

विचारमंथन
शुभदा चौकर
मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडताहेत आणि त्यांच्या जागी इंग्रजी विशेष शाळा झपाट्याने उभ्या राहतात; ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाने हा गंभीर प्रश्न भावनिक पद्धतीने मांडला, पण तर्कसंगत विश्लेषणाचे दार उघडे राहिले."
मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडताहेत. त्यांच्या जागी मोठ्या इंटरनॅशनल स्कूल उभ्या राहत आहेत. हा प्रश्न महाराष्ट्रातील शहरी भागांत सार्वत्रिक झालेला आहे. ग्रामीण भागातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांही आता त्यांच्या प्रवेशद्वारावर ‘पहिलीपासून इंग्रजी माध्यम’, ‘CBSC पॅटर्न’ असे फलक दिमाखात मिरवत आहेत. हा विषय घेऊन ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा मराठी चित्रपट आला आहे. तो बऱ्यापैकी गाजत आहे. या विषयावर सिनेमा करावासा वाटला याबद्दल निर्माते, दिग्दर्शक यांचे कौतुक वाटले. सिनेमा आकर्षक आहे, पण तो माध्यमाच्या प्रश्नापेक्षा शाळेच्या रीयुनियन भोवतीच खूप रेंगाळतो. मराठी माध्यमाच्या शाळांची अशी परिस्थिती होण्याची कारणे कोणती आहेत, त्यावर उपाय काय, याची मांडणी करण्यात हा सिनेमा सपशेल कमी पडला आहे.
मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तरी मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालावे, असे भावनिक आवाहन त्यात आहे. मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ मराठी अस्मितेशी जोडला, तर तो कधीच सुटणार नाही. असे व्यापक भान आणि बांधिलकी असलेल्या कितीशा व्यक्ती आपल्या समाजात असतील? मातृभाषेत शालेय शिक्षण हे मुलांच्या सर्वंकष हिताचे कसे आहे, मातृभाषेत शिकण्याचे कोणते फायदे मुलांना कायम त्यांच्या जीवनात होतात, त्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे चौफेर फुलू शकते, अशी तर्कशुद्ध मांडणी केली तरच समाजातील किमान काही जणांना ते पटू शकते.
मी स्वत: सन, २००० पासून (माझ्या कन्येच्या जन्मापासून) शालेय माध्यमाच्या प्रश्नाचा अभ्यास करत आहे. तीन वर्षे कसून अभ्यास करून मग मी माझ्या लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले. ‘मित्र मराठी शाळांचे’ हा एक मंचही ५, ६ वर्षे चालवला. ठिकठीकाणी सभा घेतल्या. शेकडो पालकांना त्यासाठी मोफत सल्ले दिले. अजूनही देत असते. आज बहुतांश शहरी मराठी पालकांच्या मनातही ‘मराठी शाळा’ हा पर्यायच डोकावत नाही आणि डोकावला तरी तो स्वीकाण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही. `मातृभाषेतून शिक्षण घेणे तार्किकदृष्ट्या योग्यच' हे विज्ञानाने वारंवार सिद्ध केलेले आहे. मेंदूचे अभ्यासकही सांगतात की, लहान वयात मातृभाषेतून शिकल्यावर आकलन सहजसोपे होते. घरात, परिसरात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेतले नवे शिक्षण मेंदू लवकर, विनासायास स्वीकारतो. प्रोसेसिंग टाइम कमी असतो. लहानपणी मुलांना मातृभाषेत शिकताना ताण जाणवत नाही. संदर्भ लगेच लागतात, कारण ते शिकण्याची पार्श्वभूमी तयार असते. मात्र असे असूनही मराठी पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवताना दिसतात. त्याची अनेक कारणे आहेत.
आजूबाजूची सर्व मुले इंग्रजी शाळेत जातात. त्यांच्यात आपले मूल सहज सामावले जावे, असे पालकांना वाटते. ट्रेंडच्या विरोधात जाण्याचे धैर्य फार कमी जणांकडे असते..
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जागतिक भाषा आहे. या भाषेतील सर्व स्रोत (इंटरनेट, ए.आय.) मुलांना लहानपणापासून वापरता यावे, अशी पालकांची आकांक्षा असते.
या आधुनिक ग्लोबल जगात आपले मूल मागे पडणार नाही, त्याला/तिला इंग्रजी नीट येईल, असा विश्वास किंवा खात्री मराठी शाळा देत नाहीत. सन २००० सालापासून मराठी शाळांत पहिलीपासून इंग्लिश शिकवले जात आहे. पण इंग्लिशचे ते शिक्षण अनेक शाळांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आजही मराठी शाळेतून शिकलेली सर्वसामान्यत: सर्व मुले दहावीपर्यंत इंग्रजी बोलण्यात, समजून घेण्यात सक्षम होतील, याची शाश्वती मराठी शाळा देत नाहीत.
मातृभाषा आपण घरी नीट शिकवू शकतो, शास्त्रशुद्ध इंग्रजी भाषा मात्र मुद्दाम वेगळी शिकवावी लागते. ती शाळेतच शिकणे उत्तम, ती जबाबदारी आपल्यावर नको, असे पालकांना वाटते.
मराठी शाळांमध्ये झोपडपट्टीतली, कष्टकऱ्यांची मुले असतात, अशी मुले आपल्या पाल्याचे मित्र असणे हे सुशिक्षित, उच्चस्तरीय पालकांच्या स्टेटसला ते साजेसे नाही, असे त्यांना वाटते.
एक नवी वर्गव्यवस्था यानिमित्ताने निर्माण झालेली दिसते. IB, IGCSE, CBSE, ICSE, SSC च्या इंग्रजी खासगी शाळा आणि मग मराठी शाळा अशी उतरंड आता लोकांच्या मनात भिनली आहे.
मराठी शाळांच्या शिक्षकवर्गात मराठी ‘अशुद्ध’ बोलणारे शिक्षक असतात, असाही एक आक्षेप असतो. या पालकांमध्ये बोलीभाषा म्हणजे अशुद्ध अशी एक चुकीची धारणा आहे. शिवाय इंग्रजी शाळांमधील शिक्षकांचे इंग्रजी शुद्ध आहे की अशुद्ध हे कितीशा पालकांना कळते?
अनेक खासगी इंग्रजी शाळा `पॉश' असतात. मर्यादित विद्यार्थीसंख्या,स्विमिंग पूल, खेळांचे कोचिंग अशा सुविधा असतात. फी भरमसाट असते, पण मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यास आज अनेक पालक तयार असतात.
अशा आधुनिक, पॉश, दर्जेदार व कल्पकतेने शिक्षण देणाऱ्या मराठी शाळादुर्दैवाने अपवादापुरत्या आहेत. बहुतांश मराठी शाळा अनुदानित असतात. त्यांना सरकारकडून वेतेनेतर अनुदान पुरेसे आणि वेळेवर मिळत नाही. त्यामुळे निधीचा अभाव, तुटपुंजी साधनसामुग्री, सोयीसुविधांची टंचाई, असे रडगाणे असते. अशा शाळेत मुलांना पाठवावे, असे अनेक पालकांना वाटत नाही. 'सरकार जेवू घालीना आणि स्वत: कमवून खायचीपरवानगी देईना' अशा कात्रीत मराठी शाळा अडकल्या आहेत. हे समाजमन बदलवण्यासाठी काय करता येईल?
‘वेतनेतर अनुदान द्या, नाहीतर खर्च भागावान्यापुरती फी आकारण्याची परवानगी द्या’- असा आग्रह मराठी शाळांनी शासनाकडे धरला पाहिजे. सरकारचा सहभाग मिळावा किंवा लोकसहभाग, पण मराठी शाळा स्वच्छ, सुंदर, अद्ययावत असल्या पाहिजेत.
मराठीतून शिकून इंग्रजीतही मुले प्रवीण होतील, असे प्रयत्न झाले पाहिजेत. मराठी शाळांनी मुलांच्या इंग्रजीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे इंग्रजी चांगले करून घेतलेच पाहिजे. मराठी शाळांतील मुलांनी दहावी होईपर्यंत इंग्लिश श्रवण,आकलन, संभाषण व लेखन ही चारही कौशल्ये सहज आत्मसात केलेली आहेत, असे सार्वत्रिक चित्र दिसले पाहिजे. पालकांना हमी हवी आहे, त्यांची मुले इंग्रजीत कमी पडणार नाहीत याची. कारण इंग्रजी आल्याशिवाय चांगल्या नोकऱ्या मिळणार नाहीत, यावर श्रद्धा आहे त्यांची! मराठी शाळेतील सर्व मुलांना इंग्रजी चांगले यावीत यासाठी पाठ्यपुस्तके, अवांतर पुस्तके, वेबसाईटस, दृक-श्राव्य माध्यमे इत्यादींचा वापर करून शाळेत इंग्रजी शिक्षणाला पोषक वातावरण निर्माण झाले पाहिजे.
आज एकंदरीत शिकवण्याचा दर्जाबाबत समाजात प्रचंड असमाधान आहे. हे तथ्य इंग्रजी शाळांनाही लागू आहे. ज्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून पालक आटापिटा करतात, त्याच शाळेवर काही वर्षांत टीकेचा सूर काढतात. मुलांना उत्तम शिक्षण मराठी शाळांत मिळते, असे चित्र निर्माण व्हायला हवे. शिक्षण हक्क कायद्याने शिक्षकांचे कामाचे तास आणि शिक्षकांकडून अपेक्षा वाढवल्या आहेत. त्या वेळेचा अपेक्षित सदुपयोग करून प्रत्येक मूल आनंदाने व छान शिकतेय,असे चित्र मराठी शाळांनी उभे केले पाहिजे. दत्तात्रय वारे गुरुजींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तसेच काही कल्पक शिक्षकांच्या शाळेत आज असे चित्र दिसते. ज्ञानप्रबोधिनी, अक्षर नंदन, आनंद निकेतन अशा काही मराठी प्रयोगशील, खासगी शाळा मुलांच्या प्रभावी शिक्षणासाठी चांगले प्रयोग करत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अधिकाधिक शाळा तशा झाल्या पाहिजेत.
मराठी शाळेतील 'क्राउड' कोणते, हाही कळीचा मुद्दा आहे. आज कुटुंबे लहान होत चाललेली असताना अनेक मुलांना भावंडे नाहीत. मित्रमैत्रिणींचे भावबंध त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. अशा वेळी त्यांच्या घराशी/ पालकांशी साधर्म्य असलेल्या घरांतील मुलांचे मित्रगट तयार व्हावेत, असे पालकांना वाटते. मराठी शाळांच्या वर्गात सर्व सामाजिक स्तरांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे सुरेख आदानप्रदान होते आहे, सुशिक्षित घरांमधील मुलांचा फायदा अशिक्षित मुलांच्या जडणघडणीत होतोय, सुखवस्तू वातावरणातील मुलांना निम्न आर्थिक स्तरावरील मुलांचे जीवनही समजते आहे व त्यातून त्यांची जीवनाची जाण वाढते आहे, असे चित्र पूर्वी होते. ते असायला हवे. आज मराठी शाळांच्या वर्गात अशी आदर्श सरमिसळ नाही, याची नुसती खंत करत बसण्यापेक्षा शाळा व्यवस्थापकांनी- मुख्याध्यापकांनी मिळून जिकिरीचे प्रयत्न करायला हवे की शाळा परिसरातील व्यावसायिक, उच्चविद्याविभूषित, सामाजिक- सांस्कृतिकदृष्ट्या एलिट, बुद्धिजीवी आणि प्रभावी पालकांना भेटून आपल्या शाळेबद्दल सांगणे, मराठी शाळेत पाठवण्याचा आग्रह करणे, त्यांना सोबत घेऊन शाळेत उपकम राबवणे अशा पद्धतीने त्यांना आपल्या शाळेशी जोडण्याचा प्रयत्न मराठी शाळांनी करायला हवेत.
परत आपण ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाकडे येऊ या. या तर्काच्या मुद्द्यांना या सिनेमाने कुठे ना कुठे स्पर्श केलाय. तो सिनेमा आहे, डॉक्युमेंटरी नाही हे मान्य. पण काही संवादांतून ते मुद्दे समोर आणता आले असते. एखाद्या पालकसभेच्या दृश्यातून मातृभाषेतून शिकण्याची फायदे समजावता आले असते. त्यामागचे तर्क आणि विज्ञान उलगडून सांगता आले असते. त्यासाठी चिन्मयी सुमितचा चांगला उपयोग करून घेता आला असता. चिन्मयी सुमित मराठी शाळांच्या भवितव्यासाठी चळवळीचे नेतृत्व करत आहेत. चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांच्या या विषयातील कामाला अजिबात न्याय देत नाहीये.
या सिनेमात भावनिक अपील जास्त आहे. मात्र त्याला तर्कसंगत वैचारिक जोड खूपच कमी आहे. चित्रपटाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थी गावात फिरून पत्रके वाटतात आणि लगेच शिर्के सरांच्या शाळेकडे प्रवेशाचा ओघ सुरू होतो. इतका सोपा उपाय?! इतका बिनबुडाचा, भाबडा आशावाद असा मांडला जाऊ शकतो? त्यामुळे हा सिनेमा बघून ‘मराठी शाळा पुन्हा भरतील’ ही आशा आजच्या पालकांमध्ये पेरण्यात आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा सिनेमा तोकडा वाटतो. तरीही हा विषय समाजासमोर आणून त्यावर एक प्रसन्न चित्रपट केल्याबद्दल हेमंत ढोमे आणि पूर्ण टीमचे अभिनंदन. सचिन खेडेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, प्राजक्ता कोळी, चिन्मयी सुमीत यांसह सर्वच कालाकारांचा अभिनय छान आहे. छायाचित्रण सुंदर आहे. संगीत सुखद आहे. मात्र एक मोठा चांगला सामाजिक विषय ताकदीने पेलण्यात हा चित्रपट कमी पडला आहे.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक
cshubhada@gmail.com