बुफे अर्थात स्वेच्छाभोजनाची गोष्ट

स्वेच्छाभोजन म्हणजे आधुनिकतेचं प्रतीक मानलं जाणारं बुफे. खरं तर ही बुफे पद्धत आपल्या पारंपरिक जेवण संस्कृतीतील आग्रह, आपुलकी आणि तृप्ती हळूहळू गिळंकृत करत गेली आहे. पोट भरण्याची सोय झाली असली, तरी मन भरणारी पंगत मात्र या झगमगाटात कुठेतरी हरवली आहे.
बुफे अर्थात स्वेच्छाभोजनाची गोष्ट
(PHOTO-YANDEX)
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

स्वेच्छाभोजन म्हणजे आधुनिकतेचं प्रतीक मानलं जाणारं बुफे. खरं तर ही बुफे पद्धत आपल्या पारंपरिक जेवण संस्कृतीतील आग्रह, आपुलकी आणि तृप्ती हळूहळू गिळंकृत करत गेली आहे. पोट भरण्याची सोय झाली असली, तरी मन भरणारी पंगत मात्र या झगमगाटात कुठेतरी हरवली आहे.

बफे, बुफे किंवा Buffet अशा वेगवेगळ्या उच्चारांनी आज सर्वप्रचलित झालेलं स्वेच्छाभोजन कोण जाणे कधी सुरू झालं आणि तो पंगतीतला जेवणाचा आनंदच संपला. आग्रह संपून इच्छा असेल तर घ्या हा भाग आला. पूर्वी जेवताना निमंत्रित मंडळी छान मांडी ठोकून जिलब्या, बासुंदी हाणायच्या पैजा लावायची आणि या पैंजांना यजमान मंडळी आग्रह करकरून मदत करायची. पानं वाढून झाली की, अगदी श्लोकांपासून हा सिलसिला सुरू व्हायचा. पुढे फक्त पंगतींची भारतीय बैठक जाऊन टेबलं-खुर्च्या आल्या, पण आग्रह मात्र कायम होता, म्हणजे, “घ्या हो अजून जिलब्या! आज मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. अगदी सावकाश होउद्या.”

“अरे सदाशिव, इकडे मसालेभात येऊदे रे, मंडळी खोळंबलीयत. श्रीखंडाचा टोप आणा इकडे, वाट्या रिकाम्या दिसतायत, पुऱ्या पण येऊदे गरमागरम. अरे तुम्ही सगळी तरुण मंडळी किती हळूहळू जेवताय. आधी बसुंदीची वाटी लावा तोंडाला. मठ्ठा येऊ द्या.”

अशा आग्रहाने कार्यालय दणाणून जायचं. आनंदात जेवणावळी चालायच्या. पण आज तो आग्रहच संपून गेलाय आणि “ओम् भवती भिक्षां देही”सारखं प्लेट, चमचा, टिश्यू आणि आपले कपडे सांभाळत जेवण वाढून घ्यायला रांगेत उभं रहाणं आलंय. आज ज्येष्ठ असलेली पिढी या प्रकाराला सर्वस्वी नवखी होती आणि त्याआधीच्या पिढीने तर हे तंत्र स्वीकारणं अशक्य होतं. कारण आपली जेवणाची पद्धत कशी? बसायला पाट, समोर एक पाट, त्यावर सुग्रास पदार्थांनी भरलेलं ताट, सगळे पदार्थ वाढून झाल्यावर वरण-भात आणि तुपाची अन्नशुद्धी झाली की, चित्राहुती घालून सुरू करायचं जेवायला. अशी सवय असलेल्या आजच्या ज्येष्ठ आणि त्याआधीच्या पिढीला, हातात भली थोरली डिश घेऊन स्वतःच्या हाताने वाढून घेणं कठीण होऊ लागलं. रांगेतून पुढे सरकता सरकता मान उंच करत पुऱ्या, इतर जिन्नस आहेत की संपलेयत पहायचं. संपले असतील तर आणखी दोन मिनिटं मोडणार. मागच्या माणसाची प्लेट, चमचा पाठीला लागत असतो, मध्येच कुणी संपलेलं वाढून घ्यायला येतात, पुन्हा खोळंबा.

ही सगळी कसरत कशासाठी तर पोटात जेवण जाण्यासाठी. बरं आम्ही ही पाश्चिमात्यांची पद्धत स्वीकारली खरी, पण तीही अर्धवट. कारण, पदार्थ काटा चमच्याने खायचे ठेवलेले नसतात तर हाताने खायचे असतात. पुऱ्या, पोळी किंवा रोटी, भात, भाजी, लोणचं. म्हणजे अर्ध्या पदार्थांना हात लावायचा आणि मग भात जो आपण व्यवस्थित कालवून खातो तो त्याच उष्ट्या हाताने चमचा पकडून आणि त्यामध्ये दाल नावाचा पदार्थ ओतून खायचं. सगळाच अर्धवट मामला. हे सगळं करायचं ते हातातली डिश सांभाळून. पाश्चिमात्यांच्या समारंभात वाढलेले पदार्थ काट्या चमच्याने खाण्याचेच असतात आणि त्यांना याची सवयही असते. पण आपण का मांडी ठोकून, पदार्थ व्यवस्थित कालवून, हाताने छान तुकडे करून, यथेच्छ भुरके मारून आणि तृप्त झाल्यावर अन्नदाता सुखी भव म्हणत जेवण्याची आपली पद्धत विसरून नको ते अंगिकारतो? जे आपल्याला जमत नाही. बरं हे उभं राहून जेवणं सगळ्यांना जमत नाही हे लक्षात आल्यामुळे कार्यालयात वयस्कर मंडळींसाठी टेबलं आणि भोवती खुर्च्या मांडलेल्या असतात. डिश घेण्याआधी लोकं बसायला खुर्ची शिल्लक आहे का पहात असतात. मग कुणी पर्स, रुमाल ठेवून तीनचार खुर्च्या आरक्षित करून ठेवतं. एखादी बिचारी वयस्कर व्यक्ती आला की सांगितलं जातं, “अहो तिकडे बसू नका, आमची मंडळी येतायत”. म्हणजे संगीत खुर्ची खेळल्यासारखे पाहुणे खुर्च्या पकडायला बघत असतात. मग जेवताना एखादा पदार्थ संपला आणि तो अजून हवा असला की, रांग पाहून उठण्याचं धाडस होत नाही, खुर्ची जाण्याचीही शक्यता असते. रांगेच्या दुसऱ्या बाजूने घुसण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा तिथे उभे असलेले वाढपी आपल्यावर नजर ठेवायला उभे केल्यासारखे उभे असतात.

आपण पदार्थात असलेल्या डावाला उष्टा हात कसा लावायचा म्हणून त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो. पण ते मख्खपणे उभे असतात. बरं उजव्या हातात डिश घेतली तर उष्ट सगळं डिशला लागतं आणि डाव्या हाताने नीट वाढून घेता येत नाही. मग तसंच उजव्या हाताने वाढून घेतलं जातं. सगळाच विचित्र मामला. आपण कसं एकदा जेवायला बसलो की, अधेमध्ये उठत नाही. पण इकडे ते शक्यच नसतं. मग काही मंडळी पुन्हा उठायला नको म्हणून आधीच डिश शब्दशः तुडुंब भरून घेतात आणि मारुतीने द्रोणागिरी पर्वत आणला तशी ती घेऊन एकदाचे स्थानापन्न होतात. पण ते एव्हढं वाढून घेतलेलं संपत नाही किंवा ते पाहूनच त्यांची भूक मरते आणि अक्षरशः त्यातलं बरचसं फुकट जातं ही फार गंभीर गोष्ट आहे. पंगतीमध्ये वाढणारे वाढपी हे वाढण्यात तरबेज असायचे, त्यांना कोणता पदार्थ किती वाढायचा याचं प्रशिक्षण दिलेलं असायचं. इथे आपल्यालाच समजत नाही आपण किती खाणार आहोत ते. जेवताना, आपल्या बाजूचा कुणी स्वतःला काही आणायला जात असेल तर त्यालाच आपली फर्माईश सांगितली जाते. “अरे, तू जातोयस तर मलाही एक आणशील? मला परत परत उठायला होत नाही रे.”

एक आणशील म्हटल्यावर तोही बिचारा परोपकारी वृत्तीने म्हणतो, “आणतो ना, काय हवंय तुम्हाला?”

“फक्त चार पुऱ्या आण, दोन जिलब्या, एक पापड आणि हो, प्लीज एक चाटची वाटी आणि आमरस बस्स इतकंच आण. आणखी काही नको रे.” आणतो म्हणणाऱ्याला कुठून हो म्हणालो असं होतं.

हल्ली सगळी कार्यालयं वातानुकूलित असतात म्हणा, पण काही वर्षांपूर्वी हे नव्हतं. सोसाट्याचा वारा फेकणारे आणि केस अस्ताव्यस्त करून सोडणारे, पापड, पुऱ्या, सांडगे एका डिशमधून उडवून दुसऱ्या डिशमध्ये नेऊन सोडणारे पंखे जागोजागी अटेन्शनमध्ये उभे असायचे. कुणाच्या शर्टवर आमटी, भाजीचे डाग असा सगळाच बेरंग. अगदी आरामात बसून पंगतीसारखा जेवणाचा मनमुराद आनंद काही घेता येत नाही. बरं, बहुतेक मंडळींचा कल आणि समज, समोर ठेवलेला प्रत्येक पदार्थ आपल्याला आवडत असो वा नसो डिशमध्ये घेतलाच पाहिजे असा झालेला असतो.

खरं सांगू का? या बुफे प्रकारामुळे ती पंगत गेली, आपण हो म्हणेपर्यंत वेगाने वाढत पुढे जाणारे ते कुशल वाढपी गेले, जेवणावळी सुरू होताच मसालेभात, जिलबी, मठ्ठा, पुऱ्या श्रीखंड आणि खमंग भजी या सगळ्याचा एकत्रित येणारा आणि भूक उद्दिपित करणारा सुगंध गेला, आग्रह इतिहासजमा झाला आणि ‘नमः पार्वतीपते हर हर महादेव’च्या दणदणीत आरोळी सोबत, ‘सावकाश होऊ द्या मंडळी’ हा प्रेमळ आग्रहही गेला. उरलंय तो पदार्थांच्या असंख्य रांगा मांडलेल्या स्टॉलचा श्रीमंती थाट आणि त्याच पदार्थांची होणारी प्रचंड नासाडी.

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in