दिवाळी अंक २०२६ : दिवाळीची नवलकथा!

यंदा दिवाळीत फक्त फटाके वाजवायचे नाहीत, तर डोक्यात प्रश्नांचे फटाकेही फोडायचे आहेत ! आकाशकंदील कोणी शोधला ? दिवाळी अंकांची सुरुवात कशी झाली ? फराळाचे पदार्थ आले कुठून? चला, शोधूया या सगळ्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं !
दिवाळी अंक २०२६ : दिवाळीची नवलकथा!
दिवाळी अंक २०२६ : दिवाळीची नवलकथा!
Published on: 

सोनाली कोलारकर-सोनार

यंदा दिवाळीत फक्त फटाके वाजवायचे नाहीत, तर डोक्यात प्रश्नांचे फटाकेही फोडायचे आहेत ! आकाशकंदील कोणी शोधला ? दिवाळी अंकांची सुरुवात कशी झाली ? फराळाचे पदार्थ आले कुठून? चला, शोधूया या सगळ्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं !

'दिवाळी, दसरा आणि हात-पाय पसरा !' असं मजेत आपण म्हणतोच की नाही? मग काय बच्चेकंपनी, परीक्षा संपली, आता सुट्टीची मजा लुटायला तयार आहात ना? मस्त ! तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, किल्ले, आकाशकंदील, रांगोळी आणि भरपूर धमाल ! पण या सगळ्यांमागे काही मजेशीर गोष्टी आणि रंजक इतिहासही दडलेला आहे. चला तर मग, यंदाच्या दिवाळीत केवळ आनंदच लुटू नका, तर काही नवलकथाही जाणून घेऊया !

सर्वप्रथम अभ्यंगस्नानाची तयारी झाली की नाही? अंघोळ करताना आपला शाम्पू आणि चम्पू करायला विसरू नका बरं का ! कारण शाम्पूचा शोध आपल्या देशातील माणसाने लावला, हे आपण याआधी पाहिलंच आहे. दिवाळीचा सण भारतभर वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. दक्षिण भारतात काही ठिकाणी डोंगरांवर किंवा मंदिरांमध्ये पणत्या लावल्या जातात आणि रात्रभर भजन-कीर्तन केले जाते. बंगालमध्ये कालीमातेची पूजा होते, तर आंध्र प्रदेशात नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. दिवाळीची नावेदेखील किती वेगवेगळी आहेत माहिती आहे? दीपावली, दिवाळी, यक्षरात्री, दीपप्रतिपदुत्सव, सुखरात्री, दीपमालिका अशी अनेक नावे या सणाशी जोडली गेली आहेत. भारताबरोबरच परदेशातही अनेक देशांमध्ये आणि विविध धर्मांमध्ये दिवाळी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते.

आता सांगा बरं, आकाशकंदील कोणी शोधला असेल? आकाशकंदील लावण्याची परंपरा फार प्राचीन असल्याचे सांगितले जाते. पूर्वी मातीच्या भांड्यांमध्ये पणती ठेवून ती उंचावर टांगण्याची पद्धत होती, असा उल्लेख आढळतो. मात्र, आज आपण पाहतो तसे 'स्काय लॅटर्न्स' म्हणजेच आकाशात सोडले जाणारे कंदील चीनमध्ये प्रसिद्ध झाले. तिसऱ्या शतकात चीनचे सेनानी आणि इतिहासकार झुगे लिआंग यांनी अशा आकाशदिव्यांचा वापर केल्याची नोंद आहे. म्हणजेच आकाशात तरंगणाऱ्या दिव्यांची कल्पनाही किती जुनी आहे, नाही का?

दिवाळी म्हटलं की मराठी माणसाला आठवतात ते दिवाळी अंक ! गोष्टी, कविता, विनोद, लेख, चित्रे आणि नवनवीन विचारांनी सजलेले दिवाळी अंक म्हणजे वाचनाची एक वेगळीच मेजवानी. मराठी दिवाळी अंकांची परंपरा सुरू करण्याचे श्रेय का. र. मित्र यांच्या 'मनोरंजन' या मासिकाला दिले जाते. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या या मासिकाचे दिवाळी अंक तब्बल दोनशे पानांहून अधिक असत. त्या काळातही त्यात भरपूर जाहिराती असत, हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? मुलांसाठीही 'आनंद' यांसारखी मासिके प्रसिद्ध होत होती. बा. रा. मोडक यांनी १९२७ मध्ये 'मुलांचे मासिक' सुरू केले. मुलांसाठीच्या वाचनसंस्कृतीला चालना देणारी ही परंपरा आजही महत्त्वाची आहे.

दिवाळीत मातीचा किल्ला तयार करायला तुम्हाला खूप आवडतं ना? मग त्यावर मावळे, तोफा, गड-किल्ले आणि छानशी सजावटही करता. काही जणांना फुले, पाने, दगड, वाळू आणि रंगीत पावडर वापरून पारंपरिक रांगोळी काढायला आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का, चित्रे काढण्याची आणि विविध आकृत्या तयार करण्याची आवड माणसाला अगदी प्राचीन काळापासून आहे. गुहांमध्ये राहणाऱ्या आपल्या पूर्वजांनीही गुहेच्या भिंतींवर चित्रे काढली होती. निसर्गातील रंग, आकार आणि वस्तू यांच्यापासून प्रेरणा घेऊनच पुढे अनेक कलांचा विकास झाला.

दिवाळीचा आनंद केवळ भारतापुरता मर्यादित नाही. नेपाळमध्ये दिवाळीला 'तिहार' म्हणतात. इंग्लंड, अमेरिका आणि जगातील अनेक देशांमध्ये भारतीय समुदाय मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतो. कुठे दिव्यांची रोषणाई, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम, तर कुठे पारंपरिक पूजा आणि फराळाची मेजवानी असते.

तर बच्चेकंपनी, यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत भरपूर खेळा, वाचा, फिरा आणि निसर्गाचा आनंद घ्या. मात्र, फटाक्यांचा अतिरेक टाळा, ध्वनिप्रदूषण करू नका आणि पर्यावरणाची काळजी घ्या. दिवाळीचा खरा आनंद प्रकाशात, प्रेमात आणि एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांत असतो.

आणि हो, दिवाळीत आपण यथेच्छ फराळावर ताव मारतो. चकली, लाडू, करंजी, शंकरपाळे, चिवडा असे एक ना अनेक पदार्थ ! पण हे पदार्थ तयार करण्याची कल्पना कोणाला सुचली असेल? त्यांचा इतिहास काय असेल? कोणता पदार्थ किती जुना असेल? हे प्रश्न पडले तर त्यांची उत्तरं शोधायला काय हरकत आहे? चला तर मग, नवलनगरीच्या या सफरीत दिवाळीच्या पदार्थांमागची रहस्यं शोधूया आणि ज्ञानाबरोबरच फराळाचाही मनसोक्त आनंद लुटूया !

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com