

विशेष
गीतेश गजानन शिंदे
दूरदर्शनच्या पडद्यावर उमटणाऱ्या काळ्या-पांढऱ्या मुंग्यांपासून ते आजच्या हाय-डेफिनिशन डिजिटल विश्वापर्यंत तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली. मात्र, त्या जुन्या टीव्हीभोवती जमणारी माणसं, कार्यक्रमांची उत्सुकता आणि एकत्र पाहण्याचा आनंद काळाच्या ओघात कमी होत गेला. काल झालेल्या जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त तंत्रज्ञानाच्या या प्रवासासोबत बालपणीच्या रम्य आठवणींचा हा नॉस्टॅल्जिक मागोवा.
एलईडी टीव्हीच्या बिघाडाने मेकॅनिकला बोलावण्याची वेळ आली; त्याच्या बोलण्यातून नव्या तंत्रज्ञानाच्या अल्पायुष्याची जाणीव झाली. काळ्या पडद्याकडे पाहताना मात्र जुन्या दूरचित्रवाणीच्या रम्य आठवणी मनाच्या पडद्यावर तरळू लागल्या.
मला आठवतंय मी चवथीत असताना आमच्याकडे डायनोरा कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट बॉक्स टीव्ही होता. टीव्हीचा पडदा झाकण्यासाठी समोरून शटरसारखं बंद होणारं सरकवायचं कव्हर होतं. त्यावर आईनं विणकाम केलेलं एक सुंदर कापडही टीव्ही पाहून झाल्यावर आम्ही घालायचो. टीव्ही चालू बंद करायला आत-बाहेर होणारं एक बटन, चॅनेल बदलायला फॅनच्या रेग्युलेटरसारखं खट-खट असं आवाज करणारं दुसरं आणि टीव्हीचा आवाज कमी-जास्त करायला टूथपेस्टच्या झाकणासारखं काळ्या रंगाचं तिसरं फिरवायचं एक बटन होतं. त्या काळी चॅनेल्स तरी किती होती? अवघी दोनच! DD1 आणि DD2 म्हणजेच डीडी-मेट्रो या दोनच चॅनेल्सभोवती आमच्या पिढीची दुनिया फिरायची हे सतत स्क्रोल करणाऱ्या आणि सहा सेकंदाचा अटेंशन स्पॅन असणाऱ्या आजच्या जेन-झीला सांगितलं तर मुळीच पटणार नाही.
आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि ओटीटीच्या जमान्यात दूरदर्शन हा शब्द उच्चारला तरी कदाचित नव्या पिढीला त्याचं फारसं अप्रूप वाटणार नाही. कारण आज मनोरंजनाची साधनं अमाप आहेत. एका बटणावर जगभरातील कार्यक्रम उपलब्ध आहेत. हवं तेव्हा, हवं ते पाहता येतं. पण आमच्या पिढीच्या बालपणात दूरदर्शन ही केवळ मनोरंजनाची वस्तू नव्हती, तर तो एक सांस्कृतिक सोहळा होता. घरातल्या माणसांना एकत्र आणणारा, शेजाऱ्यांना जवळ करणारा आणि एकमेकांना जगाशी जोडणारा एक पूल होता.
ऐंशी-नव्वदच्या दशकात घरात दूरदर्शन असणं म्हणजे त्या घराला एक वेगळाच मान मिळाययचा. त्या काळी अगदी मोजक्याच घरांमध्ये टीव्ही असायचा. त्यामुळे ज्यांच्या घरी दूरदर्शन होते, त्यांचं घर म्हणजे गावातील मुलांसाठी मनोरंजनाचं हक्काचं ठिकाण असायचं आणि ते कुटुंब सधन मानलं जायचं. संध्याकाळ झाली की मुलांच्या पावलांना आपोआप त्या घराची वाट सापडायची. कोणत्या घरात आज टीव्ही पाहायला मिळणार, याची मुलांमध्ये चर्चा रंगायची. घरातील मोठ्यांची परवानगी मिळाली की मुलांची स्वारी टीव्ही असलेल्या घराकडे निघायची.
त्या काळात टीव्ही सुरू करणं हीसुद्धा एक तारेवरची कसरत असायची. आधी टीव्हीचं बटण दाबायचं. मग पडद्यावर काही क्षण काळे-पांढरे ठिपके दिसायचे आणि फाटल्यासारखा कर्कश आवाज यायचा. आम्ही त्या गोष्टीला मुंग्या येणं म्हणायचो. मग चित्र कधी वरखाली व्हायचं, तर कधी पूर्णपणे गायब होऊन नुसता आवाज ऐकू यायचा. त्यानंतर सुरू व्हायची अँटेना फिरवण्याची धावपळ. शक्यतो मीच गच्चीवर जाऊन अँटेना फिरवायचो आणि खालून वडील मोठ्या आवाजात सूचना द्यायचे, ‘अँटेना जरा डावीकडे फिरव! हा दिसायला लागलं! थांब, थांब... पुन्हा गेलं! थोडं उजवीकडे फिरव... अँटेना त्याच पोजिशनला ठेव आणि ये खाली...’ मला नेहमी प्रश्न पडायचा की रोज रोज अँटेना हलवून सिग्नल का पकडावे लागतात? अँटेना हलवतं तरी कोण? याचं उत्तर शोधण्यासाठी एकदा दुपारी मी गच्चीवर गुपचूप उभा राहिलो. तर दोन कावळे अँटेनावर मस्तपैकी सिसॉ खेळत होते. या कारणामुळे कधी चित्र स्पष्ट यायचं, तर कधी पुन्हा त्यात लहरी दिसायच्या. पण चित्र व्यवस्थित दिसू लागलं की घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटायचं. आजच्या डिजिटल युगातील उच्च दर्जाच्या पिच्चर क्वालिटीपेक्षा त्या धूसर चित्रातही अधिक आनंद मिळायचा.
दूरदर्शनच्या कार्यक्रमांना वेळेची एक शिस्त होती. आजच्यासारखं चोवीस तास मनोरंजन उपलब्ध नव्हतं. ठरावीक वेळी कार्यक्रम सुरू व्हायचे आणि ठरलेल्याच वेळी ते संपायचे. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ चुकवणं परवडणारं नव्हतं. कारण एखादा कार्यक्रम चुकला तर आजच्यासारखं तो पुन्हा ओटीटीवर पाहण्याची किंवा रेकॉर्ड करण्याची सोय नव्हती.
रविवारची सकाळ तर आनंदाची पर्वणी असायची. सकाळी ‘रंगोली’ सुरू झाली की घरातील वातावरणच बदलून जायचं. हिंदी चित्रपटगीतांच्या सुरांनी घर भरून जायचं. त्यानंतर ‘रामायण’, ‘महाभारत’ सुरू होण्यापूर्वीच लोक टीव्हीसमोर जागा पकडून बसायचे. रस्त्यावरची वर्दळ कमी व्हायची. एखाद्या घरातून मालिकेचे संवाद ऐकू यायचे आणि आजूबाजूच्या घरांतही शांतता पसरायची. महाभारत, रामायण आठवण्याइतपत माझं ते वय नव्हतं. पण ‘में समय हुं...’ असं म्हणत पडद्यावर उमटलेलं अंतराळाचं चित्र मात्र मनावर कोरलं गेलंय. कोविडच्या काळात पुन्हा रामायण, महाभारतचे भाग प्रसारित करण्यात आल्यानं ती हौस मात्र भागली.
पण ‘चित्रहार’, ‘छायागीत’, ‘सुरभि’, ‘कृषिदर्शन’, ‘साप्ताहिकी’, ‘किलबिल’ यांसारख्या कार्यक्रमांनी आवडी-निवडी घडवल्या. मराठी कार्यक्रमांची तर एक वेगळीच ओढ होती. ‘गजरा’, ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘आमची माती आमची माणसं’ अशा कार्यक्रमांतून मराठी मातीचा सुगंध घराघरांत दरवळायचा. लोककला, साहित्य, नाटक, संगीत, शेती आणि ग्रामीण जीवन यांचं दर्शन घडायचं.
क्रिकेटची मॅच असेल तर काही सांगायलाच नको. प्रत्येक जण तज्ञ होऊन आपली कॉमेंट्री करायचा. कपिलने, कुंबळेने बॉलिंग कशी करायला हवीपासून सिद्धूने चुकीचा फटका खेळलापर्यंत सर्व सल्ले असायचे. आणि सचिन आऊट झाल्यावर तर जणू कर्फ्यूच लागायचा. ‘आता मॅच गेली... आपण हरलो’ असंच सर्वांना वाटायचं. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर काहींनी तर रागाच्या भरात टीव्ही फोडल्याच्याही बातम्या पेपरमध्ये झळकायच्या. यात ठळकपणे आठवते ती कोलकाताच्या इडन गार्डनवरची वर्ल्ड कपमधली भारत-श्रीलंका मॅच. सचिन बाद झाल्यावर सर्व भारतीय खेळाडूंनी तर माघारी परतण्याची जणू रांगच लावली. मग प्रेक्षकांनी मैदानात बाटल्यांचा वर्षाव करत जाळपोळ केली. विनोद कांबळी ढसाढसा रडत मैदानाबाहेर गेल्याचं दृश्य आजही आठवलं तरी गदगदून येतं.
त्या काळातील जाहिराती आजही विसरता येत नाहीत; इतक्या त्या मनावर ठसल्या आहेत. ‘मिले सुर मेरा तुम्हारा...’मधली विविध भाषांमधून व्यक्त होणारी एकात्मतेची भावना मनाला स्पर्श करून जायची. ‘हमारा बजाज’ची धून असो वा, ‘विक्को टर्मरिक, नहीं कॉस्मेटिक’, ‘धारा धारा शुद्ध धारा’ असं सांगणाऱ्या जाहिराती किंवा ‘वॉशिंग पावडर निरमा’ या जाहिराती आजही पाहिल्या, ऐकल्या की आठवणींचा दरवाजा उघडतो.
मला आठवतंय की, शाळेतून संध्याकाळी घरी आल्या आल्या मी टीव्ही लावून ‘डक टेल्स’, ‘मिकी’, ‘मिनी’, ‘डोनाल्ड डक’, ‘प्ल्यूटो’च्या ॲनिमेटेड दुनियेत रंगून जायचो. मोगलीच्या ‘जंगल बुक’सारखं आपणही एखाद्या जंगलात प्राण्यांसोबत राहावं असं वाटायचं. पण मला जास्त आवडायचं ते ‘टेल्स पिन’. हे सर्व पाहताना वेळ कसा जायचा तेच समजायचं नाही आणि पुढल्या भागात काय होणार याची उत्सुकता लागून राहायची.
एकदा मे महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या मावशीकडे राहायला गेलो होतो. ती चाळीत राहायची. तिच्याकडे टीव्ही नव्हता. संध्याकाळी कार्टूनची वेळ झाली तशी मनात चलबिचल सुरू झाली. माझ्या बहिणीनं मग चार घरं सोडून असलेल्या एका घराबाहेर मला गुपचूप उभं राहायला सांगितलं. त्या खिडकीतून आम्ही दोघे जमेल तसे लपून टीव्ही पाहत होतो. दहा-बारा मिनिटांनी त्या घरातल्या बाईला आमची चाहूल लागली. तिने आमच्या तोंडावर खाडकन खिडकी लावून घेतली आणि शिव्यासुद्धा दिल्या. त्या अपमानानं नकळत डोळ्यांत पाणी उभं राहिलं. आम्ही रडतच घरी परतलो. पण त्या काळी अभावच इतके होते की अपमानाच्या अश्रूंना काहीच मोल नव्हतं. पण तो प्रसंग मी आजही विसरू शकत नाही. आता वाटतं की, दुरून दर्शन साजिरे... त्या दिवशी माणसाच्या आतल्या भावनांचं मला दुरूनच दर्शन घडलं होतं.
पण काळ पुढे सरकत गेला आणि प्रत्येक घरात टीव्ही आला. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची जागा कलर टीव्हीनं घेतली. अँटेना गेला, केबल आली आणि आत्ता तीही जाऊन सेट टॉप बॉक्स, वायफाय टीव्हीनं जगणं हायफाय झालंय. एवढंच काय, मोबाईलमुळे खिशातच टीव्हीचं जग सामावलंय. एकेकाळी ठरावीक कार्यक्रमांसाठी आतुरतेनं वाट पाहणारी माणसं आता शेकडो वाहिन्यांच्या जंजाळात हरवून गेली. इंटरनेट, मोबाईलनं तर जगाचा ताबाच घेतलाय आणि मनोरंजन हे एकलकोंडं बनलं.
आज एका घरात चार माणसं असली तरी चार वेगवेगळे स्क्रीन दिसतात. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. प्रत्येकाचं विश्व वेगळं असतं. एकाच छताखाली राहूनही संवाद कमी होत चालला आहे. पूर्वी ‘श्रीमान श्रीमती’, ‘जबान संभाल के’, ‘देख भाय देख’ पाहताना एकमेकांना टाळ्या, कोपरखळ्या मारल्या जायच्या. एका कार्यक्रमासाठी सगळे एकत्र जमायचे; आता प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या कार्यक्रमात गुंतलेला असतो. तंत्रज्ञानानं अंतर कमी केलंय, पण माणसांमधली संवादाची दरी मात्र वाढवलीये. आज मागे वळून पाहताना जाणवतं की, दूरदर्शनचा तो काळ केवळ मनोरंजनाचा नव्हता, तर तो सामूहिक जगण्याचा आनंदोत्सव होता. त्यात सहभावना होती, साधेपणा होता, उत्सुकता होती, प्रतीक्षा होती आणि प्रतीक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारं समाधानही होतं. आज सगळं काही सहज उपलब्ध आहे; पण सहज मिळणाऱ्या गोष्टींचं अप्रूप मात्र उरलेलं नाही.
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत
geeteshshinde@gmail.com