दृष्टिक्षेप
प्रकाश पवार
सण-उत्सवांच्या माध्यमातून वेगवेगळे सांस्कृतिक राजकारण घडत असते. यातून आपल्या विजयाची, पुनरागमनाची एक ऐतिहासिक स्मृती जपली जाते. या ऐतिहासिक तथ्यांशी, कथनांशी जोडून घेत सामान्य लोक आपला आनंद साजरा करतात. दिवाळीतही हेच घडते. हिंदू, जैन, बौद्ध, शीख हे समूह वेगवेगळ्या कथनांशी स्वत:ला जोडून घेत दिव्यांच्या रोषणाईने आपला सार्वजनिक अवकाश प्रकाशमान करतात. सामान्यजन दिवाळीकडे अनीतीवर नीतीचा विजय म्हणून पाहतात.
भारतात आर्थिक राजकारणाच्या तुलनेत सांस्कृतिक राजकारणाचा बोलबाला जास्त आहे. आर्थिक राजकारण करणारे लोक देखील सांस्कृतिक राजकारणाची भाषा बोलतात. अशाप्रकारचे सांस्कृतिक राजकारण सण आणि उत्सवांमधून घडते. अगदी अलीकडेपर्यंत सण-उत्सव साजरा करणे ही एक सामान्य घटना होती. परंतु आजकाल सण आणि उत्सवांमधून जाणीवपूर्वक राजकारण घडवले जाते. तसेच जवळपास वर्षभर या प्रकारचे राजकारण घडत राहते. या मोठ्या बदलाच्या चक्रात दिवाळीचा सणही सापडला आहे. तरीही दिवाळीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण घडते. या संदर्भात तीन-चार पद्धतीने राजकारण घडविण्याची परंपरा विकसित झाली आहे.
रामायण - अधर्मावर धर्माचा विजय : भारतीय राजकारणात राम हे प्रतीक सतत कृतिशील असते. रामराज्य संकल्पनेबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळात मुख्य दोन महत्त्वाचे प्रवाह उदयाला आले होते. महात्मा गांधी यांनी रामराज्याची संकल्पना एक युटोपिया (आदर्श राज्य) म्हणून अधोरेखित केली होती, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रामराज्य संकल्पनेची समीक्षात्मक दृष्टी विकसित केली. म्हणजेच थोडक्यात भारतीय राजकारणातील महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रामराज्य संकल्पनेच्या अवतीभवती आणि समीक्षात्मक स्वरूपात राजकारणाची पुनर्रचना केली होती. या अर्थाने सत्तेच्या स्पर्धेमध्ये रामराज्य संकल्पना होती. रामराज्य आणि सत्ता यांची सांधेजोड करताना तुलसीदास यांच्या ‘रामचरित्रमानस’ आणि वाल्मिकी यांच्या ‘रामायण’ या महाकाव्यातील रामराज्याची उदाहरणे दिली जातात. यामुळे तुलसीदास आणि वाल्मिकी यांच्या लेखनात रामराज्याचे मूळ स्रोत आहेत, असा युक्तिवाद केला जातो. हा युक्तिवाद महात्मा गांधी यांनी देखील केला होता. दिवाळीच्या संदर्भात एक सर्वात प्रसिद्ध आख्यायिका रामायणातील आहे. ही कथा १४ वर्षांच्या वनवासानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याच्या अवतीभवती फिरते. भगवान राम म्हणजे विष्णूचा सातवा अवतार अशी एक धारणा आहे. त्यांचे वडील, राजा दशरथ यांनी कैकेयी यांना दिलेल्या वचनामुळे त्यांना वनवासात पाठवण्यात आले होते. या वनवासादरम्यान, सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाशी रामाने युद्ध केले. हनुमान आणि मित्रांच्या सैन्याच्या मदतीने रावणाचा पराभव केला. विजयानंतर राम-सीता-लक्ष्मण अयोध्येत परत आले. तेव्हा शहर आनंदाने उजळून निघाले. आपल्या राजपुत्राचे परतणे पाहून आनंदित झालेल्या अयोध्येच्या लोकांनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्वागत करण्यासाठी तेलाच्या दिव्यांच्या रांगा (दिवे) लावल्या.
दिवे लावण्याची ही कृती वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर नीतिमत्तेचा विजय होतो, याचे प्रतीक होती. दिवाळीला ‘दीपावली’ असेही म्हणतात. त्याचा अर्थ ‘दिव्यांच्या रांगा’ असा होतो. दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा या प्राचीन घटनेचे स्मरण करते. हिंदू संस्कृतीत, रामाचे अयोध्येत पुनरागमन म्हणजे अधर्मावर धर्माचा (नीती, न्याय) विजय मानला जातो. या तत्त्वाला अनुसरून दरवर्षी दिवाळीच्या आनंदाच्या प्रसंगाचे औचित्य साधण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात. घरे मेणबत्त्या आणि दिव्यांनी सजवली जातात. यामागची मुख्य धारणा ही न्याय आणि नीतीच्या विजयाची असते. हा देखील या सांस्कृतिक राजकारणाचा एक अर्थ आहे.
महाभारत - न्यायाचे प्रतीक : महाभारत हे महाकाव्य देखील दिवाळीशी जोडलेले आहे. ही कथा पांडवांच्या १३ वर्षांच्या वनवासावर आधारलेली आहे. वनवासातून परत आल्यानंतर उत्सव केला गेला. पाच पांडव (युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव) यांचा दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कौरवांनी खेळात पराभव केला. त्यानंतर त्यांना वनवासात पाठवण्यात आले. त्यांच्या वनवासाचा एक भाग म्हणून, पांडवांना शेवटच्या वर्षात गुप्तवासात राहावे लागले. या काळात ते सापडले असते तर त्यांना आणखी १२ वर्षे वनवास भोगावा लागला असता. परंतु त्यांनी त्यांचा वनवास पूर्ण केला. या वनवासात लपून राहण्याचे शेवटचे वर्ष देखील समाविष्ट होते. परंतु ते त्या काळातही सापडले नाहीत. अर्थातच पांडव हस्तिनापुरात परतल्यावर राज्यातील लोक आनंदी झाले. त्यांनी दिवे लावून त्यांच्या शासकांचे (ruling class) स्वागत करण्यासाठी उत्सव साजरा केला. न्यायाच्या विजयाचे प्रतीक असलेले हे स्मरण दिवाळीच्या वेळी केले जाते. यामुळे दिवाळी या सणाला महाभारताशीही जोडले जाते. पांडवांचे पुनरागमन हे संकटांचा अंत आणि न्यायाचे प्रतीक आहे. विशेषतः रामाच्या अयोध्येत परतण्यासारखे.
भारत आणि नेपाळमधील अनेक समुदाय पांडवांच्या घरी परतण्याच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी करतात. या उत्सवाच्या निमित्ताने रोषणाई साजरी केली जाते. तसेच त्यांच्या नीतिमान शासकांचे स्वागत केले जाते. परंतु हा आनंद नीती व न्याय म्हणून साजरा केला जातो. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधून धर्म, कर्तव्य, नीती, त्याग, निष्ठा आणि वाईटावर चांगल्याचा अंतिम विजय हा आदर्श मांडला जातो. हा संस्कार केला जातो. म्हणजेच हा सण प्रकाश आणि उत्सवांच्या पलीकडे जातो. माणसातील प्रकाशावर, सद्गुणांच्या विजयावर (न्याय) आणि आपल्यातील अंधार दूर करण्यावर चिंतन करण्यास हा सण प्रोत्साहित करतो. मदत करतो.
सामान्य माणसाचा सण : सामान्य माणसाला सणाचे महत्त्व जास्त वाटते. हा अर्थ नीट व्यक्त करण्यासाठी ‘राजाला दिवाळी काय माहीत’ ही एक म्हण प्रसिद्ध आहे. विशेषतः भारतात अनौपचारिक क्षेत्रामध्ये पंच्याऐंशी-नव्वद टक्के लोक कामगार म्हणून काम करतात. या कामगार वर्गाला दिवाळ सणाचे विशेष महत्त्व वाटते. भारतात डिजिटल युग अवतरलेले आहे. यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मचे मालक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती काम करणारे कामगार असे भारतीय लोकांचे दोन गट पडलेले आहेत. यापैकी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती काम करणाऱ्या कामगारांना दिवाळी साजरी करावयाची असते. डिजिटल नेटिव्ह, डिजिटल युजर्स अशा ओळखी सांगणारे लोक भारतातील सर्व जाती-धर्मांमध्ये आहेत. हे सर्वच लोक ‘सामान्य’ या प्रकारचे जीवन जगतात. ‘गिग कामगार’ हे एका अर्थाने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामगार आहेत. गिग अर्थकारण हा एक प्रकार या कामगारांच्या काम करण्याच्या पद्धतीतून उदयाला आला आहे. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नाही. परंतु दिवाळी हा सण त्यांच्या जीवनात कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त सुखशांतीचा अनुभव देणारा असतो. हे त्यांचे सार्वजनिक जीवन असते. कारण एकमेकांमध्ये मिळून मिसळून सण साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळी हा एक सार्वजनिक अवकाश (public sphere) असतो.
जैन, बौद्ध, शीख यांची दिवाळी
रामायण आणि महाभारत या महाकाव्यांव्यतिरिक्त जैन आणि बुद्ध धर्मीयही दिवाळीशी आपला संबंध जोडतात. त्यासाठी जैन आणि बुद्ध धर्मीय आपापल्या धर्मातील ऐतिहासिक घटनांचा आधार घेतात. जैन हा दिवस आपले २४ वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाण प्राप्तीच्या रूपात साजरा करतात, तर बुद्धिस्ट लोक हा दिवस दिवे लावून साजरा करतात. कारण या दिवशी भगवान गौतम बुद्ध १८ वर्षांनंतर कपिलवास्तूत परतले होते, तर शीख लोक हा सण गुरू हरगोविंदसिंगजी यांच्या तुरुंगातून घरी परतण्याच्या रूपात साजरा करतात. म्हणजेच थोडक्यात दिवाळी हा सण सांस्कृतिक राजकारणाचा भाग म्हणून साजरा केला जातो. यातून सांस्कृतिक राजकारणाचे संस्कार केले जातात. सामान्य लोक मात्र दिवाळी हा सण त्यांच्या सामूहिक आनंदाचा क्षण म्हणून साजरा करतात. हा आनंद साजरा करत असतानाच ते नकळतपणे इतिहासाशी स्वत:ला जोडून घेतात.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि राज्यशास्त्राचे अध्यापक