
पाऊलखुणा
कोकण म्हणजे केवळ निसर्ग नाही, तर वेगवेगळ्या कलांचा, परंपरांचा आणि खेळांचा मेळाही इथे भरलेला दिसतो. कोकणातली नागपंचमी ‘भल्ली भल्ली भावय’ या खेळाने रंगते आणि देसरूढ काढण्याच्या विधीने संपन्न होते. निसर्गाशी सुसंवादी राहत, निसर्गासोबत हसत-खेळत आपले पारंपरिक सण साजरे करण्याची ही पद्धत अनोखी आहे.
गावात ढोलांचा नाद घुमू लागतो आणि त्या तालावर “भल्ली भल्ली भावयऽऽ”चा सूर सर्वत्र निनादतो. देवीच्या जल्लोषात सारे ग्रामस्थ तल्लीन होतात. भावईच्या खळ्यात, एक फूट खोल मातीत, उभा नारळ पुरला जातो. हा नारळ अत्यंत मानाचा मानला जातो. भावईचा उत्सव सुरू झाल्यावर जो कोणी हाताच्या कोपराने, बोटांचा स्पर्श न करता, मातीतून हा नारळ बाहेर काढेल, त्याला गावाचा सन्मान प्राप्त होतो. कुणी कोपराने मातीखाली पुरलेला हा मानाचा नारळ शोधण्याचा प्रयत्न करतो, तर कुणी आपल्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी देवाचा दगड उचलण्याचा प्रयत्न करतो. नारळ काढण्यासाठी हा असा आगळा प्रयत्न काही जण करत असताना, पाणी उडवले जाते आणि तयार होणारा चिखल एकमेकांच्या अंगावर उडवून आनंद लुटला जातो. अखेरीस, खेळ संपल्याची थाप ढोलावर पडते, आवाजाची चाल बदलते आणि “भल्ली भल्ली भावय”चा उत्सव त्या वर्षापुरता संपलेला असतो. नव्या वर्षासाठी सारे जण नव्या उत्साहाने आपापल्या कामाला लागतात. ही आहे कोकणातील गावागावांत रुजलेली ‘भावय’ची अनोखी परंपरा!
कोकण... निसर्गसंपन्न, विस्तीर्ण सागरीकिनाऱ्यांनी नटलेला, नारळ-सुपारीच्या बागांनी समृद्ध आणि लोकजीवनाने ओसंडून वाहणारा असा प्रदेश आहे. केवळ निसर्गासाठीच नव्हे, तर कोकण आपल्या समृद्ध लोकपरंपरा, चालीरीती, सण-उत्सव आणि सांस्कृतिक विविधतेसाठीही प्रसिद्ध आहे. येथे वर्षभर अनेक सण-उत्सव, धार्मिक विधी, जत्रा, पारंपरिक नाटकं आणि खेळ उत्साहात साजरे होतात. या सर्वांमध्ये ‘भल्ली भल्ली भावय’ हा कोकणाची एक खास ओळख निर्माण करणारा खेळ आहे. कोकणातील कोणताही सण किंवा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता किंवा परंपरेपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यात सामूहिक सहभाग, आनंद आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा सुरेख संगम असतो. कोकणातील ग्रामीण जीवनात ‘भावय’ खेळ अगदी सहजपणे मिसळून गेला आहे.
कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आणि सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये नागपंचमी, आषाढी अमावस्या किंवा काही ठिकाणी कर्क संक्रांतीपूर्वी देवळासमोर चिखल केला जातो आणि त्यात वेगवेगळे खेळ खेळले जातात, चिखलफेक केली जाते. यालाच ‘भल्ली भल्ली भावय’ असे म्हणतात. हाताच्या कोपराने नारळ शोधून काढण्याचा खेळ अत्यंत मनोरंजक असतो. होळीच्या ठिकाणचा दगड उचलून आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्नही केला जातो. सायंकाळी उशिरा काठीला रूमाल बांधून शिवकळा काढली जाते. ज्यांनी नवस केले असतील, ते फेडले जातात. त्यानंतर प्रतीकात्मक शिकारीचा खेळही खेळला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रिंदावण गावात, आषाढी अमावस्येला गावची ग्रामदेवता महालक्ष्मी देवीच्या मंदिरात ‘भावय’ खेळ खेळला जातो. मंदिराच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी वळवून ते मंदिराच्या प्रांगणात सोडले जाते. “सांजवला रान काढ... सांजवला रान” असे म्हणत प्रांगणात उतरलेला प्रत्येक जण मंदिरासमोरील अंगणातील गवत काढतो. हे गवत एकमेकांच्या अंगावर फेकले जाते आणि चिखलात खेळण्याचा आनंद लुटला जातो.
सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात, ‘कसबा साळशी’ गावात श्री पावणाई देवालयासमोर ‘भावई’चा वार्षिकोत्सव साजरा होतो. भावईच्या उत्सवाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच आषाढी अमावस्येला, सूर्यास्तानंतर कातरवेळी ‘देसरूढ’ काढली जाते. देसरूढ काढणे म्हणजे दुष्ट शक्तींना बाहेर काढणे. रूढी-परंपरेनुसार, देसरूढीचा मार्ग निश्चित असतो. परडीत पेटता काकडा घेऊन गावातील मंडळी देसरूढ काढण्यासाठी निघतात. गावाच्या सीमारेषेपर्यंत त्यांची धाव सुरू होते. सीमेबाहेर पोहोचल्यावर गावातील दुष्ट शक्तींना बाहेर काढण्याचे गाऱ्हाणे घातले जाते. देसरूढ काढल्यानंतर सारा गाव आनंदी होतो. गावात कोणतेही संकट येणार नाही, असा विश्वास ग्रामस्थांना असतो. त्यानंतर भावईच्या उत्सवाच्या दिवशी घराघरात गोडधोड, तर काही ठिकाणी वडे-सागोतीचा बेत आखलेला असतो. ढोल-ताशांच्या गजरात एकमेकांवर चिखलफेक केली जाते. पावणाई देवालयासमोरच्या मोकळ्या जागेत पुरलेले नारळ कोपराने खोदून शोधून काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात.
मालवण तालुक्यातील निरोम गावात, फोंडकण देवीच्या मंदिरासमोरील प्रांगणात नागपंचमीच्या दिवशी हा उत्सव पार पडतो. येथेही चिखल, पाणी, माती यांचा वापर करून ‘भावय’ खेळ खेळला जातो. गावकरी भक्तिभावाने एकमेकांवर चिखल उडवतात आणि निसर्गात मिसळत हा खेळ साजरा करतात.
‘भल्ली भल्ली भावय’ हा केवळ खेळ नाही, तो गावकऱ्यांच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि परंपरेशी नाते सांगणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. मातीत खेळत, हसत-खेळत कोकणातील लोक आपली ओळख, आपले संस्कार आणि संस्कृती जपतात. आधुनिकतेच्या या लाटेतही अशा परंपरांना कोकणातील लोकांनी जपले आहे, जिवंत ठेवले आहे.
rakeshvijaymore@gmail.com