

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
मालवण तालुक्यातील धामापूर हे गाव केवळ एक निसर्गरम्य ठिकाण नसून, इथे निसर्ग, श्रद्धा आणि जैवविविधता एकमेकांत गुंफलेली दिसते. तलावाच्या कुशीत विसावलेलं हे गाव अनुभवताना प्रत्येक क्षण एखाद्या परिकथेप्रमाणे मनात कोरला जातो.
मालवण तालुक्यातील धामापूर या निसर्गसंपन्न गावाची भटकंती करत होते. तिथे पूर्वजांनी निर्मिलेला तलाव आणि त्याच्या बांधावर असणारे शेकडो वर्षे जुने भगवती देवीचे मंदिर आहे. संध्याकाळी तलावाच्या काठावर बसून तिथल्या प्रसन्न वातावरणात गढून गेले होते. मंदिरातून येणारे वीणावादनाचे सूर आणि त्याच्या पार्श्वभूमीवर होणारी संध्याकाळ, समुद्रावरून परत डोंगराकडे विसाव्याला जाणारे पक्षी; त्यावेळेचे सगळे क्षण आठवणीत राहतील असेच होते. अगदी मंतरलेली वेळ होती ती. या वेळेचा अनुभव मी मागच्या लेखात मांडला आहे.
संध्याकाळी तिथून निघताना मंदिरातल्या पुजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी या असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे रात्री लवकर निजून पहाटेच उठले. डोळ्यांवर अजूनही झोप होती, पण जेव्हा खोलीचं दार उघडून व्हरांड्यात आले तेव्हा बाहेरचं दृश्य पाहून डोळ्यांवर साठलेली झोप गायब झाली. धामापूर गाव धुक्यात गुडूप झालं होतं. सूर्याचा कोवळा सोनेरी प्रकाश धुक्यात मिसळला होता. हे सोनेरी अंश असणारं धुकं गावातल्या झाडात अडकलं होतं, घरांच्या कौलावर स्थिरावलं होतं, छोट्या छोट्या पक्ष्यांच्या कांतीवर उजळत होतं. सूर्यदेवाचा अलवार हात सबंध गावावर फिरत आहे असं वाटत होतं. हळूहळू गावातील दिनचर्या सुरू झाली होती. मी सुद्धा लवकर आवरलं आणि धुक्यातून चालत धामापूरच्या मंदिराकडे निघाले. यावेळी मंदिराच्या स्पीकरमधून भक्तिमय स्तोत्र ऐकू येत होते.
मंदिरात जाऊन पाहते तर देवीची पूजा झाली होती. चतुर्भूज, उंचीपुरी भगवती देवी फुलांच्या गजऱ्यात किती प्रसन्न दिसत होती!! तिची साडी हिरवी होती. काठ लाल रंगाचे वेलबुट्टीचे होते आणि पदरही साजेसा होता. अचानक ध्यानात आलं की, आदल्या दिवशी देवीची ज्या साडीने ओटी भरली होती, ही तीच साडी आहे. देवीला या साडीत पाहून मन आनंदून गेलं. पुजाऱ्यांनी उद्या सकाळी या असं का सांगितलं याचा उलगडा झाला. त्यांचे आभार मानले. त्यावेळी गप्पा मारताना ते म्हणाले, “तुम्हाला पक्षीनिरीक्षणाची आवड आहे. तलावाच्या बाजूने हे जे मोठे हिरवे डोंगर दिसत आहेत, त्यांच्यातून चालायला पायवाट आहे. त्या जंगलात तुम्हाला चिक्कार पक्षी दिसतील.”
देवीला मनोभावे नमस्कार केला आणि मी क्षणही न दवडता जंगलात फेरफटका मारण्यासाठी तलावाच्या काठाने चालायला सुरुवात केली.
या तलावाला दोन डोंगरांनी कुशीत घेतलं आहे. मध्ये निळेशार पाणी आणि त्याच्या काठी ही जंगलाची हिरवाई असा मनोरम्य परिसर आहे. त्याच्या काठाने फिरायला मन आकृष्ट होतंच. मंदिराच्या मागून गेलं की, लगेच वनराईत प्रवेश होतो. शहरात असणाऱ्या तलावाच्या काठी फिरायला पेव्हरब्लॉक्स असतात, शोभेची झाडं लावलेली असतात; इथे मात्र जांभ्याची वाट होती. सुकलेल्या पानांचा वाटेवर खच पडला होता. डोंगराच्या उतारावर मोठमोठ्या पुराणवृक्षांची दाटी होती. तलावाच्या काठी किंजळाची झाडं होती. काही झाडांच्या फांद्या तलावात झुकल्या होत्या. काही झाडं मुळं पाण्यात पसरून होती. त्यांच्याकडे पाहून- ‘पाय टाकून जळात बसला असला औदुंबर’ या बालकवींच्या काव्यपंक्ती आठवल्या. ‘तळ्याचा काठ इतका हिरवागार का आहे’, हे इथे चालताना जवळून बघता आलं. खऱ्या अर्थाने जंगलात फिरतोय असंच वाटत होतं. चालताना कडेने तलावाची अखंड सोबत होती. पाण्यावरही तलम धुकं पसरलं होतं.
हे जंगल सुरक्षित ठेवण्याविषयी मराठा साम्राज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेंनीही त्याकाळी आदेश दिला होता त्यानुसार काठावरचं हे जंगल आता सुरक्षित आहे. हे जंगल त्यांच्या निगराणीखाली अधिक घनदाट होत गेलं. वाढत गेलं.
या तलावाशी संबंधित एक आख्यायिका सांगितली जाते की, पूर्वीच्या काळी लग्न ठरलं की, लग्नात घालण्यासाठी दागिने लागायचे. तेव्हा आईवडील परडीतून फुलं घेऊन यायचे, परडी तलावाच्या काठी ठेवायचे. दुसऱ्या दिवशी परडीत फुलं नसायची तर दागिने असायचे. पण एक नियम होता. लग्नकार्य झालं की दागिने परडीत घालून पुन्हा तिथे आणून ठेवायचे. एके दिवशी हा नियम मोडला, दागिने परत केले नाहीत, देवीचा कोप झाला आणि ही प्रथा बंद करण्यास सांगण्यात आलं.
काठाने चालत मी बरेच पुढे आले होते. आख्यायिका रुंजी घालत होती. त्याविषयीचे विचार मनात गुंफले जात होते. अचानक झाडीत फडफडण्याचा आवाज आला, पंढरुकी हालचाल दिसली आणि विचार शृंखला मोडली. कोण आहे याचा कानोसा घेत पुढे आले. पाहते तर पांढऱ्या रंगाचा, बाकदार चोच असलेला पक्षी फांदीवर बसला होता. मासे टिपायच्या तयारीत होता. तो रुबाबदार पक्षी होता समुद्र गरूड. फांदीवर एका योद्ध्याप्रमाणे बसला होता.
समुद्र गरूडाचे दर्शन घेऊन पुढे पावलं टाकली. साधारण एक किमीचा पल्ला चालल्यानंतर पुन्हा त्याच वाटेवरून माघारी वळले. घड्याळात आठ वाजून गेले होते. सूर्य वर आला होता आणि धुकं हळूहळू विरत चाललं होतं. तलावाच्या निळ्याशार पाण्यावर सूर्याची चमकदार किरणं चमचमत होती. नऊचे चेकआऊट असल्यामुळे पावलांची गती वाढवली. थोडं अंतर चालल्यावर दूरवरूनच तलावाच्या काठावर हालचाल दिसली. पावलांची गती मंद केली. भिजून गेलेले चॉकलेटी रंगाचे अंग, चुटुकदार नाक, मांजरीसारख्या मिश्या आणि डोळे मला दिसले. दगडावर एका अत्यंत देखण्या प्राण्याचं कुटुंब जमलं होतं. सात-आठ पाणमांजरं त्या दगडावर आली होती. समोरून कुणीतरी आल्याची त्यांना चाहूल लागली आणि सगळ्यांनी पाण्यात पुन्हा उड्या टाकल्या. मान वर काढत, पोहत पोहत ती पुढे निघून गेली. पाणमांजरांचं कधी न घडलेलं दर्शन त्यावेळी झालं. तो दिवस एखादी परिकथा प्रत्यक्षात घडावी तसाच होता.
गंमत म्हणजे तिथून निघताना कुणीतरी कुचेष्टा करून जोरजोरात हसावं तसा आवाज जंगलातून येत होता. हा हॉर्नबिलचा आवाज असं म्हणेपर्यंत जोरजोरात पंख फडफडले आणि डोक्यावरून मलबार पाईड हॉर्नबिल उडत गेले. १५३० मध्ये मातीचा बांध घालून निर्मिलेला हा तलाव केवळ गावकऱ्यांची तहान भागवत नाही तर अनेक प्राणिमात्रांनाही आश्रय देतो. इथली संपन्न जैवविविधता डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य या भटकंतीतून मिळालं. जवळजवळ १२३ प्रजातींचे पक्षी, १९३ प्रजातींची वृक्षसंपदा, ४८ प्रजातींची फुलपाखरं शिवाय पाणमांजरं, बेडूक, सरीसृप इथे मुक्त नांदतात.
धामापूरच्या या तलावाकाठी फेरफटका मारणं म्हणजे एका जंगलबुकमध्ये फिरून आल्यासारखं आहे. धामापूरमधले हे दोन दिवस खरंच निसर्गदेवतेच्या आणि भगवतीच्या आशीर्वादाने भारलेले होते.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com