंगुर्ला. तिथे होणाऱ्या दशावतारी प्रयोगांना ते आवर्जून उपस्थित राहत. अनेकदा ते स्वतः पडद्यामागे जाऊन कलाकारांशी संवाद साधत. १९८७-८८ च्या दरम्यान मी नेरूर इथल्या बाबी कलिंगण यांच्या घरी माझ्या पीएचडी अभ्यासासाठी दशावतारी खेळ रेकॉर्ड करण्यासाठी गेलेलो असताना, त्यांच्या घराच्या अगदी दर्शनी दरवाजाच्या मध्यभागी बॅरिस्टर नाथ पै यांचा फोटो पाहून चकित झालो. मी बाबींना विचारलं-
“बाबी, लोक दर्शनी दारार गणपतीचो फोटो लावतत. तुमच्या दारार ह्यो...”
तेव्हा मला मध्येच तोडत ते म्हणाले, “ह्यो नाथ पैंचो फोटो कसो? हो तुमचो प्रश्न व्हय मा? अवो नाथ ह्योच आमचो दशावताऱ्यांचो गणपती! ते होते म्हणान आमी जगलंव...”
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com