चला बनूया पक्ष्यांचे लाडके मित्र!

पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण, म्हणूनच त्यांना जपण्यासाठी आपण पावले उचलायला हवीत. कशी?
चला बनूया पक्ष्यांचे लाडके मित्र!
चला बनूया पक्ष्यांचे लाडके मित्र!
Published on

इको-चॅम्प्स

सांबारवडी- भाग्यश्री पटवर्धन

पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण, म्हणूनच त्यांना जपण्यासाठी आपण पावले उचलायला हवीत. कशी?

सकाळी डोळे उघडण्याआधी आपल्या कानावर जेव्हा ‘चिव चिव’ किंवा ‘कुहू कुहू’ असे गोड आवाज पडतात, तेव्हा समजायचं की निसर्गाची सकाळ झाली आहे! आपल्या आजूबाजूला वावरणारे हे चिमणी, पोपट, मैना, बुलबुल आणि दयाळ असे रंगीबेरंगी पक्षी आपल्या आयुष्याचा किती महत्त्वाचा भाग आहेत ना? त्यांचा तो आनंदात केलेला किलबिलाट ऐकला की आपलं मन कसं प्रसन्न होतं. पण मित्रांनो, कधी तुम्ही शांतपणे विचार केला आहे का की पूर्वी जितक्या चिमण्या दिसायच्या, तितक्या आता का दिसत नाहीत? आपण जर आजूबाजूला नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की, शहरांमध्ये आता मोठ्या इमारतींचं जाळं पसरलं आहे, झाडं कमी झाली आहेत आणि सगळीकडे सिमेंटचं काँक्रीटीकरण झालं आहे. वाढतं प्रदूषण आणि पाण्याची कमतरता यांमुळे आपल्या या इवल्याशा मित्रांची संख्या आता हळूहळू कमी होत चालली आहे. त्यांना जगण्यासाठी जसं अन्न आणि पाणी हवं असतं, तसाच एक सुरक्षित निवाराही हवा असतो, जो बदलत्या वातावरणामुळे त्यांना सहज मिळेनासा झाला आहे. पण काळजी करू नका, कारण आपण सगळे मिळून या चिमुकल्या पक्ष्यांना नक्कीच मदत करू शकतो आणि ही मदत करण्यासाठी आपल्याला खूप मोठे कष्ट उपसण्याची गरज नाही, तर आपल्या छोट्या छोट्या कृतीही त्यांच्यासाठी मोलाच्या ठरणार आहेत.

सगळ्यात आधी आपण एका साध्या गोष्टीपासून सुरुवात करूया, ती म्हणजे पाणी! उन्हाळा आला की आपल्याला सारखी तहान लागते, अगदी तसंच या लहानग्या पक्ष्यांनाही खूप तहान लागते. पण कडक उन्हामुळे निसर्गातील पाण्याचे स्रोत आटून जातात आणि बिचारे पक्षी पाण्यासाठी भटकत राहतात. अशा वेळी आपण आपल्या घराच्या गच्चीवर, खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये एखादं मातीचं छोटं भांडं ठेवलं, तर ते या पक्ष्यांसाठी अमृतच ठरेल. मातीच्या भांड्यात पाणी थंड राहतं. फक्त एक लक्षात ठेवायचं की हे पाणी रोज बदललं पाहिजे, कारण स्वच्छ पाणी त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि यामुळे तिथे डास देखील होत नाहीत. त्या भांड्याभोवती जर थोडी सावली असेल, तर पक्षी तिथे अधिक आवडीने येतील. पाणी पिऊन झाल्यावर जेव्हा एखादी छोटी चिमणी तिथे पंख फडफडवून अंघोळ करते, तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखं असतं!

आता पाणी तर झालं, पण त्यांना राहण्यासाठी घर कसं मिळणार? पूर्वी झाडांच्या ढोलीत किंवा जुन्या वाड्यांच्या कोपऱ्यात पक्षी आपली घरटी आरामात बांधायचे. आता मात्र झाडं तोडली गेल्यामुळे त्यांना घरटी बांधायला सुरक्षित जागाच उरली नाहीये. काही धाडसी पक्षी इमारतींच्या कोपऱ्यात किंवा खिडकीच्या फटीत घरटी बांधतात, पण ती नेहमीच सुरक्षित असतात असं नाही. मग आपण काय करू शकतो? आपण त्यांना ‘तयार घरटी’ देऊ शकतो! बाजारात मिळणारी लाकडी घरटी आणून आपण लावू शकतो किंवा मग घरीच टाकाऊ वस्तूंतून म्हणजे नारळाच्या करवंट्या, वाळलेला भोपळा किंवा जुन्या लाकडाच्या तुकड्यांपासून छान घरटी तयार करू शकतो. ही घरटी आपल्या घराजवळ अशा ठिकाणी लावा जिथे जास्त गोंधळ नसेल आणि इतर प्राण्यांपासून ती सुरक्षित असतील. जेव्हा एखादा पक्षी तुमच्या हाताने लावलेल्या घरट्यात येऊन राहू लागेल, तेव्हा तुम्हाला होणारा आनंद शब्दांच्या पलीकडचा असेल.

पण मित्रांनो, घरटं आणि पाणी याहीपेक्षा एक कायमस्वरूपी उपाय म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावणं! झाडं ही केवळ पक्ष्यांची घरं नसून त्यांचा अन्नाचा मुख्य स्रोत आहेत. झाडांवर मिळणारी फळं, फुलं आणि तिथे असणारे छोटे कीटक हेच तर पक्ष्यांचं खरं खाणं असतं. झाडाच्या फांद्यांवर त्यांना केवळ विश्रांतीच मिळत नाही, तर शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचावही करता येतो. म्हणूनच आपण वड, पिंपळ, उंबर यांसारखी मोठी झाडं लावली पाहिजेत, कारण अशी झाडं शेकडो पक्ष्यांना स्वतःकडे आकर्षित करतात. आपल्या परिसरातील बागेत किमान एक तरी असं झाड असलं पाहिजे. यासोबतच, आपण त्यांना थोडं अन्नही देऊ शकतो. घराच्या बाहेर एका कोपऱ्यात तांदूळ, गहू, बाजरी किंवा भाताचे दाणे टाकले तर पक्षी ते आवडीने खातात. मात्र, त्यांना अन्न देताना एक नियम पाळायचा- अन्न नेहमी स्वच्छ असावं आणि योग्य प्रमाणात असावं. आपण जे पदार्थ खातो, जसं की मसालेदार पदार्थ, मीठ किंवा साखर असलेले पदार्थ, ते पक्ष्यांना अजिबात देऊ नयेत, कारण ते त्यांच्या पोटासाठी घातक ठरू शकतात. फळं आणि धान्य हेच त्यांच्यासाठी सगळ्यात उत्तम अन्न आहे.

पक्ष्यांना मदत करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्यांना त्रास न देणंही महत्त्वाचं आहे. अनेकदा खेळता खेळता मुलं पक्ष्यांना दगड मारतात किंवा त्यांच्या घरट्यांना उगाच हात लावतात, असं कधीही करू नका. घरट्यापाशी वारंवार गेल्यामुळे पक्षी घाबरतात आणि असुरक्षित वाटल्यामुळे अनेकदा आपली घरटी सोडून कायमचे निघून जातात. त्यांना लांबून बघण्यात आणि त्यांचा आवाज ऐकण्यात जो आनंद आहे, तो त्यांना त्रास देण्यात नक्कीच नाही. आपण वयाने लहान असलो तरी आपल्या मनात जर माया असेल, तर आपण या निसर्गात मोठा बदल घडवून आणू शकतो. जर आपल्यापैकी प्रत्येकाने पक्षांच्या पाण्याची आणि अन्नाची थोडी जरी काळजी घेतली, तर आपल्या आजूबाजूचा परिसर पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाईल. पक्षी हे आपल्या निसर्गाचे सुंदर दागिने आहेत आणि त्यांचे रक्षण करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. चला तर मग, आज आपण सगळे एक निश्चय करूया की आपण पक्ष्यांचे खरे मित्र बनूया, त्यांना सुरक्षित जग निर्माण करून देऊया आणि या निसर्गाचं सौंदर्य अधिक वाढवूया!

bhgya2510@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in