...अन कॉक्रोच पार्टीचा झाला सफाया

कुलकर्णींच्या घरातील झुरळांच्या सुखवस्तू संसारावर आणि माणसांच्या राजकारणातील 'कॉकरोच (झुरळ) पार्टी'च्या उदयावर भाष्य करणारा एक खुसखुशीत व उपरोधात्मक लेख...
...अन कॉक्रोच पार्टीचा झाला सफाया
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

टपल्या आणि ठोसे

संदीप प्रधान

कुलकर्णींच्या घरातील झुरळांच्या सुखवस्तू संसारावर आणि माणसांच्या राजकारणातील 'कॉकरोच (झुरळ) पार्टी'च्या उदयावर भाष्य करणारा एक खुसखुशीत व उपरोधात्मक लेख...

कुलकर्णींच्या वन बी-एचकेच्या किचनमधील खाद्यपदार्थांच्या खणात श्री. झुरळेंचा संसार सुखात सुरू होता. सौ. झुरळे आणि दहा-पंधरा चिमुकली झुरळे यांनी ते घर भरलेले होते. कुलकर्णींची कन्या अनेकदा बिस्किटाच्या डब्याचे झाकण लावायला विसरायची आणि कुलकर्ण्यांचा दिवटा तर चक्क जामपासून अनेक बाटल्या सताड उघड्या ठेवून मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसायचा. त्यामुळे झुरळे कुटुंबाची मोठ्ठी चैन होई. झुरळेंच्या चिल्ल्यापिल्ल्यांना यावर ताव मारू की त्यावर ताव मारू, असे होऊन जायचे. कुणी मुरंब्यात डुंबतोय तर कुणी क्रीमी चॉकलेटी बिस्किटांचे लचके तोडतोय. कुलकर्णींचे हे सारे पाहून संताप व्हायचा, पण घरात त्यांची अवस्था झुरळ्यासारखी असल्याने ते छूत छूत करून झुरळेंच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ हाकलून द्यायचे. काही काळ डबे, बाटल्यांची दारे बंद झाल्यावर झुरळे कुटुंब वामकुक्षी घ्यायचे. मग पुन्हा मेजवानी सुरू...

अशाच एका दुपारी झुरळे कुटुंब सुस्त होऊन सांदीकोपऱ्यात डोळे मिटून पडलेले असताना अचानक सौ. झुरळे यांनी श्री. झुरळे यांना खणखणीत हाक घालत आपल्या मिशा गरागरा फिरवल्या. आपल्या बायकोचा पारा चढल्यावर किंवा ती प्रेमात आल्यावर अशा मिशा गरागरा फिरवते हे श्री. झुरळेंना ठावूक होते. कधीपासून मी तुम्हाला सांगतेय की, त्या वरच्या फडताळातील प्रशस्त जागेत आपण शिफ्ट होऊया. पण तुमचा सगळा आळशीपणा एक दिवस आपल्याला नडणार आहे. आपला चिंकू सकाळपासून कुठे दिसत नाही. पटकन कुणाच्या पायाखाली आला की त्या किचनमधील सिंकमधून वाहून गेला कुणास ठावूक? सौ. झुरळे जर रडवेल्या झाल्या. श्री. झुरळेंनी आपले पंख पसरून तिला जवळ घेतले. तेवढ्यात कुलकर्णींच्या घरातील संवाद त्या दोघांच्या कानावर पडले. सौ. कुलकर्णी बोलत होत्या. अहो ऐकलेत का? तुमचा हा चिरंजीव ती कॉकरोच की काय झुरळांची पार्टी जॉइन करतोय. काय मेली अवदसा आठवते एकेकाला. सगळे प्राणी सोडून घाणेरड्या झुरळांच्या नावाने कसल्या पार्ट्या काढतात? सौ. कुलकर्णी यांच्या या तिखट प्रतिक्रियेमुळे कुलकर्णी ज्युनियर खवळला. ए आई, उगाच भलतेसलते बोलू नकोस. आमच्या पार्टीला पाच तासांत कोट्यवधी लोकांनी फॉलो केलेय. आमची पार्टी ही उद्याचे भवितव्य आहे. चांगला इंजिनिअर झालो. एमबीए केले पण प्लेसमेंट मनाजोगी मिळत नाही. घसघशीत पँकेज नाही. हे दोन्ही नसल्याने लाइफमध्ये गर्लफ्रेंड नाही. मग मी काय करायचे सुसाईड? अहो बघा हा त्या झुरळांच्या नादी लागून काहीबाही बडबडायला लागलाय... सौ. कुलकर्णीनी गळा काढायचे बाकी होते. श्री व सौ. झुरळे हा संवाद जीवाचा कान करून ऐकत होते. आपल्या नावाची पार्टी या माणसांनी स्थापन केली? या मागे यांचे काही कटकारस्थान तर नाही? सौ. झुरळे कावऱ्याबावऱ्या झाल्या. श्री. झुरळे म्हणाले की, मी मगाशी जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो तेव्हा टीव्हीवर मी माझाच भलामोठा फोटो पाहिला. क्षणभर मीच मला पाहून घाबरलो. पण नंतर मी कान लांब करून ऐकले तर खरोखरच झुरळांची पार्टी तयार झालेय. कुणीतरी कुणाला तरी झुरळ म्हणाला आणि या माणसांना लाज वाटली. आम्हाला झुरळ म्हणतोस तर होय आम्ही झुरळांची पार्टी तयार करतो, असे काहीतरी घडलेय. पण झुरळांच्या पार्टीत आपल्याला प्रवेश नाही. अगदी झुरळ असलो तरी... श्री. झुरळे यांनी सुस्कारा सोडला.

कुलकर्णींच्या घरातील ओट्यावर रात्री बिर्याणी, श्रीखंड, दही, साखर वगैरे खाद्यपदार्थांच्या मेजवानीसह घरातील वेगवेगळ्या सांदीकोपऱ्यातील झुरळांची मीटिंग भरली. घरातील एक ज्येष्ठ झुरळअण्णा बोलायला उभे राहिले. माणसांनी झुरळांची पार्टी काढली म्हणून आपल्यातील काही मंडळी अस्वस्थ आहेत. पण मला वाटते हा समस्त झुरळांचा बहुमान आहे. यामुळे कदाचित येत्या काही दिवसांत झुरळांकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तेवढ्यात काही तरुण झुरळे बोलायला उभी राहिली. अहो अण्णा तुम्ही झुरळांच्या पार्टीला पाठिंबा देऊन मोकळे झालात. पण याच काही माणसांची हीट पार्टी सुद्धा काढलेय. झुरळे मारायला हीट. हीट पार्टीला जर माणसांनी निवडून दिले तर ही लढाई माणसांपुरती मर्यादित राहणार नाही. जगभरातील झुरळांना यापासून धोका होईल. झुरळअण्णांनी नकारार्थी मान हलवली. अरे वेड्यांनो, जगभरातील अणुबॉम्ब फोडले तरी आपली कौम कुणी माय का लाल संपवू शकत नाही. अण्णा हे बरोबर आहे, पण अणुबॉम्ब माणसाने बनवलाय आणि टाकायचा की नाही, याचा निर्णय तोच करणार आहे. पण हीटने आपल्या पिढ्यानपिढ्या संपलेल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच माझे चार भाऊ आणि तीन बहिणी हीटच्या माऱ्यात शहीद झाले. हे सांगताना एका चिमुकल्या झुरळाला रडू कोसळले. कुणीतरी त्याला श्रीखंडाच्या कणाकडे नेले. मग त्याने त्यात तोंड खुपसले.

कुलकर्णींकडील गलेलठ्ठ बोका रात्रीच्या अंधारात घरात शिरला. म्याव म्याव करत त्याने ओट्यावर उडी घेतली. बोक्याची चाहूल लागताच झुरळांची पळापळ झाली. एक-दोन झुरळे त्याने आपल्या डावलीखाली पकडून ठेवले. तो बोका त्या जखमी तडफडणाऱ्या झुरळांसोबत खेळू लागला. लोळण घेऊन त्यांना पुनः पुन्हा मारू लागला. बोक्याच्या धक्क्याने ओट्यावर ठेवलेले दह्याचे विरजण आडवे झाले. दुधाची नदी वाहू लागली आणि त्यात झुरळं वाहू लागली. त्या प्रवाहातून सुटका होण्याकरिता अंग झटकत पाय ओढत धावण्याकरिता धडपडू लागली. सौ. कुलकर्णींनी दिवा लावला. ओट्यावरील दुधाच्या थारोळ्यात झुरळं पाहून त्यांचा पारा चढला. बोका पटकन उडी मारून पळून गेला. अगं बाई त्या टीव्हीवर, मोबाईलमध्ये आणि माझ्या घरातही झुरळंच झुरळं. अहो उठा आणि ते हीट घेऊन या... श्री. कुलकर्णी डोळ्यावरील झोपेचं कातडं दूर करून हीट फवारू लागले... कुलकर्णींच्या बोक्याच्या चेहऱ्यावरही कॉकक्रोच पार्टीचा सफाया झाल्याचा आनंद लपत नव्हता.

pradhansandeep19@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in