

विशेष
गीतेश गजानन शिंदे
पावसाचा पहिला थेंब म्हणजे केवळ ऋतू बदलण्याची चाहूल नसते, तर तो निसर्गाच्या नव्या सृजनाचा उत्सव असतो. आभाळाच्या दाटलेल्या भावनांपासून मातीच्या मृद्गंधापर्यंत, धबधब्यांच्या खळाळापासून हिरवाईच्या नव्या उमलण्यापर्यंत पावसाचं हे मनोहारी रूप उलगडणारा हा भावस्पर्शी लेख.
आभाळ भरून येतं तेव्हा नेमकं काय होतं? ते फक्त पाणी घेऊन येत नाही किंवा ते मुळीच नसतं समुद्राच्या मनाचं बाष्पीभवन. ते तर निसर्गाच्या एका विराट, आदिम आणि कमालीच्या देखण्या महाकाव्याची प्रस्तावना घेऊन येतं. उन्हाच्या तीव्र, सोसवेनाशा झळांनी जेव्हा अवघी धरणी एखाद्या व्याकुळ विरहिणीसारखी होरपळून निघते, तिची कात सुकते आणि नदी-नाले कोरडे पडून तिचं हृदय तृषार्त होतं; तेव्हा कुठेतरी दूर, क्षितिजावर ढगांचा एक निळा-सावळा, अंजनसर्ज रंगाचा पुंजका डोकावतो. तोपर्यंत अंगाची लाही करणारा वारा अचानक आपली दिशा बदलतो आणि पानापानांना गुदगुल्या करणारा एक मखमली, ओलसर गारवा आसमंतात पसरतो. प्रकाशाची तीव्रता गळून पडते आणि चहूबाजूला एका धूसर, सोनेरी काजळीसोबत गूढ अशी सायंकालीन सावली पसरते. झाडं, वेली, तृणांकुर आणि आभाळाकडे चोच उघडून बसलेली पाखरं, सगळेच जणू श्वास रोखून त्या पहिल्या थेंबाच्या अलौकिक स्पर्शाची वाट पाहत असतात. आकाशात काळ्या ढगांचे जणू जलतरंग वाजू लागतात आणि अवघी सृष्टी एका अलौकिक अभिप्रेत सोहळ्याच्या स्वागतासाठी तृप्ततेनं डोळे मिटून सज्ज होते. आणि मग, विजांच्या लखलखत्या रुपेरी नृत्यासोबत, ढगांच्या गंभीर तालावर तो पहिला सुवर्णथेंब एका पानावर विसावतो आणि तिथून उडी मारून थेट धरणीच्या कुशीत विरघळतो. तप्त, शेकलेल्या मातीच्या तव्यावर जेव्हा पावसाचा तो पहिला थेंब पडतो, तेव्हा चर्र असा आवाज उमटतो. आणि त्याच वेळी तिच्या उरातून जो तीव्र, वेड लावणारा सुगंध उफाळून येतो... त्यालाच आपण ‘मृद्गंध’ म्हणतो. हा सुगंध म्हणजे केवळ एखादा सुवास नाही, तर ते आकाश आणि पृथ्वी यांच्यातल्या युगायुगांच्या गूढ मीलनाचं पहिला उसासा टाकणारं प्रेमपत्र असतं! जगातल्या कुठल्याही महागड्या अत्तराची किंवा सुवासाची या अथांग सुगंधाशी तुलना होऊच शकत नाही. तो गंध श्वासात भरून घेतला की, आत्म्यावर साचलेली वर्षानुवर्षांची धूळ आणि थकवा एका क्षणात विरघळून जातो. धरणी तृप्ततेनं सुटकेचा नि:श्वास टाकते आणि तिच्या प्रत्येक कणाकणांतून आकाशाप्रति एक नि:शब्द, पवित्र कृतज्ञता वाहू लागते.
पाऊस सुरू झाला की, निसर्गाचा मूळ कॅनव्हास एखाद्या कुशल चित्रकारानं आपले जादुई रंग उधळावेत तसा बदलून जातो. रोजचीच ती झाडं, पण पावसाच्या नितळ, स्फटिक रूपी पाण्यात न्हाऊन निघाली की ती पुन्हा हिरवीगार होतात. पानापानांवर साचलेली गर्द धूळ एका झटक्यात वाहून जाते आणि समोर येतो तो इतका समृद्ध, गडद आणि सजीव हिरवा रंग... जो डोळ्यांना आणि मनाला एकाच वेळी तृप्ततेची समाधी देऊन जातो. डोंगरांनी पांघरलेला तो हिरवा मखमली मफलर आणि कड्याकपारींतून उड्या मारत, फेसाळत वाहणारे ते दुधाळ पांढरेशुभ्र झरे पाहून असं वाटतं की, निसर्गानं स्वतःच आपल्या स्वर्गातील सौंदर्याची पेटी पृथ्वीवर उपडी केली आहे. अशावेळी कविता सुचली नाही तर नवलंच. अशाच एका पावशी नकळतपणे पावसाचा खळाळ माझ्या कवितेतही उतरला आणि मी लिहून गेलो,
‘डोंगराच्या स्तनातून
शुभ्र झऱ्याचा खळाळ
पाणी धबाधबा पडे
नाद घुमे रानोमाळ’
धबधबा या शब्दामधली ऊर्जा तेव्हाच आपल्याला जाणवते जेव्हा आपण एखाद्या प्रचंड जलस्रोतापाशी उभे असतो. नदीचं पाणी फेसाळत दरीत अक्षरशः कोसळत असतं. त्याच्या धबाधबा पडण्याच्या आवाज रानात, कानात आणि मनातही घुमत राहतो. कितीही पाहिलं तरी मन भरत नाही. म्हणूनच कदाचित आपण त्या कातळाशी थिजून गेलेलो असतो. मला त्या रानवाटेनं नदीचा माग काढत जायला फार आवडतं. बहुधा नदीला फार काळ एका रेषेत वाहायला आवडत नाही. कोण म्हणेल की ती हीच नदी आहे जी उन्हाळ्यात अंतर्धान पावली होती. सांगायला तिच्या प्रवाहाच्या खुणा मात्र मागे उरलेल्या होत्या. भर उन्हाळ्यातही काही दगडगोट्यांमध्ये ओल शिल्लक होती. पण आता मात्र या पावसानं तिचं रूपच बदलवून टाकलं. जणू काही नदीनं कात टाकली होती. तिची नागमोडी वळणं पाहून मला सुचलं,
‘नाग नदीचा निघाला
त्याची ऐटदार चाल
पावसाने उतरली
तप्त उन्हाची ती साल’
हेच पाणी अधेमध्ये खडकावर आदळतं, आणि पुन्हा नव्या दमानं झेपावून पुढे वाहत राहतं. तिच्या अशा वाहतं राहण्यानं अवघ्या सृष्टीला वेणा येतात आणि त्यातूनच नवं अंकुर जन्माला येतात. त्यांचं हिरवं जावळ हातानं कुरवाळत असताना मनात ओळी गुंजतात,
‘पाणी झेपावते असे
जणू उगारती फणा,
येती सृष्टीला अवघ्या
नवं सृजनाच्या वेणा’
पानांच्या नाजूक, टोकदार कोपऱ्यांवर रेंगाळणारे ते पाण्याचे पारदर्शक, टप्पोरे थेंब पाहिले की वाटतं, निसर्गानं स्वतःच्या सुखाश्रूंनीच प्रत्येक वेलीला दागिन्यांसारखं सजवलं आहे. हवेच्या एका मंद, सुगंधी झुळकेनं ते थेंब जेव्हा खाली मोत्यांसारखे गळतात, तेव्हा धरणीवर पाण्याच्या लडीच्या लडी कोसळतात. तुम्ही कधी कळ्याकभिन्न कातळावर ओघाळणारे पावसाचे थेंब पाहिलेत? मला तर हे थेंब म्हणजे कातळाच्या फळ्यावर लिहिलेली सुभाषितं वाटतात. मागे एका कवितेत मी लिहिलं होतं की,
‘फळ्यावर कातळाच्या
जल थेंबांची अक्षरे
ओळ दिसे मोती माळ
खडू नभाचा पाझरे’
पावसाच्या या रिमझिम धारांमध्ये एक आदिम, अनाकलनीय लय असते. छपरावर पडणाऱ्या टपटप थेंबांमध्ये, बांबूच्या वनातून जाणाऱ्या वाऱ्याच्या शिट्टीत, पानांच्या सळसळीत आणि डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या खळाळाटात एक असं निसर्गदत्त संगीत असतं, जे कोणत्याही मानवी वाद्याशिवाय थेट आत्म्याच्या तारा छेडून जातं. रानातले मयूर आपला निळा-हिरवा पिसारा पूर्ण ताकदीनं फुलवून, मान उंचावून थुईथुई नाचू लागतात; तर झाडांच्या दाट आडोश्याला बसलेली लहान पाखरं आपले ओले पंख फडफडवून हवेत पाण्याचे तुषार उडवतात. नदी, नाले, ओढे आपल्या मर्यादा ओलांडून ओसंडून वाहू लागतात, विहिरींचे तळ गच्च भरतात आणि अवघा निसर्ग एकाच रंगात, एकाच सुरात अन् एकाच तालात ओलाचिंब होऊन न्हाहून निघतो. अशावेळी एखाद्या डोंगर कड्यावर धुक्याच्या धुपामध्ये आपल्याला हरवून जायला होतं. ढगांमधलं आणि आपल्यातलं अंतर मिटून जातं. मग तेच थेंब पावसाच्या सुयांसारखे बोचतात आणि मनात टापूर टिपूर असा नाद निर्माण होताना शब्द स्फूरतात,
‘टोचे पावसाच्या सुया
डोंगराच्या माथ्यावर
खोल मनात निनादे
ताल टापूर टिपूर’
मात्र पावसाचं हे रूप नेहमी एकाच भावविश्वात रमत नाही; त्याचे अनेक मूड्स असतात, अनेक रूपं असतात. कधी तो एखाद्या अल्लड, लाजाळू मुलीसारखा ‘रिमझिम’ बरसून झाडावेलींशी लपाछपी खेळतो आणि सृष्टीच्या मनात एक अनामिक, शांत संमोहन जागवून जातो. कधी तो रात्रीच्या काळ्याकुट्ट शांततेत संथपणे, एखाद्या लयीत गुंजत राहतो; तर कधी एकाएकी विजांच्या तांडवासह आणि ढगांच्या काळजाला चिरणाऱ्या कडकडाटासह रौद्र रूप धारण करतो. मुसळधार बरसणाऱ्या त्या जाडजूड धारा जेव्हा जमिनीवर एखाद्या शस्त्रासारख्या आदळतात, तेव्हा पावसाची ती अथांग, अफाट ताकद पाहून माणूस स्वतःचं अस्तित्व विसरून स्तिमित होतो. पण निसर्गाच्या या रौद्र, भयानक रूपातही एक आदिम आणि ओबडधोबड सौंदर्य दडलेलं असतं, जे सृष्टीची अथांगता अन् मानवाचं खुजेपण अधोरेखित करतं. तो कसाही आला, तरी शेवटी सृष्टीला अमृत देऊन जातो. कोरड्या पडलेल्या पाषाणांमधून आणि जमिनीच्या भेगांमधून लहान, कोवळे हिरवे अंकुर माना उंचावून बाहेर डोकावू लागतात, ज्यांना पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात एका नव्या सोन्याच्या हंगामाची स्वप्नं जिवंत होतात.
धोधो बरसणारा पाऊस ओसरल्यावर निसर्गाचं रूप अत्यंत जादुई आणि शांत होतं. मातीच्या सुवासामुळे आणि कोवळ्या पश्चिमेकडच्या उन्हामुळे अवघा आसमंत लखलखू लागतो. तळ्याच्या संथ पाण्यात ढगांचं प्रतिबिंब असं दिसतं, जणू काही ढग वाऱ्याची वाट पाहत तिथेच विसावले आहेत. पाऊस जाताना झाडांच्या फांद्या त्यांना निरोप देतात. पाऊस संपला तरी तो मागे एक नवी उमेद, हिरवं चैतन्य आणि पुन्हा बरसण्याचं रेशमी आश्वासन सोडून जातो; ज्यामुळे सृष्टीला त्याच्या पुढच्या आगमनाची आस लागून राहते आणि निसर्गाच्या आत्म्यावरील त्याची सुगंधी ओल कधीच आटत नाही.!
geeteshshinde@gmail.com
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत