

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
पुस्तक वाचण्यापेक्षा ते फाडणं सोपं, विचार समजून घेण्यापेक्षा त्यावर गदारोळ करणं सोपं आणि इतिहासाचा अभ्यास करण्यापेक्षा राजकीय तमाशा करणं सोपं झालं आहे. पुस्तकांच्या विरोधात आंदोलन करणारे आणि दुर्मिळ ग्रंथांच्या जतनाबाबत उदासीन असणारे यांच्यात फरक किती, हा प्रश्न आज विचारण्याची वेळ आली आहे.
सोनिया गांधी यांचं ‘Belonging : A journey of love ‘ हे पुस्तक सध्या अनेक कारणांमुळे गाजत आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये भांडणं लागलीत. अलटवार- पलटवार सुरू आहेत. एका पक्षानं हे पुस्तक फाडण्याची मोहीम हाती घेतलीय. का? तर या पुस्तकात म्हणे वीर सावरकरांची बदनामी करण्यात आलीय. पण चमकोगिरीच्या नादात, या पक्षाच्या शायनिंग प्रवक्त्या बाईंनी पुस्तक फाडता फाडता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाडला आणि गदारोळ झाला. नंतर मग आपण मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला अशी सारवासारव त्या बाईंनी केली; पण त्यांचं आणि त्यांच्या पक्षाच्या बालिशपणाचं हसं झालं ते झालंच. मुद्दा असा आहे की समजा एखाद्या पुस्तकातील विचार आपल्याला पटत नसतील तर त्याचा प्रतिवाद करणारी अभिव्यक्ती आपण दुसरं पुस्तक लिहून केली पाहिजे. पण तेवढा वेळ आणि अभ्यास आहे कुणाला? पुस्तक फाडणाऱ्यांनी स्वतः सोनियाजींचं पुस्तक वाचलं आहे का? आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं तरी कुठलं पुस्तक त्यांनी संपूर्ण वाचलेलं आहे? असे प्रश्न त्यांना विचारले तर त्यातले बरेच जण ततपप करतील. पुस्तक लिहिण्यापेक्षा किंवा वाचण्यापेक्षा ते फाडणं अधिक सोपं आहे. त्यामुळे बातम्यांमध्ये राहता येतं आणि राजकीय लाळघोटेपणा करता येतो.
पुस्तकं फाडणारे किंवा जाळणारे लोक अनेकदा असहिष्णुता, कट्टरतावाद किंवा विचारांच्या भीतीचं प्रतीक असतात. या कृतीमागे विविध सामाजिक, राजकीय किंवा मानसिक कारणं असतात. ज्या लोकांकडे समोरच्याच्या विचारांना तोंड देण्यासाठी योग्य तर्क नसतात, ते लोक पुस्तकांचा नाश करून विचार संपवण्याचा प्रयत्न करतात.
हुकूमशाही किंवा कट्टरपंथी गट समाजात फक्त ठराविकच विचार राहावेत यासाठी विरोधी साहित्य नष्ट करतात.एखाद्या विशिष्ट जाती, धर्म, भाषा किंवा संस्कृतीबद्दल असलेल्या टोकाच्या द्वेषातून त्या समुदायाचं ज्ञानभांडार नष्ट केलं जातं. एखाद्या समाजाची ओळख आणि त्यांचा खरा इतिहास मिटवण्यासाठी ऐतिहासिक ग्रंथ जाळले जातात.
इतिहासात ज्ञानाचा आणि सत्याचा द्वेष करणाऱ्यांची काही प्रसिद्ध उदाहरणं आढळतात. नाझी जर्मनीत १९३३ मध्ये हिटलरच्या काळात ज्यू लेखकांची आणि सरकारविरोधी विचारांची हजारो पुस्तकं जाहीरपणे जाळण्यात आली होती. त्याआधी सन ११९३ मध्ये बख्तियार खिलजीनं भारतातील प्राचीन नालंदा विद्यापीठाचन ग्रंथालय जाळलं होतं, ज्यात लाखो दुर्मिळ हस्तलिखिते जळून खाक झाली होती.
रे ब्रॅडबरी यांनी ‘फॅरेनहाईट ४५१ ‘या प्रसिद्ध कादंबरीत अशाच एका काल्पनिक समाजाचं चित्रण केलं आहे, जिथं पुस्तकं वाचणं गुन्हा मानलं जातं आणि ती जाळली जातात. प्रसिद्ध कवी हाइनरिक हाइन (Heinrich Heine) यांनी यावर एक अत्यंत मार्मिक भाष्य करताना म्हटलं आहे: ‘जिथे पुस्तके जाळली जातात, तिथे शेवटी माणसेही जाळली जातात.’ पुस्तकं जाळल्यानं कागद नष्ट होतो, पण त्यातील विचार आणि ज्ञान कधीही संपत नाही, उलट त्या विचारांबद्दल लोकांची उत्सुकता अधिक वाढते. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाविरुद्ध होत असलेली आंदोलनं त्या पुस्तकाची विक्री वाढवत आहेत, हे याचं ताजं उदाहरण आहे.
हे सगळं बिलॉंगिंग प्रकरण चाललेलं असताना एक कविता सुचली ती अशी:
वाचू नका पुस्तक बिस्तक
कामातूनच जाईल मस्तक
वाचू नका पुस्तक बिस्तक.
वाचून वाचून चष्मा लागेल
सोडावॉटर
मग कसला शेक्सपिअर
आणि कसला हॅरी पॉटर!
राष्ट्रभक्त सर्कशीत व्हेटर्नरी मास्टररींग कसलं काय बिलॉंगिग नि कसलं हाय फिलांगिंग!
बुकलवर बिकलवर
शक्यतो होऊ नका
भिकारपणाचे हे धंदे,
त्यात लक्ष देऊ नका
आजतागायत एक तरी शाणा कोण
झालाय काय पुस्तक वाचून?
वर्षामागून वर्षे गेली
जात-धर्म- तसेच साचून-
म्हणून म्हणतो,
पुस्तक फक्त किलोवरची
रद्दी असते
‘शायनांग’ प्रवक्त्यांची चार
दिवस सद्दी असते .
किती जरी वाचली तुम्ही
पानांमागून पाने
कुणीतरी विचारतोच पण
कोण गुरुजी साने ?
आणि कोण पां.वा काणे?
‘श्यामच्या आई ‘शिवाय
कुणाचे काही अडत नाही
पुस्तक वाचलं नाही म्हणून
आमदार खासदार पडत नाही
पुस्तक वाचणे म्हणजे सांगतो,
फक्त रिकामटेकडा धंदा
दरमहा पगार चोख ,
वाचले जरी नाहीत ‘विंदा’
अटक मटक चवळी चटक
वाचू नका पुस्तक बिस्तक
डोकं नसलं तरी खोकं
एकदम पायजे चकाचक!
आणखी एक दोन वर्षात बघा
पुस्तकफाडू हिरो होतील
फेसबुकवरच्या फेसामधे
लेखक-बिखक बुडत जातील
समीक्षक बिमीक्षक
मुरडतील नाके खूप
काय माहीत, छापील बिपील
हळुहळू होईल चूप?
ज्या देशाच्या राजकारणातील आणि प्रशासनातील प्रभावी लोक ग्रंथांबाबत आस्थेवाईक नसतात, त्या देशाची संस्कृती आणि महत्ता हळूहळू अवनत अवस्थेकडे वाटचाल करते. १३५ वर्षे जुन्या सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररीतील (Central Secretariat Library) दुर्मिळ पुस्तकांच्या स्थलांतरावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सांस्कृतिक मंत्रालयावर अलीकडेच कडक शब्दांत ताशेरे ओढले, हे आणखी एक ताजं उदाहरण. याशिवाय, दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंच्या दुरवस्थेवरूनही ऑक्टोबर २०२६ मध्ये न्यायालयानं मंत्रालयाला फटकारलं होतं.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत शास्त्री भवन पाडलं जाणार असल्यानं तेथील ऐतिहासिक ग्रंथालयातील पुस्तकं हलवण्याच्या नियोजनावर न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठानं सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर टीका केली. ‘या पुस्तकांचा थोडा तरी आदर करा. तुम्हाला ती सांभाळायची नसतील, तर त्यांची किंमत करणाऱ्या दुसऱ्या देशाला देऊन टाका,’ अशा शब्दांत न्यायालयानं सुनावलं. या ग्रंथालयात १७०२ सालापासूनची सुमारे ८.५ लाख दुर्मिळ पुस्तकं आणि ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. तसंच, गेल्या १५ वर्षांपासून आर. के. पुरम येथील गोदामात सुमारे २ लाख पुस्तकं अत्यंत दयनीय अवस्थेत पडून असल्याची बाबही न्यायालयासमोर आली. नवीन प्रस्तावात ग्रंथालयासाठी अपुरी जागा दिल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं पुस्तकं हलवण्याच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या देखभालीवरून सर्वोच्च न्यायालयाने सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) आणि दिल्ली महानगरपालिकेला (MCD) धारेवर धरलं होतं. त्यांना धारेवर धरा की ताशेरे ओढा, महोदय विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com