
दखल
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
पंढरीला देवाच्या दारी सगळे सारखेच असतात, तसेच संविधानासमोरही सगळे समानच असतात. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हे सकल संत समाजाचं स्वप्न आहे, तर ‘लोककल्याणकारी राज्य’ हे संविधानाचं आश्वासन आहे. वाढती धर्मांधता संविधानातील समतावादी मूल्य नाकारत असताना पंढरीच्या वारीत या मूल्यांचा होणारा उच्चार महत्त्वाचा आहे.
नाचत जाऊ त्याच्या गावा रे
खेळीया सुख होईल विसावा..
असे गात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. जात-धर्म-पंथाचा विसर पडून आपण सर्वजण वारकरी आहोत अशी भावना पंढरीच्या वाटेवरील प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असते. कुणी कुणाला जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, स्त्री आहे की पुरुष आहे, असा भेद उरत नाही, असं एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे पंढरीची वारी! म्हणजे माणूसपणाचा निखळ आविष्कार इथे पहायला मिळतो. या वारीमध्ये एक अनोखी दिंडी गेली सात वर्षं सहभागी होत आहे. ती म्हणजे ‘संविधान समता दिंडी’.
संविधान समता दिंडीबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जिथे फक्त नामाचा गजर केला जातो, भजन होतं, कीर्तन होतं, जिथे संपूर्ण आध्यात्मिक वातावरण असतं तिथे ही संविधान समता दिंडी कशी? असा प्रश्न अनेकांना पडतो. धार्मिक दिंडीमध्ये या संविधान समता दिंडीचं काय काम? असा प्रश्न विचारणारेही अनेकजण आहेत.
संविधान समता दिंडीची सुरुवात कशी झाली याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय खरंतर कोणताही भेद मानत नाही, परंतु गेल्या काही वर्षांत समतेचा विचार मांडणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये विषमतेची विषारी बीजं रुजवण्यात आली आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद कीर्तनातूनही उमटू लागले आहेत. विशेषत: जे तरुण कीर्तनकार, वारकरी आहेत त्यांच्या मनामध्ये धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या वारकरी संतांनी
यातायाती धर्म नाही विष्णू दासा..
असं ठणकावून सांगितलं, त्याच संतांचा अभंग कीर्तनाला घेऊन धर्मासाठी लढले पाहिजे, धर्मासाठी मरायला आणि मारायला तयार राहिलं पाहिजे, अशी चिथावणीची भाषा केली जाते. खरं तर वारकरी परंपरा समतावादी आहे, परंतु समतेचा विचार घेऊन चालणाऱ्या मंडळींनीही वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष केलं. दिंडी सोहळा आध्यात्मिक आहे, देवाधर्माचा आहे, अशी भावना मनामध्ये ठेवून या अत्यंत महत्त्वाच्या प्रबोधनाच्या चळवळीकडे पाठ फिरवली. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर स्वतःला पुरोगामी म्हणवणारी ही मंडळी या संत विचारापासून दूर गेली. परिणामी प्रतिगामी आणि विषमतावादी मंडळींनी या समतावादी वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करून इथे विषमतेचा विचार पेरायला सुरुवात केली. हे सर्व लक्षात आल्यानंतर काही संविधानप्रेमी मंडळींनी पुन्हा या वारकरी संप्रदायाशी जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यातूनच बारा वर्षांपूर्वी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असा उपक्रम सुरू झाला. समतावादी मंडळी एक दिवस या वारीमध्ये चालू लागली.
पुढे वेगवेगळ्या मंचावर संविधानाबद्दल वेगवेगळ्या अंगाने चर्चा होऊ लागली. अगदी कीर्तनातूनच संविधान हे हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे, असं धर्मांध मंडळींकडून सांगितलं जाऊ लागलं, तर काही लोक संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे, अशी मांडणी करू लागले. दिल्लीतील काही संविधान विरोधकांनी तर थेट संविधान जाळून त्याच्या क्लिप्स लोकांच्या मोबाईलवर पाठवल्या. संविधानाची ही अशी बदनामी केली जात असताना हे संविधान प्रतिष्ठापूर्ण मानवी जीवनासाठी कसं उपयुक्त आहे आणि ते संत विचारावरच कसं आधारित आहे हे सागितलं पाहिजे, हे लक्षात आलं. म्हणून संविधानाला ७० वर्षं पूर्ण होत असताना २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ जानेवारी २०२० यादरम्यान संविधान आणि संत साहित्य हे कसं परस्पर पूरक आहे याची मांडणी करणारी ७० ‘संविधान कीर्तनं’ करण्याचा संकल्प मी केला होता. त्यावेळेला संविधान संवादक चळवळ, संविधान प्रचार चळवळ, संविधानाचे अभ्यासक या सर्वांनीच ही संविधान कीर्तनं करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहकार्य केलं.
पुढे हा विचार अधिक लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच सात वर्षांपूर्वी ‘संविधान समता दिंडी’ची संकल्पना पुढे आली. ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’, या उपक्रमाची तयारी सुरू झाली तेव्हा पंढरपूरच्या वारीमध्ये असलेल्या वारकरी समुदायासमोर हा विषय गेला पाहिजे, अशी चर्चा सर्वांनी मिळून केली. त्यातूनच संविधान समता दिंडीचा जन्म झाला. ‘संविधान समता दिंडी’ आणि ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमांमध्ये संविधानाबद्दल आस्था असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था-संघटना एकत्र आल्या. ज्यात ‘राष्ट्र सेवा दल’, ‘लेक लाडकी अभियान’, ‘मासूम’ ‘युवा’, ‘अनुभव शिक्षा केंद्र’, ‘संविधान प्रचारक’, ‘संविधान संवादक चळवळ’ या सर्व संस्था-संघटनांनी एकत्र येऊन ही दिंडी सुरू केली.
आषाढीची वारी जवळ येऊ लागते तेव्हा वारकऱ्यांना जसे पंढरपूरचे वेध लागतात तसेच गेली सात वर्षं आम्हाला संविधान समता दिंडीचे वेध लागतात. हा सगळा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शरद कदम, ‘लेक लाडकी अभियान’च्या वर्षा देशपांडे, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे माजी अध्यक्ष अविनाश पाटील, अंनिसचे विद्यमान अध्यक्ष माधव बावगे, दत्ता पाखरे, विशाल विमल, साधना शिंदे, नागेश जाधव, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, सुमित, भारत घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख असे असंख्य कार्यकर्ते संविधान समता दिंडीच्या तयारीला लागतात. संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा समता भूमी भिडे वाडा, पुणे येथे होतो. संविधानाचे मूल्य आणि संतांचे अभंग, ओव्या यांचा परस्पर असणारा संबंध दर्शवणारे पोस्टर्स, बॅनर, पत्रकं तयार केली जातात. संतांच्या अभंग, ओव्या आणि संविधान मूल्यांनी सजलेला ‘संविधान रथ’ तयार होतो. पुणे येथून तो पुढे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी होतो. पंढरपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मठामध्ये या संविधान समता दिंडीचा समारोप होतो. या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी, दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी संविधानाची मूल्य आणि संत विचार सांगणारी पत्रकं वाटली जातात. बॅनरचं प्रदर्शन लावलं जातं. कार्यकर्ते पथनाट्यातून, गीतातून संविधानाची मूल्य आणि संविधानाचं महत्त्व वारकऱ्यांना समजावून सांगतात, तर मी स्वतः संध्याकाळी एखाद्या दिंडीसमोर ‘संत साहित्यातील संविधान मूल्य’ या विषयावर प्रवचन करून संतांनी मांडलेले विचार आणि संविधानातील मूल्य हे एकच कसे आहेत हे वारकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याला वारकऱ्यांमधून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी या संविधान समता दिंडीला नवे कार्यकर्ते जोडले जात आहेत. संविधानाचा सांगावा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान समता दिंडी हे योग्य माध्यम ठरत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या दिंडीमध्ये आतापर्यंत महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी, अभिनेत्री मधुरा वेलणकर, सुहिता थत्ते, शाहीर संभाजी भगत, पत्रकार रवींद्र पोखरकर, मुकेश माचकर, तुळशीदास भोईटे सहभागी झालेले आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संपूर्ण कुटुंबासह बारामती येथे या संविधान समता दिंडीत सहभागी झाले होते.
संविधान समता दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज, ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, कैकाडी महाराज मठाचे प्रमुख भारत जाधव यांचं मार्गदर्शन मिळतं. संतांनी पाहिलेल्या आनंदी समाजाचं स्वप्न हे संविधानाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतं, हा विश्वास समाजात निर्माण करण्यासाठी ‘संविधान समता दिंडी’ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असं मला वाटतं.
विठूनामाच्या गजरासोबत ही ‘संविधान समता दिंडी’ अखंड चालू रहावी, या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या वाढती रहावी, हीच इच्छा.
कीर्तनकार आणि संविधान प्रचारक.