दिवाळी अंक २०२६ : बूट पॉलिश आणि गाणं

तो बूट पॉलिशवाला मुलगा, माझ्या बुटांना पॉलिश करताना रोज एक गाणं गुणगुणतो...
दिवाळी अंक २०२६ : बूट पॉलिश आणि गाणं
Published on: 

प्रशांत असनारे

तो बूट पॉलिशवाला मुलगा
माझ्या बुटांना पॉलिश करताना
रोज एक गाणं गुणगुणतो.

आश्चर्य म्हणजे
त्याच्या ओठांवर
रोज एक नवीन गाणं असतं,
कधी नवं...
कधी जुनं!

दिवसभर मग
माझ्या पायांत
त्याने पॉलिश केलेले बूट असतात
आणि ओठांवर
त्याने म्हटलेलं गाणं.

माझा अख्खा दिवस
खूप सुरेल जातो
त्या गाण्यामुळे.

त्याला कदाचित ठाऊक नसेल की
मी दिलेल्या पैशांत
तो मला बूट पॉलिश करण्याबरोबर
एक गाणं फ्री देतोय म्हणून!