मिसळून गेले, अदृश्यच झाले..!

आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेली वस्तू समोर असूनही पाहू शकत नाही, कारण ती भोवतालच्या वातावरणात इतकी मिसळलेली असते की जणू अदृश्यच वाटते. निसर्गातही अनेक जीव स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा शिकार साधण्यासाठी अशीच ‘कॅमोफ्लेज’ म्हणजेच सरूपतेची अद्भुत युक्ती वापरतात.
मिसळून गेले, अदृश्यच झाले..!
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेली वस्तू समोर असूनही पाहू शकत नाही, कारण ती भोवतालच्या वातावरणात इतकी मिसळलेली असते की जणू अदृश्यच वाटते. निसर्गातही अनेक जीव स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा शिकार साधण्यासाठी अशीच ‘कॅमोफ्लेज’ म्हणजेच सरूपतेची अद्भुत युक्ती वापरतात.

आपण आपल्या ड्रॉवरमध्ये, टेबलावर काहीतरी- पेनड्राइव्ह, किल्ल्या, पेनं, नेलकटर, स्टेपलर असं काहीतरी शोधत असतो आणि ते काही केल्या मिळत नसतं. म्हणजे ते समोरच असतं पण भोवतालच्या पसाऱ्यात असं काही मिसळून गेलेलं असतं की जणू अदृश्यच होतं. ही गोष्ट निसर्गात अनेकदा पहायला मिळते. अजब निसर्गातील अनेक घटक कधी आपला जीव वाचवायला, कधी भक्ष्य मिळवायला अशा प्रकारे आपल्या सभोवतालाशी असे मिसळून गेलेले असतात की जणू अदृश्यच झालेत. कीटक, सरपटणारे प्राणी, जलचर, पक्षी आणि सस्तन प्राणी अशा सगळ्या गटातल्या जीवांमध्ये याची उदाहरणे सापडतात. आपल्या अवतीभवतीच्या परिसरामध्ये हे जीव असे मिसळून गेलेले असतात की शोधूनही दिसत नाहीत. यालाच आपण ‘कॅमोफ्लेज’ किंवा ‘सरूपता’ म्हणतो. गर्द हिरव्या रंगाच्या झाडावर त्याच रंगाचा नाकतोडा (टोळ) बसला असेल तर चटकन दिसत नाही किंवा माळरानावरच्या खडकाळ-वैराण भूभागावर दबून बसलेला सँडग्राऊज पक्षी (भाट तित्तर) शोधायलाच लागतो. निसर्गाने प्रत्येक जीवाला त्याच्या बचावासाठी, संरक्षणासाठी काही ना काही साधन दिलं आहे, त्यातलंच एक म्हणजे ‘कॅमोफ्लेज’. सुकलेल्या पानासारख्या दिसणाऱ्या ओक लिफ बटरफ्लायपासून ते हिरव्यागार वेलीसारख्या दिसणाऱ्या हरणटोळ सापापर्यंत ‘कॅमोफ्लेज’ होऊन स्वतःचा बचाव करणाऱ्या जीवांचे अनेक नमुने आपल्याला निसर्गात पाहायला मिळतात.

निसर्गामध्ये कॅमोफ्लेज म्हणजे सरूपता वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्यक्षात आलेली पाहायला मिळते. स्टीक इन्सेक्ट म्हणजे काडी किडा हा हुबेहुब झाडाच्या वाळक्या काडीसारखा दिसतो. जोपर्यंत तो हालचाल करत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व उघड होत नाही. त्याचप्रमाणे बार्क मॅन्टीस हा कीटक झाडाच्या खोडात असा मिसळून जातो की खूप बाराकाईने बघितल्यावरच दिसू शकतो. ऑर्नामेंटल मॅन्टिस हा नाकतोडा त्याच्या हिरव्या अंगावरील पांढऱ्या नक्षीने फक्त शोभिवंत दिसत नाही तर झाडाच्या फुलामध्ये मिसळून जातो आणि त्या फुलाचा मधुरस खायला फुलपाखरू किंवा माशी आली की तिची शिकार करतो. याच प्रकारची सरूपता काही जातीच्या कोळ्यांमध्ये बघायला मिळते. ओकलीफ बटरफ्लाय हे फुलपाखरू त्याच्या नावाप्रमाणे झाडाच्या सुकलेल्या पानासारखं दिसतं, म्हणून तर त्याला मराठीत ‘शुष्कपर्णी’ असंच म्हणतात. झाडाच्या वाळलेल्या, सुकलेल्या पानाचा जसा रंग असतो, अगदी तस्साच रंग, त्यावरील बुरशीच्या ठिपक्यांसह या फुलपाखराच्या पंखांवर उमटलेला पाहायला मिळतो. मात्र पानाशी ही सरूपता फक्त बाहेरूनच असते बरं का, आतमध्ये जातीनुसार ऑरेंज किंवा निळा रंग पाहायला मिळतो. हा आतला रंग बाहेरच्या मळकट रंगापेक्षा एकदम विरोधी, उठावदार असतो. त्यामुळे हे फुलपाखरू या दोन्ही रंगसंगतीचा वापर करून स्वतःचा बचाव करतं. जेव्हा त्याचे पंख मिटलेले असतात तेव्हा ते वाळक्या पानासारखं वाटतं आणि समोर असून जणू अदृश्य होऊन जातं. त्या अवस्थेतही त्याला कुणी टिपायचा प्रयत्न केला तर ते झटकन पंख उघडून उडू लागतं, मग आतला झळाळता रंग अचानक चमकल्याने त्याचा शिकारी गोंधळतो. ते उडताना त्याचा आतला झळाळता निळा किंवा केशरी रंग चमकतो आणि शिकारी त्या रंगाचा माग काढू लागला की फुलपाखरू चटकन आपले पंख मिटून गायब होतं. जायंट स्वॅलोटेल या फुलपाखराची अळी तर अगदी एखाद्या पक्ष्याच्या ‘शी’सारखीच दिसते. पाहणाऱ्याला वाटतं की एखादा पक्षी पानावर शिटला आहे, त्यामुळे आपोआप त्या अळीचा बचाव होतो. मात्र सरूपतेची ही युक्ती फक्त कीटक किंवा सरपटणारे प्राणी यांनाच उपयोगी पडते असं नाही. पट्टेरी वाघ, अंगावर ठिपके मिरवणारा बिबळ्या, बर्फाच्छादित परिसरात राहणारा हिमकोल्हा अशा प्राण्यांनाही सरूपतेची मदत घ्यावी लागते. भारतामध्ये ताडोबाच्या पानगळी अरण्यापासून ते हिमालयातल्या जीम कॉर्बेट पार्कच्या गवताळ कुरणांपर्यंत अनेक प्रकारच्या अधिवासांमध्ये आढणारा पट्टेरी वाघ काळ्या-पिवळ्या रंगाचा असतो. हा पट्टेरी वाघोबा जेव्हा गवतामधून चालायला लागतो तेव्हा त्याच्या अंगावरचे पट्टे त्याला त्या गवतात लपायला मदत करतात. त्यामुळे अशा गवताळ कुरणात दबा धरून बसलेला वाघ त्या कुरणात चरणाऱ्या हरणांना पटकन दिसत नाही आणि मग संधी साधून तो आपल्या भक्ष्यावर झेप घेतो. बिबट्याच्या अंगावरचे ठिपके ही त्याला याच पद्धतीची मदत करतात. पिवळ्या रंगावरच्या काळ्या ठिपक्यांमुळे बिबट्या झाडा-पानांमध्ये सहज मिसळून जातो आणि त्याला शिकार मिळवणं सोपं जातं. आफ्रिकेच्या विस्तिर्ण गवताळ कुरणांमध्ये राहणारे झेब्रे नेहमी कळपाने राहतात. शंभर-सव्वाशे झेब्र्यांचा कळप जेव्हा एकत्रितपणे उभा असतो किंवा फिरत असतो तेव्हा त्यांच्या अंगावरच्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांच्या डिझाइनमुळे त्यांना वेगवेगळे पाहणं शक्य होत नाही. तो सगळा कळप हाच जणू एक विशाल झेब्रा वाटू लागतो आणि मग सिंह किंवा चित्त्यासारखे शिकारी प्राणी गोंधळून त्या कळपावर हल्ला करत नाहीत.

पक्ष्यांच्या राज्यातही सरूपतेची युक्ती वापरून स्वतःचा बचाव करणारे काही भिडू आहेत. त्यातला सर्वात तरबेज म्हणजे इंडियन नाइटजार अर्थात रातवा पक्षी. निशाचर वृत्तीचा म्हणजे काळोख पडल्यानंतर हालचाली करणारा हा पक्षी रात्रीच्या गडद अंधारात तर मिसळून गेलेला असतोच, पण दिवसासुद्धा जमिनीवरच्या पालापाचोळ्यात मिसळून, अगदी जमिनीलगत दबून बसून राहात असल्याने रातवा दिसायला तुमची नजर अतिशय तीक्ष्ण असावी लागते. याची रंगसंगती तांबूस, पिवळट, मातकट, काळसर अशी असल्याने वाळलेल्या पाचोळ्यात, माळरानावरच्या जमिनीत हा अगदी सहज मिसळून जातो. संध्याकाळी याची कार्यरत होण्याची वेळ झाली की त्याच्या विशिष्ट आवाजावरूनच त्याचा शोध घेता येतो.

निसर्गातील या सरूपतेच्या तत्त्वाचा उपयोग माणसाने युद्धामध्ये सैन्य, सैनिक, रणगाडे व इतर वाहने लपवण्यासाठी केलेला पाहायला मिळतो. लष्कराचे गणवेश नेहमी चट्टेरी-पट्टेरी असतात त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळी कारवाई करणारे कमांडो त्यांच्या चेहऱ्यावर काळे-पांढरे पट्टे ओढतात. या सगळ्यामुळे सैनिक, लष्करातली वाहने आजुबाजूच्या परिसराशी मिसळून जातात आणि त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही. निसर्गातल्या महासागरामधील महाकाय शार्क माशांपासून ते लहानग्या माकुल (स्क्विड)पर्यंत आणि विषारी सापांपासून ते निरुपद्रवी फुलपाखरांपर्यंत विविध जीवांना सरूपतेची युक्तीच उपयोगी पडते. आपण माणसं नेहमी सर्वांपेक्षा वेगळं दिसायची, सगळ्यांमध्ये उठून दिसायची धडपड करतो. पण निसर्गात मात्र भोवतालच्या परिसराशी मिसळून जाण्यावर भर दिलेला पाहायला मिळतो. जर आपणही अशाचरीतीने आपल्या कामाशी, जगण्याशी मिसळून गेलो तर कदाचित आपलं जगणं अधिक सुखकारक होईल नाही का?

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in