'बुकर'मंथन

कोणतेही साहित्य, मग ती सुखांतिका असो वा शोकांतिका त्यातून पारंपरिक चौकटी मोडणारे, प्रवाहाविरुद्ध वाहणारे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगण्याची दुर्दम्य आशा फुलविणारे साहित्यच इतिहासात अजरामर होत असते आणि तोच आशावाद त्यांच्या कादंबरीने जागविला आहे. त्यानिमित्ताने साहित्यविश्वातील हे ‘बुकर’मंथन-
'बुकर'मंथन
'बुकर'मंथन
Published on: 

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

यंदाचा ‘बुकर’ पुरस्कार ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांच्या ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. कोणतेही साहित्य, मग ती सुखांतिका असो वा शोकांतिका त्यातून पारंपरिक चौकटी मोडणारे, प्रवाहाविरुद्ध वाहणारे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगण्याची दुर्दम्य आशा फुलविणारे साहित्यच इतिहासात अजरामर होत असते आणि तोच आशावाद त्यांच्या कादंबरीने जागविला आहे. त्यानिमित्ताने साहित्यविश्वातील हे ‘बुकर’मंथन-

युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडण्याचा तो ‘ब्रेग्झिट’चा काळ. या काळात ‘सरकार’ केवळ नावापुरतेच आपले अस्तित्व राखून होते. कायदा व सुव्यवस्था पार कोलमडली होती. अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तू वेचून त्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या फिलीप पेमेंट या व्यक्तीभोवती व स्मृतिभ्रंशाने पीडित असलेली त्याची वृद्ध काकी मार्नी यांच्या भोवती या कादंबरीचे कथानक गुंफलेले आहे. या कथानकाला कलाटणी देणारी घटना एके दिवशी घडते. समुद्रात शोधाशोध करीत असताना फिलीपला एक विचित्र, सतत आपला आकार बदलणारी एक गूढ वस्तू वा जीव हाती लागतो. तेथूनच ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग’ ही कादंबरी नवे वळण घेते. ही कादंबरी म्हणजे परग्रहवासीयांच्या आक्रमणाचा थरारपट नाही, तर ती मानवी स्मृती, ‘ब्रेक्झिट’नंतरची अस्वस्थता, हवामानबदल आणि संकटकाळी माणसे कशी तग धरतात याचे मनोवैश्विक व उपरोधिक चित्रण आहे.

‘भविष्याच्या भिंगातून पाहिलेले आजचे राजकारण’ अशा शब्दात परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष मेरी बियर्ड यांनी हॅरिसन यांच्या ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग’ कादंबरीचे यथार्थ वर्णन केले आहे. ही कादंबरी जाडजूड नाही, तर अवघ्या १९८ पानांची आहे. सामाजिक व्यवस्थेचा ऱ्हास, मानवी अस्तित्वापुढील प्रश्न, वास्तव समजून घेण्याची मर्यादा आणि संकटकाळातही जगण्याचा प्रयत्न हा कादंबरीचा विचारप्रवर्तक गाभा आहे. या जगावर खरोखरच विनाश ओढवला तर तो आपल्यालाही पूर्ण समजणार नाही आणि जुने नियम तिथे लागू होणार नाहीत हेच या कादंबरीचे सार आहे.

लेखकाचे वय, उंची वा श्रीमंती किंवा त्याच्या पुस्तकाचे आकारमान वा किंमत यावरून साहित्याचे मोल ठरत नाही. लेखक लहान की मोठा यापेक्षा तो कोणता आशय, विषय व विचार मांडतो, यावरच त्याच्या साहित्याचे मापदंड ठरत असतात. बुकर पुरस्कार हा त्यावर आधारलेला एक प्रतिष्ठेचा पुरस्कार. यंदाचा बुकर पुरस्कार ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांच्या ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग’ या कादंबरीला जाहीर झाला आणि साहित्यविश्वात पुन्हा एकदा या पुरस्काराची चर्चा सुरू झाली आहे. कारण, वयाच्या ८१व्या वर्षी हा पुरस्कार मिळवून हॅरिसन यांनी बुकर पुरस्काराच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध विजेते होण्याचा मान पटकावला आहे. या पुरस्काराने त्यांच्या सहा दशकांच्या साहित्यप्रवासाचा गौरव झाला नाही, तर साहित्याच्या पारंपरिक चौकटी मोडणाऱ्या लेखनालाही जागतिक मान्यता मिळाली आहे.

बुकर पुरस्काराच्या या वैश्विक चर्चेत भारतीय साहित्याची कामगिरीही लक्षवेधी ठरते. आजवर भारतीय वंशाच्या सात लेखकांनी बुकर किंवा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पटकावला आहे. मूळ बुकर पुरस्काराच्या यादीत व्ही. एस. नायपॉल, सलमान रश्दी, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि अरविंद अडिगा यांचा समावेश होतो, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय लेखिकांमध्ये गीतांजली श्री आणि बानू मुश्ताक यांचा समावेश आहे. २०२५ मध्ये बानू मुश्ताक यांच्या कन्नड भाषेतील ‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पटकावला होता.

तर सांगायचे तात्पर्य हेच की, युरोपप्रमाणेच भारतामधील सध्याच्या अस्वस्थ वर्तमानाविरुद्ध ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अभिजीत दीपके, ‘अखिल भारतीय छात्र संघा’च्या नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखालील ‘जेन-झी’ पिढीने आवाज उठवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. राज्यातील बेसुमार वृक्षतोडीविरुद्ध प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे सातत्याने आवाज उठवित आहेत. या लोकचळवळींच्या पार्श्वभूमीवर ‘साहित्याचे खरे सामर्थ्य हे केवळ बदलांमध्ये नाही, तर प्रस्थापित धार्मिक रूढी, सामाजिक संकेत व राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्यामध्ये आहे. साहित्याने प्रश्न विचारावेत, अस्वस्थ करावे आणि परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करावी,’ असे परखड मत बानू मुस्ताक यांनी अलीकडेच व्यक्त केले आहे. म्हणूनच त्याची ‘बुकर’ विजेत्यांच्या पार्श्वभूमीवर दखल घेणे क्रमप्राप्त आहे.

साहित्याने शासन व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा विचार बुकर विजेत्या बानू मुस्ताक यांनी मांडला आहे. तो भारतीय साहित्याच्या भवितव्याच्या दृष्टीनेही दिशादर्शक आहे. भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्यासाठी अनुवाद, प्रकाशन आणि प्रसिद्धीची सक्षम व्यवस्था उभी करणे आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर लेखनातील निर्भीडपणा, सामाजिक भान आणि वैचारिक स्वातंत्र्यही जपावे लागेल. पुरस्कार साहित्याला प्रसिद्धी देतात; पण व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धैर्यच साहित्याला खरे सामर्थ्य देते हेही यानिमित्ताने समजून घेणे आवश्यक आहे.

खरे तर, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि भाषांतरामुळे साहित्याच्या प्रसाराच्या सीमा विस्तारत असल्या, तरी साहित्याचे मूलभूत कार्य बदललेले नाही. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे किंवा वास्तवाचे वर्णन करण्याचे माध्यम नाही. ते समाजातील विसंगती उघड करते, सत्तेला प्रश्न विचारते आणि प्रस्थापित विचारांना आव्हान देते. ते लक्षात घेता, धर्माच्या नावाखाली रूढ झालेल्या परंपरा, सामाजिक संकेत, जातीय विषमता आणि राजकीय व्यवस्थेतील अन्याय यावर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस साहित्यिकांनीच नव्हे, तर साहित्यानेही दाखवले पाहिजे. वाचकाला अस्वस्थ करणे, त्याला नव्याने विचार करायला भाग पाडणे आणि परिवर्तनाची जाणीव निर्माण करणे हे साहित्याचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच साहित्याचे मूल्यमापन केवळ पुरस्कार, विक्री किंवा जागतिक लोकप्रियतेच्या निकषांवर करता येणार नाही.

भारतीय साहित्याची भाषिक, सांस्कृतिक आणि विषयवैविध्याची समृद्ध परंपरा आहे. सामाजिक वास्तव, जातिव्यवस्था, स्त्रीजीवन, ग्रामीण संघर्ष, राजकीय उलथापालथ, स्थलांतर, पर्यावरण, मानवी नातेसंबंध आणि आधुनिकतेचे प्रश्न अशा विविध विषयांवर भारतीय लेखक सातत्याने लिहित आहेत. तरीही त्यांच्या साहित्याला जागतिक स्तरावर अपेक्षित प्रसिद्धी आणि पुरस्कारांची दखल का घेतली जात नाही, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

याचे पहिले कारण म्हणजे भाषांतराची मर्यादित व्यवस्था आहे. एखादे पुस्तक आपल्या भाषिक वर्तुळात लोकप्रिय असले, तरी त्याचा दर्जेदार अनुवाद आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशन नसेल तर जागतिक वाचकांपर्यंत ते पोहोचत नाही.

दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय साहित्यविश्वात काही मोठ्या प्रकाशन संस्था, साहित्यिक प्रतिनिधी, एजंट आणि वितरण व्यवस्था यांचा प्रभाव मोठा आहे. भारतीय भाषांतील लेखकांना या व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. इंग्रजी भाषेतील भारतीय लेखकांना तुलनेने अधिक संधी मिळत असल्या, तरी प्रादेशिक भाषांतील लेखकांसाठी जागतिक प्रकाशनाची दारे अजूनही पुरेशा प्रमाणात उघडलेली नाहीत.

तिसरा मुद्दा म्हणजे जागतिक पुरस्कारांसाठी केवळ चांगले लेखन पुरेसे नसते. पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होणे, समीक्षकांकडून त्याची दखल घेतली जाणे, प्रतिष्ठित साहित्यिक नियतकालिकांमध्ये चर्चा होणे आणि परदेशातील पुस्तक महोत्सवांमध्ये लेखकांचा सहभाग असणेही महत्त्वाचे ठरते. या आघाडीवर भारतीय भाषांमधील अनेक लेखक मागे पडतात. त्यासाठी साहित्य अकादमी, विद्यापीठे, प्रकाशक, अनुवादक आणि सांस्कृतिक संस्था यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. केवळ पुरस्कार मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर भारतीय भाषांमधील साहित्य जागतिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून हे प्रयत्न व्हायला हवेत.

आगामी काळात जागतिक साहित्यविश्वात भाषांतराचे महत्त्व अधिक वाढणार आहे. डिजिटल प्रकाशन, ई-पुस्तके, ऑडिओबुक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर तंत्रज्ञानामुळे विविध भाषांमधील साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणे तुलनेने सोपे होणार आहे. मात्र, तंत्रज्ञानामुळे भाषांतराची प्रक्रिया सुलभ झाली तरी साहित्याचा सांस्कृतिक गाभा, भाषेतील सूक्ष्म अर्थछटा आणि लेखकाची अभिव्यक्ती जपण्यासाठी मानवी अनुवादकांची भूमिका महत्त्वाचीच राहणार आहे. ते लक्षात घेता, भारतीय साहित्याचे भवितव्य केवळ पुरस्कारांच्या प्रतीक्षेत नसून, आपल्या साहित्याचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांत दडलेले आहे.

prakashrsawant@gmail.com