

विचारभान
संध्या नरे-पवार
दीपावली म्हणजे दिव्यांची आवली..दिव्यांची रांग. मंद पेटत्या ज्योतींनी तमावर मिळवला जाणारा विजय. छोट्या पणतीची एक छोटी ज्योतही खोलीतला अंधार दूर करायला, भवताल उजळायला समर्थ असते, हे सांगणारा दिवाळीचा सण अलीकडच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीने आणि धुराच्या लोटांनी काळवंडून जात आहे. यावर्षी तर रेकॉर्ड झाला आहे. भारतीयांनी सात हजार कोटींचा धूर केला आहे. हा धूर केवळ फटाक्यांचा नसून अकलेचाही आहे. ही बौद्धिक दिवाळखोरी आहे.
आनंदाचे डोही, आनंद तरंग...म्हणजे डोहही आनंदाचा आणि त्यावर उमटणारे तरंगही आनंदाचेच, हे सांगताना संत तुकाराम आपल्याला हॅपिनेस मॅनेजमेंट सांगतात. डोह या रुपकात एक सखोलता अभिप्रेत आहे. या सखोलतेमुळेच डोहातील पाण्यावर संथ तरंग उमटत असतात. तिथे उधाण नसतं, उसळण नसते, उथळ पाण्याचा खळखळाट नसतो. त्या शांत तरंगांमध्ये एक धीरगंभीरता असते. पाण्याची ती लयबद्ध हालचाल एक मंद नाद निर्माण करते. डोहाकाठी बसल्यावर तरंगांची वलयं बघत तो नाद ऐकत राहावा, असे वाटते. त्याक्षणी पंचेंद्रियं तरल होतात आणि एक ध्यानस्थ क्षण अनुभवता येतो. या अशा ध्यानस्थ क्षणात निर्भेळ आनंद सामावलेला असतो.
साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकोबा काय सांगत होते हे समजून घेण्याची तीव्रता २०२५ मध्ये अधिकच वाढतेय. कारण चारीबाजूंनी बीभत्साचे गाणे ऐकू येत आहे. कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू येत आहेत. आवाजांची एक न संपणारी मालिका कानांवर आदळत राहते. सर्वत्र एक विषारी धूर पसरला आहे. त्यातून एक मोकळा श्वास उधार मागावा लागतोय, शोधावा लागतोय. घुसमट वाढतेय. हे असं होतंय, कारण चहुबाजूंनी आनंदाच्या नावाखाली उन्मादाला उधाण आलंय. डोह फोडून, नद्या-नाले-समुद्र यात घुसून हा उन्मादनामक आनंद उसळींवर उसळी घेतोय. आनंदाच्या या उन्मादी महापुरात गावं, शहरं, जिल्हे, राज्यं, देश सारंकाही अडकलं आहे.
या उन्मादी महापुरातच तब्बल सात हजार कोटींचा धूर फसफसलेला आहे. कानाचे पडदे फाडणाऱ्या आवाजात भारतीयांनी यावर्षी दिवाळीला सात हजार कोटींचे फटाके फोडलेले आहेत. काळवेळाचं भान हरपून रात्री एक-दोन वाजेपर्यंत फटाके फुटत होते. पुन्हा पहाटे चारपासून फटाक्यांच्या वाती धडधड पेटत होत्या, ढाम...ढूम...ढाम...ढूम...ढाम...ढूम... क्षणभरासाठी आकाश विविध रंगांच्या आतषबाजीने उजळून निघत होतं आणि दुसऱ्याच क्षणी काळ्या धुराने भरत होतं. दिवाळीच्या आधी दोन दिवस, दिवाळीचे चार दिवस आणि नंतरचे दोन दिवस..या उन्मादी आनंदाचे हे ढोलताशे वाजतच आहेत.
फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कानांच्या पडद्यावर होणारे परिणाम, धुरामुळे होणारे श्वसनाचे विकार, थोडक्यात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण या बाबी दरवर्षी चर्चेला असतातच. त्यावर तुम्हाला आमच्याच धर्माच्या सणांवर टीका करायची असते, असा थोटका प्रतिवादही केला जातो. यातच दरवर्षी ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण याची आकडेवारी वाढत चालली आहे आणि त्याचवेळी उन्मादी आनंदात, भव्यदिव्य प्रमाणात सण साजरे करण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. होळी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो किंवा दिवाळी..सण साजरे करण्याचं प्रमाण अधिकाधिक दिखाऊ, प्रदर्शनीय होत चाललं आहे. सणांचा मूळ हेतू, मूळ गाभा बाजूला ठेवून त्याचं साजरीकरण तेवढं वाढत आहे. जणू येणारा प्रत्येक सण हे एक निमित्त आहे, आपल्या उन्मादी आनंदाच्या प्रदर्शनाचं. उत्सवांच्या काळात अनेक प्रदर्शनं होत असतात. हातमागाचं, हस्तकौशल्यांच्या वस्तूंचं. तसंच हेही एक प्रदर्शन...उन्मादी आनंदाचं.
या उन्मादी आनंदातच मग सात हजार कोटी रुपयांचा सहज धूर केला जातो.
वीज-पाणी यासारख्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, शिक्षण, आरोग्य यासाठी अपुरा पडणारा निधी...हे मुद्दे उपस्थित करत दिवाळीत जाळले जाणारे फटाके, एकूण सणांचा वाढता खर्च यावर प्रश्न उपस्थित केले जातात. हे पैसे अधिक चांगल्या बाबींसाठी वापरले जाऊ शकतात याकडे लक्ष वेधलं जातं. पण मूळ मुद्दा अपुऱ्या निधीचा, आर्थिक दरीचा नाही. कारण त्यावर निधीची चणचण कायमच असेल, म्हणून आम्ही आमचा आनंद साजरा करायचा नाही का? असा उन्मादी प्रश्न विचारला जाऊ शकतोच. किंबहुना कृतीतून तो विचारला जातोच. फुटू देत कोणाचे ते कान, आम्ही वाजवणारच ढोलताशे आणि फोडणारंच न संपणारी फटाक्यांची माळ. मरू देत कोणी औषधपाण्याविना आणि राहू देत शिक्षणाविना, आम्ही करणारंच भव्यदिव्य देखावे आणि आणणारंच उंच उंच मूर्ती. मूलभूत सोयींच्या अभावावर काट मारतंच हा सगळा उन्मादी आनंदाचा डोलारा उभा असतो. म्हणूनच वारंवार भाबडेपणाने या मूलभूत सोयीसुविधांच्या नावे गळा काढणे थांबवले पाहिजे. कारण मुळात या मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाच्या मुद्द्यात एक परस्परविसंगत बाब आहे. ती म्हणजे उद्या सुबत्ता असेल, आर्थिक विषमता नसेल, सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतील, तर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या, वायू प्रदूषण करणाऱ्या उन्मादी आनंदाच्या कृती मान्य असतील का?
एखादी गोष्ट ‘अयोग्य’ असेल तर ती ‘अयोग्य’ आहे म्हणूनच करायची नसते. ती न करण्यासाठी मूलभूत सोयीसुविधांच्या अभावांच्या भावनिक सबबी द्यायच्या नसतात. यासाठी नको असलेले वास्तव थेट सांगायचे असते, कडेकडेने नाही. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते. फटाके फोडताना दरवर्षी अनेक अपघात होतात. अनेकांना कायमचं अपंगत्व येतं. या सगळ्याच्या बरोबरीनेच फटाके जाळणं म्हणजे एक प्रकारे चलन जाळणं आहे, कष्टाने कमवलेला पैसा जाळणं आहे, थोडक्यात कष्टांना, श्रमांना कमी लेखणं आहे. कष्टांना, श्रमांना कमी लेखणं म्हणजे मानवी जीवनाचं, मानवी मूल्यांचं अवमूल्यन करणं आहे. म्हणूनच फटाके फोडणं ‘अयोग्य’ आहे आणि अयोग्य आहे म्हणूनच ‘अमान्य’ आहे. एक सुसंस्कृत समाज म्हणून अयोग्य गोष्टीची अमान्यता आपण मान्य केली पाहिजे. अन्यथा तुमची सांस्कृतिक इयत्ता कोणती, हा प्रश्न निर्माण होतो.
संस्कृती आपल्याला अन्नाचा आदर करायला सांगते. ताटात घेतलेल्या अन्नाचा एक घासही वाया घालवू नये, हे सांगते. संस्कृती आपल्याला नैसर्गिक संसाधनांचं, जल-जंगल-जमीन यांचं जतन करायला सांगते. संस्कृती आपल्याला संयम सांगते, संवर्धन शिकवते आणि मुख्य म्हणजे सहिष्णू बनवते. या संयमाच्या, सहिष्णुतेच्या सोबतीनेच संतुलित आनंदाची ज्योत प्रज्वलित होते. या संतुलित आनंदाला कष्टाची कदर असते. श्रमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीनिर्माणाची किंमत असते. संतुलित आनंदाला झगमगाटी प्रदर्शनाची, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजी नोंदीची गरज नसते. संतुलित आनंदाला कोणताही सण अर्थवाहीपणे साजरा करता येतो.
म्हणूनच सात हजार कोटी रुपयांचे फटाके जाळले हे वास्तव सांगताना एक समाज म्हणून आपण संतुलित आनंद कुठे गमावला आणि उन्मादी आनंदाच्या सापळ्यात आपण सगळेच अलगद कसे अडकले आहोत, हे प्रश्न विचारायला हवेत. कारण योग्य प्रश्न विचारले तरच योग्य उत्तरांच्या दिशेने जाता येईल.
एक समाज म्हणून आपण नैराश्यग्रस्त झालोय का?
आतून पोकळ झालोय का? भरकटलो आहोत का?
छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण गमावला आहे का?
मुख्य म्हणजे आपण भयभीत आहोत का?
मॉल्सची मयसभा ओसंडून वाहत असतानाही आपण भूकेलेले आहोत का?
एक न संपणारी भूक आपल्याला लागली आहे का?
अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं थेट सात हजार कोटींच्या जळण्याशी-जाळण्याशी जोडलेली आहेत. हे सात हजार कोटी रुपये प्रत्यक्षात लोकांच्या हातून फटाक्यांच्या रूपाने जाळले गेले असले तरी त्यामागे एक व्यवस्था उभी आहे. बाजारव्यवस्था फटाक्यांची निर्मिती करते, तर शासनव्यवस्था फटाक्यांच्या निर्मितीसाठी आणि विक्रीसाठी परवाने देते. बाजारकेंद्री अर्थव्यवस्था पैसा हेच सर्वोच्च मूल्य मानते. पैशावर प्रेम करायला शिकवते आणि त्याचवेळी अतिरिक्त पैसा जाळायलाही शिकवते. बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेचं दुसरं मूल्य स्पर्धा हे आहे. अधिकाधिक श्रीमंतीची ही स्पर्धा कसंही करून पैसा मिळवा, हे सांगते. कसंही करून मिळवलेला पैसा उधळायला, पर्यायाने जाळायला वेळ लागत नाही. बाजारकेंद्री अर्थव्यवस्था आणि त्याला पाठबळ देणारी राज्यव्यवस्था, ही जोडगोळी आज सहकारापेक्षा स्पर्धेला अधिक महत्त्व देत आहे. एक न संपणारं धावणं लोकांच्या वाट्याला आलं आहे. कधी निराश वाटलं, थकायला झालं तरी थांबायला परवानगी नाही. कारण सतत सुरू असणारी स्पर्धा. यातून मग आनंदाच्या दिखाव्याचीही स्पर्धा सुरू होते. अधिकाधिक फटाके कोण जाळतं? याची स्पर्धा. अधिकाधिक उंच मूर्ती कोण आणतं? याची स्पर्धा. अधिक दिवे कोण पेटवतं आणि वर्ल्ड रेकॉर्ड कोण करतं? याची स्पर्धा. जणू उन्मादाच्या वाटेवर लोकांचे मेंदू बधिर करण्याची स्पर्धा सुरू आहे.
जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी...
किंवा
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण...
हे तुकोबांनी दिलेलं सांस्कृतिक भान आज पार हरवलं आहे. अशा काळात उन्मादी धुराचंच साम्राज्य असणार. ढोलताशांचाच घणघणाट घुमणार. बौद्धिक दिवाळखोरीच्या आजच्या काळात दुसरे काय घडणार?
sandhyanarepawar@gmail.com