पूर्वीच्ये चाकरमानी

लालबाग, परळ भागातील चाकरमानी एकेकाळी भारतमाता चित्रपटगृहात घटकाभराच्या मनोरंजनाकरिता गर्दी करायचे. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाण्यावर सणसणीत शिट्टी घालायचे. दीर्घकाळ बंद असलेले भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरू झाले आणि लालबाग, परळमधील अस्तंगत झालेल्या चाकरमान्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...
पूर्वीच्ये चाकरमानी
पूर्वीच्ये चाकरमानी
Published on

मुलखातले गजाली

डॉ. महेश केळुसकर

लालबाग, परळ भागातील चाकरमानी एकेकाळी भारतमाता चित्रपटगृहात घटकाभराच्या मनोरंजनाकरिता गर्दी करायचे. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाण्यावर सणसणीत शिट्टी घालायचे. दीर्घकाळ बंद असलेले भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरू झाले आणि लालबाग, परळमधील अस्तंगत झालेल्या चाकरमान्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...

गिरनीत नायतर पोट्र्समधी कामाक लागलो म्हंजे झील चाकरमानी झालो, अशी पूर्वी पद्धत होती. तेचो नि आपलो जलम धन्य झालो असा गाववाल्यांका वाटायचा. चाकरमानी मुंबयत कोनाच्या पैपावण्याच्या चाळीच्या जिन्याखाली नायतर गॅरेज्यात हवायचो. फाटफटी उठान भायरच्या नळार थंड पानयान न्हावन, चाय नि पाव खावन कामावर जायाचो. रातपाळी आसली तर दिस मावळलो की निघायची. म्हेनत करायची, गाववाल्यांका इसरायचा नाय. देवाधर्माची नि गावच्या उच्छवाची वर्गणी द्येयाची. म्हयन्याचो दोनशे रुपये पगार गावलो तर शंभरची मनीआर्डर करायची. गावाकडे जर कोन मधीच जानारो आसलो तर त्येच्याकडे चायची फकी, सुके बोंबील, म्हेसूरपाक, नि तंबाकू-सुपारी द्येयाची..

चाकरमानी हळूहळू मुंबयत रुळायचो. तेका मुंबयचे सगळे रस्ते, सिनेमाची थेटरा, हटेला पाठ व्हायची जीवाची हौसमौज करूची वाटायची. मग कदीतरी एकादो दोसदार शिग्रेटचा पाकीट फुडे धरून म्हणायचो..

"अरे चिंदरकर, तुम शिग्रेट नही पिता ?"

"नय- मेरेको ठसका लगेगा"

"अरे पयले टाइम लगता है ठसका.. बाद मे अच्छा लगता है.. देखो तुम शिग्रेट नही पिया तो तुमको कोई बंबईवाला नही बोलेगा"

चाकरमानी अखेरीक बंबयवाला व्हायचो. कदीतरी नवटाक मारूक शिकायचो. सगळी यसना प्रमाणात केल्यान तर चार पैशे गाठीक मारून भांडुपला नायतर विरारला खोली घ्यायचो. दारयेत नि झुगारात व्हावत हवलो तर सत्यानास करून घ्यायचो.

तो बगा आकाबायचो धकलो डोळ्यार गागल लावन, हातीत मोठी बॅग घेवन आपल्या केंबळी घराच्या खळ्यात उबो आसा. तेचो ड्रेस बदाललो.. नदार बदालली.. भाषा बदलली

"आये गे आयेऽऽ"

"अगे बायऽ बबन्या तू? अचानक कसो पुता ?"

"बाबा कुठे गमत नाही तो.."

"झाड्याक गेलेत. तू चल भूतुर.. अरे केवडा वजा आणलस ह्या मुंबयसून !"

मग भूतुर जावन बबन्यान ती बगा इल्या इल्या बॅग खोलल्यान. काय काय भायर पडला बगा बॅगेतसून.. आकाबायक नववारी लुगडा, बाबाक धोतराचा पान नि पैरन, दादाक लायटर, ब्रुक ब्रांड चायचे मोठे पुडे, चांदेरकराचे बुंदी लाडू, पारले बिस्किटाचे पुडे, वासाचो हमाम साबुन..

"पुता इतको कित्या खरच करायचो ? किती वस्तू हाडलंस हो..."

"अगे तुजा झील आता चाकरमानी झाला हाय, ह्या लोकांनला कळायला नको ? सगळ्या आवाठाला लाडू वाटून टाक. बोलो बंबईवाला आया है"

ती बगा रोग लागलीहा आकाबायच्या घराकडे. आव्हाठकरी बबन्याची चौकशी करतहत.. तो खय काम करता ?: खोली घितल्यान काय ? आपले पावणे कशे आसत ? मागच्या दंग्यात मुंबय पेटली तेवा काय काय झाला? बबन चाकरमानी आता बबनराव झालेलो आसा. तो मुंबैवालो झालो म्हणजेच तेका जगाचा सगळा ज्ञान झाला हेच्यात शंका नाय.

पावस्कराच्या हटेलात बबन्याभोवती गाववाल्यांची गर्दी आसा. बबन्यान सगळ्यांका चाय भजी मागवल्यान हा. दोन-चार गाववाले ईडये वडतहत. बबन्याच्या हातात बर्कले शिग्रेट दिसताहा. बबनो फकाफक धूर सोडताहा...

'मी काय बोलतो बाप्या, तुला पन मुंबयला यायला पायजे. अरे आता गावामधी हावून काय फायदा नाय. मी बाबुरावच्या संगती त्या टायमाला गेलो आणि त्यामुळा सुधारलो. मुंबै बँकेत प्यूनची नोकरी लावलान मला बाबुरावान. त्येला दर म्हयन्याला जाऊन भेटतो पगार झाल्यावर आनि जाताना मच्छी न्हेतो त्याला आपन. आपुनके उपर उसकी म्हेरबानी हाय. "साला तू काय पन बोल बंबयकी हवाही अलग है. अरे परवा शिद्धिविनायकाला मी पन फाटफटी गेलो होतो तर तिथे कौन बोला मेरे साथ मालूम है? पैचानो... नाय? अरे सबका बाप अमिताभ बच्चन बोला मेरे साथ. मी असा लायनीत खडा होतो तर अचानक दोन-चार पुलीस येवन 'बाजू हटो बाजू हटो' करायला लागले.. माजी खोपडीच सणाकली. मी म्हटला, "क्यूं ? हम रातभर खडा है इधर लाईन मे?"

"शानपत्ती मत करो, व्हीआयपी आ रहे है.."

"भगवान के सामने कोई व्हीआयपी बीआयपी नही, सबका मालिक एक."

आयला पाठीवर हात कोनी ठेवला म्हणून वळून बगतो तर कोण? अरे अपना लंबू ! मला बोलतो, "आपका कहना सही है. लेकिन हम लाईन मे खडे रहे तो बहुत भीड होगी इधर और फिर सबको तकलीफ होगी..."

आयला माजे तर होश उडाले. तो सरळ माज्यापाठी लायनीत खडा ऱ्हायला. अखेरीस मीच म्हटला, "आप आगे जाईये बच्चनसाब. कोई वांदा नही. हम बाद मे दर्शन कर लेंगे.."

आता बबन्याचे वळखी नि म्हशीचे बुळकी सारखेच ह्या गाववाल्यांका म्हायती आसता पण तेच्या समोर कोण बोलत नाय. भेटलो तुका अमिताभ तर भेटलो, आमच्या बापाशिचा काय जाता ! 'तू बंडला मारतहस बबन्या,' असा कोन म्हणत नाय. कारण की बबनो नाराज झालो तर फुकटची चाय नि भजी मिळनार नाय.

अशे हे पूर्वीचे चाकरमानी रजेर इले काय गावात आठ-पंधरा दिवस हवायचे. आजूबाजूच्या गावातल्या पावण्यांकडे बिस्किटाचे पुडे घेवन जायचे. गावातल्या वळखीच्या पाळखीच्या सगळ्यांकडे जावन भायरले भुतुरले चौकशे करायच्ये. रोज माशे-मटना खावन गजाली छाटीत बसायचे. गाववाले त्येंका हरभऱ्याच्या झाडार चढवायच्ये. हे चडायच्ये. बबन्याक बबनराव, बाळग्याक बाळासाहेब, सोमग्याक सोमाजी, नि गोमग्याक गोमाजी म्हणायचे. चाकरमान्यांचे खिशे मोठेपणाच्या नादात बढायके मारीत खाली व्हायाचे. मुंबयक जावचो दिवस उजवाडलो की चाकरमानी गावातल्या बाबी शेटकडे जाणार नि म्हणणार. बाबीशेठ आज "मुंबईला चाल्लो.. आमच्या म्हातारीला खात्यावर जिन्नस देत चला.."

"हां.. पण मागच्या हिशोबातले ह्या पावटी पाचशेच दिलात. आजून ३०० बाकी आसत"

"वांदा नाय. मुंबईला गेल्यावर पाठवून देतो"

"हां ता झालाच. चाकरमानी देणारो आसल्यार आमका काळजी कसली."

"आता कसा बोललास ! जरा उताराची नड आहे. दीडशे द्या"

"नाय पण एकदम दीडशे म्हणजे.."

"ह्या घड्याळ ठेवा ना घानवटीक. फुडच्या पावटी चौथीला येईन तेवा सोडवून घेतो."

नको नको म्हणत बाबीशेठ घड्याळ ठेवून घेयाचो नि चाकरमान्याची उताराची नड भागायची. मग तेका बोटीर नायतर एसटीवर सोडूक घरातली नि गावातली मानसा येयाची. बोट नायतर एसटी सुटली नि आपली मानसा अंदुक अंदुक दिसाक लागली की चाकरमानी हळुच खिशातना रुमाल काडायचो नि आपल्या डोळ्यांक लावायचो.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

mahesh keluskar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in