बिहार राज्याची ‘राष्ट्रीय निवडणूक’

बिहार राज्याची निवडणूक स्थानिक पातळीवर तेजस्वी यादव आणि नितीश कुमार लढवत असले तरी प्रत्यक्षात त्यात वेगवेगळी समीकरणे मांडून तिला आकार देण्याचे काम राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी व अमित शहा आणि राहुल गांधी करत आहेत. जातवादाला एक नवे रूप दिले जात आहे.
बिहार राज्याची ‘राष्ट्रीय निवडणूक’
Published on

दृष्टिक्षेप

प्रकाश पवार

बिहार राज्याची निवडणूक स्थानिक पातळीवर तेजस्वी यादव आणि नितीश कुमार लढवत असले तरी प्रत्यक्षात त्यात वेगवेगळी समीकरणे मांडून तिला आकार देण्याचे काम राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी व अमित शहा आणि राहुल गांधी करत आहेत. जातवादाला एक नवे रूप दिले जात आहे. हिंदुत्व आणि विकास व राष्ट्रवाद यांच्याकडे निवडणूक मेरिट म्हणून पाहिले जात आहे. बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये होणारे वेगवेगळे प्रयोग राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी निवडणुकीबद्दलची आपापली प्रारूपे मांडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेचे आणि जनतेच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करणे या गोष्टीला मध्यवर्ती ठेवले होते. विशेषत: जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी न्याय आणि बंधुभावाचे राजकारण करण्याची संकल्पना त्यांनी अधोरेखित केली होती. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निवडणूकविषयक संकल्पना वेगवेगळ्या होत्या. परंतु काँग्रेस पक्ष जनतेचे प्रतिनिधित्व करेल, अशी त्यांची धारणा होती. त्याबरोबरच त्यांची धारणा ‘स्वातंत्र्य चळवळ’ या अर्थाने राष्ट्रवादाची होती. विशेषतः सरदार वल्लभभाई पटेल हे उमेदवार निवडणे, निवडणुकीसाठीचा निधी उभारणे आणि प्रचार करणे या निवडणुकीशी संबंधित गोष्टी कौशल्याने हाताळत होते. आजच्या भाषेत या तीन गोष्टींना ‘निवडणूक मेरीट’ म्हटले जाते. या प्रक्रियेपासून आजच्या बिहार निवडणुकीपर्यंत निवडणूक प्रक्रिया ही खूपच बदलत आली आहे. विशेषतः निवडणूक मेरीट महत्त्वाचे ठरले आहे. निवडणूक मेरीट भारतीय राज्यकर्त्यांच्या आता अंगवळणी पडले आहे. या प्रक्रियेतून आज ‘हिंदुत्व’, ‘विकास व राष्ट्रवाद’ यांच्याकडे ‘निवडणूक मेरीट’ म्हणून पाहिले जात आहे. हाच प्रयोग आज बिहारच्या निवडणुकीमध्ये केला जात आहे.

राष्ट्रीय व्यूहरचना : बिहारचे राजकारण नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशा दोन गटांमध्ये राज्यपातळीवर विभागलेले आहे. या राजकारणाचा एक भाग अतिमागासांचे राजकारण आणि दुसरा भाग ओबीसींचे राजकारण हा आहे. परंतु सध्या बिहारच्या निवडणुकीमध्ये अतिमागासांचे प्रतिनिधी नितीश कुमार ओबीसींना आपल्या पक्षात सामावून घेत आहेत. तसेच ओबीसींचे नेते तेजस्वी यादव अतिमागासांना आपल्या पक्षात स्थान देत आहेत. ही बिहारची बदललेली सामाजिक परिस्थिती आहे. परंतु या सामाजिक परिस्थितीतून बाहेर पडून राष्ट्रीय पातळीवरून निवडणुकीची एक व्यूहरचना आखली जात आहे. विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बिहारची निवडणूक हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनवलेला आहे. यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नितीश कुमार, चिराग पासवान, मांझी अशी एक व्यापक एनडीए आघाडी उभी केली आहे. उच्च जातींची संख्या दहा टक्के आहे. परंतु भाजपने ३७ टक्के उमेदवार उच्च जातीतील दिले आहेत. तसेच नितीश कुमार, चिराग पासवान, मांझी यांचे सामाजिक आधार मागास समूहातील आहेत. थोडक्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उच्च जाती आणि मागास जाती यांचा एक सामाजिक समझौता घडवलेला आहे. यावर नियंत्रण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आहे. म्हणजेच थोडक्यात वरवर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली दिसते. परंतु प्रत्यक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे.

इंडिया आघाडी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. परंतु तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने जाहीर केले. तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत, अशी भूमिका आधीच घेतली आहे. परंतु राहुल गांधी आणि काँग्रेसने त्यांना शेवटी शेवटी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केले. या सर्व प्रक्रियेत डावे पक्ष काँग्रेसबरोबर होते. तसेच राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ‘मतदार फेरतपासणी मोहीम’ (एसआयआर) याविरोधात एक मोठे अभियान राबविले. विशेषतः बिहारमधील जनतेने त्यांच्या अभियानाला प्रतिसाद दिला. हे अभियान राष्ट्रीय पातळीवरील आहे. निवडणुकीत बिहारमधील नेते कृतिशील दिसतात. परंतु राष्ट्रीय पातळीवरून बिहारच्या निवडणुकीला आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अर्थाने बिहारची निवडणूक आता बिहारची राहिलेली नाही. बिहारची निवडणूक राष्ट्रीय पातळीवरील झाली आहे.

हिंदुत्व विरुद्ध जातवाद (न्याय) : बिहारच्या निवडणुकीमध्ये ‘जातवाद’ (न्याय) हा मध्यवर्ती विषय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात निवडणुकांना सुरुवात झाली तेव्हा राजेंद्र प्रसाद यांनी ‘जातवादा’चा उल्लेख केला होता. जातवाद ही संकल्पना ‘सामाजिक न्याय’ या स्वरूपाने मांडली जात होती. परंतु राजकारणामध्ये ‘जातवाद’ ही संकल्पना जाती-जातींमध्ये वैर आणि द्वेष या अर्थाने वापरण्याची प्रथा नव्याने निर्माण झाली. उदाहरणार्थ, ‘जंगलराज’ ही संकल्पना यादवांचे राज्य आणि अतिमागासांच्या विरोधातील राज्य, अशी धारणा विकसित करते. या गोष्टीचा प्रचार प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपकडून केला जातो. म्हणजेच थोडक्यात सामाजिक न्यायापासून ही संकल्पना जाती-जातींमधील वैर आणि द्वेष या नकारात्मक क्षेत्राकडे ढकलली गेली.‘हिंदुत्व’ ही भाजपची मुख्य विचारसरणी निवडणुकीत जातवादविरोधी भूमिका मांडते. भाजपच्या हिंदुत्वाचा मुख्य कार्यक्रम जातवादी राजकारण मोडून काढणे हा आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना वेगवेगळे केले गेले. यानंतर नितीश कुमार यांच्या जागांमध्ये घट झाली. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे हिंदुत्व ही विचारप्रणाली जातवादापेक्षा जास्त वरचढ झाली. या सर्व प्रक्रियेवर मात करण्यासाठी लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांनी व्यूहरचनेमध्ये मोठे फेरबदल केले.

‘माय’ (एमवाय) प्रारूप : ‘माय’ (एमवाय) या प्रारूपाचा अर्थ मुस्लिम आणि यादव यांचे संख्याबळ असा घेतला जातो. या प्रारूपामध्ये इंडिया आघाडीने मोठा बदल केला आहे. इंडिया आघाडीच्या तिकीट वाटपामध्ये देखील या गोष्टीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.

इंडिया आघाडीने ६६ यादव उमेदवार दिले आहेत. परंतु याबरोबरच कुर्मी ०४, कोईरी २८, वैश्य १७, राजपूत ११, भूमिहार १५, ब्राह्मण १०, कायस्थ १, अतिमागास ३०, दलित ३८ व मुस्लिम ३० असे तिकिटांचे वाटप केले आहे. या तिकीट वाटपावरून महत्त्वाचे चार मुद्दे पुढे येतात.

  • उच्च जातींना इंडिया आघाडीने उमेदवारी दिली आहे. उच्च जातींतील पन्नासपेक्षा जास्त उमेदवार दिले आहेत. ही एक नवीन व्यूहरचना आहे. परंतु ही व्यूहरचना न्यायविरोधी आहे.

  • इंडिया आघाडीने अतिमागास व दलित यांना उमेदवारी दिली आहे. अतिमागास व दलित उमेदवार यादवांपेक्षा जास्त आहेत (६८). याचा अर्थ ‘यादव वर्चस्व’ या संकल्पनेला आळा घालण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

  • मुस्लिम या अल्पसंख्यांक समूहातील ३० उमेदवार दिले आहेत. अल्पसंख्यांक समूहाला उमेदवारी दिली आहे. परंतु केवळ ‘माय’वर (मुस्लिम-यादव) लक्ष केंद्रित केलेले नाही.

  • मुस्लिमांपेक्षा उच्च जातीचे उमेदवार जास्त दिले आहेत. तसेच मुस्लिमांपेक्षा अतिमागास आणि दलित समाजातील उमेदवार जास्त दिले आहेत. यामुळे इंडिया आघाडी आणि विशेषतः तेजस्वी यादव यांनी माय (यादव-मुस्लिम) या प्रारूपापेक्षा नवीन प्रारूप तिकीट वाटपासाठी वापरलेले दिसते.

या आकडेवारीवरून इंडिया आघाडी जास्तीत जास्त व्यापक होण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच एनडीए हिंदुत्वाचे नियंत्रण निर्माण करण्यासाठी उच्च जातींबरोबर मागास जातींचेही संघटन उभे करत आहे. ही राज्याची निवडणूक दिसत असली तरी ही निवडणूक बिहारच्या समाज व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी आहे. यामुळेच जातवाद ही धारणा रोजगार आणि नोकरी या क्षेत्राकडे वळविण्याचा तेजस्वी यादव यांचा प्रयत्न दिसतो, तर राहुल गांधी मतदार फेरतपासणी मोहीम हा विषय राष्ट्रीय पातळीवरून मांडत आहेत. म्हणजेच थोडक्यात जातवादाच्या बाहेर ही निवडणूक जाताना दिसते. तसेच या निवडणुकीची सूत्रे राष्ट्रीय पातळीवरून हाताळली जात आहेत.

थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रारूपापासून आजची निवडणूक प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. सरदार पटेल निवडणुकीच्या तयारीमध्ये उमेदवार निवड, निवडणूक निधी आणि प्रचार या गोष्टींना मध्यवर्ती ठेवत होते. तर आज बिहारच्या निवडणूक आखाड्याला हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास या तीन गोष्टींनी राष्ट्रीय आकार दिला आहे.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व राज्यशास्त्राचे अध्यापक

logo
marathi.freepressjournal.in