नको ती छडी आणि तिची छमछम

मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. मस्ती, मौजमजा या सगळ्याला उधाण आले आहे. अशा वेळी काही गोष्टींना अनिष्ट वळणही लागते. सध्याचे मार्केट इकॉनॉमीमध्ये मुलांचे हट्ट वाढले आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी मुळातून बदलल्या आहेत. अशा वेळी मुलांना शिस्त कशी लावायची, हा पालकांपुढचा यक्षप्रश्न आहे. यावर सध्या जागतिक मंथन देखील सुरू आहे.
नको ती छडी आणि तिची छमछम
Published on

दखल

श्याम तारे

मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. मस्ती, मौजमजा या सगळ्याला उधाण आले आहे. अशा वेळी काही गोष्टींना अनिष्ट वळणही लागते. सध्याचे मार्केट इकॉनॉमीमध्ये मुलांचे हट्ट वाढले आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी मुळातून बदलल्या आहेत. अशा वेळी मुलांना शिस्त कशी लावायची, हा पालकांपुढचा यक्षप्रश्न आहे. यावर सध्या जागतिक मंथन देखील सुरू आहे.

मुलांना शिस्त लावण्याचा परंपरागत मार्ग म्हणजे ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम...’ म्हणजेच दोन दणके देऊन मुलांना वठणीवर आणणे. पूर्वी शाळांमध्ये आणि घरातही मुलांना शिस्त मारण्यासाठी शिक्षा, कधी सौम्य तर कधी तीव्र स्वरूपाची मारहाण केली जाई. काही दशकांपूर्वी तर शाळेत जायचे म्हणजे शाळेत मार पडणारच अशी खूणगाठ बांधली जायची. याबद्दल पालकांकडेही तक्रार करून काही उपयोग नसायचा. कारण पालक आणखी दोन दणके देणार, हे ठरलेलं होतं.

पण काळ बदलत असतो. तसा तो बदलला आणि मुलांच्या हक्कांविषयी बोलले जाऊ लागले. इसवी सन १९७९ मध्ये स्वीडन या देशात एक लोकचळवळ सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत अथवा घरी कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देण्यात येऊ नये यासाठी ही लोकचळवळ होती. आज जगातील एकूण ६८ देशांनी यावर प्रतिबंध घातले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने देखील सर्व प्रकारच्या शारीरिक शिक्षेला हिंसाचार असं नाव देऊन ही प्रथा बंद करावी, असं सांगितलं आहे. हाच संदेश सर्व शैक्षणिक, वैद्यकीय, सार्वजनिक आरोग्य आणि मानवाधिकार अशा अनेक संघटनांनीही दिला आहे.

या बदलाची गती इसवी सन २००० च्या आसपास आणखी वाढली आणि काही आणखी देश यात समाविष्ट झाले. नेपाळमध्ये तर मुलांना अधिकारांच्या बाबतीत प्रौढ समजले गेले असून त्यांना इजा होण्यापासून वाचवायला हवे, असा संदेश दिला गेला आहे.

पूर्वी शालेय विद्यार्थ्यांना मार मिळत असे तो प्रामुख्याने गैरवागणुकीसाठी असायचा. ‘लालयेत पंच वर्षाणि, दश वर्षाणि ताडयेत्, प्राप्तेतु शोडषे वर्षे, पुत्रम् मित्र वदाचरेत्’ असं एक सुभाषित होतं. त्याप्रमाणे पहिला भाग होत असला तरी दुसरा आणि तिसरा भाग मात्र पूर्णपणे पालकांच्या मर्जीवर अवलंबून असायचा. आपल्यापैकी प्रत्येकाचे याबद्दल वेगवेगळे अनुभव असतीलच. परंतु याबद्दल विज्ञान नेमकं काय सांगतं? आणि ज्यांना असा मार मिळतो त्यांच्यात सरासरी काय बदल होतात, हाही एक प्रश्न आहेच.

अलीकडेच या प्रश्नाच्या संदर्भातही संशोधन सुरू असून संशोधनाच्या आधारे एक विश्लेषण करण्यात आलं आहे. या संशोधनात असं दिसून आलं की, शिक्षेचा मुलांवर प्रतिकूल परिणाम होत असून हानिकारक परिणामांची जोखीम वाढते. शाळेत अथवा घरी जितका अधिक मार खावा लागेल तितकी मुलं अधिक आक्रमक होतात. काही प्रसंगी असामाजिक देखील होऊ शकतात. मुलं आणि पालक यांच्यामध्ये प्रश्नचिन्हच अधिक असतात. सततच्या शिक्षेमुळे आकलन शक्ती कमी होण्याचे प्रकार घडू शकतात. या अभ्यासाच्या निष्कर्षामध्ये सातत्य दिसून येते. ९९ टक्के उदाहरणांमध्ये मुलांना मिळालेला मार आणि परिणामी वाढत जाणारे नकारात्मक गुण दिसून आले आहेत. या विषयावर होणाऱ्या संशोधनात ही बाब अनेक दशकं कायम राहिली आहे. मारहाणीची घटना काही काळ दबून राहते आणि एकाएकी उफाळून वर येऊ शकते, असेही दिसून आले आहे. अर्थातच मार दिल्यामुळे असे घडले हे बहुतांश पालकांना मान्य नसते. पण मुलांवर होणारे परिणाम हे मानसिक ताणतणावापासून ते मादक पदार्थांकडे आकर्षित होण्यापर्यंत असे व्यापक स्वरूपाचे असतात, असे संशोधनातून हाती आलेले निष्कर्ष सांगतात.

याउलट शाळेत अथवा घरी मुलांना मार दिल्यामुळे त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडला आहे, असा निष्कर्ष एकाही संशोधन प्रकल्पातून पुढे आलेला नाही.

पालकांनी काय करावे?

मुलांना शिस्त लावायची असेल तर पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या पाल्याच्या क्षमतेबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवू नका. कारण कदाचित तुमचा पाल्य योग्य रीतीने विकसित झाला नसेल तर त्याच्या दृष्टीने तुमची अपेक्षा खूप अधिक असू शकते. म्हणूनच शाळेत शिकवले जातेय ते मुलाला-मुलीला समजत नाहीए का? की तिच्या-त्याच्या मनात काही भीती ठाण मांडून बसली आहे का? याचा शोध घेऊन बघा. शिस्तीची पद्धत शिकवणारी असावी. ती सातत्याने सुरू ठेवता येईल, अशी असावी. वेळोवेळी याचे निष्कर्ष आणि पाल्यातील मानसिक बदल लक्षात घ्यावा.

आई-वडील हे दोन्ही पालक आपल्या कुटुंबाचे नेते असतात आणि चांगलं नेतृत्व भीती न घालता मुलांना अधिक सक्षम होण्याकडे घेऊन जातं. इतरांचं ऐकता तसंच मुलांचंही ऐका... त्यांच्याशी संवाद साधा. संवादातूनच मार्ग निघणार आहे. पाल्याला शिक्षा देणं म्हणजेच आपल्या विचारांवर ठाम राहणं. त्यामुळे संयम असू द्या. या निमित्ताने पाल्याला समजून घ्या, शिक्षा हे समस्येचं उत्तर नाही हे लक्षात घ्या.

विज्ञान लेखक

logo
marathi.freepressjournal.in