दृष्टिक्षेप
प्रकाश पवार
बाबा आढाव यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने समतावादी, परिवर्तनवादी चळवळींचा आधारस्तंभ निखळला आहे. म. फुले यांचा सत्यशोधकी वारसा बाबा यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला आणि समकालातील ब्राह्मण्याची चिकित्सा करत बहुजन समाजाचे संघटन आणि प्रबोधन केले. नव्वदीपार जीनवाच्या अंतापर्यंत विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक कार्य कायम ठेवले.
डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव यांना आदराने भारताच्या कानाकोपऱ्यात ‘बाबा’ असे म्हटले जाते. वयाच्या ९५ वर्षी त्यांचे निधन झाले. आज मात्र त्यांचे ‘जीवन चरित्र’ भारतीयांसाठी एक आदर्श वारसा म्हणून शिल्लक राहिले आहे. त्यांचे जीवन चरित्र राष्ट्रवाद, परिवर्तन, जातिअंत, लिंगभाव समता, बंधुता, सेवाकार्य अशा अनेक मूल्यांचा सुवर्ण मध्य साधणारे आहे. त्यांच्या जीवनचरित्राची सुरुवातच मुळात राष्ट्रवादापासून झाली. महात्मा गांधी यांनी परकीय पारतंत्र्याविरुद्ध तीन मोठी देशव्यापी आंदोलने केली. त्यापैकी दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी, १ जून १९३० त्यांचा जन्म रोजी झाला. त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी तिसरे असहकार आंदोलन सुरू झाले. तेव्हा बाबा राष्ट्र सेवा दलात सहभागी झाले होते. या सहभागातून बाबांना सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रवादाचे बाळकडू मिळाले होते. त्यांची वैचारिक बैठक तरुण वयात पक्की झाली होती. त्यांच्या लेखन व कार्याच्या मुळाशी त्यांची सत्यशोधक विचारसरणी दिसते. त्यांनी सत्यशोधक विचारसरणीचा आपल्या जीवन कार्यात विस्तार आणि विकास केला. ते पेशाने चिकित्सक डॉक्टर आणि विचारप्रणालीच्या संदर्भात महात्मा फुलेंचा प्रभाव असणाऱ्या सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते.
मानवतावाद हे मुलभूत तत्त्व
डॉ. बाबा आढावांची विज्ञाननिष्ठा म्हणजे सतत प्रयोगशीलता. सतत पुनर्रचनाशीलता. सतत चिकित्साशीलता. सतत पुनर्लेखन. सतत पुनर्विचार. सतत पुनर्मांडणी. हीच डॉ. बाबा आढाव यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यांवर आधारित त्यांनी मानवतावादाचे कार्य केले व संरचनात्मक कार्य (विविध संस्था व संघटना यांची बांधणी) केले. मानवतावाद हे माणसांमधील, माणसांच्या गटांमधील संबंधांची निश्चिती करणारे तत्त्व आहे, असे डॉ. आढावांचे तत्त्व. म्हणजे विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद, चिकित्सा, पुनर्रचना, पुनर्विचार, पुनर्लेखन, पुनर्मांडणी हा पाया आणि त्यावरील मानवतावादी समाज हा इमला. हा डॉ. आढावांचा मानवतावाद ‘विवेकी’ स्वरूप धारण करतो. डॉ आढाव यांचा मानवतावाद म्हणजे मानवी स्वातंत्र्याची, मानवाच्या सन्मानाची, मानवाच्या प्रतिष्ठेची, मानवी श्रमाच्या प्रतिष्ठेची, स्त्री पुरुषांमधील नैतिकतेची आणि मानवांमध्ये भगिनिभावाची व बंधुत्वाची निर्मिती! ही परंपरा त्यांनी महात्मा फुलें यांच्या विचारातून स्वीकारली. ही खरे तर नुतन सृष्टी निर्मितीची कल्पना.
समूहकेंद्रित लोककल्याण
खुद्द महात्मा फुले आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये वैचारिक विचारभिन्नता होती. न्या. रानडे यांच्या अभिजन केंद्रित (Elite center) सामाजिक सुधारणेपेक्षा महात्मा फुले यांची सामाजिक सुधारणा जास्त समूहकेंद्रित होती (Masses centre). महात्मा फुले यांच्या विचारांचा मूळ स्रोत घेऊन सार्वजनिक जीवनाला डॉ बाबा आढाव यांनी सुरुवात केली. हे डॉ. बाबांचे मर्म. त्यांचा मुख्य उद्देश समूहकेंद्रित लोककल्याण आणि लोक परिवर्तनाचा राहिलेला. या अर्थाने त्यांची विचारसरणी आणि काँग्रेस, जनता पक्ष, संघ-जनसंघ, यांच्यामध्ये मूलभूत स्वरूपाची विचारभिन्नता सतत राहिली.
वैज्ञानिक द्दष्टी आणि वैज्ञानिक समाज
डॉ बाबा आढाव हे गैरवैज्ञानिक (non science) विश्वाला नाकारणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या विचारसरणीचा पाया वैज्ञानिक पद्धतीचा राहिलेला दिसतो. त्यांनी न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा वैज्ञानिक शोध लावला नसेल, परंतु वैज्ञानिक टेम्परामेंट, वैज्ञानिक दृष्टि आणि वैज्ञानिक समाज या गोष्टींचा पुरस्कार केला. अशा प्रकारच्या समाजाची जडणघडण पन्नास आणि साठीच्या दशकात सुरू होती. तेव्हाच भारतात मध्यमवर्गाचा उदय झाला. पन्नाशीच्या दशकाच्या तुलनेत साठीच्या दशकात मध्यमवर्ग जास्त प्रभावी ठरत आकाराला आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणातून तो आकाराला आला होता. त्यांनी विज्ञानाचे वातावरण व टेम्परामेट तयार केले होते. तसेच विज्ञान दृष्टीचा विकास केला होता. त्यांनी एक वैज्ञानिक समाज घडवला होता. या पार्श्वभूमीवर नेहरूंच्या निधनानंतर साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात मोठे फेरबदल झाले. कारण विज्ञानाचे टेम्परामेट, विज्ञानाची दृष्टी, वैज्ञानिक समाज या तीनही प्रक्रियांचा ऱ्हास घडू लागला. या काळात डॉ. बाबा आढाव यांनी सातत्याने वैज्ञानिक टेम्परामेंट, वैज्ञानिक दृष्टी आणि वैज्ञानिक समाजाचा आग्रह धरला. यामुळे डॉ बाबा आढाव आणि मध्यम विचारसरणी (काँग्रेस), आणि हिंदुत्व यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष निर्माण झाला. हा मुद्दा सविस्तरपणे डॉ. बाबा आढाव यांच्या लिखाणात व्यक्त झाला.
ब्राह्मण्यवादाची चिकित्सा
समाजात फेरबदल झाला की विचारप्रणाली स्वतःमध्ये बदल करते. हे सूत्र बाबांना चांगलेच माहीत होते. या सूत्रानुसार हिंदुत्व या विचारसरणीत देखील फेरबदल होत गेले. संघ-जनसंघ, हिंदू महासभा स्थापन होण्याच्या आधी ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद असा फरक केला जात होता. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मण जात किंवा समाजापेक्षा ब्राह्मण्यवाद या विचारसरणीची चिकित्सा केली होती. ब्राह्मण व्यक्तीबद्दल त्यांनी कधीही द्वेष बाळगला नाही. ब्राह्मण्यवाद या विचारप्रणालीत फेरबदल घडून हिंदुत्व या विचारसरणीचा उदय आणि विकास झाला.
विसाव्या शतकात हिंदुत्व ही विचारसरणी वेगवेगळ्या पद्धतीने घडवली गेली. उदाहरणार्थ, ‘क्षत्रिय हिंदुत्व’, ‘उच्चवर्णीय हिंदुत्व’, ‘आक्रमक हिंदुत्व’, ‘बहुजन हिंदुत्व’, ‘नव हिंदुत्व’ असे हिंदुत्वाचे विविध प्रवाह उदयास आले. आणीबाणीमध्ये संघ कार्यकर्त्यांना मिसा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले. या घटनेचा दूरगामी परिणाम डॉ आढाव यांनी नोंदविला. त्यांच्या मते ‘दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धाचे हिरो पद संघाकडे गेले’. सरसंघचालकांच्या शब्दाचा प्रभाव निर्माण झाला. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांवर संघाचा प्रभाव पडला. डॉ. आढाव यांना या सर्वच फेरबदलाची तपशीलवार व सूक्ष्म अशी माहिती होती. हिंदू अस्तित्वभान सत्तरीच्या दशकात बहुजन समाजाला व्यापक पातळीवर प्रथमच येऊ लागले. मोरारजीभाई देसाई यांनी हिंदुत्वाला अधिमान्यता दिली. संघ हळूहळू बदलतोय, तसेच संघाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे, या प्रकारचा प्रचार व प्रसार संघाने समाजात केला. हा मुद्दा डॉ आढाव यांच्या लिखाणामध्ये ठळकपणे मांडला गेला. याचा अर्थ हिंदू अस्तित्वभान बहुजन समाजाला सत्तरीच्या दशकात येऊ लागले होते. याबद्दलची जाणीव बाबा आढाव समाजाला करून देत होते.
हिंदुत्ववादी विचारसरणीची चिकित्सा
सत्तरीच्या दशकात शहरात सार्वजनिक संस्थांवर हिंदुत्व विचारसरणीचे नियंत्रण येत होते. सार्वजनिक शैक्षणिक संस्थांचा व्यवहार हिंदुत्व विचारप्रणालीच्या चौकटीत घडू लागला. या संदर्भातील उदाहरणे डॉ. बाबा आढाव यांनी दिली. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था हिंदुत्व संस्था म्हणून कार्य करू लागल्या. सार्वजनिक संस्थांचे कार्य पन्नास आणि साठच्या दशकात घटनात्मक स्वरूपाचे होते. त्या काळात या संस्था नागरी समाजाचे कार्य करत होत्या. सत्तरीच्या दशकात या संस्था हिंदुत्व संस्था म्हणून कार्य करू लागल्या. याचा अर्थ नागरी समाजाचा प्रकल्प मागे पडला आणि त्या जागी हिंदुत्व नागरी समाजाचा प्रकल्प सुरू झाला. साहित्याच्या क्षेत्रात हिंदुत्व विचारांच्या व्यक्तींचा सहभाग वाढला. या संदर्भातील उदाहरणे डॉ बाबा आढाव यांनी दिली आहेत. सत्तरीच्या दशकात वृत्तपत्रे आणि बँकिंग क्षेत्रात हिंदुत्ववादी विचारसरणीच्या व्यक्तींचा सहभाग कृतीशील होता, असे डॉ बाबा आढाव यांचे निरीक्षण होते. म्हणजेच सार्वजनिक जीवनात हिंदुत्व स्वरूपातील सांस्कृतिक वर्चस्व घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
सामान्य हिंदू स्वरूपातील सांस्कृतिक (बहुलता) ओळखीपेक्षा हिंदुत्व स्वरूपातील सांस्कृतिक ओळख भिन्न प्रकारची होती. म्हणजेच एकसंघीकरण या स्वरूपाचे ध्येय साध्य करणारे हे मिशन आणि सांस्कृतिक जीवन होते. डॉ बाबांनी हिंदुत्व जाणीवेची चिकित्सा केली. त्यांनी मंदिर प्रवेश चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, एक गाव एक पाणवठा, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन चळवळ, हमाल पंचायत चळवळ, कष्टाची भाकरी, मुस्लिम सत्यशोधक चळवळ, देवदासी निर्मूलन चळवळ इत्यादी विविध चळवळींमध्ये कृतिशील सहभाग घेतला होता. त्यांनी जातिअंताचा विचार चळवळींच्या माध्यमातून सातत्याने राबविला. सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंत नवीन सामाजिक चळवळ उदयास आली. त्या काळात डॉ बाबा आढाव यांनी केवळ सामाजिक चळवळीच्या उद्देशाने कार्य केले. ही बाबांची वेगळी दृष्टी होती. आर्थिक सुधारणांच्या काळात सामाजिक सुधारणा चळवळींचा उद्देश घेऊन संघर्ष करणे खूप अवघड आणि कष्टाचे काम होते. बाबा प्रवाहाच्या विरोधी दिशेने जात होते. हे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले. हा एक वैशिष्ट्यपूर्ण आदर्श त्यांनी भारतीय समाजाच्या पुढे ठेवला होता.
राजकीय विश्लेषक व राज्यशास्त्राचे अभ्यासक