'दशावतार' : कोकणचा राखणदार जागृत होणार?

दशावतार. या सिनेमात कोकणच्या लाल मातीत रुजलेली लोककला सिनेमाच्या पडद्यावर साकारली आहे. कोकणचा राखणदार, कोकणातील कातळशिल्प आणि ज्याशिवाय कोकण हा शब्द पूर्ण होत नाही तो कोकणातला निसर्ग, हे सगळंच पडद्यावर बघताना मोहून जायला होतं.
dashavatara-movie-review-konkan-folk-art-environment
Published on

विचारभान

संध्या नरे-पवार

दशावतार. या सिनेमात कोकणच्या लाल मातीत रुजलेली लोककला सिनेमाच्या पडद्यावर साकारली आहे. कोकणचा राखणदार, कोकणातील कातळशिल्प आणि ज्याशिवाय कोकण हा शब्द पूर्ण होत नाही तो कोकणातला निसर्ग, हे सगळंच पडद्यावर बघताना मोहून जायला होतं. हे सगळं एकजीव होत एका दीर्घ भूतकाळाची साक्ष बनून उभं राहतं, पण त्याचवेळी सुरुंगाचे आवाज वर्तमानाची बेईमानी सांगू पाहतात.

वेड लावणारं हिरवं सौंदर्य, कौलारू घरं, रानातल्या पाऊलवाटा, विस्तीर्ण नदीपात्र, काजव्यांनी उजळलेली रात्रं, रात्रीच्या अंधारात घुमणारे भजन-कीर्तनाचे स्वर, रात्र चढत जाताना उत्तरोत्तर रंगत जाणारा दशावताराचा प्रयोग. हे सारं म्हणजे कोकणातलं एक गाव आणि त्या गावात रात्रीच्या चैतन्यमय अंधारात देवाच्या वेगवेगळ्या अवतारांच्या भूमिका साकारणारा आणि दिवसाच्या लख्ख उजेडात बिया गोळा करत, त्या रुजवत पुढच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करू पाहणारा वेडा बाबली..जमीन म्हणजे आई, जमिनीचं पोट फाडून खाण नसते खणायची, असं सांगणारा वेडा बाबली..आपण काही चुकीचं केलं नाही तर देवाचा, जंगलाचा राखणदार आपलं काही वाईट करत नाही, अशी श्रद्धा जपणारा वेडा बाबली..सड्यावरच्या कातळोबाचा भक्त असणारा आणि कातळोबाच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची बाजी लावणारा वेडा बाबली..

बाबलीच्या या वेडेपणाची कहाणी म्हणजे ‘दशावतार’ हा सिनेमा.

कोकणच्या लाल मातीत रुजलेली दशावतार ही देखणी लोककला, सड्यावरचं आदिम कातळशिल्प, या कातळशिल्पाचं लोकांनी केलेलं दैवतीकरण आणि निसर्गसंपन्न कोकणाला पोखरणारे खाणींचे सुरुंग हा त्रिकोण म्हणजे दशावतार. या दशावताराच्या मध्यभागी आहे राखणदार. कातळोबाचा, कातळोबाच्या जंगलाचा राखणदार.

हा सिनेमा पाहताना सतत बालपणातलं कोकण पार्श्वभूमीवर होतं. आज राज्यात ठिकठिकाणी काजवा महोत्सव साजरा होतो. शहरातील उच्चभ्रू मंडळी काही हजार खर्चून हा महोत्सव पाहण्यासाठी जातात. पण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जेव्हा कोकणचं कोकणपण शाबूत होतं तेव्हा पावसाच्या आधी रोजच गावागावात काजव्यांनी उजळलेलं जंगल पाहायला मिळायचं, खारुताईने खाऊन टाकलेल्या बिया, चारोळ्या गोळा करायला पोरांची झुंबड उडायची, जंगल वाटेने तासाभराची पायपीट करून गाठलेला सडा सांजवेळी अद्भूत वाटायचा. वाटेतलं टेकाडावरचं गावतल्या धनगराचं एकाकी घरही त्या सांजवेळी तितकंच विलक्षण वाटायचं. तिथे वाटेत थांबून प्यालेलं विहिरीचं थंडगार पाणी सड्यावर पोहोचेपर्यंत तगवून ठेवायचं. काळोख्या वाटेवरून घराकडे परतल्यावर रात्री खळ्यात बसून कंदिलाच्या उजेडात आजीकडून ऐकलेल्या गोष्टी...त्या गोष्टींमधली राखणदाराची कथा..गावचा-जंगलाचा राखणदार. देवाचा माणूस. कधी नागाच्या रूपात, कधी वाघाच्या, कधी माणसाच्या. तो रोज रात्री गावाभोवती एक फेरी मारतो. गावाचं रक्षण करतो. त्याची वाट ठरलेली आहे. रात्री त्याच्या काठीचा आवाज ऐकू येतो. अशा किती कथा ऐकलेल्या. परसवात (घरासभोवतालच्या जागेत) कधी नाग दिसला तरी त्याला मारत नाहीत. तो राखणदार आहे, असं मानतात. सड्यावरच्या जंगलात कधीमधी दिसणाऱ्या वाघोबालाही राखणदार मानतात. आपण त्याच्या वाटेला जायचं नाही, तो आपल्या वाटेला येणार नाही, ही गावची मान्यता. या मान्यतेसह, राखणदाराच्या कथारूपी मिथकासह कोकणातल्या पिढ्यान‌्पिढ्या जगत आल्या. कोकणातला मोहक निसर्ग अनेकदा रौद्र रूप धारण करतो. होत्याचं नव्हतं करतो. अशावेळी गाऱ्हाणं घालायचं ते राखणदाराला. जगणं अनुकूल असो की प्रतिकूल, राखणदार असतोच सोबतीला.

राखणदाराचं हे मिथक जसं कोकणाने मायेने जपलं, तसाच दशावताराचा खेळही जपला. विष्णूचे दहा अवतार म्हणजे दशावतार. शेवटचा कल्की अवतार अजून यायचा आहे. जेव्हा धर्म भ्रष्ट होतो तेव्हा देव अवतार घेऊन तो अधर्म संपवतो, ही संकल्पना यामागे आहे. पण पुराणातली, गीतेतली अवताराची हीच संकल्पना कोकणातल्या दशावताराच्या लोककलेत खूप वेगवेगळी रूपं घेऊन येते. तिथे वेद पळवणारा संकासूर असतो, पौराणिक कथेला स्थानिक रूप देणारी वळणं असतात, मालवणी बोलीचं शिव्यांचं प्रेम मंचावरही कायम असतं. दशावतार हे कोकणी माणसाचं खास प्रेम आहे. एकेका कुटुंबातील माणसं पिढ्यान‌्पिढ्या दशावतारातील कलाकार म्हणून काम करत राहिली. या कलेत फार पैसा मिळतो असं नाही. अनेकदा पोटापुरता पैसा मिळण्याचीही मारामार असते. अशीही गरिबी कोकणवासीयांच्या पाचवीलाच पुजलेली. पण तरीही कलाकार मंडळी पिढ्यान‌्पिढ्या दशावतार सादर करत राहिली आणि कोकणी माणूस ही कला मनोभावे पाहत राहिला.

सभोवतालच्या समृद्ध निसर्गासोबत राखणदाराची साथ, मुंबईहून येणारी मनीऑर्डर आणि दशावतारासारखी स्थानिक कला...ए‌वढ्या पुंजीवर कोकणी माणूस निवांत जगला असता आणखी काही पिढ्या. पण गेली काही वर्षं एक वेगळाच संचार या भागात होऊ लागला. एरवी ठाणेदाराला एखादं गाऱ्हाणं घालून कोकणी माणसाने या संचाराचा ‘बंदोबस्त’ केला असता. पण ‘विकास’ नावाचा हा संचार ठाणेदाराच्याही आवाक्याबाहेरचा. शासन-प्रशासन, व्यापारी-उद्योगपती, कंत्राटदार-राजकीय नेते यांची विकासाच्या नावे बांधली गेलेली एकत्रित हितसंबंधी मोट फोडणं कोकणी माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं. त्याच्या डोळ्यासमोर बॉक्साईटच्या खाणी, चिऱ्यांच्या खाणी डोंगर, सडा पोखरू लागल्या, खणू लागल्या. अणु प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जागेची मागणी होऊ लागली. विरोधाला न जुमानता सर्व्हे होऊ लागले.

कोकणातलं हेच वास्तव ‘दशावतार’ सिनेमाने प्रगत तांत्रिक कौशल्यासह राखणदाराचं मिथक चपखलपणे वापरून अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. पारंपरिक मिथक आणि पारंपरिक लोककला यांचा अचूक वापर करत वर्तमानातला संघर्ष दाखवला आहे. या संघर्षापर्यंत जाणारा प्रवासही वेधक आहे. विशेषत: लोककलाकार असलेला बाबली, त्याचं आपल्या कलेवरचं आणि मुलावरचं प्रेम, बाबली आणि माधवमधला अतुट बंध, वडिलांना एकटं सोडून शहरात जायला तयार नसलेला माधव, नजर अधू झालेल्या वडिलांनी दशावतारात काम करू नये म्हणून रागावणारा, आपल्या या ‘आवशीच्या घोवाक’ कसं समजवायचं म्हणून चिडणारा माधव, या दोघांवर चित्रीत झालेलं गाणं..हा सगळाच भाग खूप लोभस झाला आहे.

बाप-लेकाचं नातं जितकं हळूवारपणे उलगडलं आहे, तितक्याच हळूवारपणे माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं उलगडलं आहे. रस्त्याच्या मध्यभागी पडलेलं लाल मुंगळ्यांनी भरलेलं पान बाबली अलगद उचलतो आणि त्या मुंगळ्यांशी गप्पा मारत ते रस्त्याच्या कडेला ठेवतो. मुंगळ्यांनीही जगावं असं मानणाऱ्या बाबलीला गाव हाफ मॅड म्हणतं. पण गावाजवळ कुठलीच नोकरी उपलब्ध नाही, म्हणून नाइलाजाने मुलाला खाणीत नोकरी करावी लागणार, म्हणून ह्याच हाफ मॅडचे डोळे व्याकुळ होतात. काय चुकीचा करू नकोस हां, म्हणत तो मुलाला विनवतो.

ह्याच मुलाचा जेव्हा जमिनीच्या पोटातल्या खनिजासाठी, खाणीसाठी बळी जातो, कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा जगासाठी हाफ मॅड असलेल्या बाबलीची शहाणीव जागी होते. दशावतारातले विविध अवतार आणि राखणदार गावचं दैवत असलेल्या कातळोबाला वाचवण्यासाठी एकरूप होतात. पण शत्रू बलाढ्य असतो. कारण पोलीस, प्रशासन, स्थानिक आमदार अशा सगळ्या यंत्रणा कोकणाला ओरबडण्यासाठी एकवटलेल्या असतात. शेवटी बाबलीवरही घाव पडतो. अखेरीस गाव जागा होतो, हातात मशाली घेऊन कातळोबा उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आमदाराला घेरतो.

खटकणाऱ्या काही बाबी सिनेमात निश्चितच आहेत. पण तरी कोकणात आज ज्वलंत बनलेला खाणी आणि त्यातून होणारा पर्यावरणाचा पर्यायाने गावांचा विनाश हा विषय कुठेही रुक्षता न येता किंवा प्रचारकी न बनता स्थानिक लोककलेच्या आणि मिथकाच्या आधारे अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. यातील दशावताराला सर्वस्व मानणारा बाबली दिलीप प्रभावळकरांनी अक्षरश: जिवंत केला आहे. प्रभावळकरांच्या अभिनयाने या सिनेमाचे सगळे अवतार तोलून धरले आहेत. मुलाच्या नोकरीसाठी कुठचाही मागचा पुढचा विचार न करता बाबली नदीच्या प्रवाहात उडी घेतो तो क्षण, त्या क्षणातलं कारुण्य ते अचूक पकडतात. माधवच्या व्यक्तिरेखेतील निरागसता सिद्धार्थ मेननचे डोळे अधिक बोलकी करतात.

मिथकांचं, परंपरागत धारणांचं, जनमानसात रुजलेल्या लोककलांचं वर्तमानात नेमकं काय करायचं, हे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी ‘दशावतार’ सिनेमाच्या माध्यमातून दाखवलं आहे. राखणदार हे मिथक कोकणी लोकमानसात रुजलेलं आहे. अंधश्रद्धा म्हणून त्याला नाकारताही येतं, पण त्याचवेळी त्याला स्वीकारून संघर्षासाठी उभं करता येतं. खानोलकरांनी दुसरा पर्याय निवडला आणि एक सुंदर कलाकृती निर्माण केली.

सिनेमा पाहून बाहेर पडताना एकच प्रश्न मनात येतो.

कोकणचा राखणदार कधी जागृत होणार? आपण सगळे कधी वेडे होणार?

sandhyanarepawar@gmail.com

लोकजागृतीसाठी सिनेमाचा उपयोग होईल - सत्यजित चव्हाण, शाश्वत कोकण परिषद

“दशावतार या सिनेमाने उघडपणे ‘मायनिंग’विरोधात भूमिका घेतली आहे. कोकणातल्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात लढणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणूनच हा सिनेमा महत्त्वाचा वाटतोय. कोकणातील निसर्गावलंबी संस्कृती या सिनेमात दाखवली आहे. या सिनेमामुळे कोकणाला ओरबाडणाऱ्या खाणींचा विषय पुन्हा चर्चेत येईल. जनजागृतीसाठी एक अवकाश मिळेल”, अशी प्रतिक्रिया शाश्वत कोकण परिषदेचे निमंत्रक सत्यजित चव्हाण यांनी ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केली.

या सिनेमाच्या अनुषंगाने कोकणातील प्रकल्पांची चर्चा करताना ते म्हणाले, “सिंधुदुर्गात वेगवेगळे असे ५० प्रकल्प पाय रोवायला बघत आहेत. बॉक्साईट, मँगनीज, आयर्न या खनिजांबरोबर बेसाल्ट म्हणजेच काळा कातळ आणि चिरे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात खाणकाम होत आहे. खनिजांसाठी आणि चिऱ्याच्या दगडासाठी जमीन खणली जात आहे, तर काळ्या कातळासाठी सह्याद्री फोडला जात आहे. काळा कातळ फोडणाऱ्या स्टोन क्वारीज् वाढत आहेत. काँक्रीटीकरणासाठी काळ्या कातळाच्या वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या वाळूला कृत्रिम वाळू असं म्हणून नदीपात्रातील वाळू न वापरता आम्ही कृत्रिम वाळू वापरत आहोत, असं म्हणून लोकांची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात या कृत्रिम वाळूच्या नावे सह्याद्रीचा काळा कातळ पोखरला जात आहे. एकूण पश्चिम घाटाचा पट्टाच यामुळे धोक्यात आला आहे.”

या खाणींमुळे कोकणचा प्राचीन वारसा असलेली कातळशिल्पंही धोक्यात आली आहेत. दशावतार सिनेमात असलेला कातळोबा म्हणजे एक कातळशिल्पच आहे. काही ठिकाणी खाणींचं काम या कातळशिल्पापर्यंत पोहचलं आहे. पण शासन-प्रशासन-उद्योगपती हा त्रिकोण प्रत्यक्षातही कार्यरत असल्याने संघर्ष करणं खूप कठिण झालं आहे, असं सत्यजित चव्हाण सांगतात.

खाणींच्या बरोबरीने महामार्गांचं आक्रमणही कोकणच्या निसर्गावर होत आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या बरोबरीने पेण ते गोवा या दरम्यानचा ग्रीनफिल्ड महामार्गही प्रस्तावित आहे. सिमेंट लॉबी या मागे आहे. खाणींइतकंच या महामार्गांसाठी होणारं बांधकाम धोकादायक आहे. एक तर लोकांच्या जमिनी जातील, शिवाय या बांधकामाचे दुष्परिणाम होतील ते वेगळे, असं सांगत सत्यजित यांनी चिंता व्यक्त केली.

या सिनेमाचा शेवट लोकउठावाने, लोकच राखणदार बनतात, असं दाखवून होतो. लोकांच्या या उद्रेकाविषयी बोलताना सत्यजित चव्हाण यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत लोकांचा विरोध नेमका कसा असायला हवा, लोकांनी राखणदार व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं, हे स्पष्ट केलं. गावच्या सरपंचाला, आमदाराला निवडून कोण देतं? हा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “लोकांना आक्रमक, बोलभांड नेतृत्व आवडतं आणि ते त्यांना इतर कसला विचार न करता निवडून देतात. त्याचे परिणाम मग तुम्हाला वेगवेगळ्या रूपात भोगावे लागतात. तुम्हाला गावासाठी एखादं सभागृह मिळतं, पण गावचा डोंगर पोखरला जातो. म्हणूनच आपण जे मतदान करतो, ते आपलं मत निसर्गाशी, पर्यावरणाशी जोडलं गेलं पाहिजे. गावातला तलाठी, पोलीस पाटील ही सगळी यंत्रणा राजकीय नेत्यांच्या अधीन असल्याने राजकीय बदल महत्त्वाचा असतो, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच अराजकीय संघटना बांधून शासनावर लक्ष ठेवण्याचं काम लोकांना करावं लागेल. लोकांच्या क्षणिक उद्रेकापेक्षा आणि हिंसेपेक्षा निषेधाची ही लोकशाही प्रक्रिया अधिक महत्त्वाची आहे. गाडगीळ समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी लोकांनी बोललं पाहिजे. त्यासाठी प्रेशर ग्रुप बनवला पाहिजे. असं झालं तरच लोक खऱ्या अर्थाने राखणदार बनतील.”

दशावतार सिनेमाच्या निमित्ताने राखणदार असण्याचा, राखणदार होण्याचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा, हीच कात‌‌ळोबा चरणी प्रार्थना.

logo
marathi.freepressjournal.in