

विशेष
अक्षय वाटवे
१२ जून रोजी ज्यांचा २६ वा स्मृतिदिन होऊन गेला, त्या आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा चष्मा आजच्या डिजिटल जगावर लावून पाहिला, तर या आभासी दुनियेत वावरणाऱ्या नव्या 'वल्लींचा' एक अत्यंत रंजक आणि मिश्कील दस्तावेज आपल्याला पाहायला मिळेल.
तरुण पिढी बिघडली आहे,’ असं म्हणणं हा या जगातला सगळ्यात जुना आणि सोपा उद्योग आहे. प्रत्येक पिढीला आपल्या पुढच्या पिढीचं वागणं, बोलणं आणि जगणं थोडं अजबच वाटत असतं. आजच्या ‘इन्स्टंट संस्कृती’च्या, दहा-पंधरा सेकंदांच्या रील्सच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जमान्यात जर आपण आपल्या लाडक्या ‘पुलंच्या’ साहित्याचा चष्मा डोळ्यांवर चढवून पाहिलं, तर आजच्या काळातील माणसांचं एक वेगळंच, गमतीशीर रूप समोर येतं. पुलंनी त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ किंवा ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकांमधून तत्कालीन मध्यमवर्गीय मराठी माणसांचं जे जिवंत चित्रण केलं, ते केवळ त्या काळापुरतं मर्यादित नव्हतं. माणसाचा स्वभाव, त्याच्यातील विसंगती आणि त्याचा अहंकार हा काळ बदलला तरी बदलत नाही, फक्त त्याची माध्यमं बदलतात. आज भाई हयात असते, तर त्यांनी डिजिटल आणि आभासी जगात वावरणाऱ्या नव्या ‘वल्लींचा’ एक रंजक दस्तावेज नक्कीच तयार केला असता आणि आपल्याला पावलोपावली या नव्या वल्ली भेटल्या असत्या.
एकदा वसंत सबनीस यांनी पुलंची ओळख शरद तळवलकर यांच्याशी करून दिली, तेव्हा ‘तळवलकर’ हे नाव ऐकल्यावर पुलं मिश्कीलपणे म्हणाले होते की, हा माणूस नक्कीच सरळ असणार, कारण याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार नाही. आजच्या काळात मात्र माणसांची नावं आणि त्यांचे संवाद इतके सरळ राहिलेले नाहीत. आजचा माणूस ‘इमोजी, शॉर्टफॉर्म आणि तांत्रिक क्लिष्टतेच्या वळणावळणांच्या जगात जगत आहे. माणसांमधील हाच संवादाचा अभाव आणि स्वतःला सातत्याने सोशल मीडियावर ‘प्रोजेक्ट’ करण्याची धडपड आजच्या पिढीमध्ये दिसून येते. डिजिटल युगाने प्रत्येकाला मत मांडण्याचं व्यासपीठ दिलं असलं, तरी त्यासोबतच वैयक्तिक पातळीवर हिंस्त्र भाषेत चिखलफेक करणाऱ्या ‘ट्रोलर्स’ आणि ‘कीबोर्ड वॉरियर्स’ची विकृतीही जन्माला आली आहे. विचारस्वातंत्र्याचा हा गैरवापर आजकाल समोरच्याचा गळा दाबण्यासाठी आणि समाजात द्वेष पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असताना भाईंचे विचार आपल्याला एका दीपस्तंभासारखा मार्ग दाखवतात. भाई केवळ एक विनोदी लेखक नव्हते, तर ते समाजातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असणारे एक अत्यंत सजग आणि प्रगल्भ विचारवंत होते. त्यांनी एका पत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अत्यंत अचूक व्याख्या करताना लिहिलं होतं की, विचार-स्वातंत्र्य याचा अर्थ कुठल्याही ऐकीव माहितीवर विसंबून राळ उडवण्याचं स्वातंत्र्य नव्हे किंवा पुराव्याखेरीज आरोप करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. आजच्या फेसबुक, एक्स किंवा व्हॉट्सॲपवरील चर्चा पाहिल्या, तर भाईंचे हे शब्द किती तंतोतंत लागू होतात, याची प्रकर्षाने जाणीव होते.
पुलंच्या हजरजबाबीपणाची आणि राजकीय प्रगल्भतेची धार नेहमीच अचूक असायची. आणीबाणीच्या कालखंडानंतर झालेल्या निवडणुकांच्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची तुलना थेट भगवद्गीतेशी केली, तेव्हा पुलंनी जाहीर सभेत घेतलेला समाचार अत्यंत मार्मिक होता. ते म्हणाले होते की, “मी पुन्हा गीता उघडली, सुरुवातीलाच ‘संजय उवाच’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला. तत्कालीन राजकीय दडपशाहीवर बोलताना त्यांनी पुढे म्हटलं होतं की, गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही आणि आता म्हणतात, कंठ फुटला; ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही. हा प्रसंग दाखवतो की, भाईंनी नेहमीच सत्तेच्या आणि दडपशाहीच्या विरोधात जाऊन विचारस्वातंत्र्याची पाठराखण केली, पण त्याच वेळी त्यांनी वैचारिक गांभीर्य आणि सभ्यतेची मर्यादा कधीही ओलांडली नाही. आजच्या कीबोर्ड वॉरियर्सना भाईंनी हाच मोलाचा धडा दिला असता की, मतभेद असणं हे जिवंत समाजाचं लक्षण आहे, परंतु मतभेदांचं रूपांतर मनभेदात किंवा हिंसेत होऊ नये. समोरच्याला ट्रोल करून गप्प करण्यापेक्षा, त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याचं आणि लोकशाही मार्गाने आपलं मत मांडण्याचं मोठं काळीज आजच्या पिढीने ठेवणं गरजेचं आहे, हाच भाईंच्या विचारांचा गाभा आहे.
आज सोशल मीडियाचा विस्तार इतका झाला आहे की, फेसबुक पेजेस आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर मराठी साहित्याबद्दल सातत्याने चर्चा रंगताना दिसतात. ही खरोखरच आनंदाची बाब आहे, परंतु अनेकदा या चर्चा मूळ साहित्याचा आस्वाद घेण्यापेक्षा केवळ तांत्रिक व्याख्यांच्या कुंपणात अडकून पडतात. एखाद्या डिजिटल मंचावर जर पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा विषय निघाला, तर तिथे रसिकांचे दोन गट पडतात आणि पुलंचे साहित्य म्हणजे केवळ ललित वाङ्मय की कादंबरी? किंवा त्यांचे सादरीकरण म्हणजे ‘कथाकथन’ होते की ‘एकपात्री प्रयोग?’ अशा तांत्रिक व्याख्यांवरून कमेंट बॉक्समध्ये ‘स्वयंघोषित विद्वानांचे’ युद्ध सुरू होते. साहित्याकडे पाहण्याच्या या संकुचित दृष्टिकोनावर भाईंनी वामन इंगळे यांना लिहिलेल्या एका पत्रात स्पष्ट केलं होतं की, जे मी लिहिले ते वाचकांपुढे आहे, त्यातून ज्याला जो अर्थ काढायचा आहे त्याने तो अर्थ काढावा; तुमची जी काही फूटपट्टी असेल, तिनेच माझी उंची किंवा बुटकेपणा मोजण्याचा त्याला हक्क आहे. साहित्याचा मूळ उद्देश आनंद देणं आणि माणसाला संवेदनशील बनवणं हा असतो. परंतु, आजचा वाचक अनेकदा पूर्वग्रहांची आणि स्वतःच्या सिद्धांतांची फूटपट्टी घेऊन लेखकाची उंची मोजू पाहतो. आज सोशल मीडियावरील वाद घालणाऱ्यांना भाईंनी कदाचित याच शैलीत समजावलं असतं की, कोणाला चकोल्या आवडतात तर कोणाला वरणफळे, शेवटी पोट भरून आनंद मिळणं महत्त्वाचं असतं. पुलंच्या साहित्यातून मिळणारा निखळ आनंद बाजूला ठेवून, केवळ ते कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडते यावरून कमेंट बॉक्समध्ये वाद घालणं म्हणजे जेवणाचा आस्वाद सोडून भांड्याच्या आकारावर भांडण्यासारखं आहे.
आजच्या डिजिटल युगात ‘स्टँड-अप कॉमेडी’ या कलाप्रकाराला प्रचंड मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आजचा तरुण वर्ग यूट्यूब किंवा इन्स्टाग्रामवर हे प्रयोग अत्यंत आवडीने पाहतो, परंतु यातील अनेक प्रयोगांमध्ये संवादातील अश्लीलता, शिवराळपणा किंवा समोरच्या व्यक्तीला अथवा समुदायाला कमी लेखून टाळ्या मिळवण्याचा शॉर्टकट प्रकर्षाने जाणवतो. केवळ ‘शो व्हॅल्यू’ किंवा आचरटपणाचा वापर करून तात्पुरते हसवणं, हा आजच्या अनेक नवशिक्या विनोदवीरांचा मुख्य मार्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पुलंच्या विनोदशैलीचा अभ्यास करतो, तेव्हा विनोदाची एक अत्यंत प्रगल्भ आणि वेगळी बाजू समोर येते. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी पुलंच्या विनोदावर लिहिताना अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे की, पुलंचा विनोद हा केवळ वरवरचा किंवा निव्वळ हसवणारा नसून तो माणसाच्या ‘वेदनेच्या आणि दुःखाच्या’ गाभ्यापर्यंत पोहोचणारा आहे. पुलंच्या साहित्यात ज्या पात्राची आपण सुरुवातीला सगळ्यात जास्त चेष्टा करतो, शेवटी त्याच पात्राबद्दल आपल्या मनात एक अथांग सहानुभूती, अफाट प्रेम आणि कारुण्य निर्माण होते. ‘अंतु बर्वा’ किंवा ‘चितळे मास्तर’ ही पात्रं याची जिवंत उदाहरणे आहेत. पुलं हे स्वतःवरही तितक्याच सहजतेने विनोद करू शकत असत. दुसऱ्याची खिल्ली उडवणं सोपं असतं, पण स्वतःला आरशात पाहून स्वतःवर हसण्यासाठी प्रचंड धाडस आणि बुद्धिमत्ता लागते, जी पुलंकडे प्रकर्षाने होती. पुलंचा विनोद हा माणसाच्या रूपातील त्रुटींवर किंवा वैगुण्यांवर आघात करणारा नव्हता, तर तो माणसाच्या स्वभावातील सहजता टिपणारा होता. आजच्या नवशिक्या विनोदवीरांना भाईंनी हाच धडा दिला असता की, खरा आणि टिकणारा विनोद तोच असतो, जो समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू आणता आणता त्याच्या मनात मानवी स्वभावाबद्दल सहानुभूती निर्माण करतो.
आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि अल्गोरिदम आपलं जगणं नियंत्रित करत आहेत. तंत्रज्ञानाने आपल्याला जगभरातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली असली, तरी या सगळ्या गजबजाटात माणसांमधील प्रत्यक्ष संवाद आणि एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाण्याची सहजवृत्ती कुठेतरी आटत चालली आहे. पुलं हे कधीही कालबाह्य किंवा जुनाट विचारांचे नव्हते, त्यांनी नेहमीच आधुनिक विचारप्रवाहांचं स्वागत केलं. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाला त्यांनी नक्कीच विरोध केला नसता, उलट त्यांनी मिश्कीलपणे त्याचा स्वीकार केला असता; परंतु, तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसाने स्वतःमधील ‘माणूसपण’ विसरू नये, हाच त्यांचा मुख्य आग्रह राहिला असता. एकदा पुलंना एक सुंदर क्रॉकरी सेट भेट म्हणून मिळाला असताना सुनिताबाईंचा तो जपून ठेवण्याचा स्वभाव पाहून त्यांची भाची म्हणाली की, हा सेट फुटू नये म्हणून तू तो कधी वापरणारच नाहीस का? त्यावर जवळच बसलेले पुलं पटकन मिश्कीलपणे म्हणाले, हो तर, सुनीता मला कधी ऑमलेटसुद्धा करून देत नाही, अंडी फुटतील म्हणून. आजच्या डिजिटल युगातही हेच घडत आहे. आपण खूप महागडे स्मार्टफोन घरात आणले आहेत, पण उपकरणांच्या सुरक्षेत आणि व्हर्च्युअल जगात इतके गुंतलो आहोत की माणसांमधील प्रत्यक्ष सुसंवादच विसरून गेलो आहोत.
शेवटी तंत्रज्ञान आपल्याला माहिती देऊ शकते, पण जगण्याचा मूळ संस्कार आणि जिवंतपणा केवळ संवादातूनच मिळतो. पुलंच्या निधनानंतर अंत्यदर्शनासाठी मैलोन्मैल लांब लागलेल्या रांगा आणि पुण्यात एका रिक्षावाल्याने ज्येष्ठ साहित्यिकाला सोडल्यानंतर पैसे घेण्यास दिलेला नकार हे दर्शवतो की, पुलं सामान्य माणसाच्या किती जवळ होते. आजच्या वेगवान, धकाधकीच्या आणि स्क्रीनच्या जगात आपल्याला पुन्हा एकदा संवेदनशील बनवण्यासाठी, ऐकीव माहितीवर राळ उडवण्यापासून रोखण्यासाठी आणि आपल्यातील माणसाला जिवंत ठेवण्यासाठी ‘पुलं’ नावाच्या अमूल्य आणि आनंदयात्रीच्या विचारांची गरज कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील.
लेखक, अभिवाचक
akshay.watve@gmail.com