

समाजचिंतन
जगदीश काबरे
लग्नसमारंभात महागड्या वस्तू किंवा पैशांऐवजी 'पुस्तकांचा आहेर' देण्याची संकल्पना केवळ नावीन्यपूर्ण नसून, ती मूल्यव्यवस्थेत बदल घडवणारी आणि वाचनसंस्कृतीला समृद्ध करणारी एक दूरदर्शी चळवळ आहे.
लग्न हा भारतीय समाजात केवळ दोन व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रारंभ नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाणीचा एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. या प्रसंगात आहेर देण्याची परंपरा खोलवर रुजलेली आहे. मात्र या आहेर संस्कृतीने कालांतराने आपले मूळ स्वरूप गमावून अनेकदा दिखाऊपणा, स्पर्धा आणि अनावश्यक खर्च यांचा भाग घेतला आहे. अशा परिस्थितीत 'लग्नात फक्त पुस्तकेच आहेर म्हणून स्वीकारली जातील' असे सूचित करणारी कल्पना केवळ नावीन्यपूर्ण नाही, तर सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेली आहे. या संकल्पनेत केवळ आर्थिक व्यवहाराचा बदल नाही, तर मूल्यव्यवस्थेतील बदलाची बीजे दडलेली आहेत. वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे, जो दीर्घकालीन सामाजिक परिणाम घडवू शकतो.
या संकल्पनेचा गाभा असा आहे की, लग्नसमारंभ हा केवळ उपभोगाचा नाही, तर ज्ञानवाटपाचा प्रसंग व्हावा. पाहुण्यांनी सोन्याच्या वस्तू, महागडे गिफ्ट्स किंवा रोख रक्कम देण्याऐवजी पुस्तके द्यावीत, ही विनंती केली तर त्या माध्यमातून समाजात वाचनाचा प्रसार होऊ शकतो. जेव्हा यजमान स्वतः या विचाराशी प्रामाणिक राहून पाहुण्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतात, तेव्हा तो प्रयोग अधिक नैसर्गिक आणि स्वीकारार्ह होतो. या कल्पनेचा व्यवहार्य भाग म्हणजे लग्नाच्या हॉलच्या प्रवेशद्वारी पुस्तक विक्रीचा स्टॉल उभारणे. अनेकदा पाहुण्यांना कोणते पुस्तक द्यावे हे ठरवणे कठीण जाते किंवा त्यांना आधी तयारी करता येत नाही. अशा वेळी त्या ठिकाणीच पुस्तकांचे संच उपलब्ध असतील, तर ते सहजपणे खरेदी करून आहेर देऊ शकतात. शंभर, पाचशे, हजार रुपयांचे वेगवेगळे संच तयार करून ठेवण्याची कल्पना अत्यंत व्यावहारिक आहे. या संचांमध्ये सामाजिक, वैचारिक, चरित्रात्मक, बालसाहित्य, विज्ञान साहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश असेल, तर विविध वयोगट आणि अभिरुची असलेल्या लोकांना त्यात आपलेपणा वाटेल. या प्रकारे पुस्तकांची विक्री वाढण्याबरोबरच लोकांसाठी वाचनाची दारे उघडली जातील. ज्ञान संस्कृतीच्या वाढीसाठी हा उपक्रम नक्कीच स्तुत्य ठरणारा आहे.
या उपक्रमाचा आणखी एक वेगळा पैलू म्हणजे लग्नपत्रिकेचा पर्याय. महागड्या, आकर्षक पण काही क्षणांत बाजूला पडणाऱ्या लग्नपत्रिका छापण्याऐवजी एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लग्नाचे आमंत्रण छापून ते पुस्तकच लग्नपत्रिका म्हणून देण्याची कल्पना अत्यंत प्रभावी ठरणारी आहे. यामुळे एकीकडे कागदाचा अपव्यय कमी होतो, तर दुसरीकडे प्रत्येक निमंत्रित व्यक्तीच्या हातात एक पुस्तक पोहोचते. अशा प्रकारे निमंत्रण हे केवळ कार्यक्रमाची माहिती देणारे साधन न राहता, ज्ञानाचे माध्यम बनते. ही कल्पना पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या शहाणी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारी आहे.
अर्थात, या सर्व संकल्पना अंमलात आणण्यासाठी सजग आणि विचारशील समाजाची आवश्यकता आहे. कारण आजही समाजात वाचनाची सक्य अगदी सुशिक्षित घरातसुद्धा अभावानेच दिसते. अनेकांना पुस्तक हा उपयोगी आहेर वाटत नाही. त्यामुळे सुरुवातीला या उपक्रमाला विरोध, उपहास किंवा दुर्लक्ष यांना सामोरे जावे लागू शकते. परंतु सामाजिक परिवर्तनाची प्रत्येक चळवळ अशीच सुरू होते. काही कुटुंबे पुढाकार घेतात, प्रयोग करतात आणि हळूहळू त्या कल्पना समाजात रुजतात. जर काही टक्के लोकांनीही हा प्रयोग यशस्वीपणे केला, तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. अशावेळी पुस्तक वाचनाचा प्रभाव हा केवळ वैयक्तिक पातळीपर्यंतच मर्यादित राहत नाही, तर तो सामाजिक जाणीव वाढवतो. वाचनामुळे माणसाची विचारशक्ती विकसित होते, त्याची समज वाढते आणि तो अधिक संवेदनशील बनतो. त्यामुळे पुस्तक ही केवळ एक वस्तू नसून ते विचारांचे माध्यम आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अशा माध्यमाचा प्रसार लग्नासारख्या मोठ्या सामाजिक व्यासपीठावरून झाला तर त्याचे परिणाम दूरगामी होतात. 'पुस्तकांसारखा मित्र दुसरा नाही' ही भावना केवळ भावनिक विधान नसून एक सामाजिक सत्य आहे.
भारतीय समाजात कौटुंबिक कार्यक्रमांची संख्या मोठी आहे. जर या सर्व प्रसंगांमध्ये पुस्तकांना स्थान मिळाले, तर पुस्तक व्यवहार नैसर्गिकरीत्या वाढ शकतो. उदाहरणार्थ, वाढदिवस हा अत्यंत प्रभावी प्रसंग असतो. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 'रिटर्न गिफ्ट' म्हणून प्लास्टिक खेळणी किंवा निरुपयोगी वस्तू देण्याऐवजी प्रत्येक मुलाला किंवा पाहुण्याला एक चांगले पुस्तक देण्याची पद्धत सुरू करता येईल. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी छोटासा 'बुक कॉर्नर' तयार करून पालकांना आणि मुलांना लगेच पुस्तके खरेदी करता येतील, अशी सोय करता येईल. मुलांच्या वाढदिवसात गोष्टी सांगण्याचे सत्र किंवा लेखक-भेट आयोजित केल्यास पुस्तकांबद्दल आकर्षण वाढेल आणि त्या ठिकाणीच विक्री होण्याची शक्यता वाढते. या प्रसंगी पाहुण्यांनी खेळण्यांऐवजी बालसाहित्य, चित्रपुस्तके किंवा पालकांसाठी मार्गदर्शक पुस्तके देण्याची विनंती केली, तर त्याच्या आयुष्याची सुरुवातच पुस्तकांशी नाते जोडून होते.
या सर्व कार्यक्रमांमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे पुस्तकाकडे केवळ वाचून झाल्यावरची रद्दी म्हणून न पाहता, त्या प्रसंगाचा एक अर्थपूर्ण भाग बनवणे. जेव्हा प्रत्येक कौटुंबिक समारंभात पुस्तकांचा समावेश होतो, तेव्हा पुस्तक व्यवहार ही वेगळी गोष्ट न राहता जीवनशैलीचा भाग बनते. यासाठी यजमानांनी थोडी कल्पकता, नियोजन आणि संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. 'पुस्तक स्टॉल', 'रेडीमेड संच', 'थीम आधारित पुस्तके', 'गिफ्ट पॅकिंग' या सर्व गोष्टी एकत्रितपणे राबवल्या, तर पाहुण्यांना ती सोय आणि अनुभव दोन्ही आकर्षक वाटतात. लग्न हा केवळ प्रारंभआहे; परंतु जर वाढदिवसापासून ते स्मरणदिनापर्यंत प्रत्येक प्रसंग पुस्तकांशी जोडला गेला, तर पुस्तक विक्री वाढवण्यासाठी वेगळी मोहीम राबवण्याची गरजच उरणार नाही. कारण समाजाची संस्कृतीच पुस्तकाभिमुख बनलेली असेल. ही कल्पना केवळ एक प्रयोग नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची दिशा दर्शवणारी आहे. ही कल्पना व्यवहार्य, अर्थपूर्ण आणि दूरदर्शी आहे. सुरुवातीला ती मर्यादित प्रमाणातच स्वीकारली जाईल, परंतु सातत्याने प्रयत्न केल्यास ती एक नवा ट्रेंड बनू शकते. समाज सजग होण्यासाठी शिक्षण आणि वाचन याशिवाय दुसरा मार्ग नाही आणि जर लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगातून ही प्रक्रिया सुरू झाली, तर त्याहून सुंदर आणि परिणामकारक सुरुवात दुसरी कोणती असू शकते!
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com