जंगलातील अनमोल ठेवा

उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात बहरणाऱ्या आणि आपल्या गोड पदार्थांची चव वाढवणाऱ्या चारोळी या खास फळाबद्दल...
जंगलातील अनमोल ठेवा
Published on

ग्रीन गॉसिप्स

सांबारवडी- भाग्यश्री पटवर्धन

उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात बहरणाऱ्या आणि आपल्या गोड पदार्थांची चव वाढवणाऱ्या चारोळी या खास फळाबद्दल...

उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आंबा, टरबूज अशा फळांची आठवण येते, हो ना? पण या कडक उन्हाळ्यात जंगलात एक अत्यंत खास फळ तयार होतं, ज्याची चव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी चाखलेली असते. आज आपण अशाच एका रंजक झाडाची आणि तिच्या फळाची ओळख करून घेणार आहोत, ते म्हणजे ‘चारोळी’चं झाड!

चारोळीला ‘चिरोंजी’ किंवा ‘चार’ अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातं. इंग्रजीत या झाडाला ‘कॅडप्पाह बदाम’ (Cuddapah almond) असं म्हणतात. संस्कृतमध्ये याला प्रियाल, अखट्ट अशी छान नावं आहेत, तर विदर्भ आणि मध्यप्रदेशातील आदिवासी बांधव प्रेमाने याला ‘गुठली’ असं म्हणतात. चारोळीचं झाड खूप उंच, साधारण पंधरा मीटरपर्यंत वाढतं. या झाडाचं खोड अगदी मगरीच्या कातडीसारखं खडबडीत आणि वेगळं दिसतं, त्यामुळे काही जण याला ‘क्रोडाइल बार्क’ असंही म्हणतात. हिवाळा किंवा उन्हाळ्यात या झाडाची पानं गळतात. फेब्रुवारी महिन्यात या झाडाला छान मोहोर येतो. हा मोहोर दुरून पाहिला तर अगदी आंब्यासारखा दिसतो, पण त्याला आंब्यासारखा सुवास नसतो. काही वेळा हे झाड मोहाच्या झाडासारखंही भासतं. म्हणूनच याला ‘बहुरूपी झाड’ म्हटलं तरी चालेल.

एप्रिल आणि मे महिन्यात चारोळीची फळं पिकायला सुरुवात होते. पिकल्यावर ही फळं काळी पडतात आणि दिसायला अगदी करवंदासारखी वाटतात. पण लक्षात ठेवा, करवंदाचं छोटं झुडूप असतं, तर चारोळीचा मोठा वृक्ष असतो! या फळांची चव गोड, आंबट आणि थोडी तुरट असते. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातल्या आदिवासी महिला या फळांची गोळाबेरीज करताना दिसतात. ही फळं गोळा करून काही दिवस ठेवली की ती मऊ पडतात आणि आपोआप उघडतात. त्यातून एक छोटीशी बी बाहेर पडते—हीच आपली आवडती चारोळी!

आपण जेव्हा खीर, शिरा किंवा लाडू खातो, तेव्हा त्यावर जी पांढरी, छोटी बी टाकलेली असते, ती हीच चारोळी असते. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं, त्यामुळे त्यापासून तेलही काढलं जातं. चारोळीचं झाड फक्त आपल्यासाठीच नाही, तर जंगलातल्या पक्ष्यांसाठीही खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा फळं पिकतात, तेव्हा अनेक पक्षी या झाडावर येतात आणि फळांचा आनंद घेतात. या काळात आदिवासी महिला चारोळी गोळा करून बाजारात विकतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला चांगला रोजगार मिळतो.

पण मुलांनो, आजकाल एक दुःखाची गोष्ट घडत आहे. ही झाडं हळूहळू कमी होत चालली आहेत. पूर्वी मेळघाटाच्या जंगलात ही मोठ्या प्रमाणावर दिसायची, पण आता ती दुर्मिळ झाली आहेत. चारोळीचं झाड खूप हळूहळू वाढतं, त्यामुळे अशी झाडं तोडणं अजिबात योग्य नाही. उलट, बियांपासून या झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली ही एक अमूल्य संपत्ती आहे आणि तिचं रक्षण करणं ही आपलीही जबाबदारी आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जंगलात जाल, तेव्हा या खास झाडाकडे नक्की लक्ष द्या आणि निसर्गाची ही देणगी जपायला शिका!

bhgya2510@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in