चम्पू ते शाम्पू!

चंपी म्हटलं की डोक्याला तेल आणि शाम्पू म्हटलं की फेसाळणारे केस! पण या दोघांची गोष्ट खूपच रंजक आहे. शाम्पूचा इतिहास चक्क भारताशी जोडलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
चम्पू ते शाम्पू!
चम्पू ते शाम्पू!
Published on: 

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

चंपी म्हटलं की डोक्याला तेल आणि शाम्पू म्हटलं की फेसाळणारे केस! पण या दोघांची गोष्ट खूपच रंजक आहे. शाम्पूचा इतिहास चक्क भारताशी जोडलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

काय बालमित्रांनो, रविवार म्हटलं की साधारणतः आपला बेत असा असतो की मस्त आरामात उठायचं, छानसा नाश्ता करायचा, मस्तपैकी घरच्या कोणाकडून तरी तेलाने डोक्याला चंंपी करून घ्यायची आणि मस्त सुवासिक शाम्पूने केस धुवायचे! तोपर्यंत घरी खास रविवार स्पेशल जेवणाचा घमघमाट सुटलेला असतो. भरपेट जेवायचं आणि द्यायची जरा ताणून! अहाहा! काय मस्त वाटतं अशा वेळी! या शाम्पू आणि चंपीची गंमत दिवाळीत तर खूपच असते, नाही? दिवाळीत पहाटे उठून घरातील मोठी मंडळी जेव्हा डोक्याला सुगंधी तेल लावून जरा मालिश म्हणजे ‘कूल’ भाषेत सांगायचे तर चंपी करून देतात, तेव्हा तर अगदी बात बन जाती!

दिवाळीच्या दिवसांत सगळ्या नैसर्गिक गोष्टी कशा हव्याहव्याशा वाटतात. एरवी सुगंधी महागड्या शाम्पूसाठी हट्ट करणारे आपण आनंदाने शिकेकाईने पण केस धुवायला तयार होतो. अशा वेळी वाटतं, कोणी लावला असेल शाम्पूचा शोध?

तर अभिमानाची गोष्ट अशी की शाम्पूचा शोध हा खास भारतीय आहे बरं का!

भारतीय उपखंडात पार सिंधू संस्कृतीच्या आसपास केस धुण्यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई यांचा वापर केला जायचा असे आढळून आले आहे. आवळा, रिठा पाण्यात भिजवून ठेवला जायचा. रिठा हा नैसर्गिक सरफॅक्टंट (surfactant) आहे. याने केसांत साचलेला मळ, तेलकटपणा नाहीसा होतो. रिठ्याचे, आवळ्याचे झाड अगदी आत्ता आत्तापर्यंत जोवर बैठी घरं असायची, तेव्हा अंगणात लावलेली असायची. शिकेकाईच्या शेंगा उकळून किंवा वाळवून त्याची पावडर करून ती पाण्यात उकळून घेऊन केस धुवायला वापरायची पद्धत रासायनिक शाम्पूचे फार लोण पसरले नव्हते तोपर्यंत भारतात सर्वत्र आढळायची.

तेल लावून केसांना मसाज करण्याच्या पद्धतीला बोलीभाषेत चंपी म्हणतात. ‘चम्पू’चे पुढे ‘शाम्पू’ झाले असेही सांगण्यात येते. आणि आता ज्या शाम्पू कल्चरला आपण परदेशी म्हणतो, तो काही पाश्चात्य लोकांनी तयार केलेला नाही; तर चक्क परदेशात स्थायिक झालेल्या बंगाली माणसाने ज्याला शाम्पू म्हणतो आपण, तो तयार करून तिथे लोकप्रिय केला. साके दिन मुहम्मद या बंगाली फिरस्त्याने आणि त्याच्या आयरिश पत्नीने पहिल्यांदा व्यावसायिक शाम्पू इंग्लंडला तयार केला. साल होतं अंदाजाने १८१४ च्या आसपास!

त्याची स्थानिक वर्तमानपत्रात त्याने जाहिरात दिली : ‘भारतीय गुणकारी औषधी वाफेने स्नान करा! यामुळे तुमची डोकेदुखी, अंगदुखी, स्नायूदुखी नाहीशी होईल!!’

या हर्बल शाम्पूचा हा ‘व्हॅपर बाथ’ चांगलाच लोकप्रिय झाला. हा दिन मुहम्मद मोठा हरहुन्नरी होता म्हणतात. त्याने इंग्लंडमध्ये पहिलं ‘हिंदुस्तानी कॉफी हाऊस’ नावाचं रेस्टॉरंट उघडलं होतं आणि ‘ट्रॅव्हल्स ऑफ दिन मुहम्मद’ हे त्या काळात छापलेले त्याचे पुस्तकही बरेच गाजले होते.

पुढे एकोणिसाव्या शतकात रासायनिक शाम्पू तयार करण्याचे प्रयोग झाले, कारण तोपर्यंत साबणाचा शोध लागला होता. साबण पाण्यात घालून त्याच्या फेसाने केस धुणे पण लोकप्रिय झाले. मग कालांतराने स्वित्झर्लंडमधील हेअर स्टायलिस्ट जोसेफने पहिला लिक्विड शाम्पू तयार केला.

पुढे विसाव्या शतकात युरोपात शाम्पूमध्ये खूप बदल झाले आणि आपण आता जसा शाम्पू वापरतो तो तयार झाला. अमेरिकेने त्यात अधिक बदल केले आणि शाम्पू इंडस्ट्री फोफावली.

इंडोनेशिया, फिलिपाईन्स इथे देखील पूर्वीपासून शाम्पू वापरण्याची पद्धत होती. कोणी तांदूळ धुतल्याचे जे पाणी असतं त्याने किंवा विशिष्ट प्रकारच्या गवताला कुटून त्याच्या रसाने देखील केस धुवायचे.

परंतु भारतीय रिठा, आवळा आणि शिकेकाईला जी जगभर सरसकट पसंती तेव्हा मिळाली त्याला तोड नाही. आजही हर्बल शाम्पूला जगात अधिक मागणी आहे आणि त्यात आवळा आणि शिकेकाईचा शाम्पू अधिक वरचढ ठरतो!

तर मग कसला विचार करता आहात? मस्त रविवार आहे आज, तर देशी व्हॅपर बाथ जिंदाबाद!!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in