खुजे कार्यकर्ते, उंच मूर्ती

दहीहंडी, गणेशोत्सव हे आता समाजप्रबोधन, एकत्रिकरणाचे उत्सव राहिलेले नाहीत. आपल्या धार्मिक श्रद्धांचे व पैशांचे प्रदर्शन घडवण्याचे ते इव्हेंट झालेत. आपल्या राजकीय शक्तीचे दर्शन घडवण्याचा तो मार्ग आहे. राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण या नव्या यशाच्या फॉर्म्युल्यात आपल्या लोकप्रतिनिधींनी देवांनाही सामील करुन घेतलय.
खुजे कार्यकर्ते, उंच मूर्ती
खुजे कार्यकर्ते, उंच मूर्ती (Photo-X)
Published on

विचारपान

संदीप प्रधान

दहीहंडी, गणेशोत्सव हे आता समाजप्रबोधन, एकत्रिकरणाचे उत्सव राहिलेले नाहीत. आपल्या धार्मिक श्रद्धांचे व पैशांचे प्रदर्शन घडवण्याचे ते इव्हेंट झालेत. आपल्या राजकीय शक्तीचे दर्शन घडवण्याचा तो मार्ग आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुका वर्षभरावर असतील तर मग तरुणांना आपल्यासोबत बांधून ठेवण्याकरिता राजकीय नेते अक्षरशः पैशांचा धूर काढतात. राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण या नव्या यशाच्या फॉर्म्युल्यात आपल्या लोकप्रतिनिधींनी देवांनाही सामील करुन घेतलय.

मुंबईतील चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळाने १९५५ ते १९६० च्या दरम्यान उंच गणेशमूर्ती तयार करुन घेतली. मात्र ती आणताना ट्रामच्या ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडीत करायला लागला आणि तारा कापाव्या लागल्या. यामुळे गणेशाच्या आगमन व विसर्जनाच्यावेळी उडालेली तारांबळ पाहून उंच मूर्ती तयार न करण्याचा निर्णय तत्कालीन गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी घेतला, अशी आठवण गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीच्या एका सदस्याने सांगितली. त्यावेळचा सूज्ञपणा आता मात्र गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी साफ गमावला आहे. २००० सालापासून उंच मूर्तींची क्रेझ वाढली. मग तिला वेसण घालण्याकरिता २००८ साली गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा १८ फूट इतकी निश्चित केली. परंतु २०१२ सालापासून देशात हिंदुत्ववादाच्या लाटा उसळू लागल्या. त्याचा परिणाम म्हणून २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आले. मग समोरच्या व्यक्ती किंवा मंडळापेक्षा माझे हिंदुत्व अधिक घट्ट व प्रबळ आहे हे दाखवण्याचा मापदंड काय? त्याच्या गणपती मंडळातील मूर्ती २२ फुटांची असेल तर मी २४ फुटांची मूर्ती उभारणार, मंडळाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट अधिकाधिक करणार आणि लोकांचे डोळे फुटले तरी बेहत्तर लेझरचा झगमगाट पाहून भक्तांचे डोळे दिपवून टाकणार, अशी तीव्र जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. भुलेश्वर येथील गणेश मंडळाची २२ फुटांची मूर्ती अलीकडेच कोसळली. गणेशोत्सवात शिरलेली दिखाऊपणाची स्पर्धा अशा दुर्घटनांस कारणीभूत आहे.

मुंबईतील गणेशोत्सवाचे वेगवेगळे रंग १९६० ते ८० च्या दशकांत पाहायला मिळायचे. लालबाग-परळ भागात गणेश मंडळांचे देखावे व सजावट थक्क करणारी असायची. त्यातून सामाजिक संदेश दिला जायचा. या परिसरातील कला केंद्रांमधील कलाकार या देखाव्यांच्या निर्मितीकरिता अहोरात्र खपायचे. माटुंग्याचा वरदराजनचा गणपती दिव्यांच्या माळांच्या रोषणाईने उजळून निघायचा. रंगीबेरंगी दिव्यांची ही आरास पाहायला दूरवरुन लोक यायचे. वरदराजनच्या या गणपतीची रोषणाई वाय. सी. पवार या पोलीस अधिकाऱ्याने माटुंगा येथे गणपती बसवण्याच्या ठिकाणी पोलीस चौकी बांधून मालवून टाकली. दादरच्या हिंदू कॉलनी या सुशिक्षित, लब्धप्रतिष्ठीतांच्या वसाहतीमधील गणेशोत्सवात व्यावसायिक रंगभूमीवरील गाजत असलेली नाटकांचे प्रयोग व्हायचे. यंदा या गणेशोत्सव मंडळाचे ८१ वे वर्ष आहे. या मंडळाची गणेशमूर्ती पाच फुटांपेक्षा उंच असत नाही. आता तर कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती हे मंडळ बसवते. आजही व्यावसायिक नाटके, विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम हेच येथील गणेशोत्सवाचे स्वरुप आहे. गिरगावातही बेताच्या उंचीच्या मूर्ती असायच्या. मंडपात आरती, पूजा यावेळीच वर्दळ असायची. गिरगावात गणेशोत्सवात तामझामपेक्षा धार्मिक भावनेला महत्त्व असायचे. चेंबूरचा बडा राजन-छोटा राजनचा गणपती हा वेगवेगळ्या मंदिरांचे किंवा महालांचे भव्यदिव्य सेट याकरिता ओळखला जायचा. येथे गणेशभक्तांची रांग लागायची ती देखावा पाहण्याकरिता. टिळक नगर येथील मैदानात पडदा लावून दाखवले जाणारे सिनेमे पाहण्याकरिता पडद्याच्या दोन्ही बाजूला आबालवृद्धांची जत्रा भरायची. जीएसबी मंडळाचा गणपती हा वर्षानुवर्षे सोन्याने मढलेला होता. मुंबईतील गणेशोत्सवात धार्मिक व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडायचे. डोंगरी भागातील गणेशोत्सवात कव्वालीच्या कार्यक्रमाकरिता करीमलाला व तत्सम गँगस्टर्सही सढळ हस्ते देणगी द्यायचे. गणेशोत्सवात कव्वाली का? असे बाष्कळ सवाल मनात यायला चार पक्षाच्या घाटावरील पाणी पिऊन सत्ताधारी पक्षात आलेले खुजे नेते व मंत्री तेव्हा मुंबईच्या राजकारणात नव्हते. आता धार्मिक उत्सवांचा वापर उन्मादाचे दर्शन घडवण्याकरिता होतो म्हणून मग अंडी फेकणे, रात्रीच्यावेळी कर्णकर्कश्य आवाजात बाईक चालवून मंडपासमोर धिंगाणा घालणे, असे प्रकार घडवले जातात.

खुल्या आर्थिक व्यवस्थेच्या स्वीकारार्हतेची फळे दहा वर्षानंतर मुंबईत दिसायला लागली. मुंबईतील बांधकाम क्षेत्रात तेजी आली. आडव्या झोपड्या उभ्या करण्याची व जुन्या चाळी, इमारतींचा पुनर्विकास करण्याची स्पर्धा सुरु झाली. लोकांना एकत्र करुन पुनर्विकासाकरिता तयार करण्याकरिता स्थानिकांचे सहकार्य हवे. मग याकरिता गणेशोत्सव मंडळांचे काही पदाधिकारी हे बिल्डर व त्यांच्या पंटरांना आधार वाटू लागले. गणपतीची सेवा करणारा आपल्या परिसरातील दादा-भाऊ आपल्याला नक्की पक्क्या घरात नेणार, फसवणार नाही, अशी खात्री असल्याने बाय-बापडे सहमती करारावर अंगठे, सह्यांचे कोंबडे उठवू लागले. अगदी याच सुमारास अचानक काही गणपती नवसाला पावू लागले. माझी कुस उजत नव्हती. गेल्यावर्षी दर्शनाला आले आणि मला गुटगुटीत पोरगं झालं, असे एखाद्या वाहिनीच्या कँमेरासमोर खांद्यावर खेळणाऱ्या बाळाचे मुके घेत हसतमुखाने सांगणारी बाई किंवा घरात चोरी झाल्याने दर्शनाला आलो, नाकं रगडलं आणि चोरी गेलेला एैवज पंधरा दिवसांत परत मिळाल्याचे डबडबलेल्या डोळ्यांनी सांगणारा वृद्ध पाहून मग कानाकोपऱ्यातून लोक अशा नवसाला पावणाऱ्या बाप्पापुढे रांग लावू लागले. आर्थिक हेतूने केलेले ते मार्केटिंग होते. त्याला भूलून केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री-संत्री, बडे नोकरशहा, न्यायमूर्ती, बॉलिवुडचे स्टार्स, उद्योगपती सारेच नवसाला पावणाऱ्या (?) देवापुढे पायधूळ झाडू लागले. दानपेटीत कोट्यवधींचे सोने, रोख पडू लागली. काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम क्षेत्रात बस्तान बसवले. बड्या बिल्डरांसोबत पार्टनरशीप केल्या. अनेक नगरसेवक, आमदार यांनी राजकारणाचे बाळकडू गणेश मंडळांच्या मंडपात गिरवले. झोपड्या-चाळी हद्दपार होऊन चाळीस-पन्नास मजली टॉवर उभे राहिले. गणेशोत्सव मंडळांकडे पैशाचा ओघ वाढला. मग स्पर्धा सुरु झाली. माझी श्रद्धा अधिक मोठी आहे याची फुटपट्टी उंच मूर्ती बनली. आता तर अमूक मंडळाच्या गणपतीला तमूक उद्योगपतीने दत्तक घेतल्याची चर्चा खुलेआम सुरु आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा भविष्यात आयपीएलच्या टीमसारखा लिलाव होणार आहे. या उद्योगपतींचा मुंबईतील जमिनींवर, इस्पितळांवर, मालमत्तांवर डोळा आहे. कोकणात त्यांना प्रकल्प उभे करायचे आहेत. जमीन संपादन करायची आहे. मराठी माणसांच्या मनात सहानुभूती निर्माण करुन आपला स्वार्थ साधण्याकरिता हे उद्योगपती गणेशोत्सवात कोट्यवधींची गुंतवणूक करतायत. २००८ मध्ये ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने गणेशमूर्तीची उंची १८ फुटांपेक्षा जास्त असणार नाही, असा ठराव केला. अगदीच मोठी मूर्ती बसवायची तीव्र इच्छा असेल तर मंडळाच्या २५, ५० किंवा ७५ व्या वर्षी अपवाद म्हणून बसवा, अशी सूट दिली गेली. त्याला अनेक मंडळांनी सहमती दर्शवली. परंतु तोपर्यंत उंच मूर्तींची चटक लागलीच होती. डीजेच्या तालावर कंबर मोडेस्तोवर नाचायला मुले सोकावली होती. लेझरचा झगमगाट असल्याखेरीज मिरवणूक निघाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. उंच मूर्तीच्या स्पर्धेत आता गणेशमूर्तींनी २५ फुटांची मर्यादाही ओलांडली. साळगावकर यांनी १८ फुटांची मर्यादा घातली खरी. पण त्या ठरावात जमिनीपासून मूर्तीची उंची १८ फूट हवी, अशी शब्दरचना न केल्याने अनेक मंडळांनी १८ फुटांची मूर्ती पृथ्वी, कमळ, कासव, शेषनाग यावर बसवून उंचीच्या स्पर्धेत बाजी मारण्याचा हेका पूर्ण केला. भरमसाठ उंचीच्या मूर्ती बसवणाऱ्या मंडळांची मुंबईतील संख्या १५० ते २०० च्या घरात आहे. काही मंडळांनी उंचीच्या या मर्यादा इतक्या ओलांडल्या की, मुंबईत उभारलेल्या उड्डाणपुलांखालून काही मूर्ती विसर्जनाला नेताना अडचण व्हायला लागली. आता तर अनेक मंडळे म्हणतात की, मूर्तिकार उंच मूर्ती उभारतात म्हणून आम्ही बसवतो आणि मूर्तिकार म्हणतात की, मंडळांची मागणी उंच मूर्तींना असते मग आम्ही काय करणार? जे गणेशोत्सवाचे तेच दहीहंडीतील थर लावण्याचे. तेथेही अशीच जीवघेणी स्पर्धा.

दहीहंडी, गणेशोत्सव हे आता समाजप्रबोधन, एकत्रिकरणाचे उत्सव राहिलेले नाहीत. आपल्या धार्मिक श्रद्धांचे व पैशांचे प्रदर्शन घडवण्याचे ते उन्मादी इव्हेंट झालेत. आपल्या राजकीय शक्तीचे दर्शन घडवण्याचा तो मार्ग आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका वर्षभरावर असतील तर मग तरुणांना आपल्यासोबत बांधून ठेवण्याकरिता राजकीय नेते अक्षरशः पैशांचा धूर काढतात. राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण या नव्या यशाच्या फॉर्म्युल्यात आपल्या लोकप्रतिनिधींनी देवांनाही सामील करुन घेतलय. आता तर पक्षफुटी व महायुतीमुळे राजकीय पक्षातील स्पर्धा, इर्षा अधिकच तीव्र झाल्यात. उंच मूर्तिंच्या हव्यासापोटी पीओपी मूर्तींचा मोह सोडायला आपण तयार नाही. बुद्धीच्या देवतेच्या नावावर सुरु असलेल्या श्रद्धेच्या, पैशाच्या खेळात आपण बुद्धी कधी गहाण ठेवली त्याचाच आपल्याला विसर पडलाय.

pradhansandeep19@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in