बक्षिसापलीकडचं उत्तर

तिला हवं होतं स्वतःबद्दलचं सत्य. मी शांतपणे म्हणालो- “नम्रता, बक्षीस म्हणजे गुणांची मोजपट्टी नसते. तो फक्त एखाद्या स्पर्धेचा निकाल असतो.” ती लक्ष देऊन ऐकत होती...
बक्षिसापलीकडचं उत्तर
(प्रातिनिधिक फोटो)
Published on

शिक्षणगुज

युवराज माने

सर…” मी वही तपासत होतो. आवाज ओळखीचा होता. थोडासा थरथरलेला, पण हक्काचा.

“काय झालं नम्रता?” मी डोळे वर करून विचारलं.

ती बाकावर उभी राहिली नाही, हात उंचावला नाही. ती थेट माझ्या जवळ आली. हीच तर खूण असते- गुरुजी आवडता झाला की, लेकरं परवानगी न मागता मन मोकळं करायला येतात.

“सर, एक विचारू का?” तिच्या आवाजात भीती नव्हती, फक्त शंका होती.

“विचार ना… गुरुजी आहे त्यासाठीच आहे,” मी हसत म्हणालो.

क्षणभर शांतता आणि मग शब्द बाहेर पडले- “सर, माझ्यामध्ये चांगले गुण आहेत का?” मी थांबलो. हा प्रश्न अभ्यासाचा नव्हता. तो मनाचा होता.

ती लगेच पुढे म्हणाली- “सर, मला आतापर्यंत एकदाही बक्षीस मिळालं नाही म्हणून विचारतेय…”

तिच्या डोळ्यांत नजर मिळवण्याचं धाडस होतं, पण उत्तर ऐकण्याची भीतीही होती.

“सर, मी गुनी लेकरू आहे का?”

"होय नम्रता, तू गुणी मुलगी आहेस" असं मी म्हणताच क्षणभर थांबून पुन्हा ती म्हणाली,

“मग मला आजवर एकही बक्षीस का मिळालं नाही?”

हे प्रश्न पुस्तकातले नव्हते. हे प्रश्न होते गुरु–शिष्य नात्यातून हक्कानं विचारलेले. बाल मनाला त्रास देणारे. मी तिला समजून घेत सांगत होतो पण ती पुढे बोलत होती. शेवटी ती अतिशय भावनिक झाली. बोलतानाचं शेवटचं एक वाक्य.. थेट काळजावर आदळलं-

“सर, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात म्हणूनच मला इतकं काही जमलं…” नाहीतर मी मागेच राहिले असते. त्या क्षणी मी शिक्षक राहिलो नाही. मी फक्त ऐकणारा झालो. बक्षीस हा शब्द तिला हवा असलेला नव्हता. तिला हवं होतं स्वतःबद्दलचं सत्य. मी शांतपणे म्हणालो- “नम्रता, बक्षीस म्हणजे गुणांची मोजपट्टी नसते. तो फक्त एखाद्या स्पर्धेचा निकाल असतो.” ती लक्ष देऊन ऐकत होती- जशी लेकरं आपल्या आवडत्या गुरुजीचं एकही शब्द सोडत नाहीत.

“खरे गुण वेगळे असतात,” मी पुढे म्हणालो, “वेळेवर काम करणं, चूक झाली तरी पुन्हा प्रयत्न करणं, इतरांना मदत करणं, आणि रोज थोडंसं चांगलं बनत जाणं-हे गुण बक्षिसात मोजले जात नाहीत.”

तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. “तुला अजून बक्षीस मिळालं नाही, याचा अर्थ तू कमी आहेस असं नाही. याचा अर्थ तुझी वेळ अजून आलेली नाही.”

मी थोडा थांबलो- “आणि हो… तू गुणी लेकरू आहेस. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तू चांगली माणूस होण्याच्या वाटेवर आहेस.”

त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. जणू मनावरचं ओझं उतरलं. मला उमगलं-गुरुजी आवडता झाला की, लेकरं प्रश्न विचारतात, उत्तरासाठी नाही… तर विश्वासासाठी. आणि त्या दिवशी नम्रतेला बक्षीस मिळालं नाही. पण मला मिळालं.

एका लेकरानं हक्कानं माझ्यावर टाकलेला विश्वास. तेच तर गुरु-शिष्य नात्याचं खरं बक्षीस असतं.

शिक्षणगुज- बक्षिसं क्षणाची ओळख देतात, पण गुण आयुष्यभर साथ देतात. लेकरं उत्तर नाही, विश्वास शोधत असतात- तो टिकवणं, हेच शिक्षणाचं खरं यश.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात.

yuvrajmane892@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in