

मरणचिंतन
जगदीश काबरे
मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे; तो कुणाला कधी, कुठे, कसा भेटेल याची खात्री नाही. मनोविकास प्रकाशनाचे प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन झाल्याचे समजल्यावर त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. यामुळे आकस्मिक मरणाची जाणीव अधोरेखित झाली.
मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे, कसा आणि केव्हा भेटेल याचा काहीही नेम नाही. आजच्या धावपळीच्या जगात सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. रात्री झोपलेली व्यक्ती सकाळी उठेलच याचीही खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि अजून मिळवायचं आहे या विचारात आजचा क्षण निसटून जातो. पण काळ कुणासाठीही थांबत नसतो.
आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्यावेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण. म्हणूनच नात्यांकडे- मग ते कोणतेही असो दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं बोला. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका. झाले गेले विसरून जा. माफ करणं शिका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहे, पण मानसिक सुख मात्र शाश्वत असते. समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी जीवन जगण्याची मूल्य असली पाहिजेत. उद्या काय होईल माहीत नाही, पण आज आपल्या हातात आहे. म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा...
हे सगळं तत्त्वज्ञान आत्ताच आठवायचं कारण म्हणजे काही तासांपूर्वी कळलेली एक धक्कादायक बातमी! मनोविकास प्रकाशनचा प्रकाशक आणि माझा ४० वर्षांपासूनचा मित्र अरविंद पाटकर यांचे झालेले दुःखद निधन. मला आठवतं १९८४-८५ दरम्यान आमची पहिली भेट मुंबईत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सुरू करण्यासाठी श्याम मानवने घेतलेल्या बैठकीत झाली होती. त्या पहिल्या दिवसापासूनच आमची मैत्री झाली आणि एक समविचारी मित्र भेटल्याचा आनंद झाला होता. अरविंद हा अत्यंत उमद्या मनाचा, धाडसी आणि चळवळीत झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता होता. वडील गिरणी कामगार असल्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. त्या परिस्थितीवर मात करूनही तो जिद्दीने चळवळीचे काम करत होता. ते करत असतानाच त्याला वाटले की, लोकांमध्ये सामाजिक विचार पेरायचा असेल तर समाजाला दिशा देणारी पुस्तके मोठ्या प्रमाणात निर्माण केली पाहिजेत. सुरुवातीला त्याने आकाशवाणीसमोरील मंत्रालयाच्या आमदार निवासाच्या बाहेरील जागेत विविध प्रकाशकांची पुस्तके घेऊन त्यांची विक्री करण्याचा स्टॉल सुरू केला. काही अनुभव घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, चळवळीच्या विचारांची पुस्तके व्यावसायिक प्रकाशक सहसा पटकन काढत नाहीत. म्हणून आपणच प्रकाशन व्यवसाय सुरू करावा, हा धाडसी विचार त्याच्या मनात आला आणि तो जिद्दीने पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात उतरला. त्याच्या प्रकाशनातर्फे पहिले वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे पुस्तक त्याने जे प्रसिद्ध केले ते माझे होते... त्या पुस्तकाचे नाव होते- विज्ञान कथा. त्यानंतर त्याने माझी 'बळी अंधश्रद्धेचे' आणि 'फलज्योतिषाचा बोजवारा' अशी आणखी दोन पुस्तके प्रसिद्ध केली. त्याच्या अचानकपणे जाण्याची बातमी कळल्यानंतर माझ्या मनात या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
उत्पत्ती, वाढ आणि लय ही कोणत्याही सजीवाची लक्षणे आहेत. त्याप्रमाणे अरविंदचा मृत्यू होणे अटळ असले तरीही ही जाणीव जीवाला त्रास देणारी आहेच. स्पर्धात्मक अर्थव्यवस्था, वेगवान शहरी जीवन आणि 'यश' या व्याख्येभोवती फिरणारी मूल्यप्रणाली माणसाला कायम धावत ठेवत असते. त्यामुळे गेल्या पस्तीस वर्षांत त्याने सुरू केलेल्या प्रकाशनाचे रोपटे आज एवढे वाढले आहे की, ते एक प्रतिष्ठित प्रकाशन झाले आहे. त्या प्रकाशनाची धुरा आता त्याचा मुलगा आशिष समर्थपणे सांभाळत आहे, याचा अरविंदला खूपच अभिमान वाटत होता. आशिषच्या मागे तो एखाद्या खंबीर पहाडासारखा उभा होता. पण अरविंदच्या अचानक जाण्यामुळे त्याचा हा आधार अचानक निखळून पडला आहे. अर्थात अरविंदच्या विचारांवर आशिषचा परिपोष झाल्यामुळे तो या प्रसंगालाही खंबीरपणे सामोरा जाईल याची खात्री आहे.
विचारवंत आणि पुरोगामी चळवळीचे आधारवड आ. ह. साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन महिन्यांपूर्वीच साताऱ्याला त्याची-माझी भेट झाली होती, तेव्हा ही शेवटची भेट ठरेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज अचानक तो गेल्याची बातमी आली. अकाली मृत्यूच्या बातम्या कानावर आदळल्या की, अवचितपणे अश्रू वाहतात आणि आयुष्याची नाजूकता ठळकपणे समोर येते. मात्र काही दिवसांतच व्यवस्था पुन्हा आपल्याला धावपट्टीवर उभी करते. या अर्थाने मृत्यूची आठवण ही केवळ शोकाची नाही, तर मूल्य पुनर्मूल्यांकनाची संधी असते. मनापासून, प्रामाणिकपणे जगणे याचा अर्थ आपल्या निवडींचा परिणाम इतरांवर कसा पडतो याची जाणीव ठेवणे. अशा जाणिवेतूनच व्यक्तिगत कल्याण आणि सामाजिक न्याय यांचा संगम साधता येतो. एकूणच, मृत्यूची अटळता ही निराश करणारी असली तरी जीवनाला अर्थ देणारी आहे. ती आपल्याला सांगते की, वेळ मर्यादित आहे म्हणून मूल्ये स्पष्ट असायला हवीत. नातेसंबंध जपणे, माणुसकी जोपासणे, माफीची संस्कृती रुजवणे आणि मानसिक सुखाला सार्वजनिक महत्त्व देणे, हीच सामाजिक प्रगल्भतेची चिन्हे आहेत. आजचा दिवस जगणे म्हणजे क्षणिक आनंदात बुडणे नव्हे, तर मानवी मूल्यांची निवड करणे होय. काळ थांबत नाही, पण काळाला अर्थ देण्याची संधी आपल्या हातात आहे. तेव्हा चार्वाकांचे विचार आचरणात आणा. कारण मृत्यूपश्चात जीवन नाही.
लेखक विज्ञान प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com