
विशेष
जगदीश काबरे
दरवर्षी ३० जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हे दोन दिवस ‘जागतिक मैत्री दिन’ म्हणून साजरे केले जातात. मैत्री हे केवळ वैयक्तिक नातं नसून, सामाजिक सलोखा आणि जागतिक शांतता यासाठी मैत्रीची भावना अत्यंत महत्त्वाची आहे, ही भूमिका या दिवसामागे आहे. पण आजच्या डिजिटल युगात मैत्रीचं स्वरूपही बदलत आहे. तिची व्याप्ती वाढली असली तरी खोली उथळ झाली आहे.
जागतिक मैत्री दिन हा खास तरुणाईचा उत्सव झाला आहे. ३० जुलैचा जागतिक मैत्री दिन फारसा गाजावाजा न होता पार पडतो, पण तरुणाई ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा मैत्री दिन अधिक उत्साहात साजरा करते. यावर्षी आज, ३ ऑगस्टला हा दिवस साजरा होतोय. मैत्री दिनाच्या दिवशी मित्र-मैत्रिणींना मैत्रीच्या बंधनाची जाणीव करून देण्यासाठी एकमेकांना फ्रेंडशिप बँड देणं, शुभेच्छा देणारी भेटकार्ड देणं अशी स्नेहपूर्ण परंपरा दिसून येते. जागतिक पातळीवर मैत्रीचा विचार करताना, हा दिवस हा केवळ नात्यांचा उत्सव न राहता, तो एक सामाजिक संदेश घेऊन येतो - तो म्हणजे, मैत्री हा एक सेतू आहे, जो माणसामाणसात आणि समाजासमाजात संवाद, सहिष्णुता आणि शांतता निर्माण करतो.
पण आज नेमकं होतंय असं की, एकीकडे एका क्लिकवर भेटणं होतंय, एका मेसेजवर बोलणं होतंय, पण दुसरीकडे हा परस्पर संवाद काहीसा खुंटतो आहे. नुसतं लाईक आणि ईमोजी टाकून भावनिक कोरडेपणा येतोय आणि नकळत एक प्रश्न मनात रुंजी घालतो. या डिजिटल जिंदगीत सोशल मीडियाने, इंटरनेटने मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली आहे का?
मैत्रीचं भावनिक बळ
मैत्री ही फक्त भावनिक चैन नाही, तर तिचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. एका अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात सच्चे मित्र असतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते, तणावाचं प्रमाण कमी होतं आणि आयुष्यमान वाढतं. कारण मैत्रीच्या नात्यातून मेंदूमध्ये ‘ऑक्सिटॉसिन’ आणि ‘डोपामिन’सारखी आनंददायक रसायनं स्रवत असतात. त्यामुळे आत्मियता, विश्वास आणि आनंदाची भावना निर्माण होते.
झटपट कनेक्टिव्हीटी
मात्र तंत्रज्ञानाच्या झपाट्याने मैत्रीची व्याख्या आणि व्याप्ती दोन्ही पालटली आहे. ऑर्कुटपासून सुरू झालेला प्रवास फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटपर्यंत आला. आता इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडीओ कॉल्स आणि सोशल मीडियामुळे मित्रांशी जोडणं क्षणार्धात शक्य आहे. मित्र-मैत्रीण कितीही लांब असले, तरी व्हॉट्सॲपवर एक मेसेज, झूमवर कॉल किंवा स्नॅपचॅटवर स्ट्रीक पाठवला की संपर्कात राहता येतं. भावना व्यक्त करण्यासाठी आता शब्दांपेक्षा इमोजी, मिम्स आणि व्हिडीओ कॉल्स जास्त बोलके ठरतात. मैत्रीतली ही झटपट कनेक्टिव्हिटी आणि नव्या प्रकारे व्यक्त होण्याची पद्धत यामुळे मित्रांचं जग जवळ आलंय, पण त्याच वेळी मैत्रीच्या खोलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
संपलेलं अंतर, वाढता संवाद
नव्या युगात मैत्रीचं रूपच बदललं आहे. पूर्वी प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री अशक्य वाटायची. मैत्री फुलायला भेटीगाठी, प्रत्यक्ष गप्पा या अनिवार्य होत्या. आता मात्र सोशल मीडियामुळे आपण कुठल्याही कोपऱ्यात असलो, तरी आपल्या मित्रांशी रोजच्या रोज संपर्कात राहू शकतो. अंतर संपलेलं आहे आणि संवाद अधिक सोपा झालाय. स्टेटस, स्टोरी यातून त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी थेट न सांगताही कळत असतात. शाळेतले जुने मित्र, जुने शेजारी कदाचित सोशल मीडिया नसता तर संपर्कात राहिले नसते. शाळा, कॉलेज, ऑफिस, जिम अशा विविध व्हॉट्सॲप ग्रुपमधून आता गप्पाटप्पा रंगतात. याशिवाय, मिम्स हे मैत्री-संवादाचं नवं माध्यम बनलं आहे. भावना व्यक्त करणं असो की नर्म विनोद किंवा टोमण्यांची कोपरखळी असो, पानभर शब्दांपेक्षा एक मिम पुरेसं ठरतं.
डिजिटल मैत्रीचं व्यापक वर्तुळ
डिजिटल मैत्रीने अशा अनेकांना व्यक्त होण्याची नवी संधी दिली आहे. अंतर्मुख स्वभावाचे किंवा प्रत्यक्ष समोर व्यक्त होण्यात संकोच वाटणारे लोकही आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. शिवाय, इंटरनेटमुळे विविध संस्कृती, भाषा, जगभरचे विचार आणि जगण्याच्या पद्धती यांचा परिचय होतो आणि त्यामुळे मैत्रीचं वर्तुळही विस्तारतं.
डिजिटल घोस्टिंग
डिजिटल जगात जशी मैत्रीची नवीन दालनं खुली झाली आहेत, तशा काही नव्या समस्यादेखील तयार झाल्या आहेत. कारण बऱ्याचदा प्रत्यक्ष न भेटता झालेली ऑनलाइन मैत्री वरवरची ठरण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, सोबत वेळ घालवतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडतात. आवडीनिवडी, स्वभाव समजतो. डिजिटल विश्वात मात्र बऱ्याचदा फक्त चांगलं तेच दाखवलं जात असतं. त्यामुळे स्क्रीनपल्याडची व्यक्ती खरी कशी आहे, याचा अंदाज येणं कठीण होतं. त्यामुळे काही वेळेस नंतर विसंवाद होऊ शकतो. अपेक्षा न जुळल्याने इंटरेस्ट कमी होतो आणि मग अचानक ‘घोस्टिंग’ म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता संवाद बंद केला जातो. यामुळे नैराश्य आणि गैरसमज होण्याची शक्यता अधिक असते.
फेक प्रोफाइल्सची फेक मैत्री
कधी कधी ही डिजिटल मैत्री खोटी निघते. फेक प्रोफाइल्समुळे खोटं व्यक्तिमत्त्व उभं केलं जातं आणि त्यातून आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर प्रकारही घडू शकतात. या पार्श्वभूमीवर, डिजिटल मैत्री पुन्हा नव्याने समजून घेण्याची गरज आहे.
प्रत्यक्ष भेटीला पर्याय नाही
मैत्री म्हणजे फक्त मेसेजच्या माध्यमातून कनेक्टेड राहणं नव्हे. मैत्रीत भावनिक जवळीक, पारदर्शकता आणि परस्पर आदर असतो. ती केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टेटस अपडेट्स किंवा रिप्लायवरून समजली जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्र-मैत्रिणींशी केवळ चॅटवर विसंबून न राहता, अधूनमधून फोन किंवा व्हिडीओ कॉल करावेत. ख्यालीखुशाली विचारावी, गप्पांचे फड रंगवावेत आणि अर्थातच प्रत्यक्ष भेटींचं स्थान अजूनही अतिशय महत्त्वाचं आहे. डिजिटल साधनं केवळ पूरक ठरावीत, पर्याय नसावीत, हे लक्षात घेणं गरजेचं. म्हणून ऑनलाइन मैत्रीतही काही मर्यादा ओळखणं आवश्यक आहे. प्रत्येकजण लगेच रिप्लाय करेलच असं नाही, प्रत्येक संवादात भरभरून भावना व्यक्त केल्याच पाहिजेत असं नाही. ‘शेअर-शेअर’चा खेळ न खेळता मनापासून संवाद साधणं हेच मैत्रीचं खरं रूप आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, व्यग्र दिनक्रमातून जरा वेळ बाजूला काढून आपल्या जीवलग मित्रांना प्रत्यक्ष भेटावं. जेव्हा सगळे मित्र एकत्र जमतील, तेव्हा मोबाईल बाजूला ठेवावा.
स्पर्श, सहवास, विश्वास
डिजिटल मैत्री अनेकदा तोंड दाखवण्यापुरतीच असते. आपण ज्या मित्राला-मैत्रिणीला ऑनलाइन ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणतो, त्याच्याशी प्रत्यक्षात अनेकदा महिनोन्महिने भेटही होत नाही. भावनिक संकटांच्या क्षणी त्यांचे फक्त फोटो असतात, पण खांदा द्यायला तो किंवा ती नसते. याउलट, एखादा जुना मित्र, मैत्रीण जे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात, पण प्रत्यक्ष भेटतात, तेच खरेखुरे सहकारी ठरतात. एकूणच या डिजिटल काळात मैत्रीची व्याख्या बदलली आहे, पण माणसाच्या गरजा बदललेल्या नाहीत. माणसाला अजूनही स्पर्श, सहवास, विश्वास आणि नजरेतून संवादाची गरज आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर करताना खऱ्या भेटी, एकत्र वेळ घालवणं आणि खऱ्या अर्थाने नातेसंबंध टिकवणं याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
एक क्लिकवर असलेली माणसं प्रत्यक्षही आपल्या आयुष्यात असतील यासाठी प्रयत्न करणं, हीच मैत्रीची खरी कसोटी ठरते.
जिगर के तुकडे
ब्रिटिश मानववंश शास्त्रज्ञ रॉबिन डनबार यांच्या सिद्धांतानुसार मेंदूतील निओकॉर्टेक्स या भागाचा आकार आणि आपण किती जटिल सामाजिक नातेसंबंध हाताळू शकतो याचा थेट संबंध असतो. परिणामी, मानवी मेंदूच्या आकारानुसार आपण सुमारे १५० स्थिर आणि अर्थपूर्ण नातेसंबंध जपण्यास सक्षम आहोत. डनबार यांच्या मते, आपल्या ओळखींच्या विविध पातळ्या असतात. आपल्याला अधूनमधून गाठभेट होणारे, थोडाफार संवाद असणारे सुमारे १००-१५० कॅज्युअल मित्र असू शकतात. त्यातून जरा अधिक ओळखीचे, अधिक संवाद साधणारे ३०-५० जण आपले मित्र ठरू शकतात. पुढे त्यातून १०-१५ जण असे असतात ज्यांना आपण ‘चांगले मित्र-मैत्रीण’ म्हणू शकतो. यांच्यासोबत विश्वासाचं नातं अधिक गडद झालेलं असतं आणि या सर्वांतून उरतात काही खास... अगदी कुटुंबासारखे ‘बेस्ट फ्रेंड्स’. डनबार यांच्या मते ही संख्या आहे जास्तीत जास्त पाच. या ‘जिगर के तुकडे’ बडीज्सोबत आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी, सुख-दु:ख, खेद-खंत, संघर्ष-स्वप्नं.. असं सारं काही शेअर करू शकतो.
विज्ञान लेखक व अंनिसचे कार्यकर्ते
jetjagdish@gmail.com