शब्दसंपत्ती

मालकीणबाई मार्गारेट मांजरमावशीला सारख्या हिडीस-फिडीस करतात. घालूनपाडून बोलतात. ते करताना त्याच त्या चार-पाच घिस्यापिट्या शब्दांचा वापर करतात.
शब्दसंपत्ती
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाई मार्गारेट मांजरमावशीला सारख्या हिडीस-फिडीस करतात. घालूनपाडून बोलतात. ते करताना त्याच त्या चार-पाच घिस्यापिट्या शब्दांचा वापर करतात.

बिळात लपून बसलेल्या रॉबिन्सन उंदीर मामाच्या कानावर या शिव्या पडत. त्याच त्या शिव्या ऐकून रॉबिन्सनला जाम कंटाळा आला. त्याचे कान विटले. “स्वत:ला स्मार्ट नव्हे तर अतिस्मार्ट समजणारी मार्गी, कशी काय त्याच त्या शिव्या सहन करते? की तिची दाखवायची बुद्धी वेगळी नि प्रत्यक्षातील बुद्धी वेगळी असेल का?” रॉबिन्सन स्वत:शीच पुटपुटला. त्याच्या लक्षात आपली चूक लगेच आली. त्याने डाव्या पायाने स्वत:ला गालावर लगावली नि स्वत:लाच बजावलं, “गधडुद्दीन डोंग्य्रा, मार्गीची बुद्धी तेज आहे म्हणूनच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती देते नि मालकीणबाईला चुकवून तुझ्या खादडण्याची सोय करतेना. बरोबर, बरोबर. मार्गे चुकलंच माझं. तुझ्या बुद्धीवर संशय घेणं म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला मेणबत्ती दाखवण्यासारखं. सॉरी!” असं म्हणून त्याने पुन्हा स्वत:च्या गालावर उजव्या पायाने लगावली.

कशावरून तरी मालकीणबाई मार्गारेटवर पुन्हा त्याच कंटाळवाण्या शिव्यांसह खेकसल्या नि काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या. जाताना धाडदिशी दरवाजा लावला. त्या बाहेर जाताच मामा बिळाच्या बाहेर आला. मावशी लहान तोंड करून बसली होती. मामा पळतच किचनमध्ये गेला नि त्याने मावशीसाठी लोणी आणलं. मावशीला दिलं. मावशीला बरं वाटलं. तिचा चेहरा खुलला. हे बघून रॉबिन्सन तिला म्हणाला,

“अग मार्गे मावशे, ही मालकीणबाई तुझ्यासारखी इंटेलिजंट नि स्मार्ट का नाही?”

“रॉब्या, तुला रे हा प्रश्न का पडला?”

“मावशे, मालकीणबाई त्याच त्या दोन-चार शिव्या तुला देते. त्याचा तुला कंटाळा येत नाही का? मी तर जाम बोर झालोय बघ.”

“गधड्या, मालकीणबाईंनी मला खूप शिव्या द्याव्यात अशी तुझी इच्छा आहे का? तशी इच्छा असेल तर, तुला गट्टम करण्याची, मी दाबून ठेवलेली‍ इच्छा आधी पूर्ण करेन”, आपला जबडा दाखवत मावशी गरजली.

“सॉरी, सॉरी मावशे, मला म्हणायचं होतं, या मालकीणबाईंना हे चार-पाच शब्दच का आठवतात बॉ? या मनुष्यप्राण्याजवळ शब्द आठवण्याची नि साठवण्याची काही शक्तिबिक्ती किंवा क्षमता असेल ना? हा माझा मूर्खासारखा प्रश्न असला तरी त्याचं उत्तर तर तुझ्याकडेच असणारच, माझे स्मार्टू मावशे!” रॉबिन्सन लाडाने मावशीची मिशी ओढत म्हणाला. समोर प्रश्न आल्यावर त्याला भिडलंच पाहिजे, हा मार्गारेटचा खाक्या असल्याने तिने मामाचा प्रश्न मनात घोळवला. डोळे मिटले. मेंदूला इकडे तिकडे दौडवले. क्षणात डोळे उघडून म्हणाली, “रॉबिन्सनराव, मालकीणबाई जरा कमी किंवा अजिबातच स्मार्ट नसल्याने त्यांच्या मेंदूत फार काही शब्द राहत नाहीत. शिवाय शिव्यांसारखे किंवा निषेध करणारे शब्द हे भाषेतील मूलभूत आणि भावनिक शब्द असतात. ते मेंदूच्या भावनिक प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या भागातून (लिम्बिक सिस्टिम) निर्माण होऊन मुखावाटे बाहेर पडतात. त्यासाठी उच्च भाषिक बुद्धिमत्तेची गरज नसते. त्यामुळे तणावाखाली असताना, लोक कमी विचार करून पटकन त्याच त्या भावनिक शब्दांचा वापर करतात.”

“याचा दुसरा अर्थ असा की, मालकीणबाईंच्या मेंदूत शिव्यांचा साठा मर्यादित असला तरी इतर स्मार्ट मनुष्यप्राण्याच्या मेंदूत असंख्य शब्द राहू शकतात म्हणायचं.”

“हो रे माझ्या हुशार रॉबेश्वरा!”

“म्हणजे किती?”

“रॉबुद्दीन, मनुष्यप्राण्यातील काही अतिहुशारांना, ज्यांना इतर मनुष्यप्राणी ‘संशोधक’ म्हणतात, त्यांना असं आढळलं की, अमेरिकेतल्या १६ वर्षांच्या मुलाच्या मेंदूत दहा ते १२ हजार सक्रिय शब्दांचा संग्रह राहतो.”

“म्हणजे तो इतक्या शब्दांचा वापर करू शकतो. असंच ना.”

“अगदी बरोबर. हे झालं १६ वर्षांच्या मुलाचं, तर २२ किंवा २३ वर्षांच्या मुलांच्या मेंदूत २० ते २५ हजार सक्रिय शब्दांचा संग्रह राहतो.”

“पण हे कळलं कसं?”

“रॉबूसिंग, डेव्हिड क्रिस्टल या ब्रिटिश भाषातज्ज्ञाने त्यासाठी एक प्रयोग केला.

“काय केलं त्याने?”

“त्याने शब्दकोश फाडला.”

“कशासाठी?”

“प्रयोगासाठी रे.”

“असा फाडफूड प्रयोग. अजबच म्हणायचा.”

“हो ना, तर या डेव्हिडने मग या फाडलेल्या शब्दकोशातील वेगवेगळी पाने मुलांना दिली. यातील किती शब्द त्यांना माहीत आहेत, याची बेरीज करायला लावली.”

“त्यातून काय सिद्ध झालं?”

“मुलांना ६० ते ७५ हजार शब्द माहीत असल्याचं दिसून आलं.”

“वाव!”

“टाव! पण मग त्याच्या हेही लक्षात आलं की आपण फक्त शब्दकोशातल्या मूळ शब्दांचाच विचार करतो. पण या शब्दांचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात. प्रत्यय लावून, विशेषणं-क्रियाविशेषणं लावून वेगवेगळी रूपं तयार होतात.”

“यानेकी, मुलांना माहीत असणाऱ्या शब्दांची संख्या ६० ते ७५ हजारांहून अधिक निघते, असंच ना.”

“वा... क्या बात है, आईन्स्टाईनच्या सत्ताविसाव्या वंशजा. पण हे सगळे निष्क्रिय म्हणजे फारसे उपयोगात न आणणारे शब्द असतात.”

“पुढे काय झालं?”

“पुढे या डेव्हिड महाशयांनी त्यांचा निष्कर्ष ताडून पाहण्यासाठी आणखी एक प्रयोग केला.”

“या रिकामटेकड्याला दुसरा उद्योग नव्हता वाटतं.”

“अरे राबूप्रताप मुर्खेश्वरा, या संशोधकांच्या अशा रिकामटेकडेपणाच्या उद्योगातून नवं नवं संशोधन बाहेर पडत असतं ना.”

“मग काय बाहेर पडलं बुवा?”

“डेव्हिड महाशयांनी एक पुस्तक घेतलं. त्यात दहा लाख शब्द होते. त्यातले मूळ शब्द त्याने शोधले. त्‍यावरून, डेव्हिड यांचा निष्कर्ष बरोबर असल्याचं इतर संशोधकांच्या लक्षात आलं.”

“म्हणजे नेमकं काय झालं?”

“या मनुष्यप्राण्याला साधारणत: ३८ हजार शब्द माहिती असतात. बस्स.”

“मावशे, असं जर असेल तर या मालकीणबाईंचं डोकं फारच भंगार म्हणायचं. किमान दोन-चार हजार तरी शिव्या लक्षात ठेवा म्हणावं. किती दिवस त्याच शिळ्या शिळ्या शिव्या ऐकायच्या मी.” रॉबिन्सन बिळाकडे धूम पळत, मावशीला दात दाखवत म्हणाला.

मावशी मिशीला पिळ देत मनात पुटपुटली, “मालकीणबाईंच्या सक्रिय शब्दसंग्रहाला वाढवण्यासाठी शिव्यांची नवीन यादी मीच तयार करते नि उद्यापासून शिकवते त्यांना!”

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in