मांसाहारामुळेच माणूस बुद्धिमान होतो का?

मांसाहारामुळे मेंदूचा विकास अधिक होतो आणि म्हणूनच मांसाहारी लोक अधिक बुद्धिमान असतात, असा समज समाजात वारंवार ऐकायला मिळतो. मात्र विज्ञान अशा दाव्यांकडे भावना किंवा परंपरेने नव्हे, तर पुराव्यांच्या कसोटीवर पाहते.
मांसाहारामुळेच माणूस बुद्धिमान होतो का?
मांसाहारामुळेच माणूस बुद्धिमान होतो का?'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

समाजचिंतन

जगदीश काबरे

मांसाहारामुळे मेंदूचा विकास अधिक होतो आणि म्हणूनच मांसाहारी लोक अधिक बुद्धिमान असतात, असा समज समाजात वारंवार ऐकायला मिळतो. मात्र विज्ञान अशा दाव्यांकडे भावना किंवा परंपरेने नव्हे, तर पुराव्यांच्या कसोटीवर पाहते.

मांसाहार करणारे लोक अधिक बुद्धिमान असतात, तर शाकाहारी लोक तुलनेने कमी बुद्धिमान असतात, असा समज अनेक समाजांमध्ये प्रचलित आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ मानवी उत्क्रांतीमध्ये मांसाहाराची भूमिका, आदिमानवांचा मेंदू, तसेच नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये मांसाहारी पाश्चात्त्य देशांचे वर्चस्व यांसारखी उदाहरणे दिली जातात. परंतु हा समज खरोखरच वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित आहे का? आधुनिक विज्ञान या प्रश्नाचे अधिक संतुलित आणि सूक्ष्म उत्तर देते. ते कसे ते आपण पाहू या.

सर्वप्रथम बुद्धिमत्ता म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. बुद्धिमत्ता म्हणजे केवळ परीक्षेतील गुण किंवा गणित सोडवण्याची क्षमता नव्हे. नवीन माहिती समजून घेणे, अनुभवातून शिकणे, तर्कशुद्ध विचार करणे, समस्या सोडवणे, नियोजन करणे, कल्पनाशक्ती वापरणे, सामाजिक परिस्थिती समजून घेणे आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे या सर्व क्षमतांचा एकत्रित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय. त्यामुळे कोणत्याही एका घटकामुळे, विशेषतः एका आहारपद्धतीमुळे, बुद्धिमत्ता निश्चित होते असे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरत नाही. मानवी मेंदूचा विकास लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. हवामानातील बदल, नवीन प्रदेशांत स्थलांतर, साधननिर्मिती, अग्नीचा वापर, समूहाने राहण्याची गरज, भाषेचा विकास आणि विविध प्रकारचा आहार या सर्व घटकांनी मिळून मेंदूच्या उत्क्रांतीला चालना दिली. त्यामुळे केवळ मांसाहारामुळेच मानवी मेंदू विकसित झाला, असा कोणताही सर्वमान्य वैज्ञानिक सिद्धांत अस्तित्वात नाही.

मांसामध्ये प्रथिने, लोह, झिंक आणि विशेषतः जीवनसत्त्व बी-१२, फॉलिक ऍसिड यांसारखी पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. ही पोषकद्रव्ये मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. विशेषतः बालपणात त्यांची कमतरता राहिल्यास बौद्धिक विकासावर परिणाम होऊ शकतो. मात्र यावरून मांसाहार करणारी प्रत्येक व्यक्ती अधिक बुद्धिमान असते किंवा शाकाहारी व्यक्ती कमी बुद्धिमान असते, असा निष्कर्ष निघत नाही. आजचे पोषणशास्त्र स्पष्ट सांगते की, योग्य नियोजन केलेला शाकाहारी शरीराच्या बहुतांश गरजा पूर्ण करू शकतो. आवश्यकतेनुसार जीवनसत्त्व बी-१२ सारख्या पूरकांचा वापरही करता येतो.

सर्वात प्रसिद्ध संशोधनांपैकी एक म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ लेस्ली आयेलो आणि शरीरक्रियाशास्त्रज्ञ पीटर व्हीलर यांनी १९९५ मध्ये मांडलेला उत्क्रांतीशास्त्रातील ‘महागडा अवयव सिद्धांत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संकल्पनेनुसार मोठ्या मेंदूला अधिक ऊर्जा लागते आणि मांसासारख्या उर्जायुक्त अन्नामुळे त्याला मदत झाली असावी. परंतु हा सिद्धांत अंतिम सत्य मानला जात नाही. अनेक संशोधकांच्या मते शिजवलेले कंदमुळे, धान्ये आणि इतर वनस्पतिजन्य अन्नही भरपूर ऊर्जा पुरवू शकतात. अग्नीचा शोध लागल्यानंतर अन्न शिजवणे शक्य झाल्यामुळे अन्नाचे पचन अधिक कार्यक्षम झाले आणि त्याचाही मेंदूच्या विकासात महत्त्वाचा वाटा असावा. त्यामुळे मेंदूची उत्क्रांती ही अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून घडली, असे म्हणणे अधिक योग्य ठरते. मानववंशशास्त्रीय संशोधनातून असेही दिसते की, आदिमानवांना अनेकदा त्यांना फळे, कंदमुळे, बिया, पाने आणि मध यांवर अवलंबून राहावे लागत असे. म्हणजेच आदिमानवांचा आहार मिश्र स्वरूपाचा होता. त्यामुळे मानव मुळात पूर्णपणे मांसाहारी होता किंवा पूर्णपणे शाकाहारी होता, ही दोन्ही टोकाची मते वैज्ञानिक पुराव्यांशी सुसंगत नाहीत.

बुद्धिमत्तेवर आनुवंशिकतेचा काही प्रमाणात प्रभाव असला तरी तो एकमेव घटक नाही. बालपणीचे पोषण, आरोग्य, शिक्षण, वाचनाची सवय, भाषिक वातावरण, कुटुंबाचा आधार, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक संधी या सर्वांचा मेंदूच्या विकासावर खोल परिणाम होतो. समान आहार घेणाऱ्या दोन व्यक्तींची बौद्धिक क्षमता वेगळी असू शकते, कारण त्यांच्या आयुष्यातील इतर घटक वेगळे असतात. भारतातील अनेक प्राचीन विद्वान, गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि साहित्यिक साध्या आहारावर जगले. अर्थात सर्वच शाकाहारी होते असे म्हणता येणार नाही, परंतु त्यांच्या ज्ञानाचे श्रेय केवळ आहाराला देता येत नाही. त्यांच्या यशामागे कठोर अध्ययन, चिंतन, जिज्ञासा आणि समृद्ध ज्ञानपरंपरा होती. त्याचप्रमाणे आधुनिक काळातही अनेक यशस्वी वैज्ञानिक आणि संशोधक शाकाहारी आहेत, तर अनेक मांसाहारी आहेत. त्यामुळे आहार आणि बौद्धिक यश यांच्यात सरळ संबंध जोडणे योग्य नाही.

नोबेल पारितोषिकांच्या संदर्भातही अनेकदा असा दावा केला जातो की पाश्चात्त्य देशांतील बहुतेक विजेते मांसाहारी असल्यामुळे ते अधिक बुद्धिमान आहेत. हा युक्तिवाद सहसंबंध आणि कारण यांची गल्लत करतो. एखाद्या समाजात दोन गोष्टी एकाच वेळी आढळतात म्हणून त्यांपैकी एक दुसऱ्याचे कारण असते, असे म्हणता येत नाही. पाश्चात्त्य देशांना नोबेल पारितोषिकांमध्ये आघाडी मिळण्यामागे ऐतिहासिक कारणे अधिक महत्त्वाची आहेत. वैज्ञानिक क्रांती, औद्योगिक क्रांती, संशोधनासाठी मोठा निधी, जागतिक दर्जाची विद्यापीठे, अत्याधुनिक प्रयोगशाळा, विचारस्वातंत्र्य आणि विज्ञानाला मिळालेले सामाजिक महत्त्व यांमुळे तेथे संशोधनाची भक्कम परंपरा निर्माण झाली. याउलट भारतासह अनेक आशियाई आणि आफ्रिकी देश दीर्घकाळ वसाहतवादी सत्तेखाली असल्यामुळे संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित होण्यास विलंब झाला. त्यामुळे नोबेल पारितोषिकांची संख्या कमी असण्याचा संबंध आहाराशी नसून शिक्षण, अर्थव्यवस्था आणि संशोधनाच्या संधींशी अधिक आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि चीन यांसारख्या देशांनी संशोधनावर मोठी गुंतवणूक केल्यानंतर त्यांचे वैज्ञानिक योगदान झपाट्याने वाढले. या उदाहरणांवरूनही हे स्पष्ट होते की संशोधनासाठीची अनुकूल व्यवस्था, दीर्घकालीन धोरणे आणि वैज्ञानिक संस्कृती हे घटक आहारापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. अनेक अभ्यासांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही गटांमध्ये कोणताही लक्षणीय फरक आढळला नाही. याचे कारण असे की उत्पन्न, पालकांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक परिस्थिती, झोप, व्यायाम आणि इतर अनेक घटकही अशा अभ्यासांवर परिणाम करतात. त्यामुळे आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक निष्कर्ष मांसाहारामुळेच बुद्धिमत्ता वाढते, असा निघालेला नाही.

लहान मुलांच्या मेंदूचा विकास आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांत सर्वाधिक वेगाने होतो. त्या काळात संतुलित पोषण, चांगले आरोग्य, प्रेमळ वातावरण, दर्जेदार शिक्षण आणि भाषिक उत्तेजन मिळणे अत्यंत आवश्यक असते. मुलगा शाकाहारी आहे की मांसाहारी, यापेक्षा त्याला आवश्यक पोषकद्रव्ये आणि बौद्धिक विकासासाठी अनुकूल वातावरण मिळते का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. आजच्या मेंदूविज्ञानानुसार आयुष्यभर नवीन गोष्टी शिकल्याने मेंदू नवीन मज्जाजाळे तयार करतो. वाचन, गणित, संगीत, भाषा, संशोधन, लेखन, खेळ आणि चिकित्सक विचार यांमुळे मेंदू सक्रिय राहतो. त्यामुळे बुद्धिमत्ता ही स्थिर नसून विकसित होणारी क्षमता आहे. तिच्या विकासात आहाराचा वाटा आहे; परंतु तो अनेक घटकांपैकी केवळ एक आहे.

या सर्व वैज्ञानिक पुराव्यांचा विचार केला असता एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मांसाहार केल्यामुळेच माणूस बुद्धिमान होतो, हा दावा आज उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध झालेला नाही. विज्ञान कोणत्याही आहारपद्धतीला जन्मतः श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानत नाही. ते केवळ त्या आहारातून शरीराच्या पोषणाच्या गरजा कितपत पूर्ण होतात, याचा अभ्यास करते. म्हणूनच माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या ताटातील अन्नावर नव्हे, तर संतुलित पोषण, आनुवंशिक क्षमता, शिक्षण, जिज्ञासा, चिकित्सक विचार, संशोधनाच्या संधी, सामाजिक वातावरण आणि सतत ज्ञानार्जन करण्याच्या वृत्तीवर अधिक अवलंबून असते. खरी बुद्धिमत्ता ही आहाराच्या प्रकारात नसून पुराव्यांच्या आधारे विचार करण्याच्या क्षमतेत असते. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या शाकाहारी किंवा मांसाहारी असण्यावरून तिच्या बुद्धिमत्तेचा अंदाज बांधणे हे विज्ञानाच्या दृष्टीने योग्य नाही.

लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.

jetjagdish@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in