
विचारभान
संध्या नरे-पवार
सण साजरा केला जातो तो मुख्यत: आनंदासाठी. या सामूहिक आनंदामध्ये मग बाजारही सामील होतो. नाचगाणं ही तर आनंदाची सहज अभिव्यक्ती. त्यामुळे त्याचा सहभागही अपेक्षित. पण हेच सगळं जेव्हा अधिकाधिक उत्तान होतं, भडक होतं, नोटांचा पाऊस पडू लागतो, तेव्हा बीभत्स पर्व सुरू होतं. राजकीय चढाओढ त्याला अधिक विद्रुप करते.
“पवळाबाईला फडावर नाचवून मिळवलेला पैसा मला नको.”
हे पोटतिडकीचे उद्गार आहे घटना समितीचे अध्यक्षपद भूषवत तिला समतावादी गाभा देणारे आणि शूद्र-अतिशूद्रांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. हे उद्गार काढताना बाबासाहेब संतप्त झाले होते आणि काहीसे हताशही.
काय संदर्भ होता तेव्हा?
तर १९२७ साल होतं. पाण्याच्या हक्कासाठी महाडमधल्या चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय होत होता. बाकी सगळी तयारी होत होती. शासनाला-शासनाच्या जोरजुलुमाला न घाबरता आपले सत्याग्रही, समाजव्यवस्था ज्यांना अस्पृश्य,अतिशूद्र मानते असे आपले बांधव चवदार तळ्यावर येतील, याची त्यांना खात्री होती. पण अडचण होती ती नेहमीप्रमाणे पैशांची. लांबून लांबून सत्याग्रही येणार..महाडमध्ये जमणार..या सगळ्या व्यवस्थेसाठी पैसा लागणारच होता. पण अनेकांकडे पैसे मागूनही पुरेसा निधी उभा राहत नव्हता. अस्पृश्यांना त्यांचा पाणी पिण्याचा हक्क बजावता यावा यासाठी होणाऱ्या आंदोलनाला कोण पैसा देणार? या कामासाठी धनिक भारतीयांचा हात खिशात जात नव्हता. त्याकाळात नाटक कंपन्या बऱ्यापैकी पैसा बाळगून असत. त्यामुळे बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी काही नाटक मंडळांशी संपर्क केला. काहींनी नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर आर्थिक मदत केली. अशा वेळी तत्कालीन प्रसिद्ध तमासगीर पठ्ठे बापूराव बाबासाहेबांना भेटायला आले. त्यांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत देऊ केली. पण वरील उद्गार काढत, स्त्रियांना फडावर नाचवून कमवलेला पैसा मला नको, असे सांगत बाबासाहेबांनी ही आर्थिक मदत नाकारली.
बाबासाहेबांना सत्याग्रहासाठी पैशांची आत्यंतिक गरज असतानाही त्यांनी पठ्ठे बापूरावांचे पैसे नाकारले. कारण स्त्रीच्या शोषणातून मिळवलेला पैसा आपल्या कार्यासाठी नको, याबाबत ते ठाम होते. साध्या इतकंच साधनही महत्त्वाचं, सत्याग्रह होणं जितकं आवश्यक तितकंच तो सत्याग्रह कोणत्या पैशातून होत आहे, ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे, या नैतिक मूल्यावर बाबासाहेबांचा भर होता.
बाबासाहेब ज्यांना आपले गुरू मानत होते त्या महात्मा जोतिराव फुले यांचाही याच नैतिक मूल्यांवर विश्वास होता. त्यामुळे तेही कसबिणी नाचवणाऱ्या पुरुषांना आपल्या लेखणीने खरपूस मार देत असत. समग्र फुले वाङ्मय चाळताना याचे दाखले मिळतात. फुले लिहितात, “फारच थोडे भले गृहस्थ सापडतील की जे नाचबैठकांकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीत. बाकी सर्व वैदिक म्हणा, शास्त्री म्हणा, सुधारक अथवा सुधारलेले म्हणा, एकाच माळेचे मणी, निर्लज्ज होऊन स्वस्त्रियांसमक्ष वेस्वाकसबीण अथवा पात्राचे नाचबैठकीत गाणे चालू असतां, मधून मधून प्रतिष्ठित पुरुष एकमेकांचे मांडीवर तिजला बसवून तिच्याकडून प्रत्येकाच्या गळ्याला मिठ्या मारवितात.”
जोतिराव पुढे लिहितात, “त्याचप्रमाणे बहुतेक पुरुष नाटक व तमाशांत पोऱ्यास बायकोचे लुगडे नेसवून त्याचे अंगावर स्त्रियांचे अलंकार घालून, त्यास थेट स्त्रीचे सोंग देऊन त्यास आपल्या सुनाबाळांसमक्ष आपल्यापुढे नाचवून, हलकट गाणी गावयास लावतात व त्यांचे गाणे चालले असतां एकमेकांचे मांडीवर बसवून त्याजकडून सदरील कसबिणीसारखे चावचाळे करून, त्याचे हातात चवली अथवा पावली दर पुरुषाकडून देववून, त्यांकडून आपापले नावाची दवलतजादा करून, आपण आपणासच धन्य मानून घेतात.”
स्त्रिया आणि पुरुष यांच्यामधील विरोधाभास स्पष्ट करताना, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक शीलवान असतात हे सांगताना जोतिराव लिहितात, “स्त्रियांपैकी कोणीतरी एका ठिकाणी जमून एखादा जवान, देखणा, धष्टपुष्ट मर्द, कसबी, गवई, आपल्यासमोर इष्की गाणी गावयास लावून, त्याने गाता गाता आपले हाताचे हावभाव करून...त्याचेबरोबर पुरुषाप्रमाणे ख्यालतमाशे करतात काय?”
हे सगळं आता लिहिण्याला, नमनाला घडाभर तेल ओतण्याला आजचा संदर्भ काय?
काहींना तो उमगलाही असेल.
मुंबईकरांचा नाद करायचा नाय...कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय...असं म्हणत रंगीबेरंगी हॅलोजन लाईटच्या प्रकाशाच्या फिरत्या झोतांमध्ये, डीजेच्या कर्कश संगीताच्या भडिमारामध्ये छोट्या आयताकृती स्टेजवर नृत्यांगना नाचत असते आणि सभोवती असतो चेकाळलेला समुदाय...नोटांची उधळण करत, शिट्या मारत.. हातातल्या मोबाईलमध्ये समोरचं दृश्य बंदिस्त करत थिरकणारा. विभागातल्या राजकीय नेतृत्वाच्या कृपेने कार्यक्रमाचा खर्च होत असतो. नृत्यांगनेची बिदागी परस्पर दिली जात असते. राजकीय नेतृत्वाचे स्थानिक कार्यकर्ते प्रत्यक्ष कार्यक्रमाची व्यवस्था पाहत असतात. मंडपापासून ते लाईटिंगपर्यंत. वस्तीतल्या पोरासोरांसमोर एकच काम असतं, ते म्हणजे समोरचं दृश्य पाहत बेभान व्हायचं. एखादा सार्वजनिक उत्सव आला की ही प्रथा आता सर्वसामान्य झाली आहे.
इथे केवळ राजकारण्यांचं किती अध:पतन झालं आहे, हा मुद्दा नसून समाज म्हणून आपलं आणि एकूण भारतीय पुरुषाचं काय चाललं आहे, हा मुद्दा आहे.
सर्वसाधारणपणे हा असा मुद्दा आला की स्त्रीला, संबंधित नृत्यांगनेला दोष देण्याचा समाजाचा कल असतो. ती कला सादर करत नाही, तर बीभत्स हातवारे करते, असं म्हटलं जातं. पण त्या बीभत्स हातवाऱ्यांसाठीच (कलेसाठी, कलात्मक नृत्यासाठी नाही) तिला, तिच्यासारख्या अनेकींना अधिकाधिक मागणी असते आणि ‘लोक’मागणी असते म्हणूनच राजकीय नेतृत्त्वही कसलीच तमा न बाळगता असे कार्यक्रम आयोजित करण्याचा घाट घालतात, हे अधिक खरं. म्हणूनच या ‘लोक’मागणीचा दर्जा काय? हा मुख्य मुद्दा आहे. या अशा स्वरूपाच्या ‘लोक’मागणीतून, त्याला मिळणाऱ्या उत्तेजनेतूनच स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असतात.
घराच्या चार भिंती ते रस्त्यावरचा उघडा मंच इथपर्यंत होणारा कोणत्याही नृत्यांगनेचा प्रवास हा सोपा नसतो. अनेक प्रकारच्या शोषणांनी तो भरलेला असतो. हॅलोजनच्या चकाकत्या रंगीत प्रकाशातील लोकप्रियता ही किती क्षणभंगूर आहे, वरवरची आहे हे तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहीत असणार? एखादी मग त्याच लोकप्रियतेवर स्वार होत लोकांनीच मांडलेल्या लोकबाजाराचा फायदा उठवते, त्यावेळी तिला दोष देऊन मोकळं होणं सोपं असतं. तिचा उत्तान नाच हे काहींना ‘स्त्री स्वातंत्र्य’ही वाटतं. काहींना ती तिची निवड किंवा तिचा निवड करण्याचा अधिकार वाटतो. वरकरणी, एका परीने हे सत्य आहे. प्रत्येक स्त्रीचा आपल्या शरीरावर अधिकार आहे आणि त्या शरीर या माध्यमाचा कसा उपयोग करायचा, याची निवड करण्याचं स्वातंत्र्य तिला आहेच. पण ही निवड ती कोणत्या समाजव्यवस्थेत करते, या समाजव्यवस्थेची जातीय-वर्गीय रचना काय आहे, त्या जातीय-वर्गीय रचनेत ती कोणत्या स्थानावर आहे, ते स्थान तिला कोणत्या प्रकारच्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य देतं, हा मूळ मुद्दा आहे.
जोतिबा किंवा बाबासाहेब या दोघांनीही समाजव्यवस्थेच्या उतरंडीतील लैंगिक शोषण ओळखलं होतं. समाजाच्या जातीय उतरंडीत कोणत्या जातीच्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन घरात राहायचं, कोणत्या जातीच्या स्त्रियांनी कमरेला पदर खोचून शेतात राबायचं आणि कुठच्या जातीच्या स्त्रियांनी खांद्यावरचा पदर फडकावत बाजारात उभं राहायचं, हे ठरलेलं होतं. स्त्रीच्या लैंगिक शोषणातही जातीय भेदाभेद होता आणि आहे. तमासगीर, कसबीण या स्त्रिया मुख्यत्वेकरून मागास जातींच्या असत. उपजीविकेसाठी समाजाने त्यांना तोच एक मार्ग उपलब्ध करून दिला होता. बाबासाहेब पठ्ठे बापूरावांचे पैसे नाकारतात ते याचसाठी. बाबासाहेब आणि जोतिराव हे दोघेही पुरुषांवर दोषारोप करत आहेत. कारण त्यांचा स्त्रियांच्या लैंगिक शोषणाला स्पष्ट विरोध आहे. हे दोन्ही महापुरुष बहुजन मुलांनी शिकावं, ज्ञानार्जन करावं, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करावी, यासाठी तळमळत होते. बहुजन मुली आणि मुलगे या दोघांनीही ‘नको ते नाद करू नयेत’ हीच त्यांची इच्छा होती आणि तीच वेगवेगळ्या प्रसंगात व्यक्त होत होती.
दहीहंडी संपलीय आणि आता गणेशोत्सव येत आहे. नादाला लागायचं की सणांचं बाजारीकरण रोखायचं, हा निर्णय ‘लोकां’नीच घ्यायचा आहे. कारण राजकीय नेतृत्वाकडे आज तितकंही शहाणपण उरलेलं नाही. त्यांना फुले-आंबेडकरांचं फक्त नाव माहीत आहे.
sandhyanarepawar@gmail.com