नैराश्याचा स्पर्श न झालेला कवी

कवी द. भा. धामणस्करांच्या संपूर्ण कवितेचा विचार केला तर कुठेही नैराश्य, अगतिकतेचा सूर दिसत नाही. तात्त्विक विचारांचा पाया पक्का असल्यामुळे त्यांच्या वृत्तीत जीवन स्वीकारण्याचा समजूतदारपणा आलेला आहे. १९४७ पासून आजपर्यंतच्या या प्रदीर्घ कालखंडात त्यांची कविता कोणत्याही प्रभावापासून अलिप्त, स्वतंत्र राहिलेली आहे.
नैराश्याचा स्पर्श न झालेला कवी
नैराश्याचा स्पर्श न झालेला कवी
Published on

विशेष

राजीव जोशी

कवी द. भा. धामणस्करांच्या संपूर्ण कवितेचा विचार केला तर कुठेही नैराश्य, अगतिकतेचा सूर दिसत नाही. तात्त्विक विचारांचा पाया पक्का असल्यामुळे त्यांच्या वृत्तीत जीवन स्वीकारण्याचा समजूतदारपणा आलेला आहे. १९४७ पासून आजपर्यंतच्या या प्रदीर्घ कालखंडात त्यांची कविता कोणत्याही प्रभावापासून अलिप्त, स्वतंत्र राहिलेली आहे.

कवी कविता लिहित असतो तेव्हा आपल्या जगण्यातल्या अनुभवातून स्वतःशी संवाद करीत असतो, रसिक कविता वाचत असतो तेव्हा कवीच्या अनुभवातून, जगण्यातून त्याचात उतरलेली कविता त्याला अंतर्मुख करून प्रेरित करते आणि त्यातूनच एक नवी कविता रसिकाच्या मनात तयार होत जाते. मराठीतले ज्येष्ठ कवी द.भा. धामणस्कर आपल्या कवितेतून, अगदी साध्या-सोप्या शब्दातून, दैनंदिन जीवनातल्या सर्वसामान्य अनुभवातून रसिकाला आपल्या आत डोकवायला लावतात, अंतर्मुख करायला लावतात. कवितेतील शब्द, प्रतिमा, लय, ध्वनी वाचकाच्या मनात कवीच्या जीवनाशी निगडीत भाव जागृत करत असतात म्हणूनच वाचकाच्या मनात कविता नव्याने जन्म घेत असते, कधी शब्दातून कधी नि:शब्द करून.

कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या ‘भरून आलेले आकाश’ या संग्रहात ‘काही जणांना’ शीर्षकाची कविता आहे. नेहमीच्या जगण्यातल्या एक प्रसंग, साध्या भाषेतला, तुमच्या-आमच्या दैनंदिन जगण्यातला. कवितेतला निवेदक झोप लागेल अशी आशा करत पडलेला आहे, अर्धी रात्र उलटली तरी झोप लागत नाही म्हणून अस्वस्थ झालेला आहे. भगवंताचे नामस्मरण केले म्हणजे तरी झोप लागेल असे वाटून तो त्याचे नाम घेत पडलेला आहे. अशात त्याच्या बायकोच्या त्याला हाकावर हाका ऐकू येऊ लागतात. ती काहीतरी किरकोळ कारणास्तवच आपल्याला हाका मारत असावी असे वाटून निवेदक मुळीच ‘ओ’ देत नाही. तो ‘ओ’ देत नाही म्हणजे त्याला आपला राग येतो आहे हे जाणवून तिचा स्वर कातर, हळवा, रडवेला होतो. म्हणते, “रागावलात की काय माझ्यावर? झोप येत नाही मला. तुमचं नाव घेतल्यावर बरं वाटतं म्हणून हाका मारतेय.” लख्ख साक्षात्कार व्हावा तसे भान त्याला येते, अपराधीही वाटते. आपल्यालाही झोप येत नव्हती तर आपण भगवंताचे नाव घेऊन झोपायचा प्रयत्न करत होतो आणि हिला झोप येत नाही म्हणून हिने आपलेच नाव घ्यावे! धामणस्कर शेवटच्या चार ओळीत म्हणतात : “नुसत्या हाका मारून बरं वाटायला लावणारा देव काही जणांना किती जवळ सापडतो”. साधासुधा, दैनंदिन जीवनातला प्रसंग; कवी आपल्या श्रद्धेची आणि तिच्या श्रद्धेची मनोमन तुलना करतांना परमेश्वर प्राप्त व्हायला श्रद्धा महत्वाची या मौलिक सत्यापर्यंत पोहोचतो आणि कवितेतून वाचकांपर्यंत पोहोचवतो.

ऐंशीच्या दशकात ‘प्राक्तनाचे संदर्भ’ या संग्रहाद्वारे धामणस्करांची कविता प्रथम रसिकांसमोर आली. त्यानंतर ‘बरेच काही उगवून आलेले’ हा धामणस्करांचा दुसरा संग्रह जवळपास सत्तावीस वर्षांनी २००९ मध्ये प्रकाशित झाला आणि तिसरा कविता संग्रह ‘भरून आलेले आकाश’ २०१६ मध्ये. त्यांचे तीनही कविता संग्रह मौजेने प्रकाशित केले आहेत. तीनही संग्रह मिळून त्यांनी जवळपास अडीचशे कविता लिहिल्या असतील. प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहात १९५७ ते १९८१ या कालावधीत लिहिलेल्या एकशेएक कविता आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की धामणस्कर बहुप्रसव कवी नाहीत. आपल्या अनुभवाला चिंतनाच्या रसायनात घोळवून, मुरवत ठेवत कविता लिहिणारे कवी आहेत.

धामणस्करांच्या तीनही संग्रहातल्या कवितांवरून एक लक्षात येतं की धामणस्करांची कविता मुळात अल्पाक्षरी आहे, दीर्घत्व हा तिचा स्वभाव नाही. सांगायचं ते मोजक्या शब्दात, आखीव-रेखीव. त्यांच्या कवितेचा स्वर आत्मसंवादाचा व सुसंवादाचा आहे. त्यांची कविता, दैनंदिन जीवनातील अनुभवातून, प्रसंगातून संवेदनशीलतेचा विलक्षण आत्मप्रत्यय देत वाचकाला अंतर्मुख करते. त्यांच्या कवितांचे दोन महत्वाचे स्तर आहेत. एक म्हणजे आपल्या कवितेतून ते मानवी जीवनातील विविध रूपे पकडण्याचा, त्यांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या विभागात, निसर्गाचे भव्य-दिव्य विभ्रम त्यांना थक्क करतात. भौतिक विश्व आणि कवीचे अंतर्मन, सभोवताल आणि भव्यदिव्य असा निसर्ग अशा दुहेरी पातळीवर त्यांची कविता वाचकांशी संवाद साधते.

धामणस्करांची कविता प्राय: आत्मपर आहे. उत्कटता, तीव्रता, उत्स्फूर्तता, संवेदनशीलता, संयतता, अलिप्तता, तटस्थता हे सर्व काव्य व्यक्तिमत्वाशी निगडीत आहे. ‘बरेच काही उगवून आलेले’ या संग्रहात त्यांची ‘माझे मनगटी घड्याळ’ शीर्षकाची कविता जेव्हा त्याच्याशी असलेल्या सहजीवनाविषयी बोलतात तेव्हा त्याला येणारा अर्थ अधिक उत्कट होत जातो. या सहजीवनाबद्दल बोलतांना कवी म्हणतो : “मागे राहील त्याने अखेरपर्यंत/एकटेच/विना तक्रार/टिकटिकत राहायचे”. हा धामणस्करांचा अटळ नियतीशी समजूतदारपणाचा, सामंजस्याचा करार आहे आणि त्यातली संवेदनशीलता, अलिप्तता आणि तटस्थता येणाऱ्या अस्वस्थतेने अंतर्मुख करून जाणारी आहे.

माणसं जशी सृष्टीचा अविभाज्य भाग आहे तद्वतच पशू-पक्षी, पान-फुलं सुद्धा आणि म्हणूनच धामणस्करांच्या कविता झाडं-फुलं तोडणाऱ्या, पाखरांना पिंजऱ्यात ठेवणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्यावर, त्याच्या विध्वंसक वृत्तीवर संयमित, समजावण्याच्या सूरात भाष्य करते. विषण्ण, उदास मनाला टवटवी देणाऱ्या निसर्गात स्वत:ला शोधणं ही त्यांची वृत्ती आहे, मानसिकता आहे. निसर्ग आणि मानवी भावभावनांना जोडणारे अद्वैत त्यांच्या कवितेत आहे.

धामणस्करांच्या संपूर्ण कवितेचा विचार केला तर कुठेही नैराश्य, अगतिकतेचा सूर दिसत नाही. तात्त्विक विचारांचा पाया पक्का असल्यामुळे त्यांच्या वृत्तीत जीवन स्वीकारण्याचा समजूतदारपणा आलेला आहे. १९४७ पासून आजपर्यंतच्या या प्रदीर्घ कालखंडात त्यांची कविता कोणत्याही प्रभावापासून अलिप्त, स्वतंत्र राहिलेली आहे. झाडं-पान-फुलं यांच्याशी त्यांचा व्यवहार संवादाचा आहे. जे.कृष्णमूर्ती : एक संस्मरण या कवितेत ते म्हणतात, अशा व्रतस्थपणे जगतांना – ‘शब्देविण संवादिजे’चा नव्याने अनुभव घेता आला.

लेखक सुप्रसिद्ध कवी आहेत.

logo
marathi.freepressjournal.in