

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
देवगड म्हटलं की समुद्र आणि किल्ला आठवतो; पण या भागात निसर्गाची आणखी एक सुंदर बाजू दडलेली आहे. गड नदीच्या खाडीपासून गढीताम्हाण्याच्या शांत मंदिरापर्यंतचा हा प्रवास अविस्मरणीय ठरला.
पावसाळ्यात कोकण बघणं म्हणजे भूतलावर असलेला स्वर्ग पाहण्यासारखं आहे. साधारण चार वर्षांपूर्वी अगदी मुसळधार पावसात मी देवगडची भटकंती केली होती. अगदी संस्मरणीय भटकंती होती ती.
त्यावेळी मी कोल्हापूर ते देवगड असा फोंडाघाटमार्गे प्रवास केला. फोंडाघाटात वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, दरीत उतरलेलं धुकं पाहत कोकणात कधी उतरले ते समजलंच नाही. कोकणात मग उड्या मारत वाहणारे व्हाळ (ओहोळ) बघत, त्यावरून जाणारे पूल पार करत, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली हिरवीगार भातशेती पाहत देवगडमध्ये पोहोचले. त्यादिवशी पावसाने उघडीप दिली होती, मग संध्याकाळी पवनचक्कीजवळच्या पॉइंटवर जाऊन वेळ व्यतीत केला. हा पॉइंट म्हणजे समुद्राच्या बाजूला कड्यावर बांधलेलं उद्यान आहे. भवताली बऱ्याच पवनचक्की आहेत. तिथे थांबून उधाणलेला समुद्र पाहिला. सुंदर असा अनुभव होता.
दुसऱ्या दिवशीचा प्लॅन करण्यासाठी गुगल मॅप उघडला आणि आडवाटेवरील देवगड बघायचं ठरवलं. त्यावर गड नदीच्या खाडीकाठाने, गावागावांतून जाणारा रस्ता दिसला. याच रस्त्यावर भटकून यायचं असं नक्की केलं. सकाळच्या प्रहरी गाडी गड नदीच्या खाडीकाठी वळवली. पावसाची रिपरिप सुरू होती. सुरुवातीला हिरवागार कातळ सडा लागला. पुढे वळणावळणाचा रस्ता होता. या रस्त्यावर उंचावर घरं होती. घरं पाहत ही घाटी उतरले आणि समोर गड नदीचा खाडीकाठ दिसला. रस्त्याला लागूनच हा काठ होता. भरती असल्यामुळे पाणी अगदी काठोकाठ भरलं होतं. कांदळवृक्षांची मुळं पाण्यात बुडून गेली होती. तिथे मला एक कमालीची सुंदर जागा दिसली. जागेचं नाव मोंडतर. तिथे खाडीच्या काठाने नारळाची मोठी झाडं एका रेषेत उभी होती. त्यांच्या सावलीत काही पायऱ्या खाडीकडे उतरल्या होत्या आणि छोट्या छोट्या होड्या नांगरल्या होत्या. ही जागा म्हणजे एक जेट्टी आहे. मोंडतर गावातले लोक पैलतटावर जाण्यासाठी इथून होडीत बसतात. होडीत उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. तिथे थांबलं की खाडीचं विस्तीर्ण पात्र दिसतं. पावसामुळे पाणी हलकं हलकं मातकट दिसत होतं. पैलतटावर असणारी हिरवीगार डोंगुर्ली तिथून दिसत होती. श्रावणाचं लख्ख उन्ह पडल्यामुळे हा परिसर आणखी सुंदर दिसत होता. श्रावणाचाच महिना, त्यामुळे त्याच्या स्वभावाप्रमाणे ऊन एकाएकी गायब होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. वारेही वाहू लागले. मगाशी शांत उभी असलेली नारळाची झाडं-झावळ्या जोरजोरात हलू लागली. त्यात भरतीमुळे पाणी पूर्वेकडे ढकललं जात होतं. शांत वाहणाऱ्या पात्रावर वेड्यावाकड्या लाटा उसळू लागल्या. जेट्टीकडेच्या बोटी हलू लागल्या. तेवढ्यात एक आजी काठी टेकत जेट्टीवर आल्या. पाच मिनिटं आडोशाला थांबल्या. तोच एक नावाडी बाजूच्या दुकानातून बाहेर आला. नावेत जाऊन बसला. आजींनी छत्री उघडली. छत्रीवर पाऊस तडतड पडत होता अगदी. त्या पायऱ्या उतरून गेल्या. नावाड्याच्या मदतीने होडीत बसल्या. त्याने होडीची दोरी सोडली आणि काठीच्या मदतीने नावाडी त्या आजींना पैलतीरावर घेऊन निघाला. जोरदार वारा, पाण्यावरच्या लाटा, पावसाचा मारा झेलत बोटीतून निघालेले ते दोघेजण; हे सारं काही मी थक्क होऊन पाहत होते. माझ्या मनात काळजीच्या लाटा उसळत होत्या. अशा वातावरणात नावाडी मात्र कौशल्याने आणि सराईतपणे होडी नेत होता. दहा मिनिटांत ती होडी पैलतीरावर पोहोचली. आजीची एक छोटी आकृती मला दिसत होती. त्या समोरच्या जेट्टीवर काठी टेकत टेकत चढल्या. तोपर्यंत आपली लालपरी बस आली होती. आजी त्या बसमध्ये चढल्या. लालपरी हिरवाईतून वाट काढत निघाली. आजींचे त्या गाडीत सुखरूप बसणं माझ्यासाठी एका प्रसंगाचा गोड शेवट झाल्यासारखा होता.
समोरच्या जेट्टीवर काही लोक उतरले होते. त्यांना घेऊन तो नावाडी पुन्हा मोंडतरकडे येण्यासाठी निघाला. त्या नावाड्याच्या कौशल्याने माझ्या मनातल्या काळजीच्या लाटा कमी कमी होत गेल्या. सगळे लोक सुखरूप मोंडतरकडे पोहोचले. मी त्यांच्यातील एका व्यक्तीला विचारलं की, अशा वातावरणात होडीने प्रवास करताना भीती नाही वाटत? ते म्हणाले- “हे आमच्यासाठी रोजचंच आहे.” नावाड्याच्या त्या कसबीला मी सलाम केला आणि पुढची भटकंती सुरू केली. खाडीला न सोडता बरीच पुढे गेले. तिथे एक ठिकाणी खाडीवर पूल बांधला होता. तिथून खाडीचं अप्रतिम दृश्य दिसत होतं. दोन्ही बाजूचे हिरवेगार काठ आणि त्यांच्यातून वाहणारी देवगड खाडी. त्या पात्रावर बगळ्यांचा थवा उडत होता. पुलाच्या बाजूच्या झाडावर सोनपाठी सुतारपक्षी होता.
या पुलावरून पुढे गेल्यावर पुढे एक नितांत सुंदर गाव वसलेलं आहे. त्याचे नाव आहे गढीताम्हाणे. भरपूर भातशेती तिथे दिसत होती. त्यात दडलेली कौलारू घरं काय देखणी दिसत होती!! बऱ्यापैकी जंगलाचा भाग वाटत होता. गाव बघत एका टोकाला पोहोचले. तिथे एक कौलारू मंदिर दिसलं. उत्सुकतेने गाडी मंदिराच्या प्रांगणात नेली. श्री देव रहाटेश्वर मंदिर असा फलक दिसला. कोकणी धाटणीच्या मंदिराप्रमाणे ते मंदिर होतं. कौलारू, प्रशस्त. आजुबाजूचा परिसर हिरवाईत न्हाऊन गेला होता. मंदिरात प्रवेश केल्यावर मोठाला सभामंडप तिथे दिसला. भगवान शिवशंकराची पिंडी गाभाऱ्यात होती. केवळ समईचा उजेड तिथे होता. दर्शन घेऊन बाहेर सभामंडपात आले. मंदिरात कुणीच नव्हतं. ध्यान करण्याचा प्रयत्न न करताही आपसूक ध्यानमग्न झाले. पराकोटीची शांतता जाणवत होती. बाजूने वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज कानी पडत होता. पाऊस पडून गेल्यामुळे थेंब खाली पानावर पडायचे. तो आवाज ऐकू येत होता. तिथे फक्त शांतता होती. हे वातावरण मी स्वतःमध्ये झिरपून घेतलं. मंदिराच्या बाजूला एक विहीर आणि रहाट होता. प्रांगणात छोट्या छोट्या तोफा दिसत होत्या. सकाळी आठ वाजता सुरू केलेली भटकंती दुपारी तीनपर्यंत सुरू होती. जेवणाखाण्याचे भान हरवून हा आडवाटेवरील देवगड बघत होते. देवगडच्या या भागात अजून काही ठिकाणं मंत्रमुग्ध करणारी आहेत. त्यांच्याविषयी पुढच्या भागात.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com