

ऐकलंत का?
दीपक परब
सकाळीच गार वारा सुटला होता. वातावरण तर आल्हाददायक होतं. कमळाबाईंनी चहाचं आधण ठेवलं होतं; अन् स्वत:शीच काहीशा रागानं त्या पुटपुटत होत्या. तिथं टिकोजीराव एका हाताने डोळे चोळत दुसऱ्या हाताने वर्तमानपत्र उघडून वाचत बसले होते. तितक्यात, ऐकलंत का? अशी बांग त्यांच्या कानावर आली. नेहमीप्रमाणे टिकोजीरावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता कमळाबाईंच्याही हे लक्षात आलंय की, नेहमीप्रमाणे हे पहिल्या हाकेकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा पारा चढला. मी काय म्हणतेय, ते ऐकलंत का; काय करताय? ‘पेपर चाळतोय...टिकोजीरावांनी जरा नरमाईनेच स्पष्ट केलं. पेपर चाळताय कसला, तो नीट वाचा...नीटच वाचतोय, तू काय शिकवतेस. राव वैतागलेच.
कमळाबाईंनी लगेच प्रश्न फेकला, तुम्ही काय वाचलंत ते सांगा. तुम्ही पुरूषमंडळी लबाड, क्रूर झाला आहात, कमळाबाई चिडल्या. टिकोजीरावांनी जरा पडतं घेतलं आणि शांतपणे विचारलं अरे असं कसं म्हणतेस, माझं काय चुकलं ते तरी सांग...ती नांदेडची बातमी वाचलीत काय? नाही... मग काय डोंबल पेपर वाचलात... काय ते स्पष्टपणे सांग, टिकोजीरावांची विनंती. अहो स्वार्थी राजकारणासाठी ‘त्या’ बापाने मुलीचा जीव घेतला बघा... आता टिकोजीरावांनी सरसावून पेपर पुन्हा उघडला, ती बातमी शोधून काढली. त्यांच्याही तळपायाची आग मस्तकात गेली, हे राजकारण आता गजकरण झालं आहे.
खालच्या पातळीवरचे आरोप-प्रत्यारोप, धमक्या, जीवघेणे हल्ले, हे थांबायला हवं; काहीतरी करायला पाहिजे. ते भडकले. कमळाबाईंनी गुश्श्यातच, तुम्ही काय करणार? तुमच्यात हिंमत आहे काय? असा जळजळीत प्रश्न फेकला नी इथे रावांचा पाराही चढला. माझं काय चुकलं, मी काय केलं? कमळाबाईंनी आठवण करून दिली, तुम्ही पण निवडणुकीला उभे राहणार होतात ना? टिकोजीराव सावरले, हो पण तो विचार नंतर मी सोडला, ते आपले काम नाही... समजावण्याच्या सूरात म्हणाले. ‘नांदेडमध्ये नराधम बापाने निवडणुकीत तीन अपत्ये असल्याचा अडथळा ठरेल म्हणून सात वर्षांच्या पोटच्या मुलीला जीवंतपणी कालव्यात फेकून तिचा जीव घेतला’, बातमी वाचून तेही सुन्न झाले.
कमळाबाईंचा त्रागा त्यांच्या ध्यानी आला. केवळ सरपंच होण्यासाठी ‘त्या’ क्रूरकर्मा बापानं मुलीला संपवलं. तिची काय चूक होती? त्याला किंवा अन्य कुणालाही एखाद्याचा जीव घेण्याचा काय अधिकार? अशांना फासावर लटकवलं पाहिजे, टिकोजीराव प्रचंड भडकले. फासावर चढवलं, तरी याला आळा कसा बसणार? हे तुमचं राजकारणंच चुलीत घातलं पाहिजे. बंदी घातली पाहिजे; कमळाबाईंनी मागणी केली. अलीकडे राजकारण खूपच खालच्या पातळीवर गेलंय आणि जीवघेणं झालंय, यावर मात्र दोघांचंही एकमत झालं. पण अशा गोष्टींना कायमचा आळा घालण्यासाठी काय करावं? या प्रश्नाने दोघांच्याही डोक्याचा पार भुगा झालाय...
parabdeepak191@gmail.com