

क्रांती गोडबोले पाटील
कॅमेऱ्यासमोरचं प्रत्येक हसू खरं असतं का? प्रत्येक प्रेमळ स्पर्शामागे प्रेमच असतं का? जगाला सुखी दिसण्यासाठी माणसं स्वतःच्या आयुष्यात किती खोटेपणा पेरू शकतात? काही मुखवटे चेहऱ्यावर नसतात, ते नात्यांवर चढवलेले असतात आणि जेव्हा हे मुखवटे गळून पडतात, तेव्हा समोर येणारं वास्तव काळजाचा थरकाप उडवणारं असतं...
“अरे यश, तो उजव्या बाजूचा लाइट जरा डावीकडे सरकव ना रे बाबा! माझ्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स दिसतायत आणि प्लीज, तो रागीट चेहरा जरा कपाटात कुलूप लावून ठेवशील? पाच मिनिटांत लाइव्ह जायचंय आपल्याला.” रिया मोबाईलच्या स्क्रीनमध्ये स्वतःचा चेहरा न्याहाळत चिडून म्हणाली. तिच्या आवाजात नेहमीपेक्षा जास्त धार होती. काही क्षणांपूर्वीच झालेल्या वादाची कडवटता अजूनही खोलीत तरंगत होती.
यशने एक मोठा सुस्कारा सोडला. ट्रायपॉड सरकवताना त्याच्या हाताला झटका बसला आणि खोलीतल्या महागड्या पडद्यावर एक सावली नाचून गेली.
“रिया, रोजचा हाच वैताग आहे यार. आज सुटी घेऊयात ना? डोकं फाटतंय माझं. काल रात्रीपासून आपण नीट बोललेलोही नाही. साधं एकत्र बसून पाणी प्यायलो नाही आपण,” यशने आपली थकलेली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
“सुटी? आर यू आऊट ऑफ युअर माइंड, यश?”
रिया जागेवरून जवळजवळ उडालीच. तिने हातातला आयशॅडोचा ब्रश जोरात टेबलवर आपटला.
“आज ‘कपल गोल्स’च्या ब्रँड कोलॅबोरेशनचा मुख्य व्हिडीओ आहे. पन्नास हजार रुपये ॲडव्हान्स घेतलाय मी आणि मुख्य म्हणजे, आपले फॉलोअर्स वाट पाहत आहेत. इन्स्टाग्रामवर आज पोस्ट नाही पडली, तर आपला एंगेजमेंट रेट रसातळाला जाईल. कपाळातलं दुखणं बाजूला ठेव आणि ते ‘इन्स्टा-परफेक्ट’ हसू चेहऱ्यावर आण. क्विक!”
तिने स्क्रीनवरचं ‘गो लाइव्ह’ बटण दाबलं आणि अवघ्या एका सेकंदात तिच्या चेहऱ्यावरचा सगळा ताण नाहीसा झाला. त्याची जागा एका स्वर्गीय, लख्ख आणि अत्यंत सोज्वळ हास्याने घेतली.
“हॅलो माय ब्युटिफुल फॅमिली! कसे आहात सगळे? बघा, आज तुमचा लाडका यश तुमच्यासाठी काय खास घेऊन आलाय...”
रियाचा आवाज मधाहूनही गोड झाला होता. जणू काही क्षणांपूर्वी खोलीत झालेलं भांडण दुसऱ्याच कुठल्या तरी जगात घडलं होतं. यशनेही चेहऱ्यावर एक खोटं, रुबाबदार हसू चढवलं आणि कॅमेऱ्याकडे पाहून हात हलवला. त्याने रियाच्या कमरेभोवती हात टाकला. तो स्पर्श अगदी परका, थंड आणि औपचारिक होता; पण कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये तो अत्यंत रोमँटिक आणि जिव्हाळ्याचा दिसत होता.
स्क्रीनवर लाइक्स आणि हार्ट्सचा पाऊस पडू लागला. ‘क्यूट कपल’, ‘मेड फॉर ईच अदर’, ‘माय फेव्हरेट’ अशा हजारो कमेंट्सचा पूर आला.
रिया आणि यश हे सोशल मीडियावरील एक अत्यंत लोकप्रिय ‘इन्फ्लुएन्सर जोडपं’ होतं. इन्स्टाग्रामवर त्यांचे दोन मिलियनहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांची ओळख होती ‘द परफेक्ट कपल’. ते कुठल्या हॉटेलमध्ये जेवतात, कोणते कपडे घालतात, एकमेकांना वाढदिवसाला कोणती सरप्राइज गिफ्ट देतात, यावर लाखो तरुण-तरुणी जीव ओवाळून टाकायचे. त्यांच्या प्रत्येक रीलला लाखो व्ह्यूज मिळायचे आणि लोक त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याची स्वप्नं पाहायचे.
पण या चकचकाटामागचं वास्तव अगदी वेगळं होतं. कॅमेऱ्याच्या त्या नऊ बाय सोळाच्या फ्रेमबाहेरचं त्यांचं जग पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. नात्याची वीण उसवली होती आणि एकमेकांसाठी जगणाऱ्या दोन माणसांच्या आयुष्यात आता एकमेकांसाठी जागाच उरली नव्हती.
लाइव्ह संपलं आणि रियाने फोन बाजूला ठेवला. तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू क्षणात नाहीसं झालं. तिने यशचा हात स्वतःच्या कमरेवरून झटकून टाकला, जणू काही एखादा नको असलेला कीटक अंगावर बसला होता.
“परफॉर्मन्स चांगला होता. पण पुढच्या वेळी कॅमेऱ्याकडे बघून जरा जास्त इमोशन दाखवत जा. अगदी लाकडासारखा उभा होतास. लोकांना डाऊट येईल,” रियाने पाण्याच्या बॉटलमधून घोट घेत म्हटलं.
“परफॉर्मन्स?”
यशचा आवाज चढला.
“रिया, आपण नवरा-बायको आहोत की एखाद्या थिएटर कंपनीतले को-ॲक्टर्स? आपण शेवटचं एकमेकांशी मनापासून कधी बोललो होतो, आठवतंय का तुला? कॅमेरा बंद असतो तेव्हा तू माझ्याकडे साधं बघतसुद्धा नाहीस. आपल्या घरात संवाद नाही, फक्त ‘कंटेंट’ उरलाय.”
“ओह, प्लीज! हा सेंटिमेंटल ड्रामा बंद कर,” रिया वैतागून म्हणाली. “याच ‘परफॉर्मन्स’मुळे या आलिशान फ्लॅटचं भाडं निघतंय, हे विसरू नकोस. तुझ्या त्या साध्या नोकरीच्या पगारात मॉलमध्ये फिरणं आणि महागड्या गाड्यांमधून फिरणं शक्य होतं का? आज आपण जे काही आहोत, ते या लाइक्स आणि व्ह्यूजमुळे आहोत. लोकांचा आपल्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास विकूनच आपलं घर चालतं.”
यश शांत झाला. तिच्या बोलण्यात तथ्य होतं; पण त्या तथ्यामागे दडलेली कटू वस्तुस्थिती किती विषारी होती, हे फक्त त्यालाच ठाऊक होतं.
दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं, तेव्हा ते एक सामान्य मध्यमवर्गीय जोडपं होतं. मग रियाने व्लॉगिंग सुरू केलं. हळूहळू त्यांना प्रसिद्धी मिळाली, पैसा आला, मोठमोठे ब्रँड्स मिळाले आणि त्यासोबत आलं एक न संपणारं दडपण- सतत परफेक्ट दिसण्याचं!
त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आता ‘कंटेंट’ झाली होती. सकाळी उठल्यावर मिळणारा चहा हा प्रेमाचा चहा राहिला नव्हता, तर ‘मॉर्निंग रूटीन व्लॉग’चा एक भाग झाला होता. यशने रियाला दिलेली साडी ही प्रेमाची भेट नव्हती, तर एका कपड्यांच्या ब्रँडचं प्रमोशन होतं. अगदी त्यांच्यात होणारी घरगुती भांडणंसुद्धा ‘प्रँक व्हिडीओ’ म्हणून कॅश केली जात होती.
एके दिवशी यश ऑफिसमधून प्रचंड थकून घरी आला. त्याला खूप ताप होता. तो बेडवर अंगावर ब्लँकेट घेऊन पडला होता. रिया रूममध्ये आली; पण तिच्या हातात थर्मामीटर किंवा औषध नव्हतं, तर आयफोन होता.
“यश, जरा इकडे बघ ना. प्लीज, चेहऱ्यावरचा तो थकलेला लूक तसाच ठेव. मी एक छोटासा व्हिडीओ बनवते- ‘व्हेन हजबंड इज सिक, वाइफ्स केअर’. खूप छान व्ह्यूज मिळतील. लोक हळहळतील,” तिने लाइट सेट करत म्हटलं.
यशने डोळे मिटून घेतले. त्याच्या डोळ्यांतून एक तप्त अश्रू ओघळला.
“रिया, मला ताप आलाय. मला कॅमेरा नकोय, मला तुझा हात हवाय. मला तुझा वेळ हवाय.”
“अरे बाबा, हो ना! दोन मिनिटांचाच तर व्हिडीओ आहे. हा घे, सूपचा बाऊल हातात धर आणि मी चमच्याने भरवताना कॅमेऱ्याकडे प्रेमाने बघ.”
रियाने त्याच्या वेदनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कॅमेरा ऑन केला.
त्या रात्री यशला पहिल्यांदाच प्रकर्षाने जाणवलं की, तो ज्या नात्याला आयुष्य समजत होता, तिथे आता त्याच्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्याच्या वेदनेपेक्षा त्याच्या वेदनांचा व्हिडीओ रियासाठी अधिक महत्त्वाचा झाला होता. रिया आता त्याची बायको राहिली नव्हती; ती एक ‘कंटेंट क्रिएटर’ झाली होती आणि तो तिच्या व्हिडीओमधला केवळ एक जिवंत ‘प्रॉप’ बनून राहिला होता.
दिवस जात होते आणि त्यांच्यातलं अंतर एका मोठ्या दरीसारखं वाढत होतं. यश आता रियासोबत एकाच घरात राहूनही गुदमरू लागला होता. तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू लागला. कधी कधी एकटाच गाडी चालवत दूरवर निघून जायचा. सोशल मीडियावर मात्र त्यांचे रोमँटिक व्हिडीओ नेहमीप्रमाणे वेळेवर शेड्यूल होऊन पोस्ट होत होते. जुने व्हिडीओ एडिट करून, प्री-रेकॉर्डेड फुटेज वापरून रिया जगभराला फसवत होती की त्यांचं आयुष्य किती सुखी आहे.
एकदा एका आंतरराष्ट्रीय ज्वेलरी ब्रँडने त्यांना त्यांच्या नवीन ‘ॲनिव्हर्सरी कलेक्शन’साठी साइन केलं. यासाठी त्यांना गोव्यातील एका महागड्या रिसॉर्टमध्ये जाऊन शूट करायचं होतं. डील खूप मोठी होती- जवळपास पाच लाख रुपये आणि पुढील दोन वर्षांसाठीचे कॅम्पेन्स.
गोव्यातल्या त्या आलिशान रिसॉर्टच्या रूममध्ये दोघं पोहोचले. बाहेर समुद्राच्या लाटांचा सुंदर आवाज येत होता; पण त्या बंद खोलीत कमालीची आणि भयानक शांतता पसरली होती.
“उद्या सकाळी सहा वाजता बीचवर शूट आहे. सनराइजचा शॉट घ्यायचाय. तू वेळेवर तयार राहा. कपडे मी आधीच इस्त्री करून ठेवलेत,” रियाने लॅपटॉपवर ब्रँडच्या गाइडलाइन्स वाचत सांगितलं.
यश बाल्कनीत उभा राहून समुद्राच्या अंधाऱ्या लाटांकडे पाहत होता. त्याने मागे वळून रियाकडे पाहिलं.
“रिया, आता हे सगळं थांबवायची वेळ आली आहे. आपण हे डील करूयात आणि यानंतर हे इन्फ्लुएन्सरचं आयुष्य सोडून देऊयात. आपण पुन्हा आधीसारखं जगूयात. मला माझं साधं आयुष्य हवंय. मला तू हवी आहेस. प्लीज, माझ्यासाठी एवढं कर.”
रियाने लॅपटॉपची स्क्रीन जोरात बंद केली. तिच्या डोळ्यांत एक क्रूर आणि स्वार्थी चमक होती.
“यश, तू वेडा झाला आहेस. हे साम्राज्य उभं करण्यासाठी मी माझं रक्त आटवलंय. दिवस-रात्र एक केली आहे. मी हे प्रसिद्धीचं जग कधीच सोडणार नाही आणि जर तुला प्रॉब्लेम असेल, तर तू मला सोडून जाऊ शकतोस. पण लक्षात ठेव, जर तू मला सोडलंस आणि घटस्फोटाचा विचार केलास, तर मी सोशल मीडियावर जाहीर करेन की तू माझ्यावर घरगुती हिंसाचार केलास. माझे दोन मिलियन फॉलोअर्स तुझं जगणं कठीण करून टाकतील. एका मिनिटात तुझी नोकरी आणि तुझी इमेज उद्ध्वस्त करेन!”
यश स्तब्ध झाला. ज्या मुलीवर त्याने जिवापाड प्रेम केलं होतं, ती आज स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ब्लॅकमेल करत होती. सोशल मीडियाच्या आभासी जगात स्वतःची प्रतिमा टिकवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकत होती. स्वतःचं सत्य लपवण्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचीही तिची तयारी होती.
त्या रात्री यशच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरू होती. रियाच्या धमकीने त्याच्या मनात संताप, असहाय्यता आणि निराशेचं वादळ उठलं. त्याच्या मनात एक भयंकर, हिंसक विचार आकार घेऊ लागला. जर रियाला फक्त ‘कंटेंट’ आणि ‘सिम्पथी’ हवी असेल, तर तिला ती मिळायलाच हवी, असं त्याने मनाशी ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बीचवर कमालीची शांतता होती. समुद्रावरून गार वारे वाहत होते आणि सर्वत्र धुकं पसरलं होतं. कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला होता आणि त्याचा टाइमर लावलेला होता. रिया नेहमीप्रमाणे एका सुंदर पांढऱ्या मॅक्सी ड्रेसमध्ये परफेक्ट तयार होती. यशही तिथे शांत चेहऱ्याने आला.
“चल, यश. हा शॉट असा घ्यायचाय की आपण एकमेकांचा हात धरून समुद्राच्या दिशेने चाललोय. मग लाट जवळ आल्यावर तू मला मिठी मारणार,” रियाने शॉट समजावून सांगितला.
“हो, नक्कीच. आजचा व्हिडीओ खूप स्पेशल असेल, रिया. इतका स्पेशल की आपले फॉलोअर्स तो कधीच विसरणार नाहीत.”
यशच्या आवाजात एक वेगळीच, काळजाचा थरकाप उडवणारी शांतता होती. मात्र, रियाला त्यामागचा अर्थ समजला नाही.
कॅमेरा सुरू झाला आणि त्यावरील ‘रेकॉर्डिंग’चा लाल दिवा लुकलुकू लागला. दोघं एकमेकांचा हात धरून चालत होते. समुद्राच्या थंड लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करत होत्या. ठरल्याप्रमाणे यशने रियाला जवळ घेतलं. तिने कॅमेऱ्याकडे पाहून एक सुंदर, ग्लॅमरस हसू दिलं.
पण अचानक यशची पकड घट्ट झाली. त्याने रियाचे दोन्ही हात पाठीमागे जोरात पकडले.
“यश... काय करतोयस? हे स्क्रिप्टमध्ये नाहीये. हात सोड माझा, दुखतंय मला!” रिया कुरकुरली. मात्र, कॅमेऱ्याकडे पाहून तिने आपलं हसू कायम ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
“रिया, तुला लाइक्स हवेत ना? सिम्पथी हवीये ना? आज आपण आपल्या फॉलोअर्सना सर्वात रिअल कंटेंट देऊयात.”
यश तिच्या कानात कुजबुजला. त्याचा आवाज बर्फासारखा थंड आणि धारदार होता.
रियाच्या पोटात भीतीचा मोठा गोळा आला. तिने यशच्या डोळ्यांत पाहिलं. तिथे आता तिचा प्रेमळ यशू नव्हता. तिथे होता फक्त एक अथांग आणि हिंसक अंधार.
यशने तिला ओढत समुद्राच्या खोल पाण्याकडे नेण्यास सुरुवात केली. रिया ओरडण्याचा प्रयत्न करत होती; पण लाटांचा अक्राळविक्राळ आवाज तिच्या आवाजापेक्षा कितीतरी मोठा होता. ती सुटण्यासाठी धडपडत होती. पाण्याचा मारा तिच्या चेहऱ्यावर होत होता; पण यशची ताकद तिच्यापेक्षा खूप जास्त होती.
लाटा त्यांच्या छातीपर्यंत आल्या. रियाने दूर किनाऱ्यावर असलेल्या ट्रायपॉडवरील कॅमेऱ्याकडे शेवटच्या आशेने पाहिलं. तोच कॅमेरा, ज्याला तिने संपूर्ण आयुष्य देवासारखं पूजलं होतं, आज तिच्या मृत्यूचा साक्षीदार बनला होता. तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण टिपणारा तो कॅमेरा आज तिचे शेवटचे क्षण टिपत होता.
“यश, प्लीज... मला माफ कर... मला नकोत लाइक्स... मला जगायचंय!”
रिया रडत, ओरडत पाण्याचा घोट घेत म्हणाली.
“खूप उशीर झालाय, रिया. सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला आता काहीतरी नवीन आणि सस्पेन्स हवंय.”
यश क्रूरपणे हसला आणि एका मोठ्या लाटेने त्या दोघांना आपल्या कवेत घेतलं. यशने रियाला पाण्याखाली जोरात दाबून धरलं. तिची हातापायांची धडपड हळूहळू शांत झाली. समुद्राच्या खारट पाण्याने तिच्या चेहऱ्यावरचा महागडा मेकअप आणि आयुष्यभर जपलेला खोटेपणाचा मुखवटा दोन्ही एका झटक्यात धुवून टाकले.
दोन दिवसांनंतर तो मोबाईल आणि कॅमेरा गोव्याच्या पोलिसांच्या हाती लागला. बीचवर घडलेली ती संपूर्ण घटना कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली होती. यशचा मृतदेहही काही अंतरावर किनाऱ्याला लागला होता. त्याने रियाला संपवल्यानंतर स्वतःचाही जीव घेतला होता. तो व्हिडीओ तपासादरम्यान पोलीस ठाण्यातून कोणीतरी इंटरनेटवर लीक केला.
सोशल मीडियावर जणू मोठा भूकंप झाला. ज्या ‘इन्फ्लुएन्सर कपल’च्या सुखी संसाराचे लोक दाखले देत होते, ज्यांच्यासारखं आयुष्य जगण्याची स्वप्नं पाहत होते आणि ज्यांच्यावर रील्स बनवत होते, त्यांच्या आयुष्याचा असा भयंकर आणि थरारक शेवट झाला होता.
त्यांच्या त्या शेवटच्या व्हिडीओवर अब्जावधी व्ह्यूज आले आणि कोट्यवधी कमेंट्सचा पाऊस पडला. रियाला जे हवं होतं, ते अखेर तिला मिळालं होतं. ज्या प्रसिद्धीसाठी तिने आपलं नातं, भावना आणि माणुसकी पणाला लावली होती, ती प्रसिद्धी तिला मिळाली; पण ती प्रसिद्धी पाहण्यासाठी रिया स्वतः मात्र या जगात नव्हती.
कधी काळी त्यांच्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणावर हार्ट्सचा वर्षाव करणाऱ्या स्क्रीनवर आता त्यांच्याच मृत्यूचे व्हिडीओ झळकत होते. लाखो लोक तो व्हिडीओ पाहत होते, कमेंट्स करत होते, एकमेकांना शेअर करत होते. मात्र, त्या दोन मिलियन फॉलोअर्सपैकी कुणालाही त्यांच्या आयुष्यात नेमकं काय हरवलं होतं, याची जाणीव झाली होती का? फॉलोअर्सच्या गर्दीत दोन माणसं मात्र कायमची हरवली.
कारण कॅमेऱ्यासमोरचं हसू खरं असतंच असं नाही आणि हजारो लोकांच्या गर्दीतही माणूस मनाने एकटा असू शकतो. जगाला आपलं सुख दाखवण्याच्या नादात आपण आपलं खरंखुरं आयुष्यच जगायचं विसरतो आहोत का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.
शेवटी एकच सत्य उरलं होतं- स्क्रीनवरचे हार्ट्स लाखोंच्या संख्येने मिळू शकतात; पण आयुष्यातल्या एखाद्या माणसाचं खरंखुरं प्रेम आणि सोबत विकत घेता येत नाही.