

विचारभान
संध्या नरे-पवार
ज्येष्ठ साहित्यिक, स्त्रीवादी अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील सजग कार्यकर्त्या उर्मिला पवार यांना ७ मे रोजी ८० वर्षं पूर्ण झाली. हा केवळ एक ‘वाढदिवस’ नव्हता, तर जवळपास साठ वर्षांहून अधिक काळ सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रात सजगपणे कार्यरत असलेल्या स्त्रीने काळावर उमटवलेली ती मोहोर होती, आम्हीही इतिहास घडवला हे सांगणारी!
आपल्या बायकांच्या पुड्या करून घरी ठेवायच्या आणि इथे कार्यक्रमाला यायचं, हे योग्य नाही. याने समाजात बदल घडणार नाही.’
ज्येष्ठ साहित्यिक उर्मिला पवार यांचं हे वाक्य आजही कानात जसंच्या तसं आहे आणि हे वाक्य उच्चारतानाचा त्यांचा तो संतप्त चेहरा, त्यांचे ते जोरकस हातवारे...त्यांचे शब्द ऐकले आणि त्या शब्दांसह हे संपूर्ण दृश्य जसंच्या तसं मनात फ्रिज झालं. आज चाळीशी-पन्नाशीत असलेल्या माझ्यासारख्या स्त्रियांना पुस्तकं वाचून, सिद्धान्तनं वाचून जेवढा स्त्रीवाद, समतावाद कळला त्यापेक्षा अधिक या आमच्या ज्येष्ठ फुले-आंबेडकरी आयांकडून-भगिनींकडून तो कळला. तोही साध्या-सोप्या थेट शब्दांत. अकादमिक क्लिष्टता टाळून.
नव्वदीच्या दशकातला कोणता तरी सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम होता. उर्मिलाताई वक्त्या होत्या. मी पत्रकार म्हणून कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमाला अर्थातच पुरुषांची संख्या जास्त होती. नेहमीप्रमाणे स्त्रिया मोजक्याच होत्या. उर्मिलाताईंनी स्त्रियांची ही अनुपस्थिती अचूक हेरली आणि आपल्या व्याख्यानाचा मुख्य विषय बाजूला ठेवून स्त्रियांच्या या अनुपस्थितीवरच त्यांनी सडेतोड प्रहार केला. उपस्थित पुरुष तिथे एकटेच आले होते. त्यांची जोडीदार स्त्री, पत्नी, घरातील आई-बहीण अशा इतर स्त्रिया तिथे नव्हत्या. त्या घरी घरकामात, घर सांभाळण्यात व्यस्त होत्या. कारण व्यवस्थेने, परंपरेने घरकामाची जबाबदारी स्त्रीच्या माथ्यावर ठेवली होती आणि कार्यक्रमाला एकट्या आलेल्या पुरुषांनी कामाची ती परंपरागत विभागणी जणू मान्य केली होती. उर्मिलाताई आपल्या विधानातून हे समाजवास्तवच अधोरेखित करत होत्या. वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना येणारे पुरुष जोवर आपल्या जोडीदार स्त्रीला, घरातल्या इतर स्त्रियांना या अशा वैचारिक-सांस्कृतिक भान देणाऱ्या कार्यक्रमांना घेऊन येत नाहीत तोवर समाजात बदल घडणार नाही, पुरुषसत्ताक व्यवस्था बदलणार नाही, हे उर्मिलाताई उपस्थित पुरुष कार्यकर्त्यांना सांगत होत्या.
स्त्रीने कसं ‘प्रेमळ’, ‘हसतमुख’ असावं, ‘गोडगोड’ बोलावं या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या आणि त्या व्यवस्थेची पुरुषप्रधान मूल्य मानणाऱ्या मंडळींच्या अपेक्षा असतात. पण उर्मिलाताईंसारख्या वैचारिक बांधिलकी अधिक मोलाची मानणाऱ्या कणखर स्त्रिया व्यवस्थेच्या या अपेक्षांच्याच पुड्या बांधतात आणि बायकांच्या पुड्या बांधून घरी का ठेवल्या आहेत? असा प्रश्न विचारतात. कारण त्यांना प्रेम असतं ते समतावादी विचारव्यवहाराचं, त्यांना गोडवा हवा असतो तो भेदभावविरहित जगण्याचा. हे असं जगणं अस्तित्वात येऊन सगळ्या दीनदुबळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, ही अपेक्षा असणारी स्त्री प्रसंगी संतप्त होत न्यायाची अपेक्षा करते. खोटं हसू, खोटी प्रसन्नता ती नाकारते. पहिल्या पिढीतल्या उर्मिलाताईंसारख्या स्त्रियांनी खोटे हसू आणि खोटी प्रसन्नता यावर उभारलेली पुरुषसत्ताक रचना नाकारली म्हणूनच पुढच्या पिढीतल्या आम्हा स्त्रियांचा सार्वजनिक अवकाशातील वावर अधिक सहज झाला.
उर्मिलाताईंच्या संतप्तपणाचा, न्यायासाठी झगडण्याचा स्वभाव तसा जवळच्या वर्तुळातल्या सगळ्यांच्या परिचयाचा असला तरी उभ्या महाराष्ट्राने आणि अगदी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यानेही त्यांच्या या तळपत्या रागाचं दर्शन घेतलेलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ती आणि अभ्यासक या त्यांच्या सगळ्या ओळखी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एकत्रितपणे उभ्या होत्या. खैरलांजी हत्याकांडाचा, भोतमांगे कुटुंबातील महिलांवर झालेल्या निर्मम बलात्काराचा जाब मागत होत्या. खैरलांजी हत्याकांडाची बातमी आली आणि ८ ऑक्टोबर २००६ ला मुंबईतल्या आंबेडकरी चळवळीतल्या विविध वयोगटातल्या सगळ्या महिला एकवटल्या. उर्मिला पवार पुढे होत्याच. अगदी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरही सोबतच्या तरुण मुली खालून वर येईपर्यंत त्या जाऊन आधी धडकल्या. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधून आंबेडकरी लेकींची ही ताकद महाराष्ट्रभर पोहोचली. आता खूप झालं, गप्प बसून अत्याचार सहन करणार नाही, हा संदेश दिला गेला. अर्थातच पोलिसांनी या साऱ्याजणींना अटक केली. अगदी मारझोड करत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून त्यांना खाली आणण्यात आलं. यात अनेकींना चांगलीच दुखापत झाली. उर्मिलाताईंचा खांदाही भिंतीवर आपटला. साऱ्याजणींना एक दिवसाचा तुरुंगवास घडला. पण या सगळ्या भीमाच्या लेकी.. न घाबरणाऱ्या, न डरणाऱ्या... या प्रसंगीही उर्मिलाताईंचं वेगळं वैशिष्ट्य दिसून आलं. या आंदोलक स्त्रियांमध्ये ‘ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार’ आहेत हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एव्हाना कळलं होतं. वरून, मंत्रालयातून त्यांना तसा फोन आला होता. त्यांनी उर्मिलाताईंना केबिनमध्ये बोलवून तुम्हाला सोडतो, तुम्ही घरी जा, असं सांगितलं. तेव्हा उर्मिलाताईंनी ठामपणे नकार दिला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं, ‘आम्ही भोतमांगे कुटुंबासाठी न्याय मागायला आलोय. गुन्हेगारांना शिक्षा द्या, त्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही.’ तरीही इतर आंदोलक महिलांपासून त्यांना वेगळं काढलं गेलं तेव्हा त्या उपोषणाला बसल्या. ‘साहित्यिक’ म्हणून मिळणारा हा विशेष सन्मान त्यांनी असा हट्टाने नाकारला आणि ‘आंबेडकरवादी आंदोलक महिला’ ही आपली ओळख राज्यसत्तेला स्वीकारायला लावली. त्यावेळी उर्मिलाताई जर पोलिसांचं ऐकून आंदोलन अर्धवट टाकून घरी गेल्या असत्या तर उर्वरित आंदोलक महिलांना अधिक मारहाण झाली असती, आंदोलनाचं बळ गेलं असतं. राज्यसंस्थेचा कावा यशस्वी झाला असता. भीमाच्या या लेकीला ही जाण होतीच, त्यामुळेच सोबतच्या महिलांचे हात हातात घेऊन त्या ठाम उभ्या राहिल्या.
हाच ठामपणा पुरस्कार वापसीच्या आंदोलनाच्या वेळीही कायम होता. २०१४ नंतर देशातील वातावरण बदलू लागलं. साहित्यिक एम. एस. कलबुर्गी, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या होत्या. दादरी इथे गोमांस खाण्याच्या आरोपावरून झालेले मुस्लिम हत्याकांड, हरयाणामध्ये दलित कुटुंबाला जाळून मारण्याची घडलेली घटना, या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनी एकत्र येत आपले पुरस्कार राज्य सरकारला परत देण्याचा निर्णय घेतला. साहित्यिक व कार्यकर्ती असलेल्या उर्मिलाताई मागे राहणं शक्य नव्हतं. त्यांनीही आपले पुरस्कार परत दिले. केरळमधील शबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशबंदीविरोधात मुंबईत स्त्री संघटनांच्या पुढाकाराने स्त्रियांची भिंत उभारण्याचे आंदोलन झाले. त्यातही अर्थातच उर्मिलाताई आघाडीवर होत्या. वेगवेगळ्या आंदोलनांमधील उर्मिलाताईंचा सहभाग हा त्या आंदोलनाचे बळ वाढवणारा असतो. १९९६ मध्ये मुंबईत दलित चळवळीतल्या स्त्रियांनी २५ डिसेंबरला मनुस्मृतीदहनाचा कार्यक्रम घेतला होता. घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृतीचं दहन केलं होतं. म्हणून २५ डिसेंबर हाच भारतीय स्त्रीमुक्तीदिन म्हणून साजरा व्हावा, ही मागणी विदर्भातल्या प्रमिला लीला संपत यांनी पहिल्यांदा केली. त्यानंतर मुंबईतल्या स्त्रियांनीही ही मागणी उचलून धरत विषमतावादी मनुस्मृतीच्या दहनाचा कार्यक्रम घेतला. त्यातही उर्मिलाताईंनी हिरिरीने सहभाग घेतला होता. आजच्या काळाच्या संदर्भात या घटनेकडे मागे वळून पाहिलं तर त्यातलं द्रष्टेपण दिसून येतं. आज जे मनुवादी सांस्कृतिक राजकारण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ही कृती अधिक झळाळून उठते.
उर्मिलाताईंमधील कार्यकर्ती त्यांच्यातल्या लेखिकेलाही व्यापून उरते. त्यामुळेच त्यांच्यावर लिहिताना आपसूक हे असे आंदोलनाचे, विद्रोहाचे क्षण डोळ्यासमोर येतात. फार कमी लेखकांच्या बाबतीत हे असं घडतं. म्हणूनच २०१२ मध्ये विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होण्याचा बहुमानही उर्मिलाताईंना मिळाला. कोकणातल्या खेडेगावात जन्माला आलेली, पूर्वास्पृश्य जातीतील एक मुलगी ते मुंबईसारख्या शहरात एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कथा लिहिणारी लेखिका..हा एक दीर्घ आणि कोकणातल्या रस्त्यांसारखाच उंचसखल वळणावळणाचा प्रवास होता. ‘सहावं बोट’ हा उर्मिलाताईंचा पहिला कथासंग्रह १९८८ साली प्रसिद्ध झाला, तर मागोमाग १९८९ मध्ये ‘चौथी भिंत’ हा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. मधल्या काळात १९९४ मध्ये ‘मॉरिशस एक प्रवास’ हे प्रवासवर्णन त्यांनी लिहिलं. ‘हातचा एक’ हा आणखी एक कथासंग्रह २००४ मध्ये प्रसिद्ध झाला. पण सर्वाधिक गाजलं ते त्यांचं ‘आयदान’ हे आत्मचरित्र. २००३ मध्ये ते प्रसिद्ध झालं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या आत्मचरित्राची दखल घेतली गेली. अनेक पुरस्कार या ग्रंथाला मिळाले.
‘आयदान’ म्हणजे बांबूपासून तयार केल्या जाणाऱ्या सुपं, रोवळ्या, परड्या, करंडे यासारख्या वस्तू. कोकणात महार जातीचा हा परंपरागत व्यवसाय होता. उर्मिलाताईंच्या आई ही आयदानं तयार करायच्या. आईच्या हातात अखंड फिरणारं आयदान आणि आपलं लेखन यांची वीण एकच आहे, असं उर्मिलाताईंना वाटलं आणि आपल्या आत्मचरित्राचं नाव त्यांनी ‘आयदान’ असं ठेवलं. उर्मिलाताईंसारखी लग्नानंतर संघर्ष करत शिक्षण घेणारी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारी शहरी, नोकरदार स्त्री जेव्हा मागे वळून आपल्या आयुष्याकडे बघते, त्यावेळी तिच्यासमोर खेडेगावातलं आपलं बालपण असतं, त्या बालपणाला व्यापून राहिलेल्या वेगवेगळ्या नात्यातल्या स्त्रिया असतात, त्यांची मूक दु:खं असतात. या दु:खांमध्ये जातव्यवस्थेने केलेलं शोषण आहे, तशीच पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेली गळचेपीही आहे. ‘आयदान’मधून हे सारं जगणं उर्मिलाताईंनी कोणतीही लपवाछपवी न करता जसं घडलं तसं आणि अगदी त्याच वास्तव भाषेत मांडलं. उगाच तुपात घोळलेल्या भाषेचा सोवळेपणा उर्मिलाताई पाळत नाहीत. अर्थात त्यांची ही भाषा, कोणतीही लपवाछपवी न करता तत्कालीन दलितांचं जीणं मांडणं हे काहींना आक्षेपार्ह वाटलं. तशी टीकाही काहींनी केली.
मुळात आयुष्यभराच्या उपेक्षेने, शोषणाने दलित स्त्रीची भाषा ही अशी चरचरीत झालेली आहे. गुळमुळीत शब्दांच्या आवरणाखाली ती झाकणं म्हणजे दलित स्त्रीचं दु:खच झाकण्यासारखं आहे. मग आत्मभान आलेल्या लेखिकेला ही झाकपाक कशी मान्य होणार? उर्मिलाताईंनी आपल्या सर्जनशील लेखनातही ही अशी झाकपाक मान्य केली नाही. लैंगिक अभिव्यक्तीचे जे प्रसंग होते ते त्यांनी त्याच शब्दांमध्ये मांडले. ‘चोळीतले आंबे’ या त्यांच्या कथेवर अश्लिलतेचा आरोप झाला होता. रस्त्यावर मोलमजुरी करणाऱ्या स्त्रीसाठी अनेकदा उघडीनागडी भाषा हे एक शस्त्र असतं. तिच्या त्या शस्त्राने समोरचा पुरुष गांगरतो, पुढचा रस्ता धरतो. पण दलित स्त्रीच्या जगण्याचा आधार असलेली ही भाषा, त्याचा कथेतला वापर मध्यमवर्गीय साहित्याला अश्लील वाटला. यासंदर्भात एका मुलाखतीत उर्मिलाताईंनी सांगितलं होतं, “भाषेपेक्षाही ही भाषा एका स्त्रीने लिहावी हे त्यांना मान्य नाही. स्त्रीचं लेखनही कसं मर्यादशील हवं, अशी ही परंपरागत ब्राह्मणी अपेक्षा आहे.”
जिथे जिथे सामाजिक विसंगती दिसेल त्यावर प्रहार करणं हा उर्मिलाताईंचा स्वभाव आहे. त्यांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचा तो भाग आहे. त्यामुळेच आयुष्यभर त्या कार्यरत आहेत. पुरोगामी असणं ही शिवी झालेल्या आजच्या काळात त्या सातत्याने विविध प्रश्नांवर भूमिका घेत आहेत. हे सारं कशाच्या बळावर? तर निळ्या विचारांचं जे आभाळ सोबतीला आहे त्याच्याच बळावर. म्हणूनच एक दुर्मिळ बाब उर्मिलाताईंच्या लेखनाच्या संदर्भात घडलेली आहे. ती म्हणजे, एकाच व्यक्तीची दोन आत्मचरित्रं असणं. २००३ मध्ये ‘आयदान’ हे त्यांचं पहिलं आत्मचरित्रं प्रसिद्ध झालं. यात प्रामुख्याने त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचा कौटुंबिक संघर्ष आणि त्यांचा स्त्रीवादी चळवळीतील सहभाग आलेला आहे. पण २००३ ते २०२५ या काळात त्यांचा सार्वजनिक अवकाशातला वैचारिक हस्तक्षेप अधिक वाढला. या काळात ‘आयदान’ या आत्मचरित्राचा ‘द विव्ह ऑफ माय लाइफ’ या नावाने इंग्रजीत अनुवाद झाला होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहित्यिक परिषदांमधला उर्मिलाताईंचा वावर वाढला होता. त्यामुळे त्यांच्या या वैचारिक हस्तक्षेपालाही एक वजन प्राप्त झालं होतं. शिवाय हा सगळा काळ सामाजिकदृष्ट्या धार्मिक असहिष्णुतेच्या दिशेने जाण्याचा. त्यामुळेच उर्मिलाताईंच्या नजरेतून या काळाची नोंद होणं आवश्यक होतं. या रेट्यातून ‘निळे आभाळ सोबतीला’ हे त्यांचं दुसरं आत्मचरित्र आकाराला आलं आणि गेल्याच वर्षी जुलै २०२४ मध्ये ललित पब्लिकेशनने त्याचं प्रकाशन केलं. उर्मिलाताईंचं हे दुसरं आत्मचरित्र म्हणजे या काळाचा सामाजिक दस्तावेज आहे.
‘आयदान’च्या शेवटी उर्मिलाताईंनी लिहिलं आहे, “शेवटच्या बसने परतताना पार अंधारून आलं होतं. रिकाम्या खडखडत्या बसच्या खिडकीत बसून मी बाहेरच्या काळोखात बघत होते. वहिनीच्या चुलीमागचा देव्हारा डोळ्यांसमोरून हलत नव्हता. बुद्धाच्या विज्ञान आणि परिवर्तनवादात मनाचा पतंग भिरभिरत होता. बाबासाहेबांनी मनाला लागलेली अंधश्रद्धेची जळमटं झटकून टाकली. त्या घटनेला फारशी वर्षं झालेली नाहीत. माणसं पुन्हा त्याच फसव्या, फुसक्या धाग्यात गुरफटत-सरपटत जातायत याची भीतीच वाटली.”
भीती वाटावी असा काळ आज सभोवताली आहे. माणसं पुन्हा एका आभासी जगात रममाण होत आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा यांची बेमालूम सरमिसळ होत त्यांची जाळी मेंदूभोवती विणली जात आहेत. जात-धर्म आणि बाजार एकत्र येत माणसाच्या जाणिवा बधिर करत आहेत. अशा काळात उर्मिलाताई आपल्या सामाजिक आयुष्यातील संघर्षाची मांडणी करत निळे आभाळ सोबतीला आहे, असा दिलासा देत आहेत. संघर्षासाठी साद घालत आहेत.
sandhyanarepawar@gmail.com