दीपोत्सवाचा संदेश

सध्या जाती-धर्मावरून वितंडवाद सुरू आहेत. व्यक्तीद्वेष उफाळून आला आहे. धार्मिक असहिष्णुता पराकोटीला पोहोचली आहे. पक्षपाती राजकारणाने कहर माजविला आहे. व्यक्तींनी आपला विवेक, तर संस्थांनी आपले अस्तित्व गमावले आहे.
दीपोत्सवाचा संदेश
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

सध्या जाती-धर्मावरून वितंडवाद सुरू आहेत. व्यक्तीद्वेष उफाळून आला आहे. धार्मिक असहिष्णुता पराकोटीला पोहोचली आहे. पक्षपाती राजकारणाने कहर माजविला आहे. व्यक्तींनी आपला विवेक, तर संस्थांनी आपले अस्तित्व गमावले आहे. घराघरातील, मनामनातीलच नव्हे, तर सार्वजनिक संवादही लोपत चालला आहे. या अशा नकारात्मक वातावरणात समतेची ज्योत तेवत, विद्वेषाचा अंध:कार दूर करीत, माणुसकीचे नाते जपत परस्परविश्वास वृद्धिंगत व्हावा आणि त्यातून जनसामान्यांचे जगणे अधिक सुसह्य व्हावे, हाच दीपावलीच्या आनंदोत्सवाचा तेजोमय संदेश आहे.

यंदाच्या हंगामात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाने रुद्रावतार धारण केला. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. उद्याच्या जगण्याची आशा असलेली कसदार जमीन महापुराने खरवडून नेली. कुणाचे घरसंसार वाहून गेले. शेतीने मान टाकली. फळबागा उद‌्ध्वस्त झाल्या. लाखोंचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर खायची भ्रांत निर्माण होऊन त्यांचे जगणे चिंतांनी व्यापले. या शेतकऱ्यांना आता सरकारने आर्थिकदृष्ट्या धीर देऊन सावरण्याची गरज आहे. आधीच शेती परवडत नाही. त्यातच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना हवेत विरली आहे. शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. ज्या वेळेस चार पैसे मिळण्याची आशा निर्माण होते, तेव्हाच आयातीला चालना देऊन निर्यातबंदीसारखे कठोर उपाय योजले जातात. त्यामुळे बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी होत आहे. या अडलेल्या, नाडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देऊन त्याचे अश्रू पुसण्याची नितांत गरज आहे. शेतशिवार बहरले, शेतमालाला रास्त भाव मिळाला, तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलेल, शेतकऱ्यांचा सांगावा आहे तो हाच.

तरुणांच्या देशाची औद्योगिक भरभराट झाली, तर बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता काहीशी कमी होईल. अलीकडे सरकारने उद्योगपतीधार्जिणे धोरण अवलंबिल्याने कायमच्या नोकऱ्या संपून कंत्राटी पद्धत सर्रास अवलंबिली जात आहे. पगार कमी व कामाचे तास वाढवून कामगारांची फसवणूक, पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे कर्ज घेऊन घरस्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यात तरुणाईला अडचणी उद‌्भवत आहेत. कामातील ताणतणाव वाढल्याने तरुण मुले अकाली वृद्ध दिसू लागली आहेत. अनेकांना अल्पवयातच रक्तशर्करा, रक्तदाबासारख्या विकाराने घेरले आहे. देशाची भावी पिढी सुखीसमाधानी, तणावमुक्त, आरोग्यदायी व्हावयाची असेल, तर त्यांच्यासाठीच्या कामगार कायद्यांची विश्वासार्ह अंमलबजावणी व्हायला हवी, तरुणाईची मनोभावना आहे, ती अशीच.

आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेत विज्ञान-तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊन संशोधननिष्ठ, चिकित्सक विद्यार्थी घडायला हवेत. तथापि, आजकाल शिक्षणाला वेदपुराणाने, कर्मकांडाने ग्रासल्याने विवेकवादी विचारसरणी मागे पडली आहे. त्यातच शिक्षण सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेल्याने शाळागळती काही थांबलेली नाही. हसतखेळत शिक्षण घेता आले पाहिजे. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर पोहोचविण्यासाठी शिक्षण अधिकाधिक कौशल्याधारित, व्यवसायाभिमुख व्हायला हवे. शिक्षणहक्क सर्वांचा असेल, तर मोफत शिक्षणही सर्वांना सारखे मिळायला हवे, हाच सांगावा आहे विद्यार्थी-शिक्षक-पालकांचा.

आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने दुर्धर आजाराने पछाडलेल्या रुग्णांना अद्ययावत उपचारसुद्धा घेता येत नाहीत. अनेकांना धर्मादाय संस्थांकडे, मंदिर न्यासांकडे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे, तर कुणाला तुटपुंजा आर्थिक मदतीसाठीसुद्धा समाजातील विविध घटकांपुढे हात पसरावे लागत आहेत. त्यामुळेच माफक दरात अद्ययावत व दर्जेदार औषधोपचार कसे मिळतील, याकडे गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या नजरा लागल्या आहेत.

न्या. वर्मा यांच्या निवासस्थानाजवळ कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर न्यायपालिकांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. सरन्यायाधीश गवई यांच्यावरील बूटफेकीनेही न्यायदानाच्या प्रतिष्ठेला मोठाच धक्का बसला आहे. न्यायव्यवस्थेतसुद्धा राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल, तर न्यायप्रणाली राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असावी हेच जनसामान्यांचे अंतर्मन सांगत आहे.

एक काळ असा होता की, समाजाला दिशा देण्याचे व प्रबोधनाचे काम संतसज्जन, समाजसुधारक करीत होते. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून विश्वकल्याणाची संकल्पना मांडली. ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ अशी अभंगवाणी रचतानाच पर्यावरण रक्षणाचा, मानवतेच्या कल्याणाचा कानमंत्र संत तुकारामांनी दिला. संत गाडगे महाराजांनी सार्वजनिक स्वच्छतेचे, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व विषद केले. ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज घेऊ नका, अडाणी राहू नका, पोथीपुराण, मंत्र-तंत्र-चमत्कारावर विश्वास ठेवू नका’ अशी शिकवण त्यांनी दिली. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले’, अशा शब्दात महात्मा फुले यांनी सामाजिक वास्तवाची जाणीव करून दिली. वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवत जगाला सत्य-अहिंसेचा महामंत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिला. सत्याच्या कसोटीवर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची चिकित्सा करून माणसाने माणुसकीने वागण्याचा जो वास्तववादी संदेश संतसज्जनांनी दिला, त्याचीच आज समाजाला, देशाला अधिक गरज आहे.

जागतिकस्तरावर शांततापूर्ण सहजीवनाचाच बड्या राष्ट्रधुरिणांना विसर पडला आहे. त्यामुळेच कधी रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास, भारत-चीन, भारत-पाकिस्तान, पाकिस्तान-अफगाणिस्तान असा एकापाठोपाठ एक असा अहंकाराचा युद्धसंघर्ष जारी आहे. काही देशांना महासत्ता व्हायचे आहे. आपल्या देशातील गरिबी-दारिद्र्य दूर व्हावे, लोक अधिक सुसंस्कृत, सहिष्णू, उदारमतवादी व्हावेत असे कुणालाच वाटेनासे झाले आहे. सर्वांना सत्याचा नव्हे, तर सत्तेचा हव्यास जडला आहे. लोकशाही, स्वातंत्र्याच्या फुकाच्या गप्पा मारून राज्य, देश, जग केवळ आपल्याच ताब्यात राहावे, ही हुकूमशाही प्रवृत्ती बळावत चालली आहे. त्यासाठी अनिष्ट मार्गाचा अवलंब केला जात आहे. भ्रष्टाचाराच्या नावे एकेकाळी गळे काढणाऱ्यांनीच आता भ्रष्ट मंडळींना पाठीशी घालण्याचा नवाच पायंडा रूढ झाला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता हा देश संविधानाने चालावा, देशात बंधुभाव जपला जावा, सामाजिक परिवर्तनाचे सुधारणावादी वारे वाहत राहावेत, ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मिळविलेले स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्था कायम टिकावी, याच जाणीव जागृतीमधून दशदिशा सुखासमाधानाने उजळून निघाव्यात, हीच मनोकामना. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in