फूडमार्क
श्रुति गणपत्ये
गेल्या काही वर्षांमध्ये के-ड्रामाच्या माध्यमातून तिथली अन्न संस्कृती जगभर पोहोचली आहे. तिथल्या मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये खाद्यपदार्थांविषयीचे कथासूत्र, संदर्भ आणि दृश्य विपूल प्रमाणात असतात. तेच काहीसे हॉलिवूडपटांबाबत म्हणता येईल. मात्र भारतीय बॉलिवूड ‘गाजर का हलवा’च्या पलीकडे आणि मराठी चित्रपटसृष्टी कांदेपोहे आणि वरण-भाताच्या पलीकडे गेलेली नाही. ग्रामीण भागातल्या यूट्यूबर्सनी मात्र आपल्या दैनंदिन अन्नाचे वास्तव चित्रण दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय आहारातील वैविध्य जगासमोर येत आहे.
महाराज, अन्नात महत्त्वाचं काय असतं? चव की सुगंध?” - योन जी यंग (राजाची शेफ)
“चव” - महाराज.
“माझ्या मते, चवीत आपण केवळ पाच रस अनुभवू शकतो. कडूपणा, आंबटपणा, गोडवा, तिखट आणि खारट. पण पदार्थांचे सुगंध अगणित आणि विविधतेने परिपूर्ण असतात” - योन जी यंग.
हा संवाद आहे नेटफ्लिक्सवरच्या के-ड्रामामधल्या ‘बोन अपेतित, युअर मेजेस्टी’ या नवीन मालिकेतला. शेफ आणि राजा यांच्यामध्ये अन्नावरून ही चर्चा सुरू असते. योन म्हणते त्याप्रमाणे खरोखरंच अन्न पदार्थांचे सुगंध ही प्रत्येकासाठी एक वेगळी अनुभूती असते. त्यामुळेच ते अगणित आहेत. कोणतेही अन्न हे त्याचा सुवास, चांगले रंग, नेत्रसुखद रंगसंगती आणि अर्थातच चव यामुळे माणसाला आवडते. पण ते पदार्थ शिजताना येतो तो सुवास मनात भरून राहतो. मग नंतर त्याचे दृश्य रूप आणि चव कळते.
कोरियन क्युझिन्सची वाढती लोकप्रियता
गेल्या काही वर्षांत के-ड्रामाच्या बहुतेक मालिकांमधून कोरियन पदार्थ, तिथली अन्न संस्कृती ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामध्ये ‘होमटाऊन चा चा चा’, ‘ए नेशन ऑफ किमची’, ‘कोरियन फ्राइड चिकन रापसोडी’, ‘डिनर मेट’, ‘टेस्टफुली युवर्स’ अशा अनेक मालिकांचा समावेश करता येईल. कोणत्याही विषयावरची मालिका असो, त्यामध्ये काही ना काही कोरियन अन्नाचा संदर्भ येतोच. कोरियन पदार्थ इतक्या आकर्षक पद्धतीने या मालिकांमधून दाखवले गेले आहेत की भारतासह अनेक देशांमध्ये कोरियन हॉटेल्सचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांमध्ये के-ड्रामामधील फूड खाणे, तसे कपडे करणे, कोरियन गाणी-बीटीएस ऐकणे हा एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. काही वर्षांपूर्वी भारतात चायनीज फूडची अशाच प्रकारे क्रेझ होती. पण ती टीव्ही मालिकांसारख्या दृकश्राव्य माध्यमातून कधीच चित्रीत झाली नाही.
हॉलिवूड चित्रपट आणि युरोपियन क्युझिन्स
याआधी हॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून युरोपियन - खास करून फ्रेंच, इटालियन क्युझिन्स अशाच पद्धतीने लोकप्रिय केली गेली. ‘अंडर द टस्कन सन’, ‘ज्युलिया ॲण्ड ज्युलिया’, ‘चॉकोलेट’, ‘इट प्रे लव’, ‘हॉट क्युझिन’, ‘गॉड फादर’मधले अनेक सीन्स वेगवेगळ्या पदार्थांना केंद्रस्थानी ठेवून चित्रीत करण्यात आले होते. याची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान आहे - ती म्हणजे अन्न पदार्थ शिजवण्याची प्रक्रिया नीट उलगडून दाखवणे, पदार्थांची मांडणी, त्यातील वैविध्य, त्याविषयीची चर्चा आणि त्यातून इतिहास उलगडून सांगणे. मुळात उत्कृष्ट पद्धतीने मांडलेल्या दृश्य स्वरूपात पदार्थ पाहिले की त्यांची भुरळ पडतेच. चव चांगली की वाईट हे नंतर ठरते. प्रत्येकाच्या लहानपणापासूनच्या खाण्याच्या सवयी, पदार्थांचा सुगंध अशा अनेक गोष्टींवर एखाद्याला समोरचा पदार्थ आवडेल की नाही, हे ठरते.
बॉलिवूडचे मर्यादित विश्व
बॉलिवूडमध्येही गेल्या काही वर्षांत अन्न पदार्थांवर रचलेले काही सिनेमे नक्की आले. पण त्याआधी हिंदी चित्रपटांमध्ये फक्त ‘माँ के हाथ का हलवा’, नाश्त्यासाठी ‘ब्रेड-बटर’ आणि मराठी मालिकांमध्ये ‘कांदेपोहे’ या पलीकडे पदार्थांचा फारसा विचार झालेला नव्हता. ईशान्येकडील पदार्थांवर ‘आकुनी’, माणसाचं मांस खाण्यासंबंधी ‘आमिस’, वादाच्या भोवऱ्यात फसलेला ‘अन्नपूर्णा’, ‘लव्ह शव दे चिकन खुराना’, ‘स्टॅन्ली का डब्बा’, ‘चिनी कम’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘उस्ताद हॉटेल’, ‘गुलाबजाम’ असे काही मोजके चित्रपट सांगता येतील. यातील काही चित्रपट नक्कीच सामाजिक आणि राजकीय भाष्य करतात. त्यामुळे वादही होतात. ‘आकुनी’ चित्रपटामध्ये ईशान्येकडे सोयाबीन आंबवून पदार्थ बनवला जातो. आंबवण्याच्या प्रक्रियेत त्याला तीव्र वास येतो. तो वास शेजाऱ्यांना असह्य होतो. ‘आकुनी’ हा चित्रपट त्यातून उलगडत जातो. ‘आमीस’मध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे मांस खाता खाता माणसाच्या मांसाची चव एका डॉक्टर बाईला आवडून जाते आणि त्याचे परिणाम अर्थातच तिला भोगावे लागतात. हे असे विषय म्हणजे सध्याच्या वातावरणात थोरच म्हणायला हवेत. कारण अन्नाविषयी काहीही बोलायलाच आज लोकांना भीती वाटते. अशावेळी आपण आपले अन्न इतक्या सहजतेने आणि अभिमानाने लोकांसमोर आणू शकतो का, हा प्रश्न आहे. भारतातील अन्नपदार्थांमध्ये जेवढे वैविध्य आहे तेवढे वैविध्य कोणत्याही मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये मुळीच येत नाही. कारण मुळात आपले अन्न स्वीकारायलाच आपण घाबरतो. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी या वादामुळे अनेक लोक आपले मूळचे परंपरागत अन्न खायलाही घाबरतात.
प्राचीन काळापासून अन्न हे जगभरातील संस्कृतींचा पाया राहिले आहे. आपल्या अस्तित्वासाठी ते आवश्यक आहे, म्हणूनच अन्नाबद्दलची सामायिक भावना ही माणसाला जोडून ठेवते. अन्न हे केवळ शारीरिक गरजेपुरते मर्यादित नसून ते संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. समाजाची ओळख, परंपरा, मूल्ये आणि इतिहास अन्नाच्या माध्यमातून दिसून येतो. अन्न हे सामाजिक नातेसंबंध दृढ करणारे माध्यमही ठरते.
बहुसांस्कृतिक खाद्यसंस्कृती
प्रत्येक समाजात काही खास पदार्थ त्या त्या संस्कृतीचे प्रतीक मानले जातात. अन्न शिजवण्याच्या पद्धती आणि त्याची सादरीकरण शैली लोकांना त्यांच्या मुळांशी जोडते. आहारपद्धती आणि खाद्यपरंपरा या श्रद्धा, जीवनशैली आणि सामाजिक रचनेशी जोडलेल्या असतात. अन्न हे प्रतीकात्मकही आहे. एकत्र बसून जेवणे, जेवत असताना कोणी आले तर त्यालाही जेवण देणे या गोष्टी मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. जागतिकीकरण, स्थलांतर आणि शहरीकरणामुळे खाद्यसंस्कृतीत सतत बदल होत आहेत. स्थलांतरित समाज नवीन पाककृती आणतात, तर जागतिक बाजारपेठेमुळे पदार्थ झपाट्याने पसरतात. त्यामुळे बहुसांस्कृतिक खाद्यसंस्कृती तयार होते. पण भारतात अन्न हे जाती, धर्म, वर्ग आणि अगदी लिंगभेदही निर्माण करते. कोणत्या पद्धतीचे अन्न कोणी सेवन करावे आणि कोणी सेवन करू नये, याचे काही सामाजिक नियम अगदी आजपर्यंत होते. अन्नाच्या सेवनातून समाजातील वर्गभेद, सत्ता-संबंध आणि मूल्येही दिसून येतात. हे जुने भेद कायम असतानाच आधुनिक अन्नप्रणालीमुळे शाश्वतता आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक उपक्रम राबवताना विद्यमान अन्नपरंपरांचा आधार घेतल्यास ते अधिक प्रभावी ठरतात.
मनुष्याच्या उत्क्रांतीबरोबरच अन्नाच्याही उत्क्रांतीची कथा तेवढीच रोचक आहे. अन्न केवळ आपली भूक भागवत नाही, तर मेंदू, डोळे, जीभ आणि नाक अशा सगळ्या इंद्रियांना आनंद देते. अन्न संस्कृती टिकवण्यासाठी टीव्हीसारखे दृकश्राव्य माध्यम हे एक चांगले माध्यम आहे. पण मुख्य समजल्या जाणाऱ्या आपल्या माध्यमांमध्ये, रोजच्या मालिका-चित्रपट यामध्ये अन्न संस्कृतीचे वास्तव प्रतिबिंब पडत नाही. मात्र अलीकडे यूट्यूबसारख्या माध्यमातून मात्र न घाबरता, न लाजता अनेक छोट्या-छोट्या गावातले लोक आपले दैनंदिन अन्न, त्याचे विविध प्रकार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच भारतातही गोगलगाय, क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा किडा, कासव, बकऱ्याचे विविध अवयव, भाज्या आणि मांस यांचे एकत्रित पदार्थ, मांस आणि गोड चव एकत्र असे कांदेपोहे आणि ब्रेड-बटरच्या पलीकडले अनेक पदार्थ आपल्या संस्कृतीमध्येही दिसतात. यूट्यूबमुळे आज ते घरोघरी पोहोचत आहे.
मात्र सध्याच्या शहरी-उच्चभ्रू समाजामध्ये अशा पदार्थांची कल्पना करणेही शिष्टसंमत मानले जाणार नाही. पण हे आपले ‘अन्न वास्तव’ असून त्याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. कारण हे अन्नसुद्धा आपल्याच संस्कृतीचा भाग आहे.
मुक्त पत्रकार
shruti.sg@gmail.com