दिवाळी अंक २०२६ : फराळाचा फ्लॅशबॅक

पूर्वी दिवाळीची चाहूल कॅलेंडरवरच्या तारखांवरून नाही, तर घरातल्या पितळी डब्यांच्या घासाघाशीवरून लागायची. चिंचेने डबे लखलखीत व्हायचे, उन्हात वाळायचे आणि मग त्यात फराळाची साग्रसंगीत बेगमी व्हायची. चिवडा, चकली, कडबोळी, लाडू, करंज्या... प्रत्येक पदार्थाची एक खासियत आणि प्रत्येक घासामागे एक आठवण ! आता डबे आहेत, फराळही आहे; पण त्या चवी घडवणारी माणसं आणि तो उत्साह मात्र हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे.
दिवाळी अंक २०२६ : फराळाचा फ्लॅशबॅक
दिवाळी अंक २०२६ : फराळाचा फ्लॅशबॅक
Published on: 

प्रसाद कुळकर्णी

पूर्वी दिवाळीची चाहूल कॅलेंडरवरच्या तारखांवरून नाही, तर घरातल्या पितळी डब्यांच्या घासाघाशीवरून लागायची. चिंचेने डबे लखलखीत व्हायचे, उन्हात वाळायचे आणि मग त्यात फराळाची साग्रसंगीत बेगमी व्हायची. चिवडा, चकली, कडबोळी, लाडू, करंज्या... प्रत्येक पदार्थाची एक खासियत आणि प्रत्येक घासामागे एक आठवण! आता डबे आहेत, फराळही आहे; पण त्या चवी घडवणारी माणसं आणि तो उत्साह मात्र हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे.

कोणे एकेकाळी, दिवाळी जवळ आली की घरोघरी साग्रसंगीत फराळ बनायला आरंभ व्हायचा. वरच्या फळीवरचे पितळी डबे चिंचेने चकचकीत घासून उन्हात सुकत ठेवले जायचे, फराळाच्या बेगमीसाठी... पूर्वी बेगमी करण्याएवढा फराळ बनायचा, खरंच सांगतोय. तर बेगमीसाठी आणि या डब्यांची झाकणं घट्ट असायची, त्यामुळे फराळाचे पदार्थ ताजे राहायचे. तर अशा दोन कारणांनी पितळेचे डबे वापरले जायचे.

प्रत्येक घराची आपापली फराळाची एक चव असे. कुणाचे बेसन लाडू मस्त, तर कुणाची करंजी सुबक, कुणाचे शंकरपाळे खुसखुशीत तर कुणाचे अनारसे स्वादिष्ट. आमच्या घरची बाकरवडी स्पेशल असे.

आता फराळातला चिवडा हा पदार्थ त्यात भरपूर शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे तुकडे यांनी भरलेला आणि डबा उघडताच कढीपत्त्याचा जीभ चाळवणारा खमंग गंध येणारा हवा. चमच्याने वगैरे चिवडा खाण्याचे नखरे तेव्हा नव्हते. एका हाताने चिवड्याचा बकाणा भरायचा आणि दुसऱ्या हाताने चहाचा घोट. चिवड्यात काजू वगैरे श्रीमंत मंडळी तेव्हा फारशी सहभागी होत नव्हती, किंबहुना चिवडाप्रेमींना त्यांची जरुरीही वाटत नव्हती. पुढे पुढे तर काजू, बेदाणे, काळ्या मनुका असं काय काय चिवड्यात कॉबलं जाऊ लागलं, यामुळे चिवड्याचा तिखट गुण जाऊन तो गोडसर झाला आणि यामुळे अस्सल चिवडाबाज जरासा व्यथित झाला.

चकली किवा कडबोळी हा प्रकार एक तर खुसखुशीत हवा किंवा चिवट. छान आसनमांडी घालायची, खुसखुशीत चकलीचं चक्र डाव्या हातात धरायचं, उजव्या हाताने चकलीचा तुकडा मोडायचा, चहात बुडवायचा आणि जिभेवर ठेवायचा. चहा-चकलीचा संयोग इतका मस्त लागतो की काय सांगू...

तशीच कडबोळी. चकली काटेदार तशी कृश प्रकृतीची, पण खमंग तर कडबोळी अंगाने तुळतुळीत गडद काळसर तपकिरी आणि बाळसेदार. तिच्यासोबत चहा नसला तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्याचा तुकडा हवा. मऊ चिवटसर कडबोळीचा तुकडा दातांनी मोडायचा आणि लगेच ओल्या खोबऱ्याचा लहानसा तुकडा खायचा. हे कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं ना. आमच्याकडे चिक्की गुळ घालून चकली कडबोळी केली जायची. ही चकली खुसखुशीत नाही तर छान चिवट असायची. म्हणजे चकली कडबोळीची कडी सापासारखी, न तुटता पूर्ण उघडता यायची. गुळमट तिखट चव लागायची. आजकाल विकत कडबोळी मिळतात ती अति खुसखुशीत असल्यामुळे, तुकडा मोडायला गेल्यावर त्याचा चुरा होतो.

आता बेसन लाडू हा पदार्थ मला वर्षभर दिला तरी मी खायला तयार आहे. त्याच्या रंगावरून, बेसन किती परफेक्ट भाजलंय हे अस्सल खवय्याला कळून येतं. फिकट पिवळट रंगाचे बेसन लाडू दिसायला बरे दिसतात, पण मुखात जाताच टाळ्याला चिकटून बसतात आणि जीभ वळवून वळवून तो टाळ्याचा चिकटा काढावा लागतो. बेसन छान खमंग भाजून गडद सोनेरी झाल्यावर त्यात पिठीसाखर तूप घालून बनलेला बेसन लाडू छान गोल वळून ताटात उतरतो. काही मंडळी डाएटच्या नावाखाली तूप फारच कमी घालून हे लाडू बनवतात. हा बेसन लाडू निसत्व, निर्जीव, निराश झालेला दिसतो. तुपातला बेसन लाडू तेल लावलेल्या पहिलवानासारखा तुकतुकीत कांती लेवून ताटात उतरतो. त्याची नजरानजर होताच खाल्ल्याविना चैनच पडत नाही. काही मंडळी अख्खा लाडू तोंडात टाकतात. काय हळूहळू खात बसायचं म्हणतात. माझ्या मते हे खवय्ये नाहीतच. बेसन लाडू खाताना हळुवार त्याचा तुकडा दातांनी मोडायचा. जिभेवर घोळवत त्यातल्या खमंग बेसन, तूप, साखर या सगळ्याची चव घेत त्याचा आस्वाद घ्यायचा आणि अशाच त-हेने छोट्या छोट्या तुकड्यात तो मटकवायचा. पूर्ण मुख चवीने भरून जातं.

आता रवा लाडू की राघवदास लाडू ? तर मी म्हणेन राघवदास. अहो, राघवदास म्हणजे रवा, खोबरं, साखरेचा पाक यांनी युक्त लाडू. यालाच आमच्याकडे राघवदास म्हणतात. मऊशार दिसणारा हा लाडू, याच्या चवीचा आनंद काय वर्णावा! यातल्या खोबरं, रवा आणि साखरेच्या पाकाचा चविष्ट त्रिवेणी संगम मुखात होतो आणि हात पुन्हा एकदा दुसरा लाडू घेण्यासाठी पुढे येतो.

करंजी हा पदार्थ ओल्या खोबऱ्याच्या सारणाची सोडल्यास मला तरी अजिबात आवडत नाही. गोबरी फुगलेली करंजी आणि ती तोंडात घालताच आत कुठेतरी खोलवर असणारा साठा. याला आम्ही खुळखुळा करंजी म्हणायचो. ओल्या खोबऱ्याच्या सारणाची (गुळ, खोबऱ्याचं असेल तर सोन्याहून पिवळं) करंजी डोळे मिटूनच मनापासून आनंद घेत खायची. करंजीचं खुसखुशीतपण आणि चुनाचा गोडवा, याला फक्त त्रिवार वाह ! वाह ! वाह !

तिखट शेव हे योग्य तिखटपणा आणि अरळ असतील तरच मस्त. यांच्यासोबत चहा mandetory आहे. मूठभर शेव घेऊन छान चुरायचे आणि उजव्या हातावर थोडे थोडे घेऊन तोंडात टाकायचे, सोबत अर्थात चहाचा घोट. शेवसुद्धा छान गडद सोनेरी रंग येईपर्यंत तळलेले हवे.

आमच्या घरची बाकरवडी (आईच्या हाताची) म्हणजे तर कहर असे. त्यातलं सारण आई करून ठेवायची आणि जेव्हा लागतील तेव्हा गरमागरम बाकरवड्या तळून समोर ठेवायची. या मस्त चविष्ट खमंग पदार्थाची कृती पुढच्या पिढीतल्या कुणीही लिहून ठेवली नाही. माझी आई, मामी यांच्याबरोबर बाकरवडीही अस्तंगत झाली. दिवाळीत घरी येणाऱ्या प्रत्येकाची ती पहिली फर्माईश असायची.

चिरोटे हा दिवाळीत बनणारा खाद्यप्रकार मला तरी प्रचंड आवडतो. आई मस्तच करायची. छान अनेक पदर ल्यालेला पांढराधोप चिरोटा आणि त्यावर पेरलेली पिठीसाखर. ब्रह्मकमळासारखा दिसतो हा पदार्थ. आपल्या चवीच्या प्रचंड मोहात पडणारा. आज मात्र माझ्यापुरते मी विकत आणतो.

शंकरपाळे वगैरे पदार्थाबद्दल काही सांगावं असं विशेष काहीच नाही त्यात.

अजूनही अनेक पदार्थ अनेक घरांत बनत असतील, पण दिवाळीत बनणाऱ्या या काही प्रमुख पारंपरिक पदार्थांची ही कहाणी. आज हे सगळे पदार्थ फारसे कुणी बनवत नाहीत आणि बनवायला कुणाला वेळही नाही आणि बनवलेच तर पनीर, वडा, पंजाबी समोसा, चाट यावर वाढलेली आजची पिढी ते खाईल की नाही हेही सांगता येत नाही. त्यामुळे घरगुती फराळ अशी पाटी लागलेल्या दुकानातून त्याचं जरुरीपुरतं आगमन होतं. तसंही आज पहाटेचं अभ्यंगस्नान, ओवाळणी वगैरे सोपस्कार कुठे उरलेयत.

पूर्वी, घरी उत्साहाने बनणारा तो दिवाळीचा फराळ सरला आणि तो बनवणारी ती पिढीही... व्हॉट्सअॅपवर H.D. म्हटलं की झालं. कुठे कोणाकडे जात बसायचं. घरीच चिल् मारायचं झालं.

तरीही दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. विकतचा तर विकतचा, भरपूर फराळ खा.....

kprasad1959@gmail.com