विभूतीपूजनाचा भोवरा

भारतीय समाजात श्रद्धा, भक्ती आणि विभूतीपूजनाला विशेष स्थान आहे. संकटाच्या काळात माणूस मानसिक आधारासाठी आश्रम, सद्गुरू आणि कर्मकांडांकडे वळतो; मात्र हाच आधार कधी कधी शोषणाचे साधन ठरतो. शफी काझी यांची भोवरा ही साहित्यकृती श्रद्धेच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या आश्रमव्यवस्थेतील अनैतिकता, फसवणूक आणि मानवी शोषणाचे वास्तव चिकित्सकपणे उलगडते.
विभूतीपूजनाचा भोवरा
Published on

रसास्वाद

डॉ. आदित्य देसाई

भारतीय समाजात श्रद्धा, भक्ती आणि विभूतीपूजनाला विशेष स्थान आहे. संकटाच्या काळात माणूस मानसिक आधारासाठी आश्रम, सद्गुरू आणि कर्मकांडांकडे वळतो; मात्र हाच आधार कधी कधी शोषणाचे साधन ठरतो. शफी काझी यांची भोवरा ही साहित्यकृती श्रद्धेच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या आश्रमव्यवस्थेतील अनैतिकता, फसवणूक आणि मानवी शोषणाचे वास्तव चिकित्सकपणे उलगडते.

भारतीय समाज विविध भक्ती संप्रदायाने प्रभावित झालेला आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर भक्ती परंपरेचे वैविध्य जाणवते. या सर्वांना सामावून घेणारा धर्म अद्याप निर्माण झालेला नाही, मात्र हिंदू धर्माच्या सावलीखाली बहुतांशी भक्ती संप्रदाय निर्माण झालेले असल्यामुळे किंबहुना विभूतीपूजनाचे संस्कार हिंदू धर्मीयांवर लहानपणापासून झालेले असल्यामुळे जेव्हा संकटांचे डोंगर दिसू लागतात तेव्हा पंथ, संप्रदायांनी निर्माण केलेल्या कर्मकांडांमध्ये सर्वसामान्य हिंदू स्वतःला गुंतवून घेताना दिसतात. संकटावर मात करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ निघून जाण्यासाठी स्वयंसंमोहनातून मार्ग सापडत जातो. हे स्वयंसंमोहन केवळ भक्तीतून निर्माण होत नाही तर त्यासाठी निश्चितच एखाद्या मार्गदर्शक विभूतीची आवश्यकता असते. पूर्वापार चालत असलेल्या कर्मकांडांचे बदलते स्वरूप हे अशा प्रकारच्या स्वयंघोषित सद्गुरूंनी आणि त्यांच्या अनुयायांनी निर्माण केलेले असते. काही अंशी ही कर्मकांडे मनावरील ताण हलका करण्यासाठी आणि संकटाचा विचार मनातून दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात, परंतु या सद्‌गुरूंच्या आश्रमामध्ये किंवा मठामध्ये कायमचे अडकून पडणाऱ्यांना या आश्रमव्यवस्थेतील भ्रष्ट आणि अनैतिक प्रकारांचे बळी ठरावे लागते. पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली आश्रयाला आलेल्या पथिकाला झाड पावसापासून थोडासा दिलासा देते. मात्र पाऊस ओसरल्यानंतरही झाडाखाली उभे राहिल्यास त्याच झाडाच्या पानांवरील पाणी त्या पथिकाला भिजवते. याप्रकारे आश्रमात काही कारणास्तव आश्रयास गेलेल्या व्यक्तीने वेळीच आश्रमापासून दूर जाऊन आपल्या मूळ कर्मामध्ये स्वतःला व्यग्र करणे गरजेचे असते.

शफी काझी यांची 'भोवरा' ही साहित्यकृती अशाचप्रकारचा आशय भाष्यस्वरूपात मांडते. रघुवीर मंडपे या मुंबईतील नोकरदार व्यक्तीचा रघुवीरबाबापर्यंतचा प्रवास हा या साहित्यकृतीचा पूर्वार्ध आहे, तर त्यानंतरच्या उत्तरार्धात रघूवीरबाबाच्या आश्रमातील गैरव्यवहाराचे वर्णन करीत आश्रमातील न्यायप्रविष्ट गुन्ह्याची घेतली गेलेली दखल आणि त्यातून सोयीस्कररीत्या स्वतःला सोडवून घेणारे धनाढ्य यांचे वर्णन केलेले आहे. प्रस्तुत साहित्यकृती कथनपरतेच्या वर्णन आणि भाष्याचा तुलनात्मक वापर अधिक करताना दिसते. तृतीय पुरुषी निवेदन तंत्राचा वापर केलेला असल्यामुळे यात निवेदकाची कालसापेक्ष आणि भविष्यवेधी विधाने महत्त्वाची ठरणारी आहेत. या साहित्यकृतीमध्ये संवाद तंत्राचा वापर केलेला नसल्यामुळे यातील पात्रांच्या मनातील भाव व्यक्त करण्याची जबाबदारी निवेदकाने घेतलेली आहे. या दृष्टीने ही साहित्यकृती पूर्णपणे लेखकाने निर्माण केलेल्या सर्वसाक्षी निवेदकाची अर्थात लेखकाचीच ठरते.

एका मोठ्या यंत्रणेमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा काही संधीसाधू शिरतात तेव्हा ती यंत्रणा ते पोखरून टाकतात. स्वतःच्या सोयीसाठी ते यंत्रणेतील कच्चे दुवे समजून घेतात. आपल्याला हवा असलेला स्वार्थ साधताना त्याच्या अडचणीही समजून घेतात. व्यवस्थेतील गरज ओळखून यंत्रणेचा हवा तसा वापर करतात. अशा व्यक्ती व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून राहतात. तसेच यंत्रणेतील महत्त्वाच्या व्यक्तीपर्यंत आपले कृष्णकृत्य पोहचणार नाही याचीही काळजी घेतात. भोवरा ही साहित्यकृती आश्रमात मनःशांतीसाठी आलेल्या भाविकांच्या व्यथा आणि गरजा समजून घेऊन त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या सदाशिव डोईफोडे या पात्राच्या गुन्ह्यांचे तपशिलात वर्णन करणारी आहे.

गुरमीत राम रहीम सिंग याचे उदाहरण देत लेखकाने या साहित्यकृतीचा विषय आणि आशयसूत्र वाचकासमोर स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे साहित्यकृतीचे कथानक म्हणजे एका विभूतीपूजन करणाऱ्या आश्रमव्यवस्थेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची उकल करणे असा आहे. असे असले तरी ही साहित्यकृती कुतूहल, गूढचिकित्सा, शोधकार्य असे रूप धारण करीत नाही, तर ती सुरुवातीसच डोईफोडे या पात्राच्या गुन्हेगारी वृत्तीचे आणि त्याच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचे वर्णन करते. त्यामुळे निवेदक नवनव्या पात्रांचे वर्णन करताना ते पात्र डोईफोडेची कशी शिकार बनले आहे याचे वर्णन करतो. यात सुरेखा सुलाखे, कुसूम काळे, शांताबाई, रबिया अख्तर, प्रतिभा जोशी, शीला कुलकर्णी नाईक, सुषमा पांडे अशी पात्रे कथाशयात सामील होतात, पण त्यांचे होणारे शोषण हे वाचकाला पूर्वसूचना स्वरूपात निवेदकाने आधीच स्पष्ट केलेले असल्याने प्रत्येक नवे पात्र हे नव्या तपशील स्वरूपात साहित्यकृतीमध्ये अवतरते.

प्रस्तुत साहित्यकृती ही कथनात्मक असल्यामुळे ती कथासूत्र मांडणारी आहे, ती दीर्घ स्वरूपात असल्यामुळे कादंबरीचा आवाका व्यक्त करणारी आहे. संवादात्मक नसल्यामुळे आणि तपशिलाचे सूत्र पुढे नेणारी असल्यामुळे या साहित्यकृतीला रिपोर्ताज या प्रकाराचे रूपही प्राप्त झालेले दिसते. यादृष्टीने विचार केल्यास प्रस्तुत साहित्यकृतीला रिपोर्ताज कादंबरी म्हणणे उचित ठरेल.

धर्माच्या नावाखाली लपून भाविकांच्या भावनांशी खेळणारी व्यवस्था केवळ धर्माला लांच्छन लावत नाही तर एकूणच नैतिकतेच्या सर्व संस्कारांचे संदर्भ बदलून टाकत असते. भोवरा ही साहित्यकृती मानवी जीवनातील संघर्षात आमिषाला बळी पडून गर्तेत खोल अडकत जाणाऱ्या मानसिकतेचे वर्णन करणारी आहे. वासनाविकार जेव्हा अतिरेक साधतो तेव्हा तो अधःपतनाला कारणीभूत ठरत असतो. विशेषतः स्त्रियांच्या शोषिक, श्रद्धामय आणि समर्पण भावनेचा जेव्हा गैरफायदा घेतला जातो तेव्हा त्यांच्या एकूणच जीवनाच्या सर्व अंगांकडे पाहण्याच्या भूमिका बदलतात. स्त्री-पुरुष नातेसंबंधातील आत्मियता संपून आक्रमक वासनांध आणि उपयुक्ततावादी मानसिकता समाजात रुजतात तेव्हा कोणताही धर्म, संप्रदाय, रूढी, परंपरा या बदलणाऱ्या आपमतलबी समाजाचे नेतृत्व करू शकत नाही. प्रस्तुत साहित्यकृती केवळ अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण आणि फसवणुकीबाबतची गुन्हेगारी तपशिलासह मांडत नाही तर यापल्याड असलेल्या जीवन जाणिवा, नातेसंबंध, अपेक्षित सामाजिक बदल व्यक्त करते.

लेखक एक प्रतिथयश वकील असल्यामुळे तसेच सामाजिक कार्यक्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांना दिसत असलेले वास्तव आणि त्यांना अपेक्षित असलेले समाजाचे रूप त्यांनी साहित्यकृतीत साकारलेले आहे. त्यांच्या लेखनशैलीनुसार एक नवा साहित्यप्रकार निर्माण होऊ घातलेला आहे. टिपणात्मक आणि रिपोर्ट सादरीकरणात्मक कथनशैली असा याचा उल्लेख करता येऊ शकतो. या दृष्टीने त्याच्या भविष्यातील लेखनप्रवासास शुभेच्छा...

logo
marathi.freepressjournal.in