

झिरो नंबरचा चष्मा
राजेंद्र साठे
NEET व CBSE परीक्षांमधील गोंधळामुळे संतापलेल्या मध्यमवर्गीय तरुणांनी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून थेट मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालील या उत्स्फूर्त बंडाचे महत्त्व, मर्यादा आणि भविष्यातील आव्हाने यावर टाकलेला हा एक प्रकाशझोत.
नरेंद्र मोदींनी अलिकडेच सलग सत्तेत राहण्याचा पंडित नेहरुंचा विक्रम मोडला. या निमित्ताने दिल्लीत कौतुक सोहळा चालू असतानाच तिकडे कालपर्यंत मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींच्या घरात जाऊन सीआयडीवाले तपास करीत होते. केरळात पिनाराई विजयन यांच्या मुलीच्या एका प्रकरणात इडीची कारवाई नव्याने सुरु झाली होती. तिसरीकडे मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची राज्यसभेची उमेदवारी निवडणूक आयोगाचा अत्यंत दुय्यम अधिकारी त्याहूनही तिय्यम कारणासाठी रद्द करीत होता. एकूण या विक्रमी मोदी राजवटीमध्ये एखादा विरोधक बराच काळ जिवंत आणि सक्रीय राहिला तर तोही विक्रम वाटावा असा सध्याचा आजूबाजूचा भोवताल आहे. या स्थितीत कॉकरोच जनता पार्टी नावाच्या एका नव्या घटकाचा उदय झाला आहे. या पार्टीचे पहिले आंदोलन शनिवारी दिल्लीमध्ये पार पडले. पण मोदी सरकारने इतक्या सहजपणे हे आंदोलन होऊ दिल्यामुळे त्याच्याबाबत या पार्टीच्या चारित्र्याबाबतच अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके सहजपणे अमेरिकेतून दिल्लीत येतो काय आणि त्याला लगोलग आंदोलनाची परवानगी दिली जाते काय, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी हे आंदोलन एका दिवसात का संपवले असाही प्रश्न केला आहे. मिडियातल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर अनेकांना, बहुदा अण्णा हजारे व केजरीवाल यांच्या २०११ ते १३ च्या आंदोलनाप्रमाणे प्रचंड काहीतरी उभे राहील, कित्येक हजार लोक अनेक दिवस दिल्लीत ठिय्या देतील असे वाटत होते असे दिसते. पण अण्णा हजारे हे २०११ पूर्वी किमान तीस वर्षे अनेक आंदोलने करीत होते. केजरीवाल हे दिल्लीमध्ये किमान दहा वर्षे जनचळवळी उभारत होते. दीपके हे आम आदमी पक्षात होते व मनीष सिसोदिया यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. पण बाकीच्यांचा राजकारण किंवा चळवळींशी फार संबंध नाही. नीट व सीबीएसईच्या परीक्षांमधील भानगडींमुळे संतापलेली ही तरुण पिढी होती. एका अर्थाने आधी सोशल मिडियात आणि नंतर प्रत्यक्ष जमिनीवर उमटलेली ही संतापाची उस्फूर्त प्रतिक्रिया होती. आता इथून पुढे हे लोक जसजसे एकत्र येतील तसतसे त्यांचे विचार अधिक स्पष्ट होतील.
एक लक्षात ठेवायला हवे की, मिडियाला वा कार्यकर्त्यांना अमुक वाटते म्हणून तशी आंदोलने उभी राहत नसतात. आंदोलक संघटनांची जमिनीवर ताकद किती आहे त्यांची संघटना कशी आहे यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अभिजित दीपकेने गेल्या आठ दिवसात मिडियामध्ये ज्या मुलाखती दिल्या आहेत त्यावरून त्याचा राजकीय विचार किती खोल आहे हे स्पष्ट झालेले नाही. आपण नोकरी करण्याचा विचार करीत होतो, तेव्हा अचानक ही जबाबदारी आपल्यावर येऊन पडल्याचे त्याने वारंवार म्हटले आहे. अशा स्थितीत त्याच्याकडून एकाएकी चळवळीला नेतृत्व किंवा दिशा देण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. अभिजितने नीट परिक्षेच्या निमित्ताने मोदी सरकारवर टीका केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही कॉकरोच पार्टीची प्रमुख मागणी आहे. गेली अनेक वर्षे हे सरकार सातत्याने हिंदू विरुद्ध मुस्लिम करीत आले याबद्दल दीपके याने राग व्यक्त केला आहे. यामुळे तरुणांना काय मिळाले असा सवाल तो करतो. हिंदुत्व आणि मोदीत्व या दोन खांबावर सध्याची राजवट उभी आहे. त्यालाच अभिजितने आव्हान दिले आहे. पण हे आव्हान पुढे घेऊन जाण्यासाठी जी सूत्रबध्द आणि विविध प्रश्नांना भिडणारी जी चळवळ उभारावी लागेल त्यासाठी अभिजित तयार आहे का हे अजून कळायचे आहे.
दिल्लीत जंतरमंतरवर पहिल्या आंदोलनासाठी आलेल्यांमधले अनेक तरुण व त्यांचे पालक निवडणुकीमध्ये कदाचित मोदींना व भाजपला मतदान करीत असतील. एरवीच्या आयुष्यात मुस्लिमांना वेगळे पाडण्यात त्यांना कदाचित काही गैर वाटत नसेल. देशाची सध्याची आर्थिक घसरण होण्यात किंवा महागाई, बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होण्याला मोदी सरकार जबाबदार आहे असा विचार त्यांनी आजवर कधी केला नसेल. त्यामुळे उद्या समजा दीपके याने हे आंदोलन अधिक व्यापक केले तर हे लोक त्याच्यासोबत राहतीलच याची हमी कोणी देऊ शकत नाही.
तरीही कॉकरोचच्या पहिल्या आंदोलनाची धग, सच्चाई, उस्फूर्तता, सात्विक संताप हा दृष्टिआड करता येऊ शकत नाही. परिक्षांच्या निमित्ताने का होईना पण हे लोक खुलेपणाने व सोशल मिडियामध्ये मोदी सरकारवर टीका करीत आहेत. शिक्षण खाते किंवा सीबीएसईसारख्या संस्थांची तर अक्षरशः सालटी काढत आहेत. हा सगळा संपन्न असामध्यमवर्ग आहे. हा एरवी भाजपचा समर्थक वर्ग आहे. म्हणूनच त्यातून निर्माण झालेले हे बंड महत्वाचे आहे.
पंजाबातल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्द तब्बल दीड वर्ष दिल्लीत ठाण मांडले. पण मोदींनी त्यांना दुर्लक्ष करून मारण्याचा प्रयत्न केला. मिडियाने त्यांना खलिस्तानी ठरवले. पोलिसांनी त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले. अखेरीला शेतकरी जिंकले. पण राजकीयदृष्ट्या तेही भाजपला मोठा विरोध उभा करू शकले नाहीत. हरियाणामध्ये पुन्हा भाजपचेच सरकार आले. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीकडून अवास्तव अपेक्षा करणे चुकीचे आहे.
लोकांना या सरकारविरुदध प्रचंड संताप आला व तो त्यांनी व्यक्त केला हे महत्वाचे आहे. मोदी सरकार नालायक आहे हे असंख्य लोक रस्त्यावर येऊन बोलले हे सध्याच्या काळात नवलाचे व म्हणून मौल्यवान आहे. मोदींचे तळवे चाटणारा मिडिया जनतेतील संताप दडवू व दडपू शकत नाही हे या निमित्ताने दिसले हेही दीर्घकालीन परिणाम करणारे आहे. उद्या या संतापाला आकार देणे व त्यातून राजकीय विरोध उभा करणे हे काँग्रेस किंवा बाकीच्या विरोधी पक्षांचे काम आहे. दीपके व त्याच्या सहकाऱ्यांकडून काही अपेक्षा जरूर करता येतील. त्यांनी जनतेच्या या उद्रेकाशी, बंडखोरीच्या भावनेशी गद्दारी करू नये, सरकारसोबत तडजोड करू नये असे सर्वांचे मत असेल. कारण, उद्या समजा आंदोलकांपैकी काही जण सरकारचेच एजंट निघाले किंवा त्यांनी समजा सरकारशी मांडवली केली तर लोकांना प्रचंड विश्वासघात झाल्यासारखे वाटेल. प्रामाणिक कार्यकर्त्यांवर तो मोठा आघात ठरेल. मग त्यांच्याकडे सामान्य माणसे संशयाने पाहू लागतील. मग भविष्यात अशा कोणत्याही चळवळीमागे उभे राहण्यास कचरतील.
दीपके यांनी आता बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पण तो तडीला नेणे सोपे नाही. आजवरचा अनुभव पाहता मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता शून्य आहे. दुसरीकडे नीटची फेरपरीक्षा झाली व सीबीएसईचे नवीन प्रवेश सुरू झाले की, दीपके यांच्यामागची गर्दी विरळ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आंदोलनाला वेगळी दिशा देण्याची मुत्सदेगिरी ते दाखवतात का याचे उत्तर लवकरच मिळेल. पण जोवर त्यांच्या अप्रमाणिकपणाचा थेट पुरावा मिळत नाही तोवर त्यांच्या चळवळीबाबत सतत शंका घेत राहता कामा नये. विरोधी पक्षांनीही दीपके यांना आपले प्रतिस्पर्धीम्हणून न पाहता या चळवळीचा आपल्या भावी राजकारणासाठी कसा योग्य रीतीने उपयोग करून घेता येईल हे पाहायला हवे. तूर्तास दीपके आणि मंडळी केवळ परिक्षांवर बोलत आहेत. आज ना उद्या त्यांना देशातील एकूण शैक्षणिक व्यवस्थेवर बोलावे लागेल. नंतर त्यांना एकूण अदानीच्या दावणीला बांधलेल्या एकूण अर्थव्यवस्थेविरुध्द आणि मोदी सरकारच्या देशात खड्ड्यात घालणाऱ्या धोरणांविरुध्दही बोलावे लागेल. तसे ते बोलले नाहीत तर दीपकेंचा प्रयत्न फार विस्तारणार नाही. पण म्हणून सोशल मिडियातल्या त्यांनी उडवलेल्या धमालीचा व नंतरच्या जंतरमंतरवरचा त्यांच्या आंदोलनाचे मोल कमी होणार नाही.
सध्याच्या निराश वातावरणात या युवकांनी नक्कीच एक नवीन आशा जागवली आहे. झुरळांनी त्यांचे काम केले आहे.
satherajendra@gmail.com