

बालविश्व
युवराज माने
मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे वातावरण मिळालं की शाळा त्यांच्यासाठी आनंदाचा प्रवास ठरते. पहिलीचा वर्ग हा त्यांच्या जीवनातील नाजूक टप्पा. ‘शाळा म्हणजे आनंद’ ही भावना त्यांच्या मनात रुजली की ते शाळेपासून कधीच दूर जात नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी आम्ही कोणताही ताण, बंधन किंवा भीती नसलेलं वातावरण तयार केलं. हळूहळू मुलं खुलू लागली. गुरुजी म्हणजे ‘सर्व सांगता येणारा मित्र’ ही भावना त्यांच्या मनात पक्की झाली.
मग दररोज सकाळी काही ना काही सांगणं, दाखवणं, उत्साहाने गोष्टी मांडणं- हा मुलांचा कार्यक्रम सुरू झाला.
एके दिवशी ईश्वरी वर्गात आली आणि म्हणाली, “गुरुजी, आमच्याकडे बाळ आलंय! अगदी आमच्या आईसारखंच दिसतंय!” तिचं बोलणं सगळे ऐकत होते. तेवढ्यात ममता पिशवीत डोकावत असल्याचं दिसलं. विचारलं तेव्हा तिने वेगवेगळ्या आकारांचे शंख-शिंपले आणि रंगीत दगड बाहेर काढले. “मामाच्या गावाजवळच्या नदीवरून आणले”, ती म्हणाली. मुलांसाठी हा अगदी नवीन अनुभव होता.
पुढच्या दिवसापासून तर जणू स्पर्धाच सुरू झाली. प्रत्येक मुलगा-मुलगी आपापला ‘खजिना’ घेऊन येऊ लागली.
अंकिताने मोरपीस आणलं; नम्रताने विविध रंगांची गुलाब फुलं.
अर्जुन आणि रेश्माने काड्यांपासून बनवलेली बैलगाडी, टिकाव, चारपाया आणल्या.
कार्तिकने सुगरणीचं घरटं आणलं.
आणि पायलचा खजिना तर अवर्णनीय - तुटकी बाहुली, मातीची भांडी, प्लास्टिकचं टोपण, आईच्या पिना-बांगड्या, भिंग, कंगवा… टेबलावर हे सर्व मांडताना तिच्या चेहऱ्यावरची श्रीमंती विशेष झळकत होती.
मुलांमध्ये निरागस स्पर्धा सुरू झाली - ‘माझा खजिना अधिक!’
आणि वर्गाचा कोपरान्कोपरा त्यांच्या वस्तूंनी उजळून निघत होता. हा खजिना पाहून मला स्वतःला श्रीमंत झाल्यासारखं वाटू लागलं.
कौतुक हा मुलांचा श्वास. आपण त्यांच्या छोट्या खजिन्याचे कौतुक केलं की त्यांना आपलेपणा जाणवतो. घरात ज्याला ‘कचरा’ म्हणतात, टाकाऊ मानतात त्याच वस्तू आमच्या वर्गात मी टेबलावर मांडून त्यांचं स्वागत करत होतो. मुलांच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट होती. खरंतर मी काही नवीन करत नव्हतो, उलट मुलंच मला नवं शिकवत होती. मोडक्या-तोडक्या वस्तूंमध्ये आनंद कसा शोधायचा हे दाखवत होती.
शीतलने लग्नपत्रिकांच्या चित्रांपासून बनवलेलं चिकटवही (स्क्रॅप बुक) आणली.
करणने कागदी विमान, बेडुक, फुलं, पंखा बनवून आणले. त्याची कल्पकता पाहून मुलं थक्क झाली. आजवर आकाशात पाहिलेलं विमान आता त्यांच्या हातात होतं.
खुशी आणि साक्षीचा खजिना मात्र वेगळाच. त्यांनी परिसरातील विविध वनस्पतींच्या बिया जमा केल्या होत्या - चिंच, बोरं, आंबा, सीताफळ, लिंबू, काजू, बदाम, करंजी, तूर, गहू, ज्वारी…टेबल भरून गेलं होतं.
“इतकीशी आंब्याची कोय आणि एवढं मोठं झाड!” स्वाती म्हणाली.
“या बियांतून झाड कसं येत असेल?” ईश्वरीचा प्रश्न.
“सीताफळात एवढ्या मोठ्या बिया का असतात?” साक्षीचं कुतूहल.
त्यांची चर्चा मनाला स्पर्शून गेली. “झाड कसं तयार होतं, ते आपण लवकरच पाहणार आहोत”, असं म्हटल्यावर त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
एक दिवस मुलांचा हा सर्व खजिना सुंदररीत्या मांडून त्यांचं प्रदर्शन भरवलं. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ते पाहायला बोलावलं. मुलं आपल्या खजिन्याजवळ बसून अभिमानाने बोलत होती. त्यांच्या वस्तूंसोबत त्यांची जीवाभावाची दोस्ती दिसत होती. मुख्याध्यापक म्हणाले, “ही आपली उद्याची कलाकारांची पिढी आहे.”
खरंच, संग्रह ही मुलांची जन्मजात प्रवृत्ती. वयानुसार ती छंदात बदलू शकते. फक्त तिला योग्य दिशा हवी. ‘कशाचा संग्रह करायचा, का करायचा, कसा करायचा’ ही दिशा दिली तर मुलं या प्रक्रियेत आनंदाने गुंतून राहतील. ते आपल्या संपत्तीचं मोल ओळखायला शिकतील.
मनाशी ठरवलं, या मुलांच्या संग्रहवृत्तीला नक्कीच सुंदर वळण द्यायचं. श्रीमंती-अभावाचा भेद मुलांच्या जगात नसतो. ईश्वरानेच जणू त्यांच्यासाठी असंख्य वस्तू पेरलेल्या आहेत.
खिशात कोंबायला वस्तू नाहीत असे मूल शोधून तरी सापडेल का?
प्रयोगशील शिक्षक व शिक्षणविषयक ललित लेखन