

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
डोंगरमाथ्यावरच्या धुक्यात हरवलेली दीपमाळ, वाशिष्ठी नदीतील शांत सफर आणि गोविंदगडाचा इतिहास यामुळे चिपळूणचा तिसरा दिवस खास ठरला. या प्रवासात निसर्गासोबतच या भूमीचे सांस्कृतिक वैभवही उलगडत गेले.
चिपळूणच्या भटकंतीचा माझा तिसरा दिवस होता. चिपळूणमध्ये थांबून बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. मी चिपळूण जवळच्या परशुराम या गावात मुक्काम केला होता. मी जिथे राहिले होते ते रिसॉर्ट डोंगराच्या माथ्यावर असणारं होतं. त्याचं नावच डोंगरमाथा इको केअर रिसोर्ट असं आहे. तिथे राहून परशुराम गाव, गावाला कुशीत घेणारा महेंद्रगिरी पर्वत, पर्वतावरील सवतसडा धबधब्याचं उगमस्थान, श्रीक्षेत्र परशुराम मंदिर अशी जवळची ठिकाणं बघितली. पहिल्या दोन दिवसांची भटकंती अशी रोमांचक आणि प्रसन्नतेचा अनुभव देणारी होती. मागच्या भागात याविषयी माहिती दिली आहेच.
तिसऱ्या दिवशी आम्ही चिपळूणमधल्या अशा ठिकाणी जाणार होतो, जे स्थळ निसर्गसौंदर्य असणारे आहेच, शिवाय त्याला धार्मिक महत्त्वही आहे. त्या स्थळाला नाव असं नाही. पण तिथे पोहोचायला सुंदरसा ट्रेक आहे. डोंगरमाथा इको केअर रिसोर्टचे मालक मंगेश गोवेकर दादांसोबत ही भटकंती मी करत होते. पावसाळी वातावरण असल्याने आणि पाऊस पडून गेल्यामुळे ट्रेकचा रस्ता ओलाचिंब आणि हिरवागार झाला होता. सुरुवातीला जंगलाचा पट्टा लागला. मंगेश दादांना तिथल्या जैवविविधतेची अफाट माहिती होती. वाटेवरच्या झाडांची, सरिसृपांची माहिती ते देत होते. ओलसर वाटेने, मध्ये मध्ये असणारे पाण्याचे ओहोळ पार करत आणि निसर्गाची रंजक माहिती घेत आम्ही चालत होतो. साधारण अर्धा ते पाऊण तासाचा तो ट्रेक होता. जंगलातून जाणारा एक चढ चढला आणि चढाच्या शेवटच्या झाडाझुडपांच्या फांद्या सारून आम्ही एका सपाटीवर प्रवेश केला. समोर पाहते तर मोकळं विस्तृत पठार होतं. धुक्याची तलम पातळ चादर पठारावर पसरली होती. छान, लुसलुशीत हिरवंगार गवत सर्वत्र वाढलं होतं. चांगलं गुडघाभर उंचीचं होतं. पावसाचा ओलावा गवतावर होता. त्याचा गारवा जाणवत होता. अशा ओलसर गवतातून चालत जात असताना मंगेश दादांनी पठाराच्या एका टोकाला बोट केलं आणि म्हणाले- ‘तिकडे मनोऱ्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय, तिथे जायचं आहे आपल्याला’ धुक्यात धुसरसा दिसणारा तो उंच मनोरा डोळ्यापुढे ठेवून चालू लागलो. थोड्या वेळात आम्ही त्या टोकावर पोहोचलो. बघते तर तो मनोरा म्हणजे एक एकाकी उंच अशी दीपमाळ होती. तिथे आजुबाजूला कोणतंही मंदिर नव्हतं. फक्त ती दीपमाळ उभी होती. ही दीपमाळ जांभ्यात बांधली आहे आणि ज्यात दीप प्रज्वलित केली जाते तो भाग केवळ काळ्या दगडाचा आहे. आधी त्रिपुरी पौर्णिमेला ही दीपमाळ ग्रामस्थ प्रज्वलित करायचे आणि त्याचा प्रकाश परशुराम मंदिरात पोहोचायचा, अशी माहिती समजली. अजूनही त्रिपुरी पौर्णिमेला ही दीपमाळ प्रज्वलित केली जाते. दीपमाळ धुक्यात असली तरी मी कल्पना केली की, त्रिपुरी पौर्णिमेला असा ट्रेक करत गावागावातून भक्त जमा होतायत आणि हा दीप प्रज्वलित करत आहेत. केवढी मोठी ज्योत असेल याची! काय सुंदर अनुभव असेल ना!
असा विचार सुरू होता. बराच वेळ शांततेत गेला. एक ससा टुणकन उडी मारून गवतात गुडूप झाला. एकाएकी धुकं विरलं आणि चक्क चिपळूण शहर त्या पठारावरून लख्ख दिसू लागलं. फार सुंदर अनुभव होता. दीपमाळ बघून रिसॉर्टवर परत आलो. मंगेश दादांच्या बायकोने म्हणजेच श्रद्धाताईने आठळ्याची भाजी केली होती. मालवणी पद्धतीने केलेली भाजी एकदम झकास झाली होती.
जेवण झाल्यावर विश्रांती घेतली. आमच्या रूमच्या बाल्कनीत उभं राहिलं की, वाशिष्ठी नदीचं दृश्य दिसायचं. संध्याकाळी तिच्याच पात्रात आम्ही बोट सफारीसाठी जायचं ठरवलं. आम्ही साधारण संध्याकाळी पाचच्या सुमाराला बोटिंगच्या स्थळी पोहोचलो. बोट सफारीला सुरुवात झाली. मी बोटीच्या पुढच्या निमुळत्या जागी जाऊन उभी राहिले. बोट पाणी कापत पुढे जात होती. निळंशार पाणी, त्यावर उमटणाऱ्या लाटा, खाडीच्या काठावरची घरं किती सुंदर दिसत होती!! बोट सफारीचा मस्त आनंद घेत होते; पण हा आनंद द्विगुणित झाला जेव्हा मंगेश दादांनी बोटीत हर्बल टी पिण्यासाठी दिला. हा चहा घेऊन एकदम तरतरी आली. बोट खारफुटीच्या दिशेने गेली. तिथे खारफुटीचं बेटच तयार झालं होतं. तिथल्या एका दगडावर मगरी पहुडल्या होत्या. सफारीदरम्यान ३ ते ४ मगरी दिसल्या. ही बोट सफारी एक सुंदर अनुभव आहे. याच वाशिष्ठी नदीच्या काठी गोविंदगड आहे. भटकंतीचा शेवट गडावर जाऊन करायचं ठरवलं. गडाच्या तटबंदीवरून फिरत होते तेव्हा कोपऱ्यातील बुरुजावर तोफ दिसली. तिथून गोविंदगडाच्या रचनेचा अंदाज येतो. गडाच्या भोवती वाशिष्ठीचं खाडीपात्र आहे आणि आधी अगदी मोठी पडावही समुद्रातून इथपर्यंत यायची. हा किल्ला बांधण्यामागचं कारणच हे होतं की, या मार्गावर आणि चालणाऱ्या व्यापारावर लक्ष राहावं. गडाला एकूण नऊ बुरुज होते, अशी माहिती मिळाली. तिथे उभे राहिल्यावर मला त्याकाळची वाशिष्ठी दिसू लागली. मोठी पडावं, गजबजलेलं बंदर दिसू लागलं. गडावर फेरी मारताना एक एक वास्तू बघत होते. गडावर सदरेचा भाग आहे, त्याच्यामागे चुन्याचा घाणा आहे. एका बाजूला पाण्याची टाकी आहे. गडावर गोवळकोट बंदरावरून काढलेल्या तोफाही संवर्धन करून ठेवलेल्या आहेत. गडावर रेडजाई देवीचे एक देऊळ आहे. मंदिराच्या बाजूने तट आहे. तिथे थांबून दूरदूरपर्यंतचा परिसर बघत राहिले. या बाजूने वस्ती, शेती आणि एकमेकांना समांतर डोंगररांगा दिसतात. पुढे मी पार टोकाच्या बुरुजाकडे गेले. तिथून वाशिष्ठीचे पसरलेले पात्र दिसत होते. संध्याकाळचे रंग तिच्या पाण्यावर उतरले होते. एकदम शांत, अंतर्मुख करणारी ती संध्याकाळ होती. वाशिष्ठीला म्हणाले, तुझ्या काठावरच्या चिपळूणचं कायम मुखात नाव असतं. पण या चिपळूणचे अंतरंग मला या भटकंतीतून समजले याचा फार आनंद होतोय बघ.
मी तीन दिवस राहून चिपळूणची भटकंती केली. जी सर्वार्थाने सुंदर झाली. अध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न चिपळूणची बाजू या भटकंतीत पाहिली. तुम्ही कधी करताय मग चिपळूणचा प्लॅन?
जवळचे रेल्वेस्थानक - चिपळूण
जवळचे बसस्थानक - चिपळूण
मुंबई ते परशुराम, चिपळूण - २४० ते २५० किलोमीटर
पुणे ते परशुराम, चिपळूण - १९० ते २०० किलोमीटर
भेट देण्यासाठी उत्तम काळ - जून ते जानेवारी. पावसाळा ते हिवाळा वातावरण सुंदर असते. फक्त पावसाच्या दिवसांत चौकशी करून जावे.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com