
दखल
रोहित गुरव
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या पक्षी वैविध्यातले एक आगळे नाव म्हणजे धनेश. हा पक्षी घनदाट जंगलातच राहतो, अंडी घालतो. जंगल कमी झालं तर तो अंडी घालत नाही. धनेशाचं अस्तित्व हे थेट जंगलाशी म्हणजेच पर्यावरणाशी जोडलेलं आहे. म्हणूनच धनेशची संख्या कमी होणं हा धोक्याचा इशारा आहे. धनेशची संख्या कमी होतेय की नाही, याबद्दल मात्र मतमतांतरं आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये किंवा गावाकडच्या देवराईतील घनदाट जंगलात फिरत असताना मध्येच एक टोकदार आवाज कानी पडतो. इतर पक्ष्यांच्या गुंजनापेक्षा हा टोकदार आवाज थोडा वेगळा वाटतो. आपसुकच आपली मान वरच्या दिशेने वळते. थोडासा कानोसा घेतला आणि त्या आवाजाच्या दिशेने माग घेत झाडांवर नजर फिरवली तर एखाद्या उंच झाडाच्या शेंड्यावर पानाआड लपलेला काळ्या, पांढऱ्या, पिवळसर रंगांतला, फांदीवर रुबाबात बसलेला, आकाराने बऱ्यापैकी मोठा असलेला पक्षी नजरेला दिसतो. बाकदार चोच, मोठे पंख, ठळक रंगसंगती...दाट झाडीत, पानांच्या गर्दीतही ‘हॉर्नबिल’ अर्थात ‘धनेश’ कोणाचंही लक्ष सहज वेधून घेतो.
सह्याद्रीच्या डोंगररांगात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचं वास्तव्य आहे. त्यात ‘धनेश’ हा पक्षी अलाहिदा. अगदी सर्वस्वी वेगळा. त्यांचं दिसणं जितकं इतर पक्ष्यांपेक्षा वेगळं, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व दाखवणारं आहे, तितकंच त्याचं वर्तनही आगळं आहे. हा पक्षी चक्क ‘प्लॅनिंग’ करतो. नियोजन करून विचारपूर्वक निर्णय घेणारा पक्षी हे धनेशचं वैशिष्ट्य त्याचं वेगळेपण अधोरेखित करतं. त्याचा स्वभाव काही बाबतीत मानवाशी मिळताजुळता आहे. तो माणसाप्रमाणे नियोजनबद्ध आहे. किंबहुना मानवापेक्षाही अधिक नियोजनबद्ध आहे, असेही म्हणता येईल. मानवी जगण्यात फॅमिली प्लॅनिंगचा उदय या विसाव्या शतकात झाला. धनेश मात्र आपल्या प्रजोत्पादनाच्या मोसमात अनेक गोष्टींचा विचार करतो. आपल्या पिल्लांच्या संगोपनासाठी सभोवतालची जागा योग्य आहे की नाही, जिथे अंडी घालायची त्या अधिवासात पिल्लांसाठी पुरेसे अन्न उपलब्ध आहे की नाही, या सर्व गोष्टी पडताळून पाहून मगच पिल्लांना जन्म द्यायचा की नाही, याचं नियोजन धनेश करतो. त्यातल्या एकाही गोष्टीत त्याला त्रुटी आढळल्यास ती जोडी पिल्लांना जन्म देण्याचं प्लॅनिंग पुढे ढकलते, असं धनेशचे अभ्यासक सांगतात. हा पक्षी आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतो. नर आणि मादी मिळून पिल्लांची काळजी घेतात. मादी भल्यामोठ्या झाडांमध्ये बांधलेल्या घरट्यात नवजात पिल्लांसोबत स्वतःला कोंडून घेते. त्या ढोलीत पिल्लांची जडणघडण होते. त्या घरट्याला छोटीशी फट ठेवलेली असते. त्या फटीतून नर अन्नाचा पुरवठा करतो. पिल्लांच्या पालकत्वाची जबाबदारी ही जोडी एकत्रितपणे पार पाडत असते.
भारतात धनेशच्या नऊ प्रजाती आढळतात. ओरिएंटल पाईड हॉर्नबिल, ग्रेट हॉर्नबिल, ब्राऊन हॉर्नबिल, इंडियन ग्रे हॉर्नबिल, मलबार ग्रे हॉर्नबिल, मलबार पाईड हॉर्नबिल, रुफस नेकेड हॉर्नबिल, नार्कोडम हॉर्नबिल आणि व्रियेथेड हॉर्नबील या प्रजातींचा त्यात समावेश आहे. त्यातील ग्रेट हॉर्नबिल, मलबार ग्रे हॉर्नबिल, मलबार पाईड हॉर्नबिल, इंडियन ग्रे हॉर्नबिल हे चार प्रकार महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रातील धनेशाच्या प्रजाती स्थलांतर करतात, असा अंदाज काही अभ्यासक वर्तवतात. परंतु महाराष्ट्रातील धनेशच्या प्रजाती स्थलांतर करत नसल्याचे धनेश अभ्यासक डॉ. प्रताप व्यंकटराव नाईकवाडे ठामपणे सांगतात.
साधारणत: भारतीय ग्रे हॉर्नबिलच्या डोक्यावर आणि पाठीवर तपकिरी रंगाचे पट्टे असतात. शेपटी आणि पोटाचा भाग पांढरा असतो. महाधनेश काळ्या आणि पांढऱ्या रंगात असतो. त्याच्या पाठीवर काळा रंग, तर पोट पांढरे असते. या व्यतिरिक्त धनेशचे इतर प्रकार नारंगी, लाल, निळा आणि पिवळा अशा विविध रंगांत असतात. त्यांची चोचही विविध रंगात असते. धनेश पक्षी विविध आवाज काढतो. त्यामुळे त्याला ओळखणं तसं सोपं आहे. त्यात त्याचं किंचाळणं किंवा किंकाळ्यांचाही समावेश आहे. तो आवाज काहीसा कर्कश, टोकदार असतो. साधारण घारीच्या आवाजासारखा असतो. आपल्या प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी आणि इतर धनेश पक्ष्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांना सावध करण्यासाठी तो किंकाळ्यांसारखे आवाज काढत असतो. उडताना त्याचे पंखही आवाज करतात. काही वेळा, विशेषत: समागमाच्या काळात तो आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट आवाज काढतो.
डेरेदार अन् भलीमोठी वृक्ष संपदा हा धनेश पक्ष्याचा हक्काचा अधिवास आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील या मोठेखानी वृक्षांचा पट्टा घटतोय. यामुळेच धनेशच्या संख्येत वाढ होत नसल्याचा अंदाज पक्षी तज्ज्ञ डॉ. प्रताप व्यंकटराव नाईकवाडे वर्तवतात. पक्ष्यांची गणना करणं तितकं सोपं नसल्याने त्यांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. परंतु पूर्वीच्या तुलनेत अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रात हा पक्षी नजरेत पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आकडेवारीत घट झाल्याचा तर्क केला जात आहे. दरम्यान, नेमकी आकडेवारी स्पष्ट होत नसल्याने धनेशच्या संख्येत वाढ झाली आहे की घट, याबाबत पक्षी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. दरम्यान मुंबई, ठाणे यांसारख्या शहरी भागांत हल्ली हा पक्षी अभावानेच नजरेस पडतो. याचं नेमकं कारण म्हणजे शहरांमध्ये पूर्वीसारखे डेरेदार वृक्ष आता राहिले नाहीत.
शहरी भागांत ग्रेट हॉर्नबिल आणि मलबार पाईड हॉर्नबिल फारसे दिसतच नाहीत. पण मलबार ग्रे आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल अधूनमधून दिसतात. कारण धनेशचे हे दोन प्रकार आकाराने छोटे असून त्यांनी शहरी वातावरणाशी जुळवून घेतलं आहे. मध्यम आकाराच्या झाडांवर छोटं घरटे बांधून हे पक्षी होणाऱ्या बदलाशी जुळवून घेत आहेत, याकडे अभ्यासक लक्ष वेधतात.
जे शहरांमध्ये तेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होत असल्याने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे दिसते. शासकीय पातळीवर हरित पट्ट्यात वाढ नोंदवली जात असली तरी घनदाट जंगल आणि त्यातील मोठ्या डेरेदार झाडांची संख्या कमी होत आहे. या स्थित्यंतरात धनेशाचा अधिवास धोक्यात आला आहे. म्हणूनच घनदाट जंगलं वाचवण्याचा प्रयत्न करण्याची अपेक्षा पक्षीप्रेमी व्यक्त करतात. गावागावांमध्ये असलेल्या ‘देवराई’ या पक्ष्यांसाठी वरदान ठरत आहेत. इथे जुनी, जाड बुंध्याची मोठाली झाडे असतात. वर्षानुवर्षे असलेली ही वृक्षसंपदा धनेशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. ही झाडे अनेक जैवविविधतेला आपल्या पंखाखाली आसरा देत आहेत. याच झाडांत धनेशाला त्याचे वास्तव्य सुरक्षित वाटत असल्याचे निरीक्षण डॉ. नाईकवाडे नोंदवतात. धनेशाच्या घटत्या संख्येची कारणमीमांसा करताना डॉ. नाईकवाडे सांगतात की, “धनेश पक्षी जुन्या झाडांमध्ये घरटी बनवतो. अशा झाडांमध्ये ढोली असतात. मात्र घटत्या वनसंपदेमुळे घरटे तयार करायला अशा मोठ्या ढोल्या मिळत नाहीत. जुनी झाडे आता कमी झालीत. झाडांमध्ये ढोल्या बनायलाही पुष्कळ वर्षे लागतात. तसेच पुरेसे खाद्य नसले तरी धनेश पक्षी त्या वर्षी पिल्लांना जन्म न देण्याचा विचार करत असावेत किंवा अन्नाच्या कमतरतेमुळे न्यूट्रिशन अभावाचा फटका त्यांना बसत असावा.”
धनेशचे अस्तित्व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यांची संख्या कमी होणं हा कदाचित पर्यावरणासाठी धोक्याचा इशारा असू शकतो. घटती दाट वनसंपदा धनेशसह पर्यावरणासाठीही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या पक्ष्यांच्या संवर्धनाची निकड पुढे येते. नागालँड राज्य त्यात अग्रेसर आहे. धनेश पक्षी नागालँडच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी या राज्यात डिसेंबरमध्ये साधारणपणे दहा दिवस ‘हॉर्नबिल फेस्टिवल’ (धनेश पक्षी महोत्सव) साजरा केला जातो.
महाराष्ट्रातही धनेशच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमी, पर्यावरणीय संस्था यांच्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. धनेशच्या संवर्धनासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतिक मोरे, डॉ. शार्दुल केळकर व डॉ. नाईकवाडे काम करत आहेत. धनेशला अनुकूल असं वातावरण निर्माण केलं जात आहे. जसं की, वड-पिंपळ यासारखी मोठी, जुनी झाडं टिकवणं, ती तोडू न देणं यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
‘जंगल’ हा पर्यावरणाच्या साखळीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ‘धनेश’सारख्या जैवविविधतेच्या अस्तित्वासाठीही या हिरव्या फुप्फुसाचे प्रमाण अधिक असणं गरजेचं आहे, याचं भान आपल्या प्रत्येकाला हवं.
guravrohit1987@gmail.com