गरब्याचा बदलता ट्रेंड

एकेकाळी ५०० रुपयांत शिकता येणारा गरबा आता शिकण्याकरिता हजारो रुपयांचा खर्च होतो. टाळी-चपटीपासून बॉलिवूड आणि सेल्फी गरब्यापर्यंतचा प्रवास करत पुन्हा पारंपरिक गरब्याकडे वळलेला हा नृत्यप्रकार आता केवळ संस्कृतीचा भाग न राहता ग्लॅमर, स्पर्धा आणि कमर्शियलायझेशनचा मोठा भाग बनला आहे.
गरब्याचा बदलता ट्रेंड
गरब्याचा बदलता ट्रेंड
Published on: 

विचारपान

संदीप प्रधान

एकेकाळी ५०० रुपयांत शिकता येणारा गरबा आता शिकण्याकरिता हजारो रुपयांचा खर्च होतो. टाळी-चपटीपासून बॉलिवूड आणि सेल्फी गरब्यापर्यंतचा प्रवास करत पुन्हा पारंपरिक गरब्याकडे वळलेला हा नृत्यप्रकार आता केवळ संस्कृतीचा भाग न राहता ग्लॅमर, स्पर्धा आणि कमर्शियलायझेशनचा मोठा भाग बनला आहे.

गरबा म्हटला की डोळ्यासमोर येतो तो पारंपरिक पोशाख, टाळी-चपटीचा ताल आणि नऊ दिवसांचा उत्साह. मात्र गेल्या काही वर्षांत गरब्याचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. एकेकाळी केवळ आवड म्हणून शिकवला जाणारा गरबा आता कमर्शियल झाला असून, गरबा क्लासेसपासून स्पर्धांपर्यंत मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे गरबा आता केवळ गुजराती समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. मराठी तसेच अन्य भाषिक नागरिकही मोठ्या उत्साहाने गरबा शिकत असून, प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढला आहे. गल्लोगल्ली देवीची घटस्थापना केली जाते. मोठमोठे कॉम्प्लेक्स, टॉवर यामध्ये दांडियाचे आयोजन केले जाते. त्यामुळे आता गरबा हा अधिकाधिक लोकप्रिय झाला आहे.

सुमारे ३० वर्षांपूर्वी गरबा क्लासेस सुरू झाले. सुरुवातीच्या काळात आवड आणि छंद म्हणून गरबा शिकवला जात होता. त्यावेळी क्लासची फी अवघी ५०० रुपयांपासून सुरू होत असे. मात्र २०१६-१७ नंतर गरबा क्लासेस मोठ्या प्रमाणावर कमर्शियल होऊ लागले आणि त्याचबरोबर त्याची फी वाढत गेली. सध्या बेसिक कोर्ससाठी साधारण तीन हजार, तर अॅडव्हान्स कोर्ससाठी चार हजार रुपयांपासून फी आकारली जाते. जूनपासूनच गरब्याची पूर्वतयारी सुरू होते. काही ठिकाणी महिन्याला आठ सेशन्स घेतले जातात. गेल्या काही वर्षांत कामाचे वाढलेले तास, नवरा-बायकोची नोकरी किंवा व्यवसाय तसेच सोशल मीडियाचा वापर यामुळे कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. काहीवेळा संवादाअभावी तणाव वाढला आहे. नवरात्रोत्सवाच्यानिमित्ताने खेळला जाणारा गरबा हे पती-पत्नीमधील बॉडिंग वाढवण्याची उत्तम संधी मानले जाते. अनेकदा संसारातील तणाव दूर करण्याकरिता मानसोपचारतज्ज्ञ गरब्याच्या स्पर्धेत सहभाग घेण्याचा सल्ला कपल्सना देतात. गरब्याचा सराव व नऊ दिवस गरबा खेळण्यामुळे अनेकदा कुटुंबे एकत्र येतात. फीटनेस हेही गरबा खेळण्याचे महत्वाचे कारण आहे. सराव व प्रत्यक्ष गरबा खेळताना कँलरीज बर्न होत असल्याने नवरात्रीचा उपवास व गरबा या माध्यमातून काहीजण तीन-चार किलो वजन कमी करतात.

टाळी-चपटीपासून बॉलिवूड, सेल्फी अन् पुन्हा पारंपरिक गरबा

गरब्याच्या शैलीतही गेल्या तीन दशकांत मोठा बदल झाला आहे. सुरुवातीला टाळी-चपटी आणि पारंपरिक स्टेप्सवर भर असायचा. त्यानंतर बॉलिवूड आणि मराठी गाण्यांवर गरबा खेळण्याचा ट्रेंड आला. सेल्फी घेत गरबा खेळणे, विविध फ्युजन स्टेप्स आणि आकर्षक कोरिओग्राफी यामुळे गरब्याला ग्लॅमरची किनार मिळाली. आता मात्र पुन्हा पारंपरिक गरब्याकडे तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे. गरब्याचे ट्रेन्ड वरचेवर बदलत आले असले तरी त्यातील उत्साह, चैतन्य व नावीन्य तसूभरही कमी झालेले नाही.

गरबा शिकण्यासाठी हजारोंचा खर्च

गरबा शिकणे हा आता केवळ काही दिवसांचा क्लास राहिलेला नाही. बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्स, सराव, स्पर्धेची तयारी यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. क्लासपासून इतर तयारीपर्यंत तीन महिन्यांचा खर्च १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत जातो. मुंबईत वर्षभरासाठी १५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक शुल्क आकारले जाते. त्यामुळे गरबा शिकण्याची आवड आता बजेटमध्येही बसवावी लागते. हौसेला मोल नसते. ज्याला गरबा खेळायचा आहे. आपल्या स्टेप्स इतरांनी पाहाव्या, मोबाईलमध्ये शूट कराव्या, आपल्या अफलातून कॉस्च्युमची तारीफ करावी, असे वाटते ते कितीही खर्च आला तरी सर्वतोपरी तयारी करून या स्पर्धेत उतरतात.

नऊ दिवस, नऊ पोशाख!

गरबा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी कॉस्च्युम हा महत्त्वाचा भाग बनला आहे. नऊ दिवसांसाठी नऊ वेगवेगळे पोशाख वापरण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे पोशाख विकत घेण्याऐवजी अनेकजण तो भाड्याने घेण्यास प्राधान्य देतात. भाड्याच्या पोशाखांची किंमत साधारण दोन हजार रुपयांपासून सुरू होते आणि त्यापुढे जाते. स्पर्धांमध्ये आकर्षक आणि हेवी कॉस्च्युमला अधिक पसंती मिळते. ज्यांना दरवर्षी गरबा खेळायचा आहे असे काही लोक कॉस्चुम खरेदी करतात. कारण नवरात्रीत या कॉस्चुमला तुफान मागणी असते. अनेकदा गरबा खेळताना अनेकांना घाम येतो. त्यामुळे अन्य व्यक्तीने काल वापरलेले कॉस्चुम दुसरे दिवशी आपण वापरायचे ही कल्पना काहींना सहन होत नाही. काहींना त्वचाविकाराची भीती वाटते. त्यामुळे या काळात गरबा कॉस्चुमची बाजारपेठ गरम असते. या काळात गरब्याच्या रंगीबेरंगी कपड्यांचे दर चौपट ते पाचपट वाढतात.

ज्वेलरीमध्येही मोठी विविधता आली आहे. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीबरोबरच हलकी आणि कपड्यांची ज्वेलरी वापरण्याचा ट्रेंड आहे. साधी ज्वेलरी २०० रुपयांपासून मिळते, तर कस्टमाइज्ड ज्वेलरीसाठी दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो. सोन्याचे किंवा मौल्यवान दागिने सहसा गरबा खेळण्याकरिता वापरले जात नाही. कारण खेळताना जर सोन्याचा दागिना गहाळ झाला तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. मात्र सिल्व्हर ज्वेलरीला अनेकजण पसंती देतात. कारण प्लँटीनम ज्वेलरी ही सर्वसामान्यांना परवडणारी नसते व तीही गर्दीत चोरीला जाण्याची किंवा खेळतांना गहाळ होण्याची भीती असते. मात्र गरबा खेळताना जेवढे महत्व कॉस्चुमला आहे तेवढेच ते ज्वेलरीला आहे. त्याखेरीज गरब्याची तयारी होत नाही.

मेकअप, नेल आर्टपासून टॅटूपर्यंत

गरबा लूक पूर्ण करण्यासाठी आता केवळ पोशाख आणि ज्वेलरी पुरेशी राहिलेली नाही. मेकअप, नेल आर्ट, टॅटू आणि इतर अॅक्सेसरीजवरही खर्च केला जातो. त्यामुळे एका रात्रीच्या गरब्यासाठी तयार होण्याचा खर्चही वाढत आहे. गेल्या काही वर्षांत नेल आर्ट लोकप्रिय झाली आहे. टँटूमुळे गर्दीत तुमचे वेगळेपण उठून दिसते. त्यामुळे अनेकजण या काळात अंगावर टँटू काढून घेतात. नवरात्रीत देवी, तिचा परशु किंवा अन्य शस्त्र, देवीचे आक्राळविक्राळ रुप यासंबंधीत टँटूंची मागणी अधिक असते.

स्पर्धेत उतरायचे तर खर्चाची वेगळीच गोष्ट

गरबा स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांचा खर्च आणखी वाढतो. काही ठिकाणी गरबा खेळण्यासाठी पास घ्यावा लागतो. नऊ दिवसांसाठी साधारण सहा ते सात हजार रुपयांचा पासचा खर्च होऊ शकतो. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना पहिल्या दिवसापासून सलग नऊ दिवस तीन ते पाच तास गरबा खेळण्याची तयारी ठेवावी लागते.

क्लासची फी, स्पर्धेचे पास, नऊ दिवसांचे कॉस्च्युम, ज्वेलरी, मेकअप, नेल आर्ट आणि इतर खर्च धरला तर स्पर्धात्मक गरब्यासाठी २५ ते ३० हजार रुपयांपासून खर्च सुरू होतो. काही जणांकडून हा खर्च ५० हजार रुपयांपर्यंतही जातो. हा खर्च उच्च मध्यमवर्गीयांकरिता फार नाही. परंतु तुम्ही मध्यमवर्गीय असाल व तुमच्यात गरबा खेळण्याचे हुनर व हौस असेल तर अगदी दरमहा काही पैसे बाजूला ठेवून तुम्ही नवरात्रीत मिरवण्याची इच्छापूर्ती करु शकता.

गरब्याची क्रेझ वाढली, भाषेची सीमा मिटली

मुंबईत गरब्याची क्रेझ भाजपच्या मुलुंडमधील एका नेत्याने वाढवली. अगदी नव्वदच्या दशकात मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गरब्याचे आयोजन हा नेता व त्याची पत्नी करत होती. या कार्यक्रमांना लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून अनेक नेत्यांना पाचारण केले होते. वेगवेगळ्या भाषिक वृत्तपत्रांच्या पत्रकारांना वाहने पाठवून रात्री उशीरापर्यंत हा नवरात्रोत्सव पाहण्याची सोय हा नेता करायचा. गेल्या काही वर्षांत गरब्याची लोकप्रियता वाढण्यामागे सोशल मीडिया आणि विविध गरबा स्पर्धांचा मोठा वाटा आहे. गरबा शिकण्यासाठी आता केवळ गुजराती समाजातील नागरिकच नव्हे, तर मराठी आणि अन्य भाषिक नागरिकही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये गरब्याची क्रेझ पाहायला मिळते.

गरबा प्रशिक्षक आणि परीक्षक वैशाली सत्रा यांच्या मते, पूर्वी गरबा शिकवणे ही आवड होती. मात्र २०१६-१७ नंतर गरबा क्लासेसचे कमर्शियल स्वरूप वाढले. ५०० रुपयांपासून सुरू झालेली फी आता तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गरबा शिकणाऱ्यांमध्ये मराठी आणि अन्य भाषिकांचाही मोठा सहभाग आहे. विविध ट्रेंडनंतर आता पुन्हा पारंपरिक गरब्याला पसंती मिळत आहे. गरबा प्रशिक्षक आणि स्पर्धक गौरी राजे यांच्या मते, जूनपासूनच गरब्याची पूर्वतयारी सुरू होते. बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्स घेतले जातात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना तीन ते पाच तास गरबा खेळण्याचा सराव करावा लागतो. कॉस्च्युम, ज्वेलरी आणि इतर तयारीचा खर्च धरल्यास गरबा आता केवळ नृत्याचा छंद न राहता मोठ्या खर्चाचा उत्सव बनला आहे.

एकूणच, एकेकाळी ५०० रुपयांत शिकता येणारा गरबा आता हजारोंच्या खर्चापर्यंत पोहोचला आहे. टाळी-चपटीपासून बॉलिवूड आणि सेल्फी गरब्यापर्यंतचा प्रवास करत पुन्हा पारंपरिक गरब्याकडे वळलेला हा नृत्यप्रकार आता केवळ संस्कृतीचा भाग न राहता ग्लॅमर, स्पर्धा आणि कमर्शियलायझेशनचा मोठा भाग बनला आहे.

pradhansandeep19@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in